‘संतांनी रेड्याला शिकवलं,’ वादग्रस्त वक्तव्य प्रकरणात सुषमा अंधारेंनी मागितली वारकऱ्यांची माफी #5मोठ्याबातम्या

Published

आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा..

1. ‘संतांनी रेड्याला शिकवलं,’ वादग्रस्त वक्तव्य प्रकरणात सुषमा अंधारेंनी मागितली वारकऱ्यांची माफी

शिवसेना पक्षाच्या (उद्धव ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आपल्या एका वादग्रस्त वक्तव्य प्रकरणात वारकऱ्यांची माफी मागितली आहे.

संतांनी रेड्याला शिकवलं. पण माणसांना कुठं शिकवलं, असं वक्तव्य सुषमा अंधारे यांनी आपल्या एका जुन्या व्हीडिओमध्ये केलं होतं.

सुषमा अंधारे यांचा वरील व्हीडिओ व्हायरल होत होता. यावरून वारकरी संतप्त झाल्याचं दिसून आलं.

राजकारण राजकारणाच्या बाजूला ठेवावं. ही टीका योग्य नसल्याचं वारकऱ्यांचं म्हणणं होतं. आळंदीत वारकऱ्यांनी अंधारेंच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी अंधारेंची प्रतिकात्मक अंत्ययात्राही काढली होती. अखेर, हे प्रकरण चिघळत चालल्याचं लक्षात येताच या मुद्द्यावर नमते घेऊन सुषमा अंधारे यांना माफी मागावी लागली.

यासंदर्भात एक पत्रकार परिषद घेऊन अंधारे म्हणाल्या, “मी संत ज्ञानेश्वरांबद्दल काहीही वावगे बोलले नाही. माझ्या आईच्या संदर्भाने बोलत असताना मी ते विधान केलं होतं. ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली. त्यांना माऊली म्हटलं गेलं. माझे वडील गेले. त्यानंतर माझ्या आईने 15 एकर कोरडवाहू शेतीत काम करून चार भिंतीचं घर चालवलं. ती माझ्यासाठी विश्ववंदनीय असली पाहिजे, असं मी म्हटलं होतं. पण ते विधान कापलं गेलं.

तरीही, वारकरी संप्रदायाला जर वाटत असेल, ताई तुमचं चुकत आहे. तर दोन्ही हात जोडून माफी मागताना गैर वाटणार नाही, असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे. ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली.

2. प्रकल्प गुजरातला नेले तसे काही जिल्हे कर्नाटकात नेले जाऊ शकतात – आदित्य ठाकरे

गुजरात निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील प्रकल्प तिकडे नेले तसे कर्नाटकच्या निवडणुकीसाठी इथले काही जिल्हे तिकडे नेले जाऊ शकतात, असा आरोप शिवसेना (उद्धव ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद प्रकरणात काल दोन्ही राज्यांच्या मंत्र्यांच्या समितीची एक बैठक केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत दोन्ही राज्यांमध्ये शांततेचं आणि सौहार्दाचं वातावरण राहावं, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, अशी सूचना दोन्ही राज्यांना करण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, “सीमावाद प्रकरणात कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून जो आक्रमकपणा दिसतो, तो कदाचित निवडणुकीसाठी असू शकतो. प्रत्येक वेळी महाराष्ट्राला यातना होतात, पण कोणालाही वाईट वाटत नाही.” ही बातमी लोकसत्ताने दिली.

3. समृद्धीच्या टोलमुळे लोक विमानाने जातील – जयंत पाटील

समृद्धी महामार्गावरील टोलचे दर सामान्य माणसाला परवडणारे नाहीत. त्यामुळे समृद्धीवरून जाण्याऐवजी जुन्या मार्गानेच जाणे लोक पसंत करतील. किंवा विमानानेही जास्त लवकर जाता येईल, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस नेते जयंत पाटील यांनी केलं आहे.

समृद्धी महामार्गावरील टोलचा मुद्दा उपस्थित करताना पाटील म्हणाले, “या प्रकल्पात मोठी गुंतवणूक झाली आहे. मात्र, याठिकाणी टोल इतका कसा, हे आम्ही मुख्यमंत्री आणि या खात्याच्या मंत्र्यांना विचारू, त्यांचे उत्तर योग्य नसेल तर मी त्याविरोधात आवाज उठवणार आहे.”

राज्य सरकारने या टोलबाबत स्वतः विचार केला पाहिजे. जनतेला कमी भुर्दंड ठेवला पाहिजे. याविषयी सरकारची बाजू ऐकून घेतल्यावर आम्ही भूमिका मांडणार आहोत, असंही पाटील यांनी म्हटलं. ही बातमी लोकमतने दिली.

 

4. महिंद्रा पुण्यात उभारणार 10 हजार कोटींचा प्रकल्प

प्रसिद्ध वाहन उत्पादक कंपनी महिंद्रा महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक करणार आहे. सदर गुंतवणूक तब्बल 10 हजार कोटी रुपयांच्या घरात असल्याची माहिती माहिती महिंद्रा अँड महिंद्रा ऑटो आणि फार्म सेक्टर कार्यकारी संचालक राजेश जेजुरीकर यांनी दिली.

या प्रकल्पाला महाराष्ट्र शासनाकडून औद्योगिक प्रोत्साहन योजनेंतर्गत मान्यताही मिळाली आहे. या उद्योगाच्या निर्मितीसाठी 7 ते 8 वर्षांचा कालावधी लागू शकतो. यामुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती देखील होणार आहे.

महिंद्रा कंपनीने ऑगस्ट 2022 मध्ये आगामी बॉर्न इलेक्ट्रिक व्हिजन अंतर्गत BE इलेक्ट्रिक SUV चे अनावरण केले होते. ही कार नव्या INGLO प्लॅटफॉर्मवर तयार केले जाईल. ऑल-न्यू एसयूव्हींपैकी पहिलं वाहन 2024 पर्यंत येण्याची अपेक्षा आहे.

यावर बोलताना कार्यकारी संचालक राजेश जेजुरीकर म्हणाले, “पुण्यात गुंतवणूक करण्यासाठी आणि आमच्या ईव्ही उत्पादन प्रकल्पाची स्थापना करण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या या मंजुरीमुळे आम्हाला आनंद झाला आहे. महाराष्ट्र 70 हुन अधिक वर्षांपासून आमचे गृहराज्य आहे."

"महिंद्राच्या गुंतवणुकीसोबतच सरकार व्यवसाय सुलभता आणि प्रगतीशील धोरणांकडे लक्ष देत आहे. यामुळे महाराष्ट्राला भारताचे ईव्ही हब बनण्यास मदत होईल, ज्यामुळे पुढील भारतीय आणि परदेशी गुंतवणुकीला थेट प्रोत्साहन मिळेल,” असं त्यांनी म्हटलं. ही बातमी एबीपी माझाने दिली.

5. अर्जुन तेंडुलकरचं रणजी पदार्पणात शतक

सचिन तेंडुलकरचा चिरंजीव अर्जुन तेंडुलकरने आपल्या पहिल्याच रणजी सामन्यात शतक झळकावलं आहे.

अर्जुनने आज गोव्याकडून खेळत असताना रणजी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. राजस्थानविरुद्धच्या या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी या डावखुऱ्या फलंदाजाने शतक साजरे केले.

अर्जुनने आपल्या शतकी खेळीत 12 चौकार आणि 2 षटकार मारले. अर्जुनने यावेळी 207 चेंडूंत 120 धावा काढल्या.

अर्जुनच्या या खेळीमुळे त्याचं प्रचंड कौतुक करण्यात येत आहे. ही बातमी महाराष्ट्र टाईम्सने दिली.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)