You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
धनंजय मुंडेंना झालेला बेल्स पाल्सी आजार नेमका काय आहे?
- Author, रेणुका कल्पना
- Role, बीबीसी मराठीसाठी
- Published
- वाचन वेळ: 6 मिनिटे
"मला बेल्स पाल्सी या नावाच्या आजाराचं निदान झालं आहे. या आजारामुळे सध्या मला सलग दोन मिनिटेही व्यवस्थित बोलता येत नाही," राष्ट्रवादी क्राँगेसचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये ही माहिती दिली.
त्यांच्या दोन्ही डोळ्यांवर पंधरा दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली असून आता त्यांना बेल्स पाल्सी आजार झाला असल्याचं त्यांनी सांगितलं. या आजारावर ते मुंबईतील एका रुग्णालयात उपचार घेत आहेत.
या आजारामुळे मला कॅबिनेट बैठका आणि पक्षाच्या जनता दरबार कार्यक्रमालाही उपस्थित राहता आला नसल्याचं मुंडे यांनी सांगितलं.
मुंडे यांना झाला तो बेल्स पाल्सी हा एक न्यूरोलॉजिकल आजार आहे. यात मेंदूच्या किंवा मणक्यातल्या मज्जासंस्थेशी संबंधित असलेल्या नसांना धक्का पोहोचतो.
या आजाराचे उपचार उपलब्ध असून काही आठवड्यात किंवा महिन्यांत रुग्ण पूर्ण बरा होतो, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
बेल्स पाल्सी आहे काय?
"बेल्स पाल्सी म्हणजे थोडक्यात चेहऱ्याच्या एका बाजूच्या स्नायूंना तात्पुरत्या काळासाठी लकवा बसणे," डॉ. विश्वनाथ अय्यर सांगतात. मुंबईच्या झायनोवा शाल्बी रुग्णालयात ते मेंदू आणि मणका सर्जन म्हणून काम करतात.
या आजारामुळे एक डोळा बंद न होणे, हसताना एका बाजूचे ओठ न हालणे, अशी लक्षणं दिसतात.
सामान्यपणे लकवा सगळ्यांनाच माहीत असतो. त्यात शरीराच्या एका संपूर्ण बाजूची संवेदना जाते. चेहरा, हात-पाय सगळ्यावरच त्याचे परिणाम दिसतात. तर, बेल्स पाल्सीमध्ये फक्त चेहऱ्याच्या, शक्यतो खालच्या बाजूच्या स्नायूंवर परिणाम होतो, असं डॉ. अय्यर पुढे सांगतात.
फार कमी लोकांना चेहऱ्याच्या दोन्ही बाजूला असा लकवा भरतो.
"बेल्स पाल्सीची अगदी सुरूवातीची लक्षणं म्हणजे कानाच्या आसपास वेदना सुरू होणे. ज्या बाजूला लकवा बसणार आहे त्या बाजूच्या कानाच्या आसपासचा भाग दुखू लागतो. त्याच बाजूच्या डोळ्यातून पाणी यायला लागतं. कपाळावर आठ्या येत नाहीत. किंवा काहीही जेवलं, पाणी प्यायलं तर एका बाजूने ते बाहेर येऊ लागतं," डॉ. अय्यर पुढे सांगतात.
ही सुरूवातीची लक्षण माहीत असतील तर आपल्याला काहीतरी होतंय याचा रुग्णाला स्वत: अंदाज येऊ शकतो. त्याच्या पुढची पायरी आली तर मात्र लक्षणं इतरांना दिसू लागतात.
चेहऱ्याची एक बाजू खाली गळाल्यासारखी दिसू लागते, डोळ्यांची उघडझाप होत असताना एका बाजूची पापणी लवत नाही.
बेल्स पाल्सी हे नाव कुठून आलं?
अनेक पारंपरिक उपचार पद्धतीत चेहऱ्याला लकवा येण्याचा उल्लेख आढळतो. अनेक पद्धतीत काढे, हर्बल औषधं वापरून या आजारावर उपचार करण्याचा प्रयत्न केला जात असे. पण आजार नेमका कशामुळे होतो याचं कारण मात्र अस्पष्ट होतं.
ते शोधून काढलं चार्ल्स बेल नावाच्या एका स्कॉटिश न्युरोलॉजिस्टने. 'रॉयल सोसायटी ऑफ लंडन' या ब्रिटनमधल्या वैज्ञानिकांच्या संस्थेसमोर 1821 मध्ये चार्ल्स बेल या डॉक्टरांनी त्यांचं एक नवं संशोधन वाचून दाखवलं.
प्राणी आणि माणसांच्या मृतदेहांवर संशोधन करून मेंदूतून निघणाऱ्या 12 कार्निअल नसांपैकी सातवी नस चेहऱ्यावरचे भाव आणि हालचाल यावर नियंत्रण ठेवते, असं त्या संशोधनात लिहिलं होतं. त्याला त्यांनी 'फेशिअल नर्व्ह' असं म्हटलं.
या नसेचं काम बिघडलं की चेहऱ्याला लकवा बसतो, हेही त्यांनी पुढे शोधून काढलं. इतर कारणांमुळे आणि 'फेशिअल नर्व्ह'वर परिणाम झाल्यामुळे चेहऱ्याला बसणारा लकवा यामधला फरकही त्यांनी स्पष्ट केला.
लॅटिन भाषेतल्या पॅरालिसिस या मूळ शब्दाचा मिडिल इंग्रजी भाषेत पाल्सी असा अपभ्रंश झाला. तर बेल यांनी शोध लावला म्हणून या आजाराला तेव्हा बेल्स पाल्सी (Bell's Palsy) असं म्हणलं गेलं.
बेल्स पाल्सी कशामुळे होतो?
"मेंदूतून निघालेली ही फेशिअल नर्व्ह कानामागे खालच्या बाजूला येऊन संपते. पुढे त्याला पाच फांद्या फुटतात आणि संपूर्ण चेहऱ्यावर पसरतात," डॉ. अय्यर सांगतात.
बहुतेक वेळेला कोणत्यातरी विषाणूच्या संसर्गानंतर रुग्णांना बेल्स पाल्सी झाल्याचं समोर येतं, असंही ते पुढे सांगतात. ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणं रुग्णांमध्ये दिसतात.
शरीरात असलेल्या विषाणूवर हल्ला करताना शरीरात सूज निर्माण होते. फेशिअल नर्व्हला अशी सूज आली किंवा सुजेमुळे ती नस दाबली गेली तर बेल्स पाल्सी होतो.
अनेकदा कानाला खूप वेळेपर्यंत गार हवा लागली तरी चेहऱ्याला अशाप्रकारचा लकवा येऊ शकतो असं डॉक्टर सांगतात.
"माझ्याकडे उपचारासाठी आलेल्या एका तरुण मुलीला लग्नाच्या एक आठवड्यापुर्वीच बेल्स पाल्सी झाला होता. आपल्याच लग्नात आपण छान दिसणार नाही या विचारानं ती फार काळजीत पडली होती.
"शेवटी तिच्या मेकअप आर्टिस्टने दागिन्यांचा वापर करून ते झाकण्याचा प्रयत्न केला. जवळपास तीन आठवड्यांनंतर मुलगी पूर्णपणे बरी झाली," डॉ. अय्यर सांगत होते.
या आजारावर उपचार काय?
फक्त विषाणूचा संसर्गच नाही इतर कोणत्याही कारणाने रोग प्रतिकारक शक्ती कमी झाली तरी बेल्स पाल्सी होऊ शकतो, असं डॉ. पवन पाई सांगतात. मुंबईच्या वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये ते न्यूरोलॉजिस्ट आहेत.
कोविड-19 हा साथरोगही विषाणूच्या संसर्गामुळे होतो. त्यामुळे साथरोगाच्या काळातही बेल्स पाल्सी झालेल्या अनेक रुग्णांवर उपचार केले असल्याचं डॉ. पाई पुढे सांगत होेते.
बेल्स पाल्सी झाला तर सामान्य माणसाला पहिल्यांदा पॅरालिसिसचा झटका आला आहे असंच वाटतं. डॉक्टरही आजाराचं निदान करताना हा पॅरालिसिसचा झटका नाही याची पहिल्यांदा खात्री करून घेतात.
"या आजाराचं निदान चिकित्सक पद्धतीने केलं जातं. म्हणजे रुग्णाचा वैद्यकीय इतिहास, लक्षणं आणि तपासणी करून बेल्स पाल्सी झाला आहे हे ठरवतात," डॉ. पाई सांगतात.
चेहऱ्यासोबत पाय, हात किंवा शरीराच्या इतर कोणत्याही भागाला लकवा आला आहे का किंवा चालताना रुग्णाचा तोल ढळतोय का हे पाहिलं जातं.
गरज वाटलीच तर एमआरआय स्कॅन करून इतर मेंदूत काही गडबड आहे का तेही तपासलं जातं. यापैकी काहीच नसेल तर रुग्णावर बेल्स पाल्सीचे उपचार सुरू केले जातात.
"विषाणूच्या संसर्गानं आजार होत असल्यानं पहिल्यांदा अँटी-व्हायरल औषधं सुरू केली जातात. तोंडावाटे स्टेरॉईड्स हाही उपचाराचा महत्त्वाचा भाग असतो. याशिवाय जीवनसत्त्व आणि कॅलशियमच्या गोळ्याही दिल्या जातात," डॉ. पाई म्हणाले.
डोळा सतत उघडा राहत असेल तर कोरडा पडतो. त्यामुळे त्याचा ओलावा टिकवून ठेवणारे आय-ड्रॉपही दिले जातात.
"आजार फक्त औषधांनी बरा होतो असं काही लोकांना वाटतं. पण ते खरं नाही. व्यायाम किंवा फिजिओथेरपी आजार पूर्णपणे बरा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असते," डॉ. पाई पुढे म्हणाले.
काम व्यवस्थित न करणाऱ्या चेहऱ्यावरच्या अवयवाला किंवा स्नायूला व्यायामाच्या माध्यमातूनच पूर्ववत करता येतं.
"अनेकदा फेशियल नर्व्हला इलेक्ट्रिकल स्टिम्युलेशन म्हणजे विद्युत उत्तेजनाही दिली जाते. पण सहसा लकवा बसल्यानंतर पहिल्या दहा ते पंधरा दिवसांनंतर ते केलं जातं," अशी माहिती डॉ. पाई देतात.
माणूस संपूर्ण बरा होण्यासाठी एक ते तीन महिन्यांचा काळ जातो. अनेकदा त्यापेक्षा कमी किंवा जास्त दिवसही लागू शकतात, असं तज्ज्ञ सांगतात. ज्यांना वेळेवर उपचार मिळत नाहीत त्यांचा लकवा पुढे आयुष्यभरही कायम राहू शकतो.
ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनानुसार,10,000 पैकी 1 ते 4 लोकांना बेल्स पाल्सी हा आजार होतो. कोणत्याही वयाच्या, कोणत्याही लिंगाच्या व्यक्तींना हा आजार होऊ शकतो.
एकदा झटका येऊन गेला असेल तरीही चेहऱ्याच्या त्याच किंवा दुसऱ्या बाजूला परत येऊ शकतो. पण अशा घटना फार दुर्मीळ दिसून येतात.
"सारकोईडोसिस नावाचा दुर्मिळ आजार असेल तर त्यामुळे बेल्स पाल्सीचा अनेकदा झटका येतो," डॉ. पाई सांगतात. त्यांच्याकडे येणाऱ्या 34 वर्षांच्या तरुण मुलाला तीनवेळा बेल्स पाल्सीचा झटका आल्याचं ते सांगत होते.
या आजाराचा खर्च फारसा नसतो. स्टेरॉईड आणि औषधं फार महागडी नसतात. मात्र फिजिओथेरपीच्या प्रत्येक सत्राचा आणि विद्युत उत्तेजना द्यावी लागली तर त्याचा खर्च काहींना न परवडणारे असू शकतात.
तरीही आजारात जास्तीत जास्त 7 ते 10 हजार रुपयांचा खर्च येऊ शकतो, असं डॉ. पाई सांगतात.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.