बुलढाण्यात केसगळती होऊन टक्कल पडण्यासाठी कारणीभूत असलेलं सेलेनियम नेमकं काय असतं?

बुलढाणा जिल्ह्यातील काही गावांत लोकांचे अचानक इतके केस गळू लागले, तर काही जणांना टक्कल पडू लागलं आहे.
फोटो कॅप्शन, बुलढाणा जिल्ह्यातील काही गावांत लोकांचे अचानक इतके केस गळू लागले, तर काही जणांना टक्कल पडू लागलं आहे.
    • Author, भाग्यश्री राऊत
    • Role, बीबीसी मराठीसाठी
  • Published
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

शरीरात सेलेनियम वाढल्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात केसगळती होऊन लोकांचं टक्कल पडत असल्याचा निष्कर्ष डॉ. हिम्मतराव बावस्कर यांनी काढला.

तसेच पंजाबमधील दोन जिल्ह्यांमधून येणाऱ्या गव्हामध्ये सेलेनियमचं प्रमाण अधिक असून यामधून रुग्णांच्या शरीरात सेलेनियम वाढल्याचा दावाही बावस्करांनी केलाय.

बावस्करांच्या संशोधनानंतर आता केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी सुद्धा आयसीएमआरच्या प्राथमिक अहवालाबद्दल माहिती दिली.

प्रतापराव जाधव यांनी असं म्हटलं आहे की, शरीरात सेलेनियमचं प्रमाण वाढल्यामुळे केसगळती झाल्याचं या अहवालात नमूद असल्याचं त्यांनी सांगितलंय. पण, पंजाबमधून येणाऱ्या गव्हाला दोष न देता या सेलेनियमचा मूळ स्रोत शोधण्याची गरज आहे.

बुलढाण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रतापराव जाधव बोलत होते.

शरीरात सेलेनियम वाढल्यामुळे केसगळती होत असल्याचं आयसीएमआरच्या प्राथमिक अहवालातूनही समोर आलंय. पण, हे सेलेनियम म्हणजे नेमकं काय असतं? ते आपल्या शरीरासाठी का गरजेचं असतं?

शरीराला हे सेलेनियम कुठून मिळतं? शरीरात सेलेनियमचं प्रमाण जास्त झालं तर काय परिणाम होतात? आणि त्यावर उपाय काय आहेत? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पाहूयात.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

सेलेनियम म्हणजे काय? त्याची शरीराला गरज का असते?

सेलेनियम हे मातीमध्ये सापडणारं खनिज आहे. पाणी आणि काही खाद्यपदार्थांमध्ये नैसर्गिकरीत्या सेलेनियम आढळून येतं. पण, आपल्या शरीराला काही प्रमाणात सेलेनियमची गरज असते.

मानवाच्या शरीराला सेलेनियमची गरज का आहे? याबद्दल न्युट्रीशनिस्ट डॉ. रेणुका माईंदे सांगतात, सेलेनियम डीएनए सिंथेसिससाठी काम करते.

तसेच आपण आजारी पडल्यानंतर काही अँटी-बायोटीक्स घेतो त्यामुळे शरीरात ऑक्सिडेशन तयार होतं. त्याला प्रतिबंध घालण्याचं काम सेलेनियम करतेय.

शरीरात सेलेनियमचं प्रमाण वाढल्यामुळे केसगळती होत असल्याचा दावा केला गेला आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, शरीरात सेलेनियमचं प्रमाण वाढल्यामुळे केसगळती होत असल्याचा दावा केला गेला आहे.

प्रदूषण किंवा अयोग्य खाद्यपदार्थ किंवा वाढतं वय यामुळे शरीरातील पेशीचं नुकसान होतं. या पेशींचं नुकसान टाळण्यासाठी सेलेनियमचा अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म महत्त्वाचा असतो.

एकूणच सेलेनियम रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठीचं काम करतं. तसेच आपल्या थॉयराईड ग्रंथीनं व्यवस्थित काम कराव्या यासाठीही सेलेनियम महत्वाचं असतं.

सेलेनियम मातीत असल्यामुळे ते धान्यामध्ये येतं. मातीत त्याचं किती प्रमाण आहे यावर धान्यातील सेलेनियमचं प्रमाण ठरतं. त्यामुळे वेगवेगळ्या भागातील धान्यांमध्ये सेलेनियमचं प्रमाण कमी-अधिक असू शकतं. पण, सेलेनियमची टॉक्सिसीट होते का? यावर तरी अजून अभ्यास करण्याची गरज आहे, असंही त्या म्हणाल्या.

पण, शरीराला सेलेनियम नेमकं कुठून मिळतं?

शरीरासाठी किती सेलेनियम गरजेचं आहे?

आपल्या देशात आढळणारा सर्वात मोठा सेलेनियमचा स्त्रोत म्हणजे मटण आणि पोल्ट्री. यामध्ये शरीराला जितकं गरजेचं आहे तितकं सेलेनियम असतं. जे नॉनव्हेज खातात त्यांच्या शरीराला यामधून सेलेनियम मिळू शकतं.

तसेच तांदूळ, गहू यांसारख्या धान्यामध्ये सेलेनियम आढळून येतं. या धान्याद्वारे सुद्धा आपल्या शरीराला सेलेनियम मिळू शकतं.

तसेच अंडी आणि सी फूडमधून सुद्धा शरीरासाठी आवश्यक असलेलं सेलेनियम मिळू शकतं.

आपल्या देशात आढळणारा सर्वात मोठा सेलेनियमचा स्त्रोत म्हणजे मटण आणि पोल्ट्री.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, आपल्या देशात आढळणारा सर्वात मोठा सेलेनियमचा स्त्रोत म्हणजे मटण आणि पोल्ट्री.

पण, शरीरात सेलेनियमचं प्रमाण किती असावं याची मात्रा इंडियन कौन्सिल ऑफ मेडीकल रिसर्चनं ठरवून दिलेली आहे. प्रत्येक दिवसाला जवळपास 40 मायक्रोग्रॅम्स सेलेनियम घेऊ शकतो अशी शिफारस आयसीएमआरच्या एका रिपोर्टमध्ये केलेली आहे.

तक्ता

तसेच वयानुसार सेलेनियमचं प्रमाण सुद्धा बदलत जातं. यूएसच्या आरोग्य विभागानुसार, कोणत्या वयोगटातील व्यक्तीनं किती सेलेनियम घ्यावं यासाठी आकडेवारी दिलेली आहे.

पण, आयसीएमआरच्या एका अहवालात याचं प्रमाण फक्त 40 मायक्रोग्रॅम ठरवून दिलेलं आहे.

शरीरात सेलेनियमचं प्रमाण वाढल्यास काय परिणाम होतात?

शरीरात सेलेनियमचं प्रमाण गरजेपेक्षा जास्त झालं तर शरीरावर नेमके काय परिणाम होतात?

यामुळे कुठले आजार होतात का, याबद्दल दिल्ली AIIMS चे डर्माटोलॉजिस्ट विभागाचे प्रमुख डॉ. सोमेश गुप्ता सांगतात, "सेलेनियम आरोग्यासाठी आवश्यक आहे. पण, जास्त प्रमाणात सेवन केल्यानं मळमळ, केस गळणं, थकवा आणि मज्जातंतूचे नुकसान यासारखे दुष्परिणाम होऊ शकतात."

"आपण जास्त दिवस सेलेनियमचं सेवन केलं तर गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते ज्याला सेलोनोसिस म्हणतात. यामुळे नखं तुटणं, केस गळून टक्कल पडणं, श्वाशोच्छवासाची दुर्गंधी आणि पचनक्रियेवरही दुष्परिणाम होतात."

शरीरात सेलेनियमचं प्रमाण कमी झालं मळमळ होणं, स्नायू ठिसूळ होणं, रोगप्रतिकारशक्ती कमी होणं असे परिणाम दिसतात.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, शरीरात सेलेनियमचं प्रमाण कमी झालं मळमळ होणं, स्नायू ठिसूळ होणं, रोगप्रतिकारशक्ती कमी होणं असे परिणाम दिसतात.

पण, हेच सेलेनियम शरीराला मिळालं नाही अथवा शरीराला असलेली सेलेनियमची गरज पूर्ण होऊ शकली नाही तर नेमकं काय होतं याबद्दलही डॉ. गुप्ता यांनी माहिती दिली.

शरीरात सेलेनियमचं प्रमाण कमी झालं मळमळ होणं, स्नायू ठिसूळ होणं, रोगप्रतिकारशक्ती कमी होणं असे परिणाम दिसतात. यामुळे हृदयविकारही होऊ शकतो किंवा थॉयराईड ग्रंथीच्या कार्यातही अडथळा येऊ शकतो. काहीवेळा वंध्यत्व सुद्धा येऊ शकतं.

शरीरातलं सेलेनियमचं प्रमाण वाढलं तर ते कसं कमी करायचं? त्यावर उपाय काय आहेत?

वाढलेलं सेलेनियम कमी कसं करायचं?

शरीरात सेलेनियमचं प्रमाण जास्त झालं तर ते कसं कमी करायचं? त्यावर उपचार काय आहेत?

याबद्दल दिल्ली AIIMS चे डर्माटोलॉजिस्ट विभागाचे प्रमुख डॉ. सोमेश गुप्ता सांगतात, शरीरातील सेलेनियचं प्रमाण कमी करण्यासाठी विशेष उपचार नाहीत.

केसगळतीनं बाधित रुग्णांच्या लघवी, रक्त आणि केसांमध्ये सेलेनियमचं प्रमाण दहापटीनं जास्त आढळून आलं आहे, तर त्यांच्या रक्तातलं झिंकचं प्रमाण कमी झालं आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, केसगळतीनं बाधित रुग्णांच्या लघवी, रक्त आणि केसांमध्ये सेलेनियमचं प्रमाण दहापटीनं जास्त आढळून आलं आहे, तर त्यांच्या रक्तातलं झिंकचं प्रमाण कमी झालं आहे.

पण, ज्यामधून शरीरात सेलेनियमचं प्रमाण वाढतंय तो स्त्रोत बंद करणं गरजेचं आहे. खाद्यपदार्थामधून सेलेनियम शरीरात जात असेल तर त्याचं सेवन बंद करायला हवं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)