मुंबईसह महाराष्ट्रात पुढील 48 तासांत असं असेल हवामान, 'या' जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता

हवामान विभागानं वर्तवलेला अंदाज

फोटो स्रोत, Getty Images

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

हवामान विभागानं आज (15 सप्टेंबर) व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, आगामी 5 दिवसांमध्ये महाराष्ट्रात जवळपास सगळ्याच विभागांमध्ये तुरळक पावसाची शक्यता वर्तवली आहे.

आज विदर्भातील 4 जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. म्हणजे या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

याशिवाय मुंबईमध्ये शहर आणि उपनगरांत पुढील 48 तासांमध्ये अंशतः ढगाळ वातावरणाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

काही ठिकाणी पावसाच्या तुरळक सरी पडू शकतात, असा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

या 48 तासांमघ्ये कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 26 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.

मुंबईसह उत्तर कोकणातही आगामी काही दिवस तुरळक पावसाची शक्यता कायम असेल. त्यामुळं महाराष्ट्र आणि गोवा परिसरासाठी कोणताही विशेष इशारा हवामान विभागानं दिलेला नाही.

पुढील 5 दिवसांत महाराष्ट्रात कमाल तापमानात 3 ते 5 अंशाने हळूहळू वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

पुढील 24 तासांत किमान तापमानात मोठा बदल अपेक्षित नसून त्यानंतर त्यात 1 ते 3 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, 19 सप्टेंबरच्या आसपास पश्चिम राजस्थानच्या काही भागांतून नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या परतीसाठीची परिस्थिती अनुकूल होण्याची शक्यता आहे. त्यामुळं राज्यात पावसाचा जोर हळूहळू कमी होण्याचे संकेत आहेत.

पुढील 5 दिवस हवामान कसे असेल?

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, उत्तर कोकणातील बहुतांश जिल्ह्यांत 15 सप्टेंबरला तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे.

दक्षिण कोकण, गोवा आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये, तसेच दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही भागांमध्येही तुरळक पावसाची शक्यता आहे.

त्यानंतर 16 सप्टेंबरला दक्षिण कोकण-गोव्यातील बहुतांश ठिकाणी, उत्तर कोकणातील अनेक जिल्ह्यांत आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही भागांत हलका पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

तर दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या काही ठिकाणीही तुरळक पावसाची शक्यता आहे.

हवामान विभागानं वर्तवलेला अंदाज

फोटो स्रोत, IMD

गुरुवारी 17 सप्टेंबरला उत्तर कोकणातील काही जिल्ह्यांत तर दक्षिण कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याचा अंदाजही आहे.

त्यानंतर 18 आणि 19 सप्टेंबरलाही उत्तर कोकणातील काही जिल्ह्यांत हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही या दिवशी तुरळक पाऊस होऊ शकतो.

शेतकरी, मच्छिमारांसाठी काय सल्ला?

राज्यात पुढील काही दिवसांसाठी हवामान काही विशेष इशारा नाही. अतिवृष्टी किंवा वादळी पावसाचा धोका नसला, तरी जिथं तुरळक पाऊस अपेक्षित आहे, त्याठिकाणी शेतकऱ्यांनी पिकांनुसार नियोजन करावं.

काढणीला आलेली पिकं, फळं आणि शेतीमालाची पावसापासून योग्य काळजी घ्यावी लागणार आहे. तसंच शेतात पाणी साचू नये याची काळजी घ्यावी लागेल.

पुढील 5 दिवसांमध्ये महाराष्ट्रात कमाल तापमानात 3 ते 5 अंशाने हळूहळू वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

पुढील 24 तासांमध्ये किमान तापमानात मोठा बदल अपेक्षित नसून त्यानंतर त्यात 1 ते 3 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे.

हवामान विभागानं वर्तवलेला अंदाज

फोटो स्रोत, IMD

पुढील 5 दिवसांमध्ये मच्छिमारांसाठीही काही विशेष इशारा देण्यात आलेला नाही. मात्र, खोल समुद्रातील काही भागांत जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे.

ईशान्य अरबी समुद्रालगत गुजरातच्या किनारपट्टीवर ताशी 35 ते 45 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

त्याचा वेग ताशी 55 किलोमीटरपर्यंत असू शकतो. त्यामुळं मच्छिमारांना संबंधित भागात न जाण्याचा सल्ला देण्यात आलाय.

जिल्हानिहाय अंदाज

राज्यात आगामी 5 दिवसांमध्ये कोणत्याही ठिकाणी मोठ्या पावसाची शक्यता नाही.

फक्त 15 सप्टेंबरसाठी चंद्रपूर, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ या 4 जिल्ह्यांनाच यलो अलर्ट आहे. या जिल्ह्यांत काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जनेची शक्यता वर्तवलेली आहे.

नाशिक, पुण्यासह सातारा घाट परिसरात मध्यम पावसाचा अंदाज आहे.

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, पुणे घाट आणि कोल्हापूर घाटात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मुंबईसह पालघर, ठाणे, रायगडमध्ये क्वचितच पावसाची शक्यता आहे. तर 16 सप्टेंबरला बहुतांश जिल्ह्यांत तुरळक पाऊस राहील.

17 ते 19 सप्टेंबरदरम्यान नाशिक, जळगाव, जालना, नांदेड, धाराशिव अशा काही जिल्ह्यांत पाऊस कमी होऊन कोरडे हवामान राहण्याचा अंदाज आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)