पुण्यातला ट्रक गिळणारा खड्डा आणि सिंकहोल यातील फरक काय? ते कशामुळे होतात तयार?

पुण्यात महापालिकेचा ट्रक पूर्णपणे खड्ड्यात बुडाला.
फोटो कॅप्शन, पुण्यात महापालिकेचा ट्रक पूर्णपणे खड्ड्यात बुडाला.
    • Author, नितीन सुलताने
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
  • Published
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

पुणे महानगरपालिकेचा एक ट्रक रस्ता अचानक खचल्यानं पूर्णच्या पूर्ण जमिनीखाली गेल्याचा प्रकार शुक्रवारी घडला. त्यानंतर या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले. मुंबईतही प्रभादेवी परिसरात काही दिवसांपूर्वी असाच प्रकार पाहायला मिळाला होता.

या दोनच घटना नव्हे तर अनेक ठिकाणी असे प्रकार घडत असल्याचं आपण पाहतो, वाचतो. अगदी परदेशातही असे प्रकार घडत असल्याचं आपल्या ऐकिवात अनेकदा येत असतं.

पुण्यातील घटनेत खड्ड्यात पडलेला ट्रक हा महापालिकेचा होता. त्याच केवळ चालक होता तोही सुखरुप बाहेर आला. पण इतर ठिकाणी अशाप्रकारच्या अचानक खड्डे पडण्याच्या घटना जीवघेण्या ठरू शकतात.

अशा घटनांत तयार होणाऱ्या खड्ड्यांना शक्यतो सिंकहोल म्हटलं जातं. पण पुण्यात पडलेला हा खड्डा मात्र सिंकहोल असण्याची शक्यता कमी आहे, असं अभ्यासकांचं म्हणणं आहे.

मग, रस्त्यांवर अचानक असे खड्डे कसे तयार होतात. त्यामागची कारणे काय आहेत? सिंकहोल म्हणजे नेमके काय असते? याबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

पुण्यातील खड्डा कशामुळे?

पुणे विद्यापीठातील भूगोल अभ्यासक अविनाश खांडेकर यांना आम्ही याबाबत चर्चा केली. त्यावेळी पुण्यातील रस्त्यावर अचानक पडलेला खड्डा हा सिंकहोल असण्याची शक्यता नसल्याचं ते म्हणाले.

अविनाश खांडेकर यांच्या मते, शक्यतो ज्याठिकाणी जमिनीखाली चुनखडी म्हणजेच लाईमस्टोन प्रामुख्यान आढळतो, त्याठिकाणी तयार होणाऱ्या मोठ्या खड्ड्यांना सिंकहोल असं म्हटलं जातं.

"महाराष्ट्रातील जमिनीखालील खडकाचा थर हा प्रामुख्यानं लाव्हापासून बनलेला म्हणजे बेसाल्ट खडकाचा आहे. त्यामुळं शक्यतो महाराष्ट्रात कुठेही जे अशा प्रकारे खड्डे निर्माण होतात, त्यांना सिंकहोल म्हणता येणार नाही. सिंकहोल चुनखडी असलेल्या भागामध्ये तयार होत असतात," असं त्यांनी सांगितलं.

पुण्यात खड्ड्यात पडलेला ट्रक.
फोटो कॅप्शन, पुण्यात खड्ड्यात पडलेला ट्रक.

अशाप्रकारच्या घटना या त्याठिकाणची जमिनीखालील माती वाहून गेल्यानं किंवा त्याखाली पूर्वीची एकदा रचना असल्यानं घडू शकतात अशी शक्यताही त्यांनी वर्तवली.

पृष्ठभागाच्या खाली काही कारणाने पोकळी निर्माण झाली आणि त्यावर ठरावीक क्षमतेपेक्षा अधिक वजन पडलं तर त्याठिकाणी अचानक अशाप्रकारचा खड्डा तयार झाल्याचं दिसून येतं.

पण मग, असं असेल तर सिंकहोल म्हणजे नेमकं काय? ते कसे तयार होतात आणि त्यासह खड्डे पडण्याची इतर कारणं काय, असा प्रश्न निर्माण होतो.

सिंकहोल म्हणजे काय?

सर्वसाधारणपणे एकाद्या ठिकाणी अचानकपणे तयार होणाऱ्या एखाद्या मोठ्या खड्ड्याला सिंकहोल म्हटलं जातं. जमिनीखाली चुनखडी किंवा विशिष्ट प्रकारचा खडकाचा थर असल्यास हे सिंकहोल निर्माण होत असतात.

पण अगदीच काटेकोरपणे विचार केल्यास सिंकहोल हा शब्द पूर्णपणे बरोबर किंवा अचूक असा नाही, असंही म्हटलं जातं.

ब्रिटिश जिऑलॉजिक सर्व्हेच्या मते, सिंकहोल हा जमिनीच्या खालील खडकांच्या विरघळण्यामुळं किंवा विघटन होण्यामुळं तयार झालेला अत्यंत खोल असा एक नैसर्गिक खड्डा असतो.

एका सिंकहोलचा लेझर स्कॅन

फोटो स्रोत, Andrew Buckley

फोटो कॅप्शन, एका सिंकहोलचा लेझर स्कॅन

जमिनीखाली खडकांचे जे थर असतात त्यातील काही हळू हळू भुसभुशीत होऊ लागतात. त्यामुळं हळू-हळू जमिनीखाली छोटी छिद्र तयार होतात. या लहान लहान छिद्रांमुळं त्या भागात एक मोठा खड्डा पडतो आणि त्याल सिंकहोल असं म्हणतात.

भूगर्भशास्त्रज्ञ डॉ. अँड्र्यू फॅरँट यांच्या मते, हळू हळू जेव्हा जमिनीखालील वेगवेगळ्या थरातील खडक तुटतात तेव्हा अशा प्रकारचे लहान छिद्र किंवा खड्डे तयार होतात. शक्यतो हे जमिनीच्या पृष्ठभागाच्या किंवा मातीच्या खाली असतात.

साधारणपणे हे सिंकहोल काही फुटांपासून ते काही मीटर अंतरापर्यंत रूंद आणि खोल असू शकतात. खालील खडकाची झीज किती झाली आहे, त्यावर ते अवलंबून असतात.

सिंकहोल तयार होण्याची कारणे काय असू शकतात?

जमिनीखालील खडकांचं नैसर्गिक किंवा काळानुरूप होणारं विघटन वाढत गेल्यानं सिंकहोल किंवा अशा प्रकारचे मोठे खड्डे तयार होऊ शकतात.

बीजीएसच्या मते, जोरदार पाऊस किंवा पूरस्थिती तसंच पाण्याचा निचरा होण्यासाठी जे जमिनीखालील पाईप असतात त्यात लिकेज असणं हेही मोठ्या खड्ड्यांचं कारण असू शकतं. पाणी पुरवठ्याची मुख्य पाईप लाईन फुटणे आणि जमिनीतील पाण्याचा अतिरिक्त उपसा हीदेखिल त्यामागची कारणं असू शकतात असं अभ्यासकांचं मत आहे.

इंग्लंडमधील एक सिंकहोल.

फोटो स्रोत, Andrew Buckley

फोटो कॅप्शन, इंग्लंडमधील एक सिंकहोल.

डॉ. फॅरँट यांच्या मते, जमिनीखालीस खडकांचे थर किंवा ज्या चकत्या आहेत त्यात अनेकदा मोठ्या गुहांसारखा भाग तयार होतो. तो हळू-हळू पृष्ठभागापर्यंत वर सरकत जाऊन अशाप्रकारचा खड्डा तयार होऊ शकतो. पण त्यांच्या मते, हे अत्यंत दुर्मिळ आहे.

इतर काही कारणे

काही खड्डे हे भूतकाळातील औद्योगिक कारणांमुळंही तयार झालेले असू शकतात. जमिनीखालून मोठ्या प्रमाणावर खनिजं मिळवण्यासाठी केलेल्या उत्खननाची आठवण ते आपल्याला करून देतात.

सिंकहोलच्या उलट काही क्राऊन होल (अधिक खोल असणारे मोठे खड्डे) हे अनेक वर्षांच्या कृत्रिम कारणांमुळं तयार होत असतात. अगदी शेकडो वर्ष जुन्या कारणांमुळंही ते तयार होऊ शकतात. अनेक वर्षांनंतर जोरदार पावसानं पाण्याशी संपर्क आल्यानंतर जमिनीला असे खड्डे पडू शकतात.

याबाबतची परदेशातील अनेक उदाहरणं समोरही आलेली आहेत.

एखाद्या सुरुंगाच्या किंवा इतर कामादरम्यान मधला एखादा खडकाचा थर खचल्यामुळंही अचानक अशाप्रकारचे खड्डे उद्भवू शकतात.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.