You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोनाची नाकावाटे दिली जाणारी लस कुठे, कितीला मिळेल? सोपी गोष्ट
- Author, गुलशनकुमार वनकर
- Role, बीबीसी मराठी
- Published
अखेर कोरोनावरची नाकावाटे दिली जाणारी लस अर्थात nasal vaccine बाजारात आली आहे.
भारत बायोटेक म्हणजे ती कंपनी जी कोव्हॅक्सिन लस देत होती, त्यांचीच ही लस आहे. पण ही लस नेमकी काय आहे? ती कुठे? कशी आणि कितीला मिळेल? तिचे काय फायदे?
दोन अडीच वर्षांपूर्वी कोरोनाची पहिली लाट आली, तेव्हापासूनच जगभरातले शास्त्रज्ञ कामाला लागले. सगळेच कोरोनावरची लस शोधत होते, त्यासाठी वेगवेगळे प्रयोग करत होते. असाच एक प्रयोग होता नाकावाटे दिल्या जाणाऱ्या लशीचा, म्हणजे nasal vaccine चा. म्हणजे सुई टोचण्याची भानगड नाही.
तर हैदराबादच्या भारत बायोटेक या कंपनीने आता iNCOVACC नावाची ही लस आणली आहे. वॉशिंग्टन विद्यापीठाच्या स्कूल ऑफ मेडिसीन इन सेंट लुई यांच्यासोबत भारत बायोटेकने ही लस विकसित केलीय.
ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने 6 सप्टेंबर 2022 ला या लशीला 18 वर्षांवरील सर्वांवर आप्तकालीन वापरासाठी परवानगी दिली होती. आणि डिसेंबरमध्ये सरकारकडून घोषणा झाली की ही लस आता कोविनवर उपलब्ध होईल.
नेसल लस कशी काम करते?
जिथून कोरोनाचा विषाणू आपल्या शरीरात प्रवेश करू शकतो, त्या नाकाच्या वाटेतच ही लस विषाणूला आळा घालेल, असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.
ही लस घेतल्यानंतर शरीरात वेगवेगळ्या रोग प्रतिकार यंत्रणा सक्रीय होतात आणि Immunoglobulin, mucosal Immunoglobulin A आणि T cells, म्हणजे शरीरातल्या अँटीबॉडिजना सक्षम करण्याचं काम ही लस करेल.
भारत बायोटेकने म्हटलंय की चाचणीदरम्यान ज्यांनी ही लस घेतली होती, त्यांच्यात mucosal Immunoglobulin A या अँटिबॉडीचं प्रमाण वाढलेलं दिसलं. यामुळे श्वसननलिकेच्या वरच्या भागात संसर्ग आणि विषाणू प्रसार रोखायला मदत मिळेल.
ही लस कुठे आणि कशी मिळेल?
जिथून कोरोनाचा विषाणू आपल्या शरीरात प्रवेश करू शकतो, त्या नाकाच्या वाटेतच ही लस विषाणूला आळा घालेल, असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.
ही लस घेतल्यानंतर शरीरात वेगवेगळ्या रोग प्रतिकार यंत्रणा सक्रीय होतात आणि Immunoglobulin, mucosal Immunoglobulin A आणि T cells, म्हणजे शरीरातल्या अँटीबॉडिजना सक्षम करण्याचं काम ही लस करेल.
भारत बायोटेकने म्हटलंय की चाचणीदरम्यान ज्यांनी ही लस घेतली होती, त्यांच्यात mucosal Immunoglobulin A या अँटिबॉडीचं प्रमाण वाढलेलं दिसलं. यामुळे श्वसननलिकेच्या वरच्या भागात संसर्ग आणि विषाणू प्रसार रोखायला मदत मिळेल.
ही लस कुठे आणि कितीला मिळेल?
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार कोविन या पोर्टलवरच 18 वर्षांवरील सर्वांना या लशीचं बुकिंग करता येईल. या लशीला heterologous booster च्या रूपात दिलं जाईल, म्हणजे तुम्ही आधी घेतलेल्या लशीपेक्षा ही लस वेगळी असेल. अर्थातच, कारण आपल्यापैकी बहुतांश लोकांनी आधी कोव्हिशील्ड, कोव्हॅक्सिन किंवा स्पुटनिक व्ही ही लस घेतली असेल.
पण जर तुम्ही आधीच लशीचे तिन्ही डोस घेतले आहेत, म्हणजे बूस्टर डोसही घेतला आहे तर मग तुम्ही पुन्हा ही लस घ्यावी का?
सरकारच्या लसीकरण मोहिमेचे दिशानिर्देश ठरवणाऱ्या NTAGI या गटाचे प्रमुख डॉ. NK अरोरा यांनी NDTV शी बोलताना सांगितलं की, “ही लस तूर्तास पहिला बूस्टर म्हणूनच घेण्याचा सल्ला आपण देतोय. म्हणजे जर तुम्ही आधीच लशीचे तिन्ही डोस घेतले आहेत, म्हणजे पहिले दोन + बूस्टर डोस, तर मग तुम्ही पुन्हा ही लस घ्यायची गरज नाही. ज्यांनी तिसरा डोस घेतला नाहीय, त्यांनी हा बूस्टर म्हणून घेतला तरी चालेल.”
पण मला चौथा डोस घ्यायचा असेल तर? यावर डॉ. अरोरा सांगतात की सध्या तरी कोविनवर चौथ्या लशीसाठी बुकिंग करायची सोयच उपलब्ध नाहीय. पण त्यांनी पुढे आणखी एक मुद्दा मांडला. ते सांगतात, “तूर्तास आपल्याला वारंवार लशींचे बूस्टर डोस घ्यावे लागतील, असं सांगणारे पुरावे उपलब्ध नाहीत. कारण उत्तर अमेरिका आणि युरोपात mRNA लशींचे दोन-तीन बूस्टर घेतल्यानंतरही लोकांना कोव्हिडची लागण होताना दिसतेच आहे.”
तूर्तास ही लस फक्त प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये उपलब्ध होईल. भारत बायोटेकने या लशीचे दर असे ठरवले आहेत – 800+ GST खासगी मार्केटमध्ये, आणि जर केंद्रीय किंवा राज्य सरकारांनी मोठ्या प्रमाणात ऑर्डर दिली तर 325+GST असे दर ठरवण्यात आले आहेत.
नाकावाटे लशीचे फायदे काय?
आता तुम्ही म्हणाल की जर आधीच आपल्याकडे दोन लशी होत्या, ज्यांचे डोसही घेऊन झाले आहेत, तर मग ही लस का आणलीय?
तर याचे काही फायदे नक्कीच आहेत -
· एक म्हणजे, ही नाकावाटे दिली जाते, त्यामुळे सुई टोचण्याची भानगड नाही.
· यामुळे त्वचेवर कुठली सूज किंवा खाज येणार नाही.
· यासाठी विशेष कुठलं प्रशिक्षण घेण्याची, देण्याची गरज नाही. त्यामुळे लसीकरण मोहीम वेगाने होऊ शकते.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)