You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर पुन्हा हल्ल्याचा प्रयत्न, FBI ने दिली ही माहिती
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि यंदा राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतले उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर पुन्हा एकदा हल्ल्याचा प्रयत्न झाला आहे. अमेरिकेची गुप्तहेर संस्था FBI नं याची पुष्टी केली असून या प्रकरणात एका संशयिताला अटक करण्यात आली आहे.
फ्लोरिडा इथे ट्रम्प यांच्या गोल्फ कोर्सवर हा प्रकार घडला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार झुडपांआड रायफलची नळी दिसल्यावर गुप्तहेरांनी त्या दिशेला गोळी झाडली आणि हा हत्येचा प्रयत्न हाणून पाडला.
हल्लेखोरापासून ट्रम्प त्यावेळी पावणे तीनशे ते साडेचारशे मीटरवरच होते. तपास यंत्रणांना घटनास्थळी AK -47 सारखी बंदूक आणि दुर्बिण तसंच दोन बॅगा आणि एक गोप्रो कॅमेरा सापडला आहे.
याआधी 13 जुलै रोजी पेन्सिल्वेनिया राज्यातील एका सभेदरम्यान ट्रम्प यांच्यावर गोळीबार झाला होता. त्यावेळी हल्लेखोराने झाडलेली गोळी त्यांच्या कानाला चाटून गेली होती.
व्हाईट हाऊसनं प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, याविषयी राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांना माहिती देण्यात आली आहे. दोघांनी हल्ल्याचा निषेध केला आहे.
दरम्यान, अमेरिकन माध्यमांनी तसंच बीबीसीची अमेरिकेतली सहयोगी वृत्तवाहिनी CBS नं दिलेल्या वृत्तानुसार एका अधिकाऱ्यानं संशयित हल्लेखोराचं नाव वेल्स्ली रूथ असल्याचं जाहीर केलं आहे. 58 वर्षीय रूथ हवाईचा रहिवासी आहे.
बीबीसी व्हेरिफायनं या व्यक्तीशी मिळत्या जुळत्या सोशल मिडिया प्रोफाईलची पाहणी केली. त्यानुसार रूथनं युक्रेनमध्ये रशियाविरुद्ध लढण्यासाठी जाण्याचं आवाहन केलं होतं. तसंच नॉर्थ कॅरोलिना राज्यात काही गुन्ह्यांसाठी त्याला शिक्षा झाल्याची माहिती मिळते आहे.
प्रत्यक्षदर्शीने काय पाहिले?
घटनास्थळी उपस्थित लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, FBI च्या एजंटने गोळ्या झाडल्यावर झुडुपातून संशयित बाहेर पडला आणि घाईनं एका काळ्या रंगाच्या कारमध्ये घुसला.
एका प्रत्यक्षदर्शीनं नंबर प्लेटसह गाडीचा फोटो घेतला. ही कार नंतर क्लबच्या उत्तरेला मार्टिन काऊंटीमध्ये अडवण्यात आली.
पाम बीच काऊंटीचे शेरिफ (शेरिफ ही अमेरिकेतील कायदा-सुव्यवस्थेची अंमलबजावणी राबवणारी यंत्रणा) रिक ब्राडशॉ म्हणाले की, "आम्हाला मार्टीन काऊंटीच्या शेरिफ ऑफिसनं अलर्ट केलं. त्यांनी गाडी पाहताच, तातडीनं कारवाई करत त्या व्यक्तीला ताब्यात घेतलं."
अधिकारी म्हणाले की, "त्यानंतर आम्ही प्रत्यक्षदर्शीकडे गेलो. त्यांनी झुडपातून पळालेला संशयित तोच असल्याची ओळख पटवली."
या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या समर्थकांना ई मेल पाठवत ते सुरक्षित असल्याचं सांगितलं.
ट्रम्प म्हणाले की, "माझा वेग कोणी रोखू शकत नाही. मी कधीही हार मानणार नाही."
सिक्रेट सर्व्हिस एजंट प्रकरणाचा तपास करत आहेत, असं म्हटलं आहे.
शेरिफ ब्राडशॉ यांनी गोल्फ कोर्समध्ये असलेल्या सिक्रेट सर्व्हिसने उत्तम कामगिरी निभावल्याचं म्हटलं आहे.
"सिक्रेट सर्व्हिसकडे एक असा एजंट असतो जो ट्रम्प यांना जिथं जायचं आहे, तिथं आधीच पोहोचतो. त्यामुळं त्याला बंदूक दिसली. त्यांनी लगेचच कारवाई केली," असं ते म्हणाले.
बायडन आणि हॅरिस काय म्हणाले?
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष कार्यालयाकडून सांगण्यात आलं की, राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांना या घटनेबाबत माहिती देण्यात आली आहे.
डोनाल्ड ट्रम्प गोल्फ खेळत होते, तो क्लब ट्रम्प इंटरनॅशनल गोल्फ म्हणून ओळखला जातो.
व्हाईट हाऊसनं प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, ट्रम्प सुरक्षित असल्याच्या बातमीनं राष्ट्राध्यक्ष आणि और उपराष्ट्राध्यक्षांना दिलासा मिळाला. बायडन आणि हॅरिस यांना याबाबत सातत्यानं माहिती दिली जात आहे, असंही त्यांनी सांगितलं.
कमला हॅरिस यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत, "अमेरिकेत हिंसाचाराला थारा नाही," असं म्हटलं.
जो बायडन यांनी म्हटलं की, "राजकीय किंवा दुसऱ्या कोणत्याही प्रकारच्या हिंसाचारालाही देशात स्थान नाही, हे मी आधीही अनेकदा म्हटलं आहे."
ट्रम्प यांचे उपराष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार जेडी वेन्स म्हणाले की, "ही बातमी येण्यापूर्वी माझे ट्रम्प यांच्याशी बोलणे झाले. ते पूर्णपणे ठीक आहेत. फार काही माहिती नाही. मी आता देवाचे जास्त आभार मानणार आहे."
ट्रम्प यांच्यावरील हल्ल्यानंतर फ्लोरिडामध्ये त्यांच्या घराबाहेर समर्थक जमायला सुरुवात झाली आहे.
ट्रम्प यांच्यावरील आधीचा हल्ला
13 जुलैला पेन्सिल्व्हेनिया राज्यातील एका प्रचार सभेत ट्रम्प यांच्यावर हल्ला झाला होता. त्यावेळी ट्रम्प यांच्या चालवण्यात आलेली गोळी, त्यांच्या कानाला चाटून गेली होती.
त्यावेळी समोर आलेल्या फोटोंमध्ये ट्रम्प यांच्या कानातून रक्त आल्याचंही दिसलं होतं.
ट्रम्प यांच्यावर त्यावेळी हा हल्ला सभेच्या ठिकाणाजवळ असलेल्या एका जागेच्या छतावरून करण्यात आला होता.
हल्लेखोराचं नाव थॉमस मॅथ्यू क्रूक्स होतं आणि तो 20 वर्षांचा होता. थॉमसला तेव्हा सिक्रेट सर्व्हीसच्या स्नायपरने गोळी मारली होती.
या घटनेनंतर सिक्रेट सर्व्हिसवर अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या सुरक्षा रक्षकांनी हल्लेखोरांना त्याच्या एवढं जवळ कसं येऊ दिलं, असे प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले होते.
थॉमसनं 130 मीटर अंतरावरून ट्रम्प यांच्यावर गोळी झाडली होती.
घटनेच्या दोन आठवड्यांनंतर सिक्रेट सर्व्हीसचे डायरेक्टर किम्बर्ली चीटल यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)