You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
डास काही ठरावीक लोकांनाच चावण्यामागे आहे 'हे' महत्त्वाचं वैज्ञानिक कारण
- Author, लाइक कॅथरिन
- Role, बीबीसी
- Published
- वाचन वेळ: 6 मिनिटे
डास माझ्याकडे अगदी चुंबकासारखे आकर्षित होतात.
उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मी जगाच्या पाठीवर कोणत्याही कोपऱ्यात गेले तरी एक गोष्ट अगदी ठरलेली असते, डास मला नक्कीच चावणार.
ते चावल्यामुळे माझ्या त्वचेवर मोठे मोठे खाज सुटणारे चट्टे पडतात जे कित्येक आठवडे तसेच राहतात.
याउलट, माझ्यासोबत राहणाऱ्या इतर दोघांवर मात्र डासांचा काही फरकच पडत नाही. त्यांना डास क्वचितच चावतात आणि समजा चुकून चावलेच तर एक छोटासा लाल डाग पडतो आणि तोही लगेच गायब होतो.
माझे मित्र नेहमी माझी थट्टा करत म्हणतात की माझं रक्त 'खूप गोड' आहे, म्हणूनच डास मला जास्त चावतात.
पण गंमत म्हणजे, त्यांच्या या बोलण्यात थोडं तथ्य असू शकतं.
"खरं तर, आपल्या शरीरातून अनेक प्रकारचे जैविक संकेत (Biological signals) बाहेर पडत असतात, जसे की आपला श्वास आणि शरीराचा वास (Body odor).
हेच संकेत ठरवतात की डास कोणत्या व्यक्तीकडे जास्त आकर्षित होणार. काही लोकांमध्ये हे संकेत इतके स्ट्रॉन्ग असतात की डास आपोआप त्यांच्याकडे खेचले जातात.
चला, आपल्या शरीराचे रक्त शोषून घेणारे हे छोटे कीटक आपल्याला कसे शोधतात, यामागची तीन मुख्य कारणं सोप्या भाषेत समजून घेऊया.
अशा प्रकारे कळते की शिकार आसपास आहे
माणसांना फक्त मादी डास चावतात. त्या आपल्या रक्ताकडे आकर्षित होतात कारण रक्तामधून त्यांना प्रोटीन मिळते जे त्यांच्या अंड्यांच्या विकासासाठी आवश्यक असते.
डास साधारण 10 मीटर (33 फूट) अंतरावरूनच आपला शिकार ओळखू शकतात. पाहण्याची आणि वास घेण्याची उत्तम क्षमता यामुळे त्यांना हे सहज जमतं.
आपण श्वासावाटे आणि त्वचेद्वारे जो कार्बन डायऑक्साइड (CO2) गॅस बाहेर सोडतो, तो डासांना आपल्याला शोधण्यात खूप मदत करतो.
माणसाच्या श्वासातील हाच कार्बन डायऑक्साइड डासांना संकेत देतो की आसपास कोणीतरी शिकार उपलब्ध आहे. हा सिग्नल मिळताच डासांची शिकार शोधण्याची यंत्रणा लगेच ॲक्टिव्ह होते आणि ते त्या व्यक्तीच्या दिशेने झेपावू लागतात.
मोठी माणसे हवेत जास्त प्रमाणात कार्बन डायऑक्साइड सोडतात, त्यामुळे लहान मुलांच्या तुलनेत डास त्यांना जास्त चावतात. याच कारणामुळे डास केवळ माणसांकडेच आकर्षित होत नाहीत, तर कार्बन डायऑक्साइड मिळणाऱ्या इतर स्रोतांकडेही खेचले जातात. हेच कारण आहे की डासांना पकडण्याच्या सापळ्यांमध्ये ड्राय आईस आणि बाटल्यांमध्ये भरलेल्या कार्बन डायऑक्साइडचा वापर केला जातो.
संशोधनातून असं समोर आलं आहे की, डास शरीराची उष्णता आणि दमटपणा यांकडेही आकर्षित होतात. कार्बन डायऑक्साइडमुळे निर्माण होणारी उष्णता आणि आर्द्रता या आकर्षणामध्ये आणखी भर घालते. याच कारणामुळे, इतर महिलांच्या तुलनेत गरोदर महिलांना डास चावण्याचं प्रमाण जवळपास दुप्पट असू शकतं असं सांगितलं गेलं आहे.
असं होण्यामागचं कारण म्हणजे गरोदरपणात शरीराची पचनक्रिया (मेटाबॉलिज्म) आणि श्वास घेण्याची गती वाढलेली असते. त्यामुळे शरीर जास्त उष्णता निर्माण करतं आणि शरीरातून कार्बन डायऑक्साइडही जास्त बाहेर पडतो.
ब्रिटनच्या डरहम युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर स्टीव लिंडसे यांनी सांगितलं होतं की, "या काळात तुमच्या शरीराच्या आत एका लहान भट्टीसारखं काम सुरू असतं, म्हणूनच शरीर जास्त गरम होतं."
व्यायाम किंवा कसरत करणाऱ्या लोकांकडेही डास जास्त खेचले जातात. खासकरून कसरत करताना किंवा त्यानंतर लगेचच. याचं कारण असं आहे की व्यायामा दरम्यान शरीराचा मेटाबॉलिझ्म वेगवान होतो ज्यामुळे जास्त कार्बन डायऑक्साइड बाहेर पडतो.
सोबतच शरीर जास्त गरम होतं आणि घामही अधिक येतो. असंच काहीसं जड शरीर असलेल्या लोकांच्या बाबतीतही होतं. त्यांच्याकडेही डास लवकर आकर्षित होतात. कारण त्यांचं शरीर सामान्यतः अधिक उष्णता निर्माण करतं आणि ते जास्त कार्बन डायऑक्साइड सोडतात.
त्वचेच्या वासावरून ठरतं की डास कोणाला चावणार
डास जेव्हा आपल्या शिकारीच्या 10 मीटरपेक्षा कमी अंतरावर येतात तेव्हा ते त्वचेचा आणि श्वासाचा वास घेऊन नेमका माणूस शोधून काढतात.
प्रोफेसर स्टिव्ह लिंडसे यांनी आधी सांगितलं होतं की, "हा सगळा फक्त वासाचा खेळ आहे. डास कोणाला जास्त चावणार हे बऱ्याच अंशी त्या माणसाच्या शरीराच्या वासावरच ठरतं.
प्रत्येकाच्या शरीरातून निघणाऱ्या वेगवेगळ्या केमिकल्सचा वास याला कारणीभूत असतो. डास हे पूर्णपणे वासाच्या आणि रसायनांच्या दुनियेत जगत असतात.
ज्यांचं रक्त गोड असतं त्यांना डास जास्त चावतात हा समज प्रोफेसर लिंडसे आणि त्यांच्या सोबतच्या वैज्ञानिकांनी चुकीचा सिद्ध केला आहे.
त्यांनी केलेल्या संशोधनानुसार असं सांगितलं होतं की, डास प्रत्येक माणसाच्या त्वचेतून येणाऱ्या एका विशिष्ट आणि वेगळ्या वासामुळे खेचले जातात.
आपल्या त्वचेवर असणारे छोटे सूक्ष्म जीव (मायक्रोऑर्गॅनिझम) कार्बोहायड्रेट, फॅटी ॲसिड आणि पेप्टाईड सारख्या पदार्थांचे विघटन करून आणि त्यातून एक विशिष्ट प्रकारचा गॅस किंवा वास तयार होतो जो हवेत पसरतो.
हा वास हवेत अगदी सहज पसरतो आणि डास तो लगेच ओळखतात. आपल्या त्वचेतून चक्क 500 हून अधिक प्रकारचे वेगवेगळे वास बाहेर पडत असतात.
आपल्या त्वचेवर आधीपासूनच असणाऱ्या अमोनिया आणि लॅक्टिक ॲसिडमुळे डास आपल्याकडे खेचले जातात. त्यात जर त्वचेवर कार्बोक्सिलिक ॲसिडचे प्रमाण जास्त असेल तर डास तिथे जास्तच आकर्षित होतात असं संशोधनातून समोर आलं होतं.
संशोधनातून काय समोर आलं?
अमेरिकेच्या रॉकफेलर युनिव्हर्सिटीमधील संशोधकांनी 64 लोकांच्या त्वचेच्या वासाचा अभ्यास केला होता.
यासाठी सहभागी झालेल्या लोकांना 6 तास नायलॉनचे कपडे घालण्यास सांगितले गेले जेणेकरून त्यांच्या त्वचेचा वास त्या कपड्यांमध्ये उतरेल.
यानंतर डासांना या नमुन्यांमधून आपली आवड निवडण्याची संधी दिली गेली. निकालांवरून असं समोर आलं की, ज्यांच्या त्वचेवर कार्बोक्सिलिक ॲसिडचं प्रमाण जास्त होतं त्यांच्या कपड्यांकडे डास जास्त खेचले गेले.
संशोधकांनी प्रत्येक व्यक्तीसाठी एक 'स्कोअर' (Mosquito Attraction Score) तयार केला होता. ज्या व्यक्तीचा स्कोअर सर्वात जास्त होता ती व्यक्ती सर्वात कमी स्कोअर असलेल्या व्यक्तीच्या तुलनेत 100 पट जास्त आकर्षक आढळली.
विशेष गोष्ट म्हणजे, लोकांनी आपली लाईफस्टाईल बदलली तरीही त्यांच्यात असणारा हा फरक कित्येक वर्षं तसाच राहिला.
प्रोफेसर स्टिव्ह लिंडसे यांनी आधी सांगितलं होतं की, "डास तुमच्याकडे किती आकर्षित होणार हे बऱ्याच प्रमाणात आधीपासूनच निश्चित झालेलं असतं."
त्वचेवरचे बॅक्टेरिया वाढवू शकतात डासांचं आकर्षण
आपल्या त्वचेवर कोणत्या प्रकारचे सूक्ष्म जीव (मायक्रो ऑर्गॅनिझम) राहतात यावरही डास आपल्याकडे किती खेचले जाणार हे ठरतं.
नेदरलँड्सच्या वागेनिंगेन युनिव्हर्सिटीत संशोधकांना असं आढळून आलं की, ज्या लोकांकडे मलेरिया पसरवणारे डास जास्त जात होते, त्यांच्या त्वचेवरच्या बॅक्टेरियांची रचना इतरांपेक्षा वेगळी होती.
त्यांच्या त्वचेवर एकूण बॅक्टेरियांची संख्या तर जास्त होती. पण त्यांच्यात वेगवेगळ्या प्रकारच्या प्रजाती फारशा नव्हत्या.
याचं एक कारण असं असू शकतं की, त्वचेवर असणारे बॅक्टेरिया शरीराचा एक विशिष्ट वास तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. खरं तर, जर त्वचेवर हे बॅक्टेरिया नसतील तर माणसाच्या घामाला अजिबात वास येणार नाही.
जुळ्या मुलांवर केलेल्या एका स्टडीमध्ये असं आढळून आलं होतं की, जे जुळे भाऊ किंवा बहीण अगदी एकसारखे दिसतात त्यांच्याकडे डास सारख्याच प्रमाणात खेचले जातात.
पण जे जुळे असूनही एकमेकांपेक्षा वेगळे दिसतात त्यांच्या बाबतीत मात्र डासांचं आकर्षण वेगवेगळं होतं.
यावरून असा अंदाज लावला गेला आहे की डासांना आकर्षित करणारा आपल्या शरीराचा वास हा अनुवांशिक असू शकतो. म्हणजेच याचा थेट संबंध आपल्या जीन्सशी सुद्धा असू शकतो.
प्रत्येकावर डास चावण्याचा परिणाम वेगळा
डास चावल्यानंतर त्याचा प्रत्येक व्यक्तीच्या शरीरावर होणार परिणाम वेगवेगळा असू शकतो.
एका मोठ्या जनुकीय अभ्यासात असं आढळून आलं आहे की, आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कशी काम करते आणि डास चावल्यावर शरीर त्याला कसा प्रतिसाद देतं याचा थेट संबंध आपल्या जीन्सशी असतो.
विशेष बाब म्हणजे हेच जीन्स शरीरात होणाऱ्या ॲलर्जीशी संबंधित जीन्सशी देखील जोडलेले असतात.
याव्यतिरिक्त काही लोकांमध्ये डास चावल्यानंतर त्वचेवर जास्त सूज येण्याची आणि मोठे डाग पडण्याची शक्यता असते. यामुळे त्यांना असं वाटू शकतं की डास त्यांना एखाद्या चुंबकासारखं स्वतःकडे खेचतात.
वैज्ञानिक फर्ग्युसन यांनी सांगितलं होतं की, "काही लोकांना असं वाटत असतं की डास फक्त त्यांच्याच मागे लागतात. पण खरं तर डास चावल्यावर त्यांच्या शरीरावर होणारा परिणाम जास्त असतो. याउलट काही लोकांना डास खूप चावत असूनही त्यांच्या शरीरावर त्याचा फारसा परिणाम दिसत नाही."
हे खरं आहे की काही लोकांकडे डास जन्मतःच जास्त आकर्षित होतात. पण डासांपासून शंभर टक्के सुरक्षित कोणीच नसतं.
फर्ग्युसन असंही म्हणाले होते की, "जरी तुम्हाला वाटत असलं की डास तुम्हाला अजिबात चावत नाहीत तरीही स्वतःच्या रक्षणासाठी लागणारी सगळी काळजी तुम्ही घेतलीच पाहिजे."
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.