You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
व्हेनेझुएलामध्ये लागोपाठ झालेल्या तीव्र भूकंपांमुळे 32 जण ठार, 700 जण जखमी
व्हेनेझुएलाची राजधानी कराकास येथे काही सेकंदाच्या अंतराने एकापाठोपाठ भूकंपाचे दोन तीव्र झटके आले. पहिला झटका 7.2 होता तर दुसरा 7.5 तीव्रतेचा होता.
व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 32 जणांचा मृत्यू झाला आहे आणि 700 जण जखमी झाले आहेत.
मात्र, या भूकंपामुळे मृतांचा आकडा खूपच जास्त असू शकतो आणि मोठ्या प्रमाणावर विध्वंस होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
'युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हे'च्या (USGS) मते, मृतांची संख्या 10 हजारच्या वर जाण्याची शक्यता 44 टक्के आहे.
देशाला उद्देशून केलेल्या भाषणात, व्हेनेझुएलाच्या हंगामी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांनी आणीबाणी जाहीर केली आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे आणि सर्वतोपरी मदतीची तयारी दर्शवली आहे.
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी सांगितलं आहे की, अमेरिका व्हेनेझुएलामध्ये "तात्काळ शोध आणि बचाव पथके, वैद्यकीय संसाधने आणि मानवतावादी मदत" पाठवत आहे.
या भूकंपामुळे इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत आणि लोक आपल्या घरातून निघून रस्त्यावर आले आहेत. आपली घरे रिकामे करावीत असे आवाहन गृहमंत्र्यांनी नागरिकांनी केले आहे.
नॅशनल हॉलिडे असल्यामुळे भूकंपावेळी अनेक लोक आपल्या घरी उपस्थित होते. स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी 6.04 वाजता भूकंप आला.
भूकंपाचे केंद्र कराकासच्या पश्चिमेला मोंटालबान क्षेत्रात होते. हा झटका इतका तीव्र होता की कोलंबियाची राजधानी बोगोटापर्यंत याचे हादरे जाणवले.
व्हेनेझुएलाच्या इतर राज्यातही भूकंपाचे झटके जाणवले. व्हेनेझुएलाच्या गृहमंत्र्यांनी टीव्हीवर सांगितले की देशातील इतर राज्य देखील प्रभावित झाली आहेत.
व्हीटीव्ही शी फोनवरुन बोलताना त्यांनी म्हटले की सर्व संकेत हेच सांगत आहेत की या भूकंपांची तीव्रता सातहून अधिक होती.
गृहमंत्री म्हणाले, या झटक्यांची तीव्रता त्रूजिलो, याराकुई, काराबोबो, अरागुआ, मिरांडा, कराकास आणि ला गुआइरा या ठिकाणी जाणवली.
पुढे त्यांनी सांगितले की कराकासमध्ये पालोस ग्रांदेस आणि अल्तामीरा हे भाग भूकंपामुळे सर्वाधिक प्रभावित झाले आहेत.
ट्रम्प आणि पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दु:ख
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 'ट्रुथ सोशल' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील एका पोस्टमध्ये जाहीर केलं की, त्यांनी व्हेनेझुएलाच्या जनतेला मदत करण्यासाठी सज्ज राहण्याचे निर्देश अमेरिकन संस्थांना दिले आहेत.
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी 'ट्रुथ सोशल'वर लिहिलंय की, "व्हेनेझुएलाच्या जनतेला बसलेले दोन मोठे भूकंप अत्यंत तीव्र होते आणि त्यात मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली आहे. अमेरिका मदत करण्यास सज्ज आणि इच्छुक आहे."
त्यांनी पुढे लिहिलंय की, "मी माझ्या सरकारच्या सर्व यंत्रणांना त्वरित कारवाई करण्यासाठी सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत. आमच्या या नवीन आणि चांगल्या मित्रांच्या मदतीसाठी आम्ही तत्पर असू."
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मृतांच्या कुटुंबीयांबद्दल शोक व्यक्त केला आहे.
पंतप्रधान मोदींनी 'एक्स' (X) वर लिहिलंय की, "व्हेनेझुएलामध्ये झालेल्या तीव्र भूकंपामुळे निर्माण झालेल्या विनाशामुळे मला अत्यंत दुःख झालं आहे. भारतीयांच्या वतीने, मी व्हेनेझुएलाचे सरकार आणि तिथल्या जनतेप्रती, तसेच ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावलं आहे, त्या कुटुंबांप्रती माझ्या अत्यंत संवेदना व्यक्त करतो."
पंतप्रधानांनी पुढे लिहिलंय की, "आम्ही जखमी लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो आणि या कठीण काळात बाधित झालेल्या सर्वांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. भारत सर्वतोपरी मदत करण्यास सज्ज आहे."
व्हेनेझुएलामध्ये भूकंप का झाला?
व्हेनेझुएला हा भूकंप होण्याचा अत्यंत उच्च धोका असलेल्या प्रदेशात वसलेला देश आहे. इथे कॅरिबियन प्लेट आणि दक्षिण अमेरिकन प्लेट या दोन टेक्टोनिक प्लेट्स एकमेकांना मिळतात.
युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हेनुसार, बुधवारी झालेल्या दोन भूकंपांपैकी दुसरा आणि अधिक तीव्र धक्का या प्लेट्सच्या (भूगर्भीय पट्ट्यांच्या) सीमेजवळील हालचालींमुळे बसला होता.
याचा अर्थ असा की, टेक्टोनिक प्लेट्समधील दोष-रेषा (fault lines) किंवा भेगा क्षितिजसमांतर दिशेने सरकतात. जेव्हा ही हालचाल अचानक आणि वेगाने होते, तेव्हा भूकंप होतो.
यूएसजीएस (USGS) ने म्हटलं आहे की, "जरी नकाशांवर भूकंप अनेकदा केवळ एका बिंदूद्वारे दर्शवले जात असले, तरी या तीव्रतेच्या भूकंपाकडे एका मोठ्या 'फॉल्ट' (भ्रंश) क्षेत्रावर होणारी हालचाल किंवा स्लीप म्हणून पाहणं अधिक योग्य ठरेल."
एजन्सीच्या मते, आज झालेले दोन भूकंप बहुधा "जमिनीतील भेगांच्या (rupture) परस्परक्रियेची एक गुंतागुंतीची प्रक्रिया" दर्शवतात.
USGS ने असा इशाराही दिला आहे की आणखी धक्के बसण्याची शक्यता कायम आहे आणि त्यापैकी काही धक्के बऱ्यापैकी तीव्र असू शकतात.
कोलंबियापर्यंत जाणवले धक्के
बीबीसीचे उत्तर अमेरिका प्रतिनिधी विल ग्रँट यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हीडिओंमध्ये अनेक इमारतींना तडे गेल्याचे दिसून येत आहे. काही इमारतींचे मोठे नुकसान झाले असून काही इमारती कोसळल्याही आहेत.
आफ्टरशॉकच्या (पुन्हा बसणाऱ्या धक्क्यांच्या) भीतीमुळे हजारो लोक अजूनही आपल्या घरांमध्ये परतलेले नाहीत.
भूकंपाचे धक्के कोलंबियाची राजधानी बोगोटापर्यंत जाणवले.
सर्वाधिक नुकसान झालेल्या भागांचा आढावा घेण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे नेमकं किती नुकसान झालं आहे, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
(ही बातमी सातत्याने अपडेट होत आहे.)
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)