डिपॉझिट जप्त झालेल्या उमेदवाराला नाना पटोले भंडारा-गोंदियामधून कसं निवडून आणणार?

    • Author, प्रतिनिधी
    • Role, बीबीसी मराठी
  • Published

डॉ. बाबासाहेब आंबेडकर, प्रफुल्ल पटेल, डॉ. श्रीकांत जिचकार यांच्यासारख्या दिग्गजांना पराभूत करणारा मतदारसंघ म्हणून भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाची ओळख आहे.

2014 लोकसभा निवडणुकीसाठी भाजपनं सुनील मेंढे यांना पुन्हा एकदा संधी दिली, तर काँग्रेसकडून प्रशांत पडोळे यांच्यासारखा नवीन उमेदवार रिंगणात आहे.

नाना पटोलेंनी इतक्या नव्या चेहऱ्याला संधी का दिली? सुनील मेंढे विरुद्ध प्रशांत पडोळे ही लढत कशी असेल? राष्ट्रवादी सोबत नसल्याचा काँग्रेसला काही फटका बसेल का? शिवाय बहुजन समाजवादी पक्षानं सुद्धा भाजपच्या माजी नगरसेवकाला उमेदवारी दिली आहे.

त्याचा फटका कोणाला बसणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात. पण, त्याआधी या मतदारसंघाचा इतिहास, जातीय समीकरणं आणि पक्षीय बलाबल या मुद्द्यांवर एक नजर टाकूया.

दिग्गजांना पराभूत करणारा मतदारसंघ

भंडारा लोकसभा मतदारसंघ असं सुरुवातीला या मतदारसंघाचं नाव होतं. याच मतदारसंघातून 1954 साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पोटनिवडणूक लढवली होती. पण या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता.

त्यानंतर डॉ. श्रीकांत जिचकार या उच्चशिक्षित तरुण नेत्याला देखील भंडारा लोकसभा मतदारसंघातून पराभवाचा सामना करावा लागला होता.

प्रफुल्ल पटेल या मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकीटावर निवडून गेले होते.

2008 नंतर सीमांकनामध्ये भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आला. तसेच प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादीसोबत गेले. पटेल राष्ट्रवादीचे खासदार म्हणून इथून निवडून गेले.

हा मतदारसंघ सुरुवातीला काँग्रेसच्या ताब्यात होता. पण, प्रफुल्ल पटेल शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत गेले आणि या मतदारसंघात काँग्रेसचं वर्चस्व कमी होत गेलं.

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीमध्ये हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे राहिला. त्यामुळे प्रफुल्ल पटेल 2009 ला लोकसभेवर निवडून गेले. 2014 ला देखील त्यांना लोकसभेचं तिकीट मिळालं होतं.

पण, नाना पटोले यांनी बंडखोरी करत भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यांना भाजपनं पटेलांच्याविरोधात मैदानात उतरवलं.

पटोलेंनी पटेलांचा पराभव करून दाखवला. पण, शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून राजीनामा देत पटोलेंनी पुन्हा काँग्रेसमध्ये घरवापसी केली.

आता जवळपास 25 वर्षांनंतर काँग्रेसच्या पंजा या चिन्हावर भंडारा गोंदियात उमेदवार निवडणूक लढवणार आहे.

विधानसभा मतदारसंघातलं पक्षीय बलाबल

भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात तीन विधानसभा मतदारसंघ भंडाऱ्यातील, तर तीन गोंदिया जिल्ह्यातील येतात.

तुमसर, भंडारा, साकोली हे भंडारा जिल्ह्यातले, तर अर्जुनी मोरगाव, तिरोडा आणि गोंदिया हे गोंदिया जिल्ह्यातील मतदारसंघ आहेत. आता प्रफुल पटेल यांचा पाठिंबा अजित पवार यांच्याकडे आहे.

पटेल महायुतीत गेल्यामुळे या मतदारसंघातील राजकीय गणितं बदलली आहेत. त्याचाही परिणाम या निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. त्यासाठी विधानसभा मतदारसंघात कोणाकडे किती संख्याबळ आहे हे बघावं लागेल.

भाजप-काँग्रेसची कुणबी उमेदवाराला पसंती का?

प्रत्येक निवडणुकीत या मतदारसंघातील जातीचं राजकारण निर्णायक ठरतं. या मतदारसंघात कुणबी समाजाचं वर्चस्व आहे. त्यापाठोपाठ तेली आणि पोवार समाजाची मतं आहेत. तसेच अनुसूचित जातीचाही मतदारवर्ग इथं दिसतो.

गेल्या काही निवडणुकांचा इतिहास पाहिला तर कुणबी उमेदवार या मतदारसंघातून विजयी होताना दिसतोय. त्यामुळे या निवडणुकीतही भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी कुणबी उमेदवार रिंगणात उतरवले आहेत.

दुसरीकडे बहुजन समाजवादी पक्षानं देखील तेली समाजाच्या संजय कुंभलकर यांना उमेदवारी दिली आहे. तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या पोवार समाजाची मतं कुणाकडे जातात त्यावर विजयाचं गणित अवलंबून असणार आहे.

काँग्रेसने डिपॉझिट जप्त झालेल्या उमेदवाराला का तिकीट दिलं?

काँग्रेसनं नाना पटोले यांना भंडारा गोंदिया मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढायला सांगितलं होतं. तसेच स्थानिक कार्यकर्त्यांनी देखील तुम्हीच निवडणूक लढा असा आग्रह पटोलेंकडे धरला होता.

त्यांच्या कार्यकर्त्यांनी पटोलेंसाठी फॉर्म देखील घेऊन ठेवला होता. पण आपल्याला राज्यभर प्रचार करायचा आहे. फक्त भंडारा गोंदियामध्ये अडकवू नका, असं नानांनी कार्यकर्त्यांना समजावलं.

त्यानंतर काँग्रेसनं सुनील मेंढे यांच्याविरोधात प्रशांत पडोळे यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघातील लोकांसाठी प्रशांत पडोळे हे नवीन आहेत. त्यांचा या मतदारसंघात जनसंपर्कदेखील नाही.

विदर्भातले सहकारमहर्षी यादवराव पडोळे यांचे सुपुत्र याशिवाय प्रशांत यांची ओळख नाही. पडोळे यांनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. यावेळी त्यांचं डिपॉजिट देखील जप्त झालं होतं. त्यामुळे काँग्रेसनं अशा उमेदवाराला संधी का दिली? असा प्रश्न आहे.

याबद्दल नागपूर 'लोकमत'चे संपादक श्रीमंत माने सांगतात, ''पक्षानं नाना पटोले यांना लोकसभा निवडणूक लढायला सांगितली होती. पण, त्यांना लोकसभेत उतरायचं नव्हतं. शेवटी मी माझ्या मर्जीतला उमेदवार देतो, असा शब्द पटोलेंनी पक्षाला दिला असावा. त्यानंतर प्रशांत पडोळे या मर्जीतल्या नेत्याला उमेदवारी देण्यात आली."

शिवाय प्रशांत पडोळे यांचे वडील यादवराव पडोळे हे नाना पटोलेंचे राजकीय गुरु मानले जातात. त्यामुळे त्यांच्या मुलाला तिकीट देऊन पटोलेंनी गुरुदक्षिणा दिली असं वाटतं.''

सुनील मेंढे विरुद्ध प्रशांत पडोळे कशी असेल लढत?

सुनील मेंढे हे पाच वर्ष खासदार होते. पण, या मतदारसंघात विकासकामे झालेली दिसत नाहीत. त्यामुळे त्यांच्याबद्दल मतदारसंघात नैसर्गिक नाराजी आहे.

भाजपनं परिणय फुके यांना उमेदवारी देण्याची तयारी केली होती. पण, काँग्रेसनं प्रशांत पडोळे यांच्यासारख्या राजकीय अनुभव नसलेल्या उमेदवाराला तिकीट दिलं.

समोरचं आव्हान मोठं नसल्यानं भाजपनं सुनील मेंढे यांना पुन्हा संधी दिली. मेंढे हे महायुतीचे उमेदवार असल्यानं त्यांच्यामागे प्रफुल्ल पटेल यांचीही ताकद आहे.

कारण, या मतदारसंघात तीन विधानसभा मतदारसंघ गोंदिया जिल्ह्यातील येतात. प्रफुल्ल पटेल यांनीच मेंढेंच्या उमेदवारीसाठी भाजपकडे आग्रह धरला होता.

त्यामुळे त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी पटेलांनी घेतली आहे. पटेलांचा मजबूत पाठिंबा ही मेंढेंची जमेची बाजू आहे. पण, मतदारांसमोर घेऊन जाण्यासाठी पाहिजे तशी विकास कामे झालेली नाही. मोदींचा चेहरा आणि राम मंदिर हे दोन मुद्दे मेंढे मतदारांसमोर घेऊन जाताना दिसतात.

सुनील मेंढे यांच्या तुलनेत पडोळे हे अतिशय नवीन उमेदवार आहेत.

नाना पटोलेंचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांची ओळख आहे. पण, प्रशांत पडोळे फक्त नाना पटोलेंच्या ताकदीवर निवडून येऊ शकतात का? याबद्दल श्रीमंत माने सांगतात,

''नाना पटोले यांना जनाधार आहे. ते स्वतः या मतदारसंघात उमेदवार असते तर निवडून आले असते. पण, ते त्यांच्या ताकदीवर अतिशय नवीन उमेदवाराला निवडून आणतील का? यात शंका आहे.

कारण, समोर फक्त भाजपचं नाहीतर प्रफुल्ल पटेल यांचं सुद्धा आव्हान आहे. पटेल आणि पटोले यांचा जुना वाद देखील आहे. त्यामुळे ही लढत भाजप विरुद्ध काँग्रेस अशी नसून प्रफुल्ल पटेल विरुद्ध नाना पटोले आहे.''

नाना पटोले आणि प्रफुल पटेल यांचा वाद काय?

हा मतदारसंघ भंडारा आणि गोंदिया अशा दोन जिल्ह्यात विभागलेला आहे. प्रफुल्ल पटेल हे गोंदियातील, तर नाना पटोले भंडाऱ्याचे आहेत.

पटेल काँग्रेसमध्ये होते तेव्हापासून या मतदारसंघातून निवडणूक लढत होते. पण, शरद पवारांनी राष्ट्रवादी पक्ष स्थापन केल्यानंतर पटेल पवारांसोबत गेले. त्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत ही जागा नेहमी राष्ट्रवादीला सुटली.

कारण, प्रफुल्ल पटेल इथून मजबूत दावेदार होते. 2014 ला नाना पटोले यांना उमेदवारी पाहिजे होती. पण, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीनं पुन्हा पटेलांच्या नावाला पसंती दिली. तसेच दोन्ही नेत्यांमधये अंतर्गत धुसफूस होतीच. त्यामुळे नाना पटोलेंनी काँग्रेसला रामराम ठोकला आणि भाजपमध्ये प्रवेश केला.

त्यांना भाजपनं लोकसभेची उमेदवारीही दिली. या निवडणुकीत पटोलेंनी गेली अनेक वर्ष खासदार राहिलेल्या पटेलांचा पराभव केला.

तेव्हापासून दोन्ही नेत्यांमधला वाद अधिकच वाढला. दरम्यानच्या काळात पटोलेंनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून राजीनामा दिला आणि काँग्रेसमध्ये घरवापसी केली.

यावेळी लागलेल्या पोटनिवडणुकीतही पटेलांनी मधुकर कुकडे यांना निवडून आणलं होतं. आता पटोलेंसोबत वाद असलेले पटेल भाजपप्रणित महायुतीत गेले आहेत. त्यामुळे पटेलांच्या आव्हानांचाही नाना पटोले यांना सामना करावा लागणार आहे. या मतदारसंघात दोन्ही नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

बसपचा फॅक्टर किती महत्वाचा?

भंडारा गोंदियात मतदारसंघात अनुसूचित जातीचा मतदार वर्ग आहे. पण, हा मतदार बसप आणि काँग्रेसकडे झुकलेला आहे.

या मतदारसंघात भाजपचे नेते संजय कुंभलकर यांना बसपने तिकीट दिलं आहे. कुंभलकर तेली समाजाचे नेते आहेत.

दुसरीकडे काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्षाचे उमेदवार हे कुणबी आहेत. त्यामुळे कुंभलकर फॅक्टर या निवडणुकीत महत्वाचा ठरू शकतो, असं श्रीमंत माने सांगतात.

ते म्हणतात, "तेली समाज ही भाजपची व्होट बँक समजली जाते. बसपनेही तेली समाजाच्या कुंभलकरांना संधी दिली आणि ते भाजपचे नेते आहेत. त्यांच्यामुळे तेली आणि भाजपच्या मतांमध्ये थोडं तरी विभाजन होईल. याचा फटका भाजपच्या सुनील मेंढे यांना बसू शकतो.''

हेही नक्की वाचा