राहुल गांधी: 'निवडणुकीच्या तोंडावर आमच्या नेत्यांना विमान प्रवास तर सोडाच साधं रेल्वेने पण जाता येत नाहीये'

काँग्रेसची बॅंक खाती गोठवण्यात आल्यानंतर काँग्रेसला अनेक आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे काँग्रेस नेत्यांनी म्हटले आहे. काँग्रेसने प्रचार करू नये म्हणून भाजपने हे मुद्दामहून केल्याचं काँग्रेस नेते म्हणत आहेत.
भारतीय जनता पार्टीने आपली बँक खाती गोठवली असा आरोप काँग्रेसने गुरुवार 21 मार्च रोजी केला आहे. सर्व राजकीय पक्षांना समान संधी मिळाली पाहिजे असं मत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी यावेळेस व्यक्त केलं.
तर काँग्रेस आपल्याशी बरोबरी करत निवडणुका लढू नये यासाठी काँग्रेसविरोधात जाणीवपूर्वक असा कट केला गेला आहे असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.
राहुल यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिलं आहे, तिरस्काराने भरलेल्या असुर शक्तीने लोकशाहीची हत्या करण्यासाठी काँग्रेसची बँक खाती गोठवली आहेत.
तर भाजपाने याला प्रत्युत्तर देत काँग्रेस आपल्या स्थितीसाठी आर्थिक कारणांना जबाबदार ठरवत आहे, असं म्हटलं आहे.
काँग्रेसच्या पत्रकार परिषदेत सोनिया गांधी यांनी हा मुद्दा गंभीर असून यामुळे फक्त काँग्रेसच नाही तर लोकशाहीवर परिणाम होतोय असं सांगितलं.

फोटो स्रोत, RAHULGANDHI/X
खरगे यांनी हा प्रकार लज्जास्पद असून यामुळे आपल्या देशाच्या प्रतिमेला तडा गेला असं म्हटलं.
ते म्हणाले, 'आपल्या देशात गेल्या 70 वर्षांत निष्पक्ष स्थितीत निवडणुका आणि चांगली लोकशाही तयार झाल्याची प्रतिमा निर्माण झाली होती, त्यावर आज प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.'
ते म्हणाले, "सध्याचे पंतप्रधान काँग्रेसला आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त करण्यासाठी सुनियोजित पद्धतीने प्रयत्न करत आहेत. सामान्य लोकांकडून गोळा केलेला पैसा गोठवला जात आहे आणि आमच्या खात्यांमधला पैसा बळजबरीने काढून घेतला जात आहे."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
ते म्हणाले की, सध्याच्या आव्हानात्मक परिस्थितीही आम्ही आमचा निवडणूक प्रचार करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत.
यावर राहुल गांधी म्हणाले की, हा प्रकार काँग्रेसचं बँक खातं गोठवण्यासारखा नसून लोकशाही गोठवण्यासारखा आहे.
ते म्हणाले, "निवडणुकीच्या अगदी आधी दोन जुन्या नोटिसा काय येतात, एकूण 14 लाख रुपये, जी आमची आर्थिक ओळख आहे ती काढून काय घेतली जाते. अगदी निवडणुकीच्या तोंडावर हे सर्व सुरू असून आपण एक महत्त्वाचा महिना गमावलाय. आर्थिक अडचणींमुळे नेते विमान प्रवास तर दूर साधा रेल्वे प्रवासाचाही विचार करू शकत नाहीत."
त्यांनी हा गुन्हा असल्याचं म्हणत पंतप्रधान आणि गृहमंत्री याला कारणीभूत असल्याचं म्हटलंय.
ते म्हणाले, "भारत ही जगातील सर्वांत मोठी लोकशाही असल्याचा विचारच खोटा आहे. भारतातील 20 टक्के लोक आम्हाला मतं देतात आणि आम्ही साधे दोन रुपयेही खर्च करू शकत नाहीये."
"आज आम्ही बँकेची खाती उघडली तरी खूप मोठा तोटा झालाय. ही विचित्र परिस्थिती आहे. सगळ्यांना दिसतंय, ना न्यायालय काही बोलतंय, ना दुसरं कोणी काय बोलतंय," राहुल गांधी म्हणाले.
सत्ताधारी पक्ष धोक्याचा खेळ खेळतोय - मल्लिकार्जुन खरगे
काँग्रेसने याला लोकशाहीवरील हल्ला म्हटलंय. सोबतच पक्ष कायदेशीर मार्गांसह इतर सर्व मार्गांचा अवलंब करेल असंही म्हटलंय.
सर्वोच्च न्यायालयाने ज्या योजनेला बेकायदेशीर ठरवलं होतं, त्याच योजनेत सत्ताधाऱ्यांनी हजारो कोटी रुपये आपल्या खात्यात जमा केल्याचे मल्लिकार्जुन खरगे म्हणाले. दुसरीकडे कट रचून प्रमुख विरोधी पक्षाचे बँक खाते गोठवण्यात आले आहे.

फोटो स्रोत, ANI
ते म्हणाले, "पैशाअभावी समान तत्वावर निवडणूक लढवता येणार नाही म्हणून हा प्रकार करण्यात आलाय. सत्ताधारी पक्ष धोक्याचा खेळ खेळतोय. याचे दूरगामी परिणाम होतील. जर लोकशाही वाचवायची असेल तर सर्वांना समान संधी मिळाली पाहिजे."
शेजारील देशाचा उल्लेख करून ते म्हणाले की, काही देशांमध्ये निवडणुका होत आहेत, मात्र एकाच व्यक्तीला 99 टक्के मतं मिळत आहेत.
ते म्हणाले, "भाजप ज्या प्रकारे खर्च करतोय त्याची इतर पक्ष कल्पनाही करू शकत नाहीत. सर्वोच्च न्यायालय या प्रकरणाची चौकशी करत आहे आणि लवकरच सत्य बाहेर येईल, अशी आम्हाला आशा आहे."
पक्षाला निवडणुकीसाठी खुलेपणाने पैसे वापरण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती त्यांनी केली आहे.
काँग्रेसच्या बँक खात्यांवर हल्ला - अजय माकन
काँग्रेस नेते अजय माकन यांनी आरोप केलाय की, जर पक्ष निवडणुकीच्या वेळी प्रचारात पैसा खर्च करू शकत नसेल, आपल्या कार्यकर्त्यांना आणि उमेदवारांना पैसे देऊ शकत नसेल, तर निवडणुकीला अर्थ काय राहिला.
ते म्हणाले, "गेल्या एका महिन्यापासून काँग्रेसला त्यांच्या खात्यात पडलेले 285 कोटी रुपयेही वापरता आलेले नाहीत, अशा स्थितीत ते समान पातळीवर निवडणूक कशी लढवणार."

फोटो स्रोत, ANI
ते म्हणाले, "सात वर्षं जुन्या प्रकरणात बँक खाती गोठवण्यात आली आहेत. गेल्या आठवड्यात आम्हाला सीताराम केसरी यांच्याकडून 1994-95 च्या काळातील आयकर नोटीस मिळाली. यासंदर्भात आमच्याकडून आणखी मागण्या करण्यात येतील आणि आमची आणखीन खाती गोठवली जातील."
"आम्हाला निवडणूक लढवता येऊ नये यासाठी हे सगळं सुरू आहे. प्रत्येक राजकीय पक्षाला आयकरात सूट मिळते, हे पाहता आजवर कोणत्याही पक्षाला दंड ठोठावलेला नाही. एकट्या काँग्रेस सोबतच असं का? निवडणूक सुरू होण्यापूर्वीच हे सगळं सुरू झालंय."
"14 लाख 40 हजार रुपयांच्या मागणीसाठी पक्षाला 210 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय. कुठे आहे लोकशाही?"

फोटो स्रोत, ANI
एका प्रश्नाच्या उत्तरात अजय माकन म्हणाले, "मी स्वत:चा पैसा वापरू शकत नसेल तर याला लोकशाही म्हणायचं का? यात युवक काँग्रेसच्या सदस्यत्वाचा पैसा आणि क्राऊड फंडिंगच्या माध्यमातून जमा झालेल्या पैशांचाही समावेश आहे."

फोटो स्रोत, ANI
अशीच परिस्थिती राहिल्यास पक्ष निवडणुकीवर बहिष्कार टाकू शकतो का, असा प्रश्नही पत्रकार परिषदेत विचारण्यात आला. यावर प्रतिक्रिया देताना अजय माकन म्हणाले की, पक्षाने अजून असा विचार केलेला नाही.
यावर भाजपची प्रतिक्रिया
काँग्रेस पक्षाने भाजपवर केलेल्या आरोपांवर भाजप अध्यक्ष जे.पी नड्डा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नड्डा यांनी आपल्या एक्स (ट्विटर) अकाउंटवर लिहिलंय की, "लोक काँग्रेसला पूर्णपणे संपवणार आहेत. ऐतिहासिक पराभवाच्या भीतीत असलेल्या काँग्रेस नेतृत्वाने भारतीय लोकशाही आणि त्याच्या संस्थांविरोधात वक्तव्य केलं आहे."

फोटो स्रोत, ANI
ते पुढे म्हणतात, "काँग्रेस आपल्या अप्रासंगिकतेसाठी अतिशय सहजपणे आर्थिक संकटांना जबाबदार ठरवत आहे. प्रत्यक्षात, त्यांची दिवाळखोरी आर्थिक नसून नैतिक आणि बौद्धिक आहे. आपल्या चुका सुधारण्याऐवजी काँग्रेस आपल्या समस्यांसाठी अधिकाऱ्यांना जबाबदार ठरवत आहे. मग ते आयटीएटी असो किंवा दिल्ली उच्च न्यायालय... त्यांनी काँग्रेस पक्षाला नियमांचं पालन करण्यास, थकीत कर भरण्यास सांगितलं आहे. पण पक्षाला ते करायचंच नाहीये."

फोटो स्रोत, JPNADDA/X
"ज्या पक्षाने प्रत्येक क्षेत्रातून, प्रत्येक राज्यातून आणि प्रत्येक ऐतिहासिक लूटमार केली आहे, त्यांच्याकडून आर्थिक असहाय्यतेची भाषा ऐकून हसू येतंय."
याव्यतिरिक्त, त्यांनी असंही म्हटलंय की, "काँग्रेसच्या अस्थायी नेतृत्वाने म्हटलंय की भारताची लोकशाही खोटी आहे. मी त्यांना विनम्रतेने आठवण करून देऊ इच्छितो की, भारतात 1975 आणि 1977 या काळात लोकशाही नव्हतीच आणि त्यावेळी भारताच्या पंतप्रधान इतर कोणीही नसून श्रीमती इंदिरा गांधी होत्या."



























