You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
एक असं औषध ज्यामुळे निर्माण व्हायची लैंगिक संबंधाची तीव्र इच्छा, त्याच्या अंमलाखाली बलात्कारही झाल्याची नोंद
- Author, नोएल टायथरेज आणि कर्टिस लँकेस्टर
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 8 मिनिटे
अनेकांना आपल्या पायांची हालचाल करायची सवय असते. या विकाराला रेस्टलेस लेग सिंड्रोम असं म्हणतात. त्यावरील औषध एका कंपनीने तयार केलं असता असं जाणवलं की जे लोक हे औषध घेत आहेत त्यांच्या लैंगिक सवयी आणि वृत्तींमध्ये खूप फरक पडत आहे.
अत्यंत तीव्र स्वरूपाच्या लैंगिक संबंधांची अनिवार इच्छा निर्माण होण्यापासून ते जुगार खेळण्यापर्यंत विविध सवयी या औषधामुळे लागल्या. इतकंच नाही तर हे औषध सुरू असताना एका व्यक्तीने लहान मुलावर अत्याचार केल्याची नोंद देखील झाली आहे.
आजकाल औषधांच्या दुष्परिणामामुळे लोकांच्या जीवनावर अनेक गंभीर परिणाम होत आहेत. काही लोकांना शारीरिक तसेच मानसिक समस्यांचा सामना करावा लागतो, ज्यात लैंगिक आजार, जुगार किंवा इतर व्यसनांचा समावेश होतो. ही औषधं त्यांचं जीवन सुकर करण्याऐवजी अधिकच कठीण करतात.
हालचालीशी संबंधित विकार ज्यात रेस्टलेस लेग सिंड्रोमचा (आरएलएस) समावेश आहे. यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी रुग्णांना औषधं लिहून देताना, या औषधांमुळं लैंगिक वर्तनाशी संबंधित गंभीर दुष्परिणाम होऊ शकतो याबद्दलची माहिती किंवा इशारा दिला नाही, असा दावा रुग्णांकडून आता केला जात आहे.
या समस्येनं ग्रस्त असलेल्या सुमारे 20 महिलांनी बीबीसीला याबाबत माहिती दिली.
आरएलएसवरील उपचारासाठी दिलेल्या औषधांमुळं शरीर आणि पाय हलवण्याची प्रबळ इच्छा निर्माण होते, या औषधानं आमचं आयुष्य उद्ध्वस्त झालं, असं या महिलांनी म्हटलं आहे.
औषध उत्पादक कंपनी जीएसकेच्या एका अहवालात बीबीसीला आढळून आलं आहे की, वर्ष 2003 मध्ये त्यांना डोपामाइन अॅगोनिस्ट ड्रग्स आणि विकृत लैंगिक वर्तन यामधील संबंध लक्षात आला होता.
यात पार्किन्सन्ससाठी औषध घेत असताना एका मुलावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या एका व्यक्तीच्या प्रकरणाचा उल्लेख आहे.
'कोणाला जुगाराचं तर कोणाला शॉपिंगचं व्यसन लागलं'
रुग्णांना दिलेल्या पत्रकात या दुष्परिणामाचा कोणताही थेट उल्लेख नाही. परंतु, यूकेच्या औषध नियामक संस्थेनं आम्हाला सांगितलं की, वाढीव कामवासना आणि हानिकारक वर्तणूक याबद्दल एक सामान्य इशारा त्यात दिला आहे.
'बदललेल्या' लैंगिक स्वारस्याच्या धोक्याचा देखील उल्लेख पत्रकात केला आहे, असं जीएसकेनं म्हटलं आहे.
धोकादायक लैंगिक वर्तनाकडे आकर्षित होण्याचं वर्णन केलेल्या काही महिलांनी त्यांना हे कशामुळं होत आहे, याची कल्पना नव्हती असं सांगितलं.
तर काहींना जुगार खेळण्याचं किंवा विनाकारण खरेदी करण्याची इच्छा निर्माण होऊ लागली. विशेष म्हणजे या महिलांचा अशा विचित्र वर्तणुकीचा कोणताच इतिहास नव्हता. एकीने तर यात 1,50,000 पौंडपेक्षा जास्त कर्ज करुन ठेवलं होतं.
इतर महिलांप्रमाणं, क्लेअरनं त्यांच्या गर्भधारणेदरम्यान पहिल्यांदा आरएलएस अनुभवला. सततच्या हालचालीमुळं झोपेची समस्या निर्माण झाली. त्वचेखाली वेगळ्याच संवेदना त्यांना जाणवायच्या.
बाळंतपणानंतरही ही स्थिती कायम राहिली. डॉक्टरांनी त्यांना डोपामाइन अॅगोनिस्ट औषध रोपिनिरोल लिहून दिले.
त्या म्हणतात की, डॉक्टरांनी या औषधाच्या दुष्परिणामाबद्दल मला कोणताही इशारा किंवा सावधानतेचा सल्ला दिला नव्हता. सुरुवातीला हे औषध माझ्या आरएलएसवरील उपचारावर प्रभावी ठरलं. परंतु, एक वर्षानंतर मात्र मला अचानकपणे विचित्र पद्धतीची लैंगिक इच्छा जाणवू लागली.
"मी याचं वर्णन एका शब्दात करु शकते, ते म्हणजे फक्त 'विकृत'पणा," त्या आम्हाला सांगत होत्या. जीएसकेनं त्या शब्दाचा वापर संशोधनाची कोणतीही माहिती न घेता अशा वर्तणुकीशी संबंधाने केला होता.
'लैंगिक भावना वाढल्या आणि चुकीचं पाऊल पडलं'
क्लेअर म्हणतात की, सेक्ससाठी मी भल्या पहाटे क्रूझवर जाण्यासाठी घरातून बाहेर पडायचे. सी-थ्रू टॉप आणि जॅकेट परिधान करून, दिसेल त्या पुरुषाला आपली छाती दाखवायचे.
त्या हे नियमितपणे करत. यासाठी त्या धोकादायक ठिकाणीही जाऊ लागल्या होत्या. विशेष म्हणजे त्यांना एक जोडीदार असतानाही त्या असं वागू लागल्या होत्या.
"तुम्ही चूक करत आहात, हे तुम्हाला जाणवत असतं. परंतु, त्याचा तुमच्यावर इतका परिणाम झालेला असतो की तुम्हाला कळतच नाही की तुम्ही ते करत आहात. म्हणजे तुमची अवस्था कळतंय, पण वळत नाही, अशी झालेली असते."
क्लेअर म्हणाल्या की, या इच्छा आपल्या औषधाशी निगडीत आहे, हे कळण्यास मला अनेक वर्षे लागली. जेव्हा मी ही औषधं घेणं बंद केलं. तेव्हा माझ्या अशा इच्छा जवळपास नाहीशा झाल्या. मला आता त्याबद्दल लाज वाटते आणि दुःख वाटतं.
डोपामिन अॅगोनिस्ट औषधांच्या माहितीपत्रकात जुगार आणि वाढलेल्या लैंगिक इच्छाशक्तीसारख्या उत्तेजक वर्तनांच्या दुष्परिणामांचा समावेश दीर्घकाळापासून केला जात आहे.
त्याचबरोबर एनआयसीई या आरोग्य मार्गदर्शक संस्थेनुसार, आरएलएसच्या रुग्णांमध्ये 6 ते 17 टक्के रुग्णांवर हे औषध घेतल्यावर असा परिणाम होऊ शकतो. कोणत्याही औषधाचा 'सामान्य' दुष्परिणाम फक्त 1 टक्के लोकांना प्रभावित करतो, असं एनएचएसच्या माहितीवरून समजतं.
या औषधांचा उपयोग स्किझोफ्रेनियाचा उपचार करण्यासाठी देखील केला जातो. ते डोपामाइनच्या वर्तणुकीला नक्कल करून कार्य करतात, जो आपल्या मेंदूतील एक नैसर्गिक रासायनिक पदार्थ आहे, जो हालचाली नियंत्रित करण्यात मदत करतो.
त्याला 'हॅप्पी हॉर्मोन' म्हणून ओळखलं जातं. कारण जेव्हा एखादी आनंददायक गोष्ट अनुभवायला मिळते किंवा आपल्याला काहीतरी मिळाल्याचा अनुभव होतो, तेव्हा ते सक्रिय होतात.
परंतु अॅगोनिस्ट ड्रग्स या भावना अधिक उत्तेजित करू शकतात. ज्यामुळं आवेगपूर्ण वर्तन होऊ शकतं, असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.
जीएसकेच्या 2003 च्या अहवालात 'अस्थिर वर्तणूक' म्हणून वर्णन केलेल्या प्रकरणांमध्ये दोन पुरुषांचा समावेश होता, ज्यांना पार्किन्सन रोगासाठी रोपिनिरोल औषध लिहून देण्यात आलं होतं.
एका प्रकरणात 63 वर्षांच्या पुरुषानं सात वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला. त्यामुळं त्याला कारावासाची शिक्षा सुनावली गेली होती.
या अहवालानुसार, रोपिनिरोलनं उपचार सुरू केल्यापासून आरोपीची लैंगिक इच्छा शक्ती लक्षणीयरित्या वाढली होती. नंतर औषधाची मात्रा कमी केल्यावर त्याची 'लैंगिक इच्छाशक्तीची समस्या' कमी झाली.
'पुरुषांपेक्षा महिलांना त्रास अधिक'
दुसऱ्या प्रकरणात तर एका 45 वर्षीय पुरुषानं 'नियंत्रणाबाहेरचं अश्लील वर्तन' केलं. त्याचा सेक्स ड्राइव्ह रोपिनिरोल लिहून देण्यापूर्वी वाढलेला होता, पण उपचारानंतर त्याची इच्छाशक्ती आणखी 'तीव्र' झाल्याचं म्हटलं आहे.
केंब्रिज विद्यापीठातील न्यूरोसायकियाट्रीच्या प्रोफेसर वॅलेरी वून यांच्या मते, जीएसके द्वारे 'विकृत' लैंगिक वर्तणूक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औषधांबद्दलचे प्रमाण दर अज्ञात आहेत. जे लोक अशा वर्तनांचा अनुभव घेतात ते कमी प्रमाणात अनुभव नोंदवतात, असं त्या म्हणाल्या.
"हे एका औषधाशी संबंधित आहे, हे लोकांना समजत नाही," असं त्या म्हणतात.
धोकादायक लैंगिक वर्तणूक फक्त वाढलेली कामवासना न ठेवता - याबद्दल विशेष सावधगिरी बाळगली जावी आणि एनएचएसद्वारे याचं स्क्रीनिंग केलं जावं, असं त्यांनी म्हटलं.
आरएलएस हा विकार 20 पैकी एका प्रौढ व्यक्तीला प्रभावित करतो असं मानलं जातं. महिलांना पुरुषांच्या तुलनेत जवळपास दुप्पट प्रमाणात याचा त्रास होण्याची शक्यता असते.
आम्ही ज्या 20 रूग्णांशी बोललो ते म्हणाले की, डॉक्टर केवळ औषधांच्या संभाव्य गंभीर दुष्परिणामांबद्दल सांगण्यास अयशस्वी ठरले नाहीत, तर औषधांचे त्यांच्या शरीरावर होणारे परिणाम तपासण्यात देखील त्यांना अपयश आलं आहे.
'अनेकजण कर्जबाजारी झाले'
सारा त्यांच्या पन्नाशीत होत्या तेव्हा त्यांना एका वेगळ्या कंपनीने उत्पादित केलेलं आणखी एक डोपामाइन अॅगोनिस्ट औषध लिहून देण्यात आलं.
त्या पुढं म्हणाल्या, "पूर्वी, जर ब्रॅड पिट माझ्या खोलीत नग्नावस्थेत आला असता, तरी मला काही फरक पडला नसता. मात्र, या औषधांमुळं मी एक वेगळी स्त्री बनले, जिला लैंगिक व्यसन लागलं होतं."
सारा यांनी वापरलेली अंतर्वस्त्रे (अंडरविअर) आणि लैंगिक कृत्यांचे व्हीडिओ ऑनलाइन विकण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर अनोळखी लोकांसोबत टेलिफोन सेक्स करणं, त्याशिवाय विनाकारण मोठ्याप्रमाणात शॉपिंग किंवा खरेदी करण्याची सवय लागली. यामुळं त्यांच्यावर 30,000 पौंडचं कर्ज झालं.
डोपामाइन अॅगोनिस्टच्या प्रभावाचा सामना करण्यासाठी, त्यांनी स्वतः मनानेच वेदनाशामक औषधं आणि झोपेसाठी गोळ्या घेऊन उपचार सुरू केले. अखेरीस त्यांना रिहॅबमध्ये (पुनर्वसन केंद्र) दाखल करावं लागलं. त्यांचं ड्रायव्हिंग लायसन्स काढून घेतलं गेलं आणि त्यांनी नोकरीही गमावली.
त्या बीबीसीशी बोलताना म्हणाल्या, "मी अशा गोष्टींकडे वळले होते, ज्या माझ्यासाठी आरोग्यदायी नव्हत्या. मला माहीत होतं की हे वर्तन माझं नव्हतं. मी अशा स्वभावाची नव्हते. परंतु माझं त्यावर नियंत्रण नव्हतं, किंबहुना मी यावर नियंत्रण ठेवू शकत नव्हते."
तिसऱ्या महिलेचं नाव सू आहे. त्या म्हणतात की, मला दोन वेगवेगळ्या डोपामाइन अॅगोनिस्ट औषधांचे प्रिस्क्रिप्शन देण्यात आलं होतं. दोन्ही वेळा मला या औषधांमुळं वर्तणूकीच्या दुष्परिणांमाबद्दल इशारा दिला गेला नाही.
दुसरं औषध लिहून दिलं जात असताना त्यांनी अलीकडील जुगाराच्या वर्तणुकीचा उल्लेख केला होता. त्यानंतर माझ्यावर 80,000 पौंड कर्ज झालं, असं त्यांनी सांगितलं.
त्या म्हणाल्या, "याचा माझ्या कुटुंबावर भयानक परिणाम झाला. पैसे गमावणं हे माझ्यासाठी जीवन बदलणारी घटना होती. पण त्या वेळी मला माहीत नव्हतं की, यात माझा स्वतःचा काहीच दोष नव्हता."
जीएसके विरुद्ध 2011 मध्ये चार पार्किन्सन्स आजारानं ग्रस्त असलेल्यांनी आवाज उठवला होता. बीबीसीनं याबाबत जाणून घेतलं. त्यांचा दावा होता की, रोपनिरोलमुळं जुगाराच्या कर्जात वाढ झाली आणि त्यांचे नातेसंबंधही तुटले.
त्यांनी अशीही तक्रार केली की, 2000 च्या सुरुवातीच्या काळात वैद्यकीय अभ्यासामध्ये अशा वर्तनांचा आणि औषधांच्या संबंधाचा उलगडा होऊनही जीएसकेने मार्च 2007 पर्यंत त्यांच्या उत्पादनात कोणताही इशारा समाविष्ट केला नव्हता. वर्ग वाद निकालात आणला गेला, परंतु जीएसकेने जबाबदारी नाकारली.
गंभीर दुष्परिणामांची प्रकरणं इतर देशांमध्ये देखील नोंदवली गेली आहेत. विशेषतः पार्किन्सनच्या आजारावरील औषधांच्या वापरासंदर्भात.
फ्रान्समध्ये, एका न्यायालयानं दोन मुलांचे वडील असलेल्या व्यक्तीला नुकसान भरपाई दिली. त्यांनी तक्रार केली होती की, रोपिनिरोलमुळे त्यांना सक्तीची समलैंगिक इच्छा उत्पन्न झाली.
तर दुसरी व्यक्ती, ज्याची कोणताही गुन्हेगारी पार्श्वभूमी नव्हती, त्यानं मांजरांना यातना देण्यास सुरुवात केली.
यूएसमध्ये, अमेरिकन ॲकॅडमी ऑफ स्लीप मेडिसिनने शिफारस केली आहे की, औषधांचा वापर केवळ तात्कालिक उपचारांसाठी केला जावा, जसं की जीवनाच्या शेवटच्या टप्प्यात.
बीबीसीनं ज्या महिलांशी संवाद साधला त्यांपैकी अनेक महिलांनी देखील तक्रार केली की, औषधांचा दीर्घकाळ वापर केल्यानं त्यांचे मूळ आरएलएस खराब झाले. याचा अर्थ त्यांचा डोस वाढवला गेला होता. ज्यामुळं, त्यांच्या वर्तणुकीत मोठा बदल झाला होता. या प्रक्रियेला ऑगमेंटेशन (वृद्धीकरण) म्हणून ओळखलं जातं.
सल्लागार न्यूरोलॉजिस्ट असलेले डॉ. गाय लेश्झिनर म्हणतात की, औषधं अजूनही महत्त्वाची भूमिका बजावतात. परंतु त्यांचा असा विश्वास आहे की औषध कंपन्या, आरोग्य अधिकारी आणि डॉक्टरांनी या दुष्परिणामांबद्दल रुग्णांना अधिक चांगल्या प्रकारे माहिती देण्याची गरज आहे.
"प्रत्येकाला खरोखरच किती नाट्यमय बदल घडू शकतात हे माहीत नाही," असं ते म्हणाले.
एका निवेदनात, जीएसकेनं बीबीसीला सांगितलं की, रोपिनिरोल 17 दशलक्षाहून (मिलियन) अधिक उपचारांसाठी लिहून देण्यात आलं आहे. त्यावर 'भरपूर क्लिनिकल चाचण्या' करण्यात आल्या आहेत. हे औषध प्रभावी असल्याचं सिद्ध झाले आहे. हे औषध 'सुरक्षित' आहे.
"सर्व औषधांप्रमाणेच, याचेही संभाव्य दुष्परिणाम आहेत. त्याचा उल्लेख माहितीमध्ये स्पष्टपणे केला आहे," असं त्यांनी म्हटलं.
वर्ष 2003 मध्ये केलेल्या संशोधनाच्या प्रतिसादात 'विचित्र' लैंगिक वर्तनाचा दुवा सापडला होता. याची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांना दिली होती, असं जीएसकेनं आम्हाला सांगितलं.
त्याचबरोबर औषधांच्या माहितीमध्ये सुधारणा करण्यासही सांगितलं गेलं. त्यात आता 'लैंगिक इच्छेत वाढ' आणि 'वर्तणुकीतील बदल' या दुष्परिणामांचा नव्यानं समावेश करण्यात आला आहे.
रोपिनिरोलसाठी सध्याच्या रुग्ण माहिती पत्रकात पाच प्रसंगी लैंगिक आकर्षणातील बदलांचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे.
जवळपास असामान्यपणे उच्च, अत्याधिक किंवा वाढलेली यासारख्या भावनांच्या वारंवारतेबद्दल असा इशारा देतात.
यूकेच्या मेडिसिन्स अँड हेल्थकेअर प्रॉडक्ट्स रेग्युलेटरी एजन्सीने (एमएचआरए) सांगितलं की, विचलित किंवा स्वैर लैंगिक वर्तनाचा विशिष्ट उल्लेख इशाऱ्यात समावेश नाही.
परंतु, असे आवेग वेगवेगळे असतात आणि हानीकारक असू शकतात. असा सामान्य इशारा समाविष्ट आहे.
यात असंही म्हटलं आहे की, आरोग्यसेवा व्यावसायिकांनी रुग्णांना संभाव्य जोखीम समजावून सांगणं महत्त्वाचं आहे. सर्वांनाच या प्रकारच्या दुष्परिणामांचा अनुभव येत नाही.
दरम्यान, आरोग्य आणि सामाजिक सेवा विभागाने यावर बोलण्यास करण्यास नकार दिला आहे.
(लोकांची ओळख लपवण्यासाठी या लेखातील काही नावं बदलण्यात आली आहेत.)
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)