गर्भपात करण्याचं स्वातंत्र्य फक्त महिलेलाच- मुंबई उच्च न्यायालय

फोटो स्रोत, Getty Images
आज सकाळी विविध वर्तमानपत्र आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या बातम्यांचा थोडक्यात घेतलेला आढावा
1. गर्भपात करण्याचं स्वातंत्र्य फक्त महिलेलाच- मुंबई उच्च न्यायालय
गर्भपात करायचा की गर्भधारणा कायम ठेवायची, हे ठरवण्याचा अधिकार संबंधित महिलेलाच आहे. त्याबद्दलचा निर्णय केवळ तिच्या एकटीचाच आहे, असे ठाम मत उच्च न्यायालयाने एका विवाहितेला 32व्या आठवडय़ांत गर्भपात करण्याची परवानगी देताना व्यक्त केले.
गर्भात गंभीर विकृती असल्याच्या वैद्यकीय अहवालामुळे न्यायालयाने ही परवानगी दिली.
लोकसत्ताने ही बातमी दिली आहे.
गरोदरपणाचा शेवटचा टप्पा असल्यामुळे गर्भात गंभीर विकृती असली तरीही गर्भपात करण्यास परवानगी देऊ नये, अशी शिफारस करणारा अहवाल वैद्यकीय मंडळाने दिला होता.
तो मान्य करण्यास नकार देऊन न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती एस. जी. डिगे यांच्या खंडपीठाने उपरोक्त मत नोंदवले. तसेच याचिकाकर्त्यां महिलेला गर्भपातासाठी परवानगी दिली.
2. अँटिलिया प्रकरणाचा नीट तपास केलेला नाही- मुंबई उच्च न्यायालय
माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांचा जामीन अर्ज फेटाळताना मुंबई उच्च न्यायालयानं एनआयएच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
एनआयएनं अँटिलिया प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा सखोल तपास केला नसल्याचं दिसतंय असं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं आहे.
एबीपी माझाने ही बातमी दिली आहे.
उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि आरएन लड्डा यांच्या खंडपीठाने या सुनावणीदरम्यान म्हटलंय की, "24/25 फेब्रुवारी 2021 रोजी एका मोठ्या उद्योजकाच्या घराजवळ स्कॉर्पिओ कारमध्ये जिलेटिनच्या कांड्या आढळून आल्या होत्या. याप्रकरणी एनआयएनं ज्या प्रकारे पार्किंग कटाचा तपास केला, तो समाधनकारक झालेला नाही".
एवढा मोठा कट नियोजनाशिवाय शक्य नाही, त्यात एकापेक्षा जास्त जण असण्याची शक्यता जास्त आहे, असं मत उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं व्यक्त केलं आहे.
या प्रकरणातील प्रमुख आरोपी, बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यासोबत स्कॉर्पिओमध्ये जिलेटिनच्या काड्या ठेवण्याचा कट कोणी रचला, यावर एनआयए मौन बाळगून असल्याचं खंडपीठानं नमूद केलं.
3. सोनम वांगचूक उणे 40 डिग्री तापमानात करणार उपोषण

फोटो स्रोत, Rolex
लडाखच्या दुर्गतीकडे लक्ष वेधण्यासाठी समाजसुधारकर सोनम वांगचूक उणे 40 डिग्री वातावरणात उपोषण करणार आहेत. खांदुर्ग भागात ते उपोषण करणार आहेत.
या उपोषणाला त्यांना 'क्लायमेट फास्ट' असं नाव दिलं आहे. लोकमत ने ही बातमी दिली आहे. योग्य पावलं उचलली नाहीत तर लेह लडाखमधील दोन तृतीयांश नद्या नष्ट होतील असं काश्मीर विद्यापीठ आणि इतर संस्थांनी केलेल्या संशोधनात नुकतंच स्पष्ट झालं आहे.
लोकमतने ही बातमी दिली आहे.
या पार्श्वभूमीवर लडाख वाचवण्यासाठी त्यांनी पंतप्रधानांना साद घातली आहे.
लडाख आणि इतर हिमालयीन प्रदेशांना औद्योगिक शोषणापासून वाचवा, असं केलं नाही तर लोकांच्या जीवनावर त्याचा परिणाम होईल, याकडे लक्ष वेधण्यासाठी मी उपोषण करत आहे. यातून जगलो वाचलो तर तुम्हाला भेटेने असं म्हणत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.
4. आयटी कंपन्यांच्या कर्मचारी कपातीमुळे भारतीय तरुणांची दैना, नोकरी शोधण्यासाठी धडपड

फोटो स्रोत, Reuters
गेल्या काही महिन्यात अमेरिकेत आयटी कंपनीत काम करणाऱ्या हजारो भारतीयांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यामुळे तिथे असलेल्या व्हिसाच्या काळात इतर नोकऱ्या शोधण्यासाठी भारतीय तरुण तरुणींची धडपड सुरू आहे.
गुगल मायक्रोसॉफ्ट, फेसबुक आणि अमेझॉन या कंपन्यांनी हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केल्यामुळ ही स्थिती निर्माण झाली आहे.
द हिंदूने ही बातमी दिली आहे.
अमेरिकेतील वॉशिंग्टन पोस्ट या वर्तमानपत्रात आलेल्या बातमीनुसार गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून 2 लाख लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यात गुगल, मायक्रोसॉफ्ट, फेसबुक आणि अमेझॉन या मोठ्या कंपन्यांमधून सर्वांत जास्त व्यक्तींना काढण्यात आलं आहे.
त्यातील 30 ते 40 टक्के लोक भारतीय आहेत. अमेरिकेत काम करायचं असल्याल H1-B नावाचा व्हिसा मिळतो. या व्हिसावर हजारो भारतीय लोक अमेरिकेत काम करतात.
5. अंदमान-निकोबारमधील 21 निनावी बेटांना परमवीर चक्र विजेत्यांची नावं
अंदमान निकोबारमधील 21 निनावी बेटांना परमवीर चक्र विजेत्यांची नावं देण्यात आली आहेत. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त 23 जानेवारी रोजी केंद्रशासित प्रदेश अंदमान आणि निकोबार बेटांवर एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे हजेरी लावली होती.
सकाळने ही बातमी दिली आहे.
मेजर सोमनाथ शर्मा, सुभेदार आणि कॅप्टन (तत्कालीन लान्स नाईक) करम सिंग, द्वितीय लेफ्टनंट रामा राघोबा राणे, नाईक जदुनाथ सिंग, मेजर शैतान सिंग, कंपनी क्वार्टरमास्टर हवालदार अब्दुल हमीद, लेफ्टनंट कर्नल अर्देशीर बुर्जोर्जी तारापोर, लान्स नाईक अल्बर्ट एकका यांची नावं या बेटाला दिली आहेत.
तसंच मेजर होशियार सिंग, सेकंड लेफ्टनंट अरुण खेत्रपाल, फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सिंग सेखॉन, मेजर रामास्वामी परमेश्वरन, नायब सुभेदार बाना सिंग, कॅप्टन विक्रम बत्रा, लेफ्टनंट मनोज कुमार पांडे, सुभेदार मेजर संजय कुमार आणि सुभेदार मेजर योगेंद्र सिंह यादव (सेवानिवृत्त) यांचीही नावं देण्यात आली आहेत.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























