You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'या' कोट्यधीशाने 27 वेळा विद्यापीठाची प्रवेश परीक्षा दिली आणि प्रत्येक वेळी नापास झाला
चीनमधील एक कोट्यधीश उद्योगपती विद्यापीठाच्या परीक्षेत नापास झाला. यात काय विशेष? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर थांबा...ही या गृहस्थाची नापास होण्याची 27 वी वेळ आहे.
गेल्या आठवड्यात या परीक्षेचे निकाल जाहीर झाले आणि त्यामध्ये 56 वर्षांच्या लियांग शी यांना 750 पैकी 424 मार्क्स मिळाले.
चीनमध्ये कोणत्याही विद्यापीठामध्ये प्रवेश हवा असेल तर किमान 458 गुण आवश्यक असतात.
या वर्षी परीक्षेला जवळपास 1.3 कोटी विद्यार्थी बसले होते.
उच्च शिक्षणाचं स्वप्न मनाशी बाळगून परीक्षा देण्याचा प्रयत्न करणाऱ्या लियांग यांची गोष्ट चीनमधील माध्यमांमध्ये छापून आली.
लियांग हे 1983 पासून प्रवेश परीक्षा देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी स्थानिक माध्यमांशी बोलताना म्हटलं, की यावर्षीचा निकाल पाहून मी निराश झालो आहे. माझं स्वप्न पूर्ण होणार नाही, असं मला आता वाटायला लागलं आहे.
सिचुआन येशील रहिवासी असलेल्या लियांग यांनी तियानम् न्यूजशी बोलताना म्हटलं, “आपण हे करू शकतो, हा विश्वास मला होता. पण आता मी खचलो आहे.”
गाओकाओ (विद्यापीठात प्रवेश घेण्यासाठीची परीक्षा) अतिशय कठीण समजली जाते. सरकारी आकडेवारीनुसार 2021 साली केवळ 41.6% उमेदवारांनाच विद्यापीठ आणि महाविद्यालयात प्रवेश मिळाला आहे.
व्यवसायात यश, मात्र...
चीनमध्ये 1950 च्या दशकापासूनच प्रवेश परीक्षांचा मुद्दा हा महत्त्वाचा राहिला होता. चीनमधील सांस्कृतिक क्रांतीदरम्यान त्या स्थगित ठेवण्यात आल्या होत्या.
एका प्रतिष्ठित विद्यापीठात प्रवेश घेऊन ‘बुद्धीजीवी’ बनण्याचं स्वप्न आपण पाहिलं होतं, असं लियांगचं म्हणणं आहे.
वयाच्या 16 व्या वर्षी त्यांनी पहिल्यांदा ही प्रवेश परीक्षा दिली होती. वर्ष होतं 1983. 1992 पर्यंत त्यांनी वेगवेगळ्या नोकऱ्या करताना प्रत्येक वर्षी परीक्षेचा अर्ज भरला. त्यानंतर त्यांची या परीक्षेसाठीची वयोमर्यादा संपली.
ज्या फॅक्टरीमध्ये ते काम करत होते, ती दिवाळखोरीत निघाली होती. त्यामुळे लियांगने 1990 च्या दरम्यान लाकडाचा होलसेलचा व्यवसाय सुरू केला.
त्यांचा लवकरच जम बसला आणि एका वर्षांतच त्यांनी 10 लाख युआन एवढी संपत्ती कमावली. त्यांनी त्यानंतर उत्पादन साधनांचा व्यवसाय सुरु केला.
त्यानंतर 2001 मध्ये चिनी सरकारने 2001 गाओकाओसाठीची वयोमर्यादा हटविण्यात आली. त्यानंतर त्यांनी पुन्हा परीक्षा द्यायला सुरूवात केली.
पुढच्या वर्षी पुन्हा देणार परीक्षा
वर्षानुवर्षे परीक्षा देणाऱ्या लियांग यांचं लक्ष आता आपलं नशीब बदलण्याऐवजी या परीक्षेत यश मिळवण्यावरच केंद्रित झालं आहे.
2014 साली त्यांनी एका स्थानिक वर्तमानपत्राशी बोलताना म्हटलं होतं, “जर तुम्ही कॉलेजमध्ये जात नसाल, तर ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. उच्च शिक्षणाशिवाय तुमचं आयुष्य पूर्ण होऊ शकत नाही.”
या परीक्षेच्या तयारीसाठी त्यांनी खेळ आणि इतर गोष्टींकडेही लक्ष दिलं नाही.
लियांग यांनी म्हटलं की, गेल्या काही वर्षांपासून ते स्वतःला खूप पराभूत समजत आहेत. मी हे सुरू ठेवावं का या विचारांपर्यंत मी आलो होतो.
दुसऱ्या एका मुलाखतीत त्यांनी म्हटलं होतं की, “मी पुढच्या वर्षी हात वर करून मोकळा होईन. जर मी पुढच्या वर्षी परीक्षेला बसलो आणि नापास झालो, तर मी माझं आडनाव काढून टाकेन.”
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)