बीबीसी मराठी : या आठवड्यातील महत्त्वाच्या बातम्या आणि लेख

Published

नमस्कार मंडळी, कसा गेला हा तुमचा आठवडा. या आठवड्यात बऱ्याच घडामोडी घडल्या.

आम्ही त्या तुमच्यापर्यंत पोहोचवल्या देखील.पण असं होऊ शकतं की तुमच्याकडून काही महत्त्वाचे लेख वाचायचे राहून गेले असतील.

तर मंडळी काळजी नको.आम्ही तुमच्यासाठी या आठवड्यातले पाच खास लेख देत आहोत. ते तुम्ही एकाच ठिकाणी वाचू शकाल.

बीबीसी मराठीने नेहमीच आपले वैविध्य जपण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे या आठवड्यात विविध क्षेत्रातील पाच खास बातम्या आम्ही देत आहोत.

राजकारण, मनोरंजन, प्रेरणादायी, ट्रेंडिंग आणि ज्ञानवर्धक असे पाच लेख जे तुम्ही नक्की वाचले पाहिजेत..

1. बाईपण भारी देवा : ‘ते दृश्य ठेवलं म्हणून सेन्सॉरनं U/A सर्टिफिकेट दिलं’

‘अर्धं आयुष्य संपलं आणि आपण स्वतःसाठी जगलोच नाही?’

‘बाईपण भारी देवा’ चित्रपटातली चारू हा प्रश्न विचारते, तेव्हा अनेक बायकांना त्यात स्वतःचं प्रतिबिंब दिसतं.

या चित्रपटानं सध्या महाराष्ट्रातल्या थिएटर्समध्ये अक्षरश: धूमाकुळ घातला आहे, असं म्हटलं तर चुकीच ठरू नये. या चित्रपटानं 10 दिवसांतच 26.19 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

चित्रपटाला एवढं यश कशामुळे मिळालं आणि विशेषतः महिलांना तो का आवडतो आहे, याविषयी आम्ही या चित्रपटाच्या टीमशी बातचीत केली.

फिल्ममधल्या सहापैकी चार बहिणी म्हणजे शशी अर्थात वंदना गुप्ते, साधना अर्थात सुकन्या कुलकर्णी मोने, पल्लवी अर्थात सुचित्रा बांदेकर, केतकी अर्थात शिल्पा नवलकर आणि दिग्दर्शक केदार शिंदे या गप्पांमध्ये सहभागी झाले होते.

2. फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातेत गेला आणि आता थेट भारताबाहेरच, वाचा संपूर्ण प्रकरण

फॉक्सकॉनने वेदांतासोबतच्या सेमीकंडक्टर प्रकल्पातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्यावर्षी हा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला वळवण्यात आला होता.

हा एकूण 1 लाख 54 हजार कोटींचा प्रकल्प सांगण्यात आलं होतं.

पण एका वर्षापेक्षा कमी कालावधीच फॉक्सकॉनने या प्रकल्पातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हा भारताच्या तंत्रज्ञान उद्योगासाठी लागणाऱ्या चीप उत्पादन क्षमतेला मोठा धक्का असल्याचं विश्लेषक सांगतायत.

दरम्यान चीप उत्पादन करण्याच्या भारताच्या प्रयत्नांवर या निर्णयाचा कोणताही परिणाम होणार नाही, असं केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी म्हटलं आहे.

याआधी वेदांता-फॉक्सकॉन या कंपन्यांचा सेमीकंडक्टर निर्मितीचा प्रकल्प महाराष्ट्रात सुरू करण्याबाबत राज्य सरकार आणि कंपन्यांमध्ये बोलणी सुरू होती. पण हा प्रकल्प गुजरातमध्ये सुरू करण्याची अचानक घोषणा करण्यात आली होती.

3. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी खाण्याच्या सवयीत 'हे' बदल करा

ग्लुकोज (शरारीतली साखर) हे आपल्या शरीरासाठी सर्वात महत्वाचं इंधन आहे.

कारण त्यातून आपल्याला हृदयाची हालचाल होण्यासाठी, विचार करण्यासाठी किंवा हृदयाची गती नीट राहाण्यासाठी आवश्यक ऊर्जा मिळते. शरीरातील महत्वाच्या कार्यांसाठी ग्लुकोज आवश्यक असते.

पण जर रक्तातील ग्लुकोजची (किंवा साखर) पातळीत चढ-उतार झाला तर त्याचे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात.

मधुमेह हा एक जुनाट चयापचयासंबंधीचा आजार आहे. यात रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते किंवा कमी होते. त्यामुळे कालांतराने हृदय, रक्तवाहिन्या, डोळे, मूत्रपिंड आणि नसा यांना गंभीर नुकसान होतं.

टाईप-2 हा सर्वात सामान्य मधुमेह आहे जो सहसा प्रौढांमध्ये आढळतो. जेव्हा आपलं शरीर इन्शुलिनला प्रतिरोधक बनतं किंवा ते पुरेसे इन्शुलिन तयार करत नाही तेव्हा हा आजार होतो.

4. चॅटबॉटसाठी 90 टक्के कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता, भारतीय कंपनीच्या सीईओचा निर्णय वादात

आधीच नोकऱ्यांचं संकट असताना एखाद्या कंपनीचा सीईओ त्याच्या 90 टक्के कर्मचाऱ्यांना काढत असेल आणि त्याच्या जागी चॅटबॉटला कामाला लावत असेल तर प्रतिक्रिया येणं स्वाभाविक आहे. त्यावर टीका होणं स्वाभाविक आहे आणि ती होतेसुद्धा आहे.

भारतातल्या ‘दुकान’ या स्टार्टअपचे संस्थापक सुमित शाह सध्या याच चर्चेचा केंद्रबिंदू झाले आहेत.

इतकंच नाही तर सुमित शाह यांनी ट्विटरवर घोषणा केली आहे की चॅटबॉटमुळे त्यांच्या ग्राहकांना मिळणारी उत्तरं लवकर मिळायला लागली आहेत आणि त्यामुळे आधीपेक्षा वेळ कमी लागतो.

5. सुनील गावस्कर जेव्हा जन्मानंतर नजरचुकीने अदलाबदली होऊन एका कोळिणीकडे पोहोचले

ही गोष्ट आहे 1949 मधली. दादरचं पुरंदरे नर्सिंग होम. 10 जुलै रोजी त्या मुलाचा जन्म झाला. दुसऱ्या दिवशी जनरल वॉर्डात असलेल्या मायलेकाला भेटायला बाळाचे नानाकाका अर्थात नारायण मसुरेकर आले. तान्ह्या बाळाला हातात घेतल्यानंतर हे आपलं नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं.

तान्ह्या बाळाच्या डाव्या कानाला लहानसं छिद्र होतं. ते छिद्र दिसत नसल्याने हे बाळ आपलं नाही हे त्यांनी सांगितलं. लहान बाळांना आंघोळ घातली जाते तेव्हा अदलाबदली झाल्याचं काही वेळात स्पष्ट झालं.

आपलं बाळ शोधण्यासाठी त्यांनी शोध सुरू केला. नर्सिंग होम असल्याने तिथे साहजिकपणे अनेक लहान मुलं होती. मासेमारी करणाऱ्या कोळी समाजातल्या आईच्या इथलं बाळ त्यांना आपलं असल्याचं लक्षात आलं.

घोळ लक्षात आल्यानंतर बाळांना आपापल्या मातांकडे सोपवण्यात आलं. जन्मानंतर काही तासात बदली होण्याची ही अनोखी घटना आहे जगविख्यात क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांची.

'सनी डेज' या आत्मचरित्रात गावस्कर यांनी हा किस्सा विषद केला आहे. काही वर्षांपूर्वी 'ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्स' कार्यक्रमात बोलतानाही गावस्कर यांनी ही अनोखी घटना सांगितली होती.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)