गळ्यातल्या साखळीनं केला घात, MRI मशीनमध्ये ओढल्यामुळे गमावला जीव

    • Author, मॅडलिन हॅल्पर्ट
    • Role, बीबीसी न्यूज, न्यू यॉर्क
  • Published
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

एमआरआय मशीमध्ये ओढलं जाऊन त्यात अडकल्यानं 61 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना अमेरिकेत घडलीय.

वैद्यकीय केंद्रात एमआरआय मशीनमध्ये ही व्यक्ती अडकली, तेव्हा तिनं गळ्यात धातूची जड अशी साखळी घातलेली होती.

न्यूयॉर्कच्या लाँग आयलंडवरील वेस्टबरी याठिकाणी नासाऊ ओपन एमआरआय सेंटरच्या एका खोलीत या व्यक्तीनं परवानगीशिवाय प्रवेश केला होता, अशी माहिती नासाऊ काऊंटी पोलिसांनी दिली आहे.

या व्यक्तीच्या पत्नीनं स्थानिक माध्यमांशी बोलताना म्हटलं की, त्या स्कॅन करण्यासाठी तिथे गेल्या होत्या. त्यावेळी त्यांचं स्कॅन झाल्यानंतर त्यांनी पतीला एमआरआय रूममध्ये बोलावलं होतं. पण ते आत येताच गळ्यात असलेल्या जड साखळीमुळे ते एमआरआय मशीनकडे ओढले गेले.

या प्रकारानंतर त्यांना काही वैद्यकीय त्रासाला सामोरं जावं लागलं आणि नंतर त्यांना मृत घोषित करण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

MRI मशीन्सद्वारे आपल्या शरीर, अवयवांशी संबंधित तपशीलवार प्रतिमा तयार करण्यासाठी प्रचंड अधिक प्रमाणात मजबूत चुंबकीय लहरींचा वापर केला जातो. त्यामुळंच एमआरआय स्कॅन करण्यापूर्वी किंवा मशीनजवळ जाण्यापूर्वीगी रुग्णांना धातूच्या वस्तू काढायला आणि कपडे बदलायला सांगितलं जात असतं.

पण या व्यक्तीने गळ्यात घातलेल्या धातूच्या एका जड साखळीमुळं ते मशीनमध्ये ओढले गेले आणि हा प्रकार घडला, असं घटनेची चौकशी करणाऱ्या नासाऊ काऊंटी पोलिसांनी सांगितलं.

"पीडित पुरुषाने गळ्यात एक मोठी धातूची साखळी घातली होती, ज्यामुळे तो मशीनमध्ये ओढला गेला, ज्यामुळे वैद्यकीय घटना घडली," असे या घटनेची चौकशी करणाऱ्या नासाऊ काउंटी पोलिस विभागाने सांगितले.

पोलिसांनी पीडिताच्या नावाबाबत माहिती दिली नाही. मात्र, अ‍ॅड्रिएन जोन्स-मॅकअ‍ॅलिस्टर यांनी स्थानिक माध्यम स्टेशन न्यूज 12 लाँग आयलंडशी बोलताना, त्यांचा पती कीथचा मृत्यू झाल्याचं सांगितलं.

"त्यानं मला शेवटचा निरोप दिला आणि त्यानंतर जणू त्याच्या शरिरातील संपूर्ण प्राण निघून गेले," असं त्या म्हणाल्या.

जोन्स-मॅकअ‍ॅलिस्टर यांच्या मते, त्यांच्या गुडघ्याचे एमआरआय स्कॅन करण्यात येत होते. त्यानंतर त्यांनी उठण्यास मदत करण्यासाठी पतीला आत बोलावले. त्यांच्या पतीनं 20 पौंड (जवळपास 9 किलो) वजनाची साखळी घातली होती. त्यात एक लॉकही लावलेले होते. व्यायाम करताना वेट ट्रेनिंगसाठी ते त्याचा वापर करायचे, असं त्यांनी सांगितलं.

"मशीनच्या परिसरात येताच ते जोराने आत ओढले गेले आणि एमआरआय मशीनवर जोरात आदळले," असंही त्या म्हणाल्या.

जोन्स-मॅकअ‍ॅलिस्टर 16 जुलैला त्या एमआरआय करण्यासाठी गेल्या होत्या. पण याआधीही त्या पतीसह त्याठिकाणी गेलेल्या होत्या. तसंच तिथल्या कर्मचाऱ्यांनीही त्यांच्या गळ्यातली साखळी आणि ते वजन आधी पाहिलेलं होतं, असंही त्यांनी सांगितलं.

तिथले एक कर्मचारी आणि त्या व्यक्तीमध्ये यापूर्वी, ती खूपच मोठी साखळी असल्यासंदर्भात चर्चा झाली होती, असा दावाही त्यांनी केला.

त्याठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या पतीला मशीनपासून दूर खेचण्याचा प्रयत्न केला होता, असंही मॅकअॅलिस्टर म्हणाल्या.

तर त्या स्वतः त्यावेळी मशीन बंद करा किंवा 911 वर कॉल करा असं म्हणत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

बीबीसीनं या प्रकरणी नासाऊ ओपन एमआरआयकडेही प्रतिक्रियेसाठी संपर्क साधला आहे.

यूएस फूड अँड ड्रग अ‍ॅडमिनिस्ट्रेशनच्या मते, एमआरआय मशीनमध्ये चुंबकीय लहरी असतात. त्या कोणत्याही आकारांच्या चुंबकीय वस्तूंना आकर्षित करतात. त्यात किल्ल्या, मोबाईल फोन आणि अगदी ऑक्सिजन सिलिंडर अशा बाबींचाही समावेश होतो.

त्यामुळं या वस्तू जर हवेत उडल्या गेल्या तर मशीनसह त्याठिकाणी असलेले रुग्ण किंवा कर्मचारी यांनाही हानी पोहोचू शकते, असंही त्यांनी सांगितलं.

2001 मध्येही न्यूयॉर्क शहरातील एका वैद्यकीय केंद्रात एका सहा वर्षांच्या मुलाचा एमआरआय तपासणी दरम्यान कवटी फ्रॅक्चर झाल्याने मृत्यू झाला होता. शक्तिशाली चुंबकीय लहरींनी ऑक्सिजनचं सिलिंडर ओढलं गेल्यानं हा अपघात घडला होता.

साधारणपणे एमआरआय स्कॅन करायच्या दिवशी जेवण केलेलं किंवा पाणी प्यायलेलं आणि औषधं घ्यायलाही चालतं. काही विशिष्ट तपासण्यांसाठी स्कॅनच्या चार तासांपूर्वीपर्यंत काही खाऊ नये असं सांगितलं जातं. काही लोकांना जास्त पाणी प्यायलाही सांगितलं जातं.

रुग्णालयात गेल्यानंतर ज्याची तपासणी करायची असेल त्याच्याबद्दलची वैद्यकीय माहिती घेतली जाते. त्यावरून स्कॅन करणं किती सुरक्षित आहे याबाबतची माहिती मेडिकल स्टाफला समजते.

ही माहिती दिल्यानंतरही स्कॅन करायचं की नाही अशी परवानगीही घेतली जाते. कारण MRI स्कॅनरद्वारे मोठ्या प्रमाणात चुंबकीय लहरी निर्माण होतात. त्यामुळं त्यावेळी कोणत्याही प्रकारची धातूची वस्तू शरिरावर असता कामा नये. यात खालील गोष्टींचा समावेश होतो.

  • घड्याळ
  • नेकलेस आणि झुमक्यासारखे दागिने
  • पियर्सिंग
  • धातूचा वापर केलेले नकली दात
  • श्रवणयंत्र
  • विग (कारण काही विगमध्ये धातूचे लहान तुकडे असतात

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)