You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
Digipin नक्की आहे तरी काय? पिनकोडची जागा घेणार का?
- Author, अमृता दुर्वे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 3 मिनिटे
एखादं पत्र किंवा पार्सल न चुकता तुमच्या पत्त्यावर पोहोचण्यासाठी लागतो... पिनकोड.. त्याशिवाय पत्ता पूर्ण होत नाही. पण पोस्ट खात्याने आता डिजिटल युगातला नवा पिनकोड लाँच केलाय. त्याचं नाव आहे डिजिपिन.
काय आहे हा डिजिपिन? ते कसं काम करणार आहे, आणि एखाद्या ठिकाणचा डिजिपिन मिळवायचा कसा?
हे जाणून घेऊयात...
डिजिपिन कोणत्याही पत्त्याचं नेमकं लोकेशन सांगेल. पोस्ट खात्याने IIT हैदराबाद आणि National Remote Sensing Centre -NRSC सोबत मिळून डिजिपिन विकसित केलंय. NRSC हे इस्रोच्या अखत्यारित येतं.
पोस्ट खात्याच्या वेबसाईटनुसार, डिजिपिन ही देशव्यापी - ओपन सोर्स, Geo Coded - digital अॅड्रेस सिस्टीम आहे... थोडक्यात समजून घेऊ.
तर एखाद्या ठिकाणच्या अक्षांश-रेखांशांशी याचा संबंध आहे. यामध्ये भारताच्या सगळ्या भूभागाची 4 बाय 4 मीटरच्या ग्रीडमध्ये - चौकानात विभागणी करण्यात आली आहे.
या प्रत्येक ग्रीडला एक 10 कॅरेक्टर्स असणारा अल्फा- न्युमरिक म्हणजे अक्षरं आणि आकडे असणारा कोड देण्यात आला आहे. हा कोड अक्षांश-रेखांशांवर आधारित आहे.
आपण आता जेव्हा एखादा पत्ता सांगतो, तेव्हा त्यात घराचा नंबर, तिथे राहणाऱ्याचं नाव - इमारतीचे नाव, ती कोणत्या भागात आहे, रस्त्याचं नाव, पिनकोड अशा सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात.
एका मोठ्या परिसरासाठी एक विशिष्ट पिनकोड असतो. म्हणजे जेव्हा आपण दादर, मुंबई, 28 असं म्हणतो, तेव्हा त्यात दादरचा भलामोठा परिसर येतो.
पण डिजिपिनचा अल्फान्युमरिक कोड हा फक्त तुमच्या लोकेशनसाठीच असतो. म्हणूनच, आजच्या काळात तो गरजेचा आहे.
कारण, यामुळे एखाद्या डिलीव्हरीसाठी नेमक्या ठिकाणी पोहोचणं सोपं जाईल. शिवाय, जिथे पत्ता नेमका नाही वा दुर्गम, डोंगराळ, ग्रामीण भाग आहे, अशा ठिकाणी पोहोचणं, यामुळे थोडं सुलभ होईल.
हा डिजिपिन नेव्हिगेशन सिस्टीम्स आणि अॅप्समध्येही वापरता येईल. हा डिजिपिन ऑफलाईनही वापरता येणार असल्याचं पोस्टाने म्हटलं आहे.
तर हा डिजिपिन जनरेट करताना कोणताही खासगी - वैयक्तिक डेटा स्टोअर केला जाणार नाही आणि भौगोलिक तपशीलांवरून कोड जनरेट केला जाईल, असंही स्पष्ट करण्यात आलंय.
हा डिजिपिन आताच्या पिनकोडची जागा घेणार नाही, तुमचा पत्ता बदलणार नाही. तर तुमच्या पत्त्यामधली ही एक अॅडिशन असेल. म्हणजे पत्ता - पिनकोड सोबत डिजीपिनही लिहीलात, तर तुमचं पत्र, पार्सल, डिलीव्हरी घेऊन येणारी व्यक्ती अधिक अचूकपणे आणि लवकर पोहोचू शकेल.
मग तुमच्या घराचा वा ऑफिसचा वा कुठल्या जागेचा डिजीपिन मिळवायचा कसा?
- सगळ्यात आधी पोस्टाच्या डिजीपिनसाठीच्या या वेबसाईटला जा.
- https://dac.indiapost.gov.in/mydigipin/home
- वेबसाईटला गेल्यावर तुम्हाला त्यांना लोकेशन अॅक्सेस आणि कन्सेन्ट द्यावा लागेल. इतकंच केलंत की तुम्हाला तुमचा डिजिपिन दिसेल. हे अगदी सोपं आहे.
- नकाशावरची एखादी जागा निवडून तुम्ही तिथला डिजिपिनही मिळवू शकता.
या वेबसाईटला 30 लाख लोकांनी भेट दिल्याचं इंडिया पोस्टने 9 जूनला म्हटलं आहे.
पोस्ट खात्यासोबतच अॅमेझॉन - फ्लिपकार्टसारख्या इ-कॉमर्स वेबसाईट्सना या प्रणालीचा फायदा होईल.
शिवाय पोलीस, अॅम्ब्युलन्स, अग्निशमन दल यांनाही इमर्जन्सीच्या प्रसंगी अचूक पणे लवकरात लवकर पोहोचणं शक्य होऊ शकेल.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)