मॅग्नेशियम घेतल्यामुळे झोप येते का? जास्त प्रमाणात ते घेतल्यास काय होतं? वाचा

मॅग्नेशियम घेतल्यामुळे झोप येते का? जास्त प्रमाणात ते घेतल्यास काय होतं? वाचा

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, रूथ क्लेग
    • Role, हेल्थ अँड वेलबीइंग रिपोर्टर
  • Published
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

मॅग्नेशियम हे सध्या अतिशय चर्चेत आहे. लाखो लोक विविध कारणांसाठी मॅग्नेशियम घेत आहेत. हे आपल्याला चांगली झोप मिळवून देऊ शकतं का? पचनाच्या तक्रारी दूर करू शकतं का? सतत धावणाऱ्या विचारांना विश्रांती देऊ शकतं का?

वेगाने बदलणाऱ्या सप्लिमेंट्सच्या जगात सध्या मॅग्नेशियमला झळाली आली आहे. जगभरात मॅग्नेशियमची बाजारपेठ सध्या जवळपास 3 अब्ज पाऊंड (सुमारे 350 कोटी रुपये) इतकी आहे आणि पुढच्या दशकात ती जवळजवळ दुप्पट होण्याची शक्यता आहे.

यॉर्कशायर डेल्समधील एका छोट्या फॅक्टरीत मोठ्या प्लास्टिकच्या ड्रममध्ये पांढऱ्या पावडरचे ढिग भरलेले आहेत आणि बाजूला मोठ्या मशीन सतत चालू आहेत. हॅझमॅट सूट घातलेले कामगार काळजीपूर्वक मॅग्नेशियम सायट्रेट स्टीलच्या चमकदार कंटेनरमध्ये मोजून भरत आहेत.

"आम्ही आमचा माल संपूर्ण जगभर पाठवत आहोत," असे लोंसडेल हेल्थचे व्यवस्थापक अँड्र्यू गोरिंग सांगतात.

"युकेमध्ये तर पाठवतोच पण ऑस्ट्रेलिया, आशियाचे काही भाग, कुवेत, इराक या ठिकाणीही पाठवतो. हे आमचं सर्वाधिक विकलं जाणारं उत्पादन आहे आणि मार्केट सतत वाढतच आहे."

गोळ्या तयार करणाऱ्या मशीनच्या आवाजावर त्यांनी ओरडून सांगितलं, हे मशीन एका डॅलेक रोबोसारखं दिसतं आणि दर सेकंदाला डझनावारी पांढऱ्या मॅग्नेशियमच्या गोळ्या तयार करतं.

"आपल्याला खरंच याची गरज आहे का?" मी विचारलं. "आणि आता अचानकच हे इतकं लोकप्रिय का झालं?"

या कारखान्यात दररोज लाखो मॅग्नेशियमच्या गोळ्या तयार केल्या जातात.

फोटो स्रोत, Ruth Clegg/BBC

फोटो कॅप्शन, या कारखान्यात दररोज लाखो मॅग्नेशियमच्या गोळ्या तयार केल्या जातात.

इन्फ्लुएन्सर्स, सोशल मीडिया हेच यामागचं कारण आहे असं गोरिंग म्हणाले. त्यांनी सांगितलं की, "मॅग्नेशियम आणि त्याचे फायदे आपल्याला अनेक वर्षांपासून माहित आहेत, पण आता ते मुख्य प्रवाहात आलं आहे."

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

आहारतज्ज्ञ किर्स्टन जॅक्सन याचं कारण एका वाक्यात सांगतात, "मार्केटिंगची चतुर क्लृप्ती," मॅग्नेशियम अशा गोष्टींमध्ये वापरलं जातं ज्या गोष्टींसाठी लोक पैसे खर्च करायला तयार असतात. जसं की झोप, पचन, मानसिक आरोग्य. पण याचा अर्थ असा नाही की आपल्याला हे सप्लिमेंट्स घ्यायलाच हवेत.

मॅग्नेशियम हे आपल्या शरीरातील अनेक खनिजांपैकी एक आहे. महिलांसाठी याची शिफारस केलेलं रोजचं प्रमाण 270mg आहे आणि पुरुषांसाठी 300mg.

आपल्या शरीरात सुमारे 25g मॅग्नेशियम साठवलेलं असतं. हे 300 पेक्षा अधिक प्रक्रियांमध्ये सहभागी असतं असं जॅक्सन सांगतात.

हे मेंदू आणि मानसकि स्थितीसाठी विशेषतः महत्त्वाचं आहे, कारण हे मज्जातंतूंना योग्य संदेश पाठवायला मदत करतं आणि मेंदूच्या पेशींच्या संरचनेला आधार देतं.

हे रक्तातील साखरेचं प्रमाण संतुलित ठेवायला मदत करतं, रक्तदाब नियंत्रित करतं आणि पेशींमध्ये कॅल्शियम तसेच पोटॅशियम यांची हालचाल नियंत्रित करतं, ते आपल्या हृदयाच्या ठोक्यांचा वेग राखण्यासाठी आवश्यक आहे.

म्हणून मग, मॅग्नेशियमच्या गोळ्या घेतल्याने शरीर व्यवस्थित चालेल का? हे इतकं सोपं नाही, असं जॅक्सन सांगतात. मॅग्नेशियमची कमतरता असेल तरच त्याची सप्लिमेंटस काम करतात. ही कमतरता तपासणं कठीण आहे, कारण शरीरातील बहुतांश मॅग्नेशियम हाडांमध्ये आणि ऊतींमध्ये साठवलेलं असतं.

केटी करनचा अनुभव आणि मॅग्नेशियम सप्लिमेंट्सचा प्रभाव

कम्युनिकेशन स्पेशालिस्ट आणि अनेक आघाडीच्या फॅशन ब्रँड्ससोबत काम केलेल्या केटी करनसाठी शांत आणि गाढ झोप म्हणजे जणू एक दुरापास्त वाटणारं स्वप्नच होतं.

"एक वर्षापूर्वी मी खूप त्रासातून जात होते," ती सांगते. "मला झोप लागायला खूप वेळ लागायचा, डोक्यात सतत विचारांचं चक्र सुरू असायचं, आणि मग झोप लागलीच तरी दोन तासांनी जाग यायची."

केटीने मॅग्नेशियम ग्लायसिनेट वापरून पाहण्याचा निर्णय घेतला. हे मॅग्नेशियम आणि ग्लायसिन (एक अमिनो आम्ल) यांचं मिश्रण आहे, मात्र याचा झोप सुधारण्याशी संबंधित पुरेसा वैज्ञानिक पुरावा नाही.

दररोज 270mg घेतल्यानंतर दोन आठवड्यांत तिला डोक्यातील गोंधळ कमी झाल्यासारखा वाटला. विचारांची धाव थोडी मंद झाली, आणि तिला पुन्हा सहजपणे, सुरळीत काम करता येईल असं वाटायला लागलं.

"माझी झोप नक्कीच सुधारली, ऊर्जा वाढली. मी अधिक सक्रिय झाले. माझ्या आयुष्यात इतरही गोष्टी बदलल्या, त्यामुळे सगळं फक्त मॅग्नेशियममुळे झालं असं म्हणता येणार नाही, पण मला वाटतं मॅग्नेशियम सप्लिमेंट्स हे त्या बदलांचा एक महत्त्वाचा भाग होतं."

मॅग्नेशियमची कमतरता असल्यास झोपेच्या पद्धतीवर परिणाम होऊ शकतो, हे निश्चित आहे. पण सप्लिमेंट्स घेतल्याने झोप सुधारतेच असं म्हणण्यास पुरेसा वैज्ञानिक पुरावा नाही.

सोशल मीडियावर अनेक लोक उत्साहाने सप्लिमेंट्स घेत असल्याचं दिसतं, आणि त्यांच्या पोस्टवर "commission paid" असं लिहिलेलं असतं. म्हणजेच त्या पोस्टमधून त्यांना पैसे मिळू शकतात.

केटी सांगते की, मॅग्नेशियमच्या सप्लिमेंट्समुळे तिची झोप सुधारली आणि डोक्यातील विचारांचे चक्र शांत झाले.

फोटो स्रोत, Katie Curran

फोटो कॅप्शन, केटी सांगते की, मॅग्नेशियमच्या सप्लिमेंट्समुळे तिची झोप सुधारली आणि डोक्यातील विचारांचे चक्र शांत झाले.

या इन्फ्लुएन्सर्सनुसार, मॅग्नेशियम अनेक गोष्टींसाठी उपयुक्त आहे असं वाटतं आणि ते विविध प्रकारची उत्पादने सुचवतात.

मॅग्नेशियम अनेक उपयुक्त संयुगांबरोबर मिसळून दिलं जातं जे शरीराच्या विविध भागांना मदत करण्यासाठी तयार केलेलं असतं. उदाहरणार्थ, मॅग्नेशियम + L-थ्रियोनेट किंवा ग्लायसिनेट हे मेंदूच्या आरोग्यासाठी वापरलं जातं जे झोप आणि तणाव कमी करण्यासाठी मानलं जातं.

मॅग्नेशियम + क्लोराईड हे स्नायूंचा ताण आणि मासिक पाळीपूर्वीच्या वेदनांसाठी वापरलं जातं, तर सिट्रेट आणि ऑक्साइड मिश्रण पचनासाठी आणि बद्धकोष्ठतेसाठी वापरलं जातं.

आपल्यापैकी बहुतेकांना यापैकी एक तरी समस्या असतेच. पण न्यूट्रिशनिस्ट क्रिस्टन स्टॅव्हरिडीस सांगतात की, या विविध मॅग्नेशियम सप्लिमेंट्सचा आरोग्यदृष्ट्या सकारात्मक परिणाम होतो, असा ठोस पुरावा अजूनही नाही.

आणि जरी फायदा होत असेल, तरी तो तेव्हाच होईल जेव्हा शरीरात मॅग्नेशियमची कमतरता असेल.

"सप्लिमेंट कंपन्या ओरडून सांगतात 'आपण सगळे मरणार आहोत'," स्टॅव्हरिडीस म्हणतात, "'लवकर, आमची गोळी घ्या आणि हाच तुमच्यासाठी सर्वोत्तम उपाय आहे ."

त्या पुढे सांगतात की, 'आपल्यापैकी अनेकांना पुरेसं मॅग्नेशियम मिळत नाही, सुमारे 10% पुरुष आणि 20% महिलांना रोजची आवश्यक असलेले प्रमाण मिळत नाही.'

"पण फक्त सप्लिमेंट घेणं हा पर्याय नाही."

स्टॅव्हरिडीस सांगतात की, 'झोपेच्या आरोग्याचं उदाहरण घ्या. मॅग्नेशियम सप्लिमेंट्समुळे खरचं फरक पडतो यावर अनेक परस्परविरोधी अभ्यास झालेले आहेत.

काही संशोधनात असं सांगितलं जातं की थोडा फायदा होतो, तर काही अभ्यासक "रँडमाइज्ड कंट्रोल्ड ट्रायल्स (randomised controlled trials) नियंत्रणाखाली केल्या गेलेल्या अपवादात्मक चाचण्यांबाबत साशंक आहेत.

याशिवाय, सप्लिमेंट्स एकमेकांशी शरीरात गेल्यावर कशी प्रतिक्रिया देतात यावरही अवलंबून असतं की ते एकमेकांवर काही वेळा परिणाम करू शकतात. उदाहरणार्थ, झिंक सप्लिमेंट जे पेरिमेनोपॉझमधून जाणाऱ्या महिलांसाठी सुचवलं जातं. हे मॅग्नेशियमवर प्रतिकूल परिणाम करू शकतं.

म्हणूनच स्टॅव्हरिडीस म्हणतात, हा सगळा अतिशय गुंतागुंतीचा मुद्दा आहे, आणि "हे घ्या आणि सगळं ठीक होईल" इतकं सरळसोपं नाही.

मॅग्नेशियम मिळवण्यासाठी बीया, काजू-बदाम, हिरव्या भाज्या आणि फळं हे सर्वोत्तम पदार्थ आहेत.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मॅग्नेशियम मिळवण्यासाठी बिया, काजू-बदाम, हिरव्या भाज्या आणि फळं हे सर्वोत्तम पदार्थ आहेत.

त्या प्रथम आहाराकडे लक्ष देण्याची शिफारस करतात. पण जर तुम्ही मॅग्नेशियम सप्लिमेंट घेण्याचा विचार करत असाल, तर त्या सांगतात की पॅकेटवर दिलेल्या प्रमाणाच्या अर्ध्या प्रमाणानुसार सुरुवात करा आणि तुमचं शरीर कसं प्रतिसाद देतं ते पाहा.

आरोग्यदृष्ट्या निरोगी लोकांनी जर खूप जास्त मॅग्नेशियम घेतले, तर मूत्रपिंड ते लघवीवाटे बाहेर टाकू शकतं, पण तरीही धोके असतात जसे की अतिसार, उलटी आणि मळमळ.

ज्यांना मूत्रपिंडाचा आजार आहे, त्यांच्यासाठी मॅग्नेशियम सप्लिमेंट्स धोकादायक ठरू शकतात आणि हायपरमॅग्नेशेमिया नावाची गंभीर स्थिती निर्माण होऊ शकते ज्यामुळे पक्षाघात किंवा कोमामध्ये जाण्याची शक्यता असते.

आहारतज्ज्ञ किर्स्टन जॅक्सन देखील सांगतात की, "बहुतेक लोकांनी 100% आहाराकडे आधी लक्ष द्यायला हवं." सीड्स, सुकामेवा, व्होलग्रेन ब्रेड, हिरव्या भाज्या आणि फळं हे मॅग्नेशियमचे चांगले स्रोत आहेत, त्या सांगतात.

त्या इशारा देतात की, जर तुम्ही नियमितपणे हे पदार्थ खाल्ले नाहीत, तर तुम्हाला कदाचित व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, फायबर आणि प्रीबायोटिक्स यांचीही कमतरता असेल.

"एक मॅग्नेशियम सप्लिमेंट हे सगळं सुधारू शकत नाही."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)