उद्धव ठाकरेंना सुषमा अंधारेंच्या पदराचा आधार घ्यावा लागतोय – रामदास कदम

रामदास कदम

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, रामदास कदम
Published

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया

1) उद्धव ठाकरेंना सुषमा अंधारेंच्या पदराचा आधार घ्यावा लागतोय – रामदास कदम

“उद्धव ठाकरे यांना सध्या सुषमा अंधारे यांच्या पदराचा सहारा घ्यावा लागतो. उद्धव ठाकरे यांच्याकडे आता कुणीच राहिलं नाही, त्यामुळे जो येईल त्याला पक्षात घ्यायचं, हा एककलमी कार्यक्रम उद्धव ठाकरे यांनी सुरू केलाय,” अशी टीका माजी मंत्री आणि ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षाचे नेते रामदास कदम यांनी केलीय. लोकसत्तानं ही बातमी दिलीय.

सध्या महाराष्ट्रात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्यात युती होणार असल्याची चर्चा सुरू आहे.

या मुद्द्यावरून रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली.

“प्रकाश आंबेडकर आणि सुषमा अंधारेंमुळे उद्धव ठाकरेंची प्रचंड ताकद वाढणार आहे. त्यांना माझ्या शुभेच्छा,” अशी उपरोधिक टीका रामदास कदम यांनी केली.

“आता खऱ्या अर्थानं उद्धव ठाकरे यांचं पितळ उघडं पडतंय, हे चांगलं आहे. त्यांना खूप शुभेच्छा,” असंही रामदास कदम म्हणाले.

2) ‘आजची शांतता, उद्याचं वादळ.. नाव लक्षात ठेवा.. तेजस ठाकरे’

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पक्षातील नेते सोडून जात असताना, घरातूनच नवा सहकारी पुढे येण्याची शक्यता आहे. तशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झालीय.

मुंबईतील गिरगावात शिवसैनिकांनी बॅनर लावत, उद्धव ठाकरेंचे धाकटे पुत्र तेजस ठाकरे यांच्या राजकीय एंट्रीचे संकेत दिलेत. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिलीय.

तेजस ठाकरे

फोटो स्रोत, Twitter

‘आजची शांतता... उद्याचं वादळ... नाव लक्षात ठेवा... तेजस उद्धव साहेब ठाकरे’ असं मजकूर या बॅनरवर असून, तेजस ठाकरे यांचा मोठा फोटा आणि त्यामागे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो दिसतात.

मुंबई महापालिका निवडणूक या वर्षात होण्याची शक्यता आहे. अशावेळी तेजस ठाकरेंची एंट्री राजकारणात होते का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

3) माजी अर्थसचिव अरविंद मायाराम यांच्यावर गुन्हा दाखल

केंद्रीय अर्थमंत्रालयाचे माजी सचिव अरविंद मायाराम यांच्याविरोधात सीबीआयनं गुन्हा दाखल केला आहे. मायाराम यांच्याशी संबंधित दिल्ली आणि जयपूरमधील मालमत्तांवर सीबीआयनं छापे टाकले. इकोनॉमिक्स टाइम्सनं ही बातमी दिलीय.

मायाराम यांच्यासह ब्रिटनस्थित कंपनी आणि अर्थ मंत्रालयातील अज्ञात अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल नोंदवण्यात आलाय.

विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच मायाराम हे राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त

चलनी नोटांमध्ये वापरण्यात येणाऱ्या रंग बदलणाऱ्या धाग्याचे कंत्राट ब्रिटनच्या दे ला रू इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनीला नियमबाह्य पद्धतीने देण्यात आल्याचा आरोप सीबीआयनं केला आहे.

4) भारत-चीन सीमेवरील स्थिती नियंत्रणात, पण... – भारताचे लष्करप्रमुख   

भारत-चीन सीमेवरील स्थित नियंत्रणात असली तरी अंदाज लावता येणार नाही अशी आहे, असं भारताचे लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे म्हणाले. द ट्रिब्युननं ही बातमी दिलीय.

लष्कर दिवसाचं निमित्त साधत जनरल मनोज पांडे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

मनोज पांडे

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, मनोज पांडे

लष्करातील साहित्याच्या आधुनिकीकरणावर भर देणार असल्याचं यावेळी मनोज पांडे म्हणाले.

“भारताकडे आजच्या घडीला 45 टक्के विंटेज इक्विपमेंट्स आहेत, 41 टक्के आताच्या तंत्रज्ञानावर आहेत.”

5) शीना बोरा हत्या – कोर्टानं गुवाहाटी विमानतळाचे CCTV फुटेज मागवले

शीना बोरा हत्याकांडातील आरोपी इंद्राणी मुखर्जीने शीना बोरा जिवंत असल्याचा दावा केलाय. आसाममधील गुवाहाटी विमानतळावर शीनाला पाहिल्याचं तिने म्हटलंय.

त्यानंतर सीबीआयच्या विशेष कोर्टानं गुवाहाटी विमानतळ प्रशासनाला नोटीस जारी करत CCTV फुटेज देण्याची मागणी केलीय.

या प्रकरणात पुढची सुनावणी 2 फेब्रुवारीला होणार आहे. दैनिक भास्करनं ही बातमी दिलीय.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)