गारपिटीमुळे होत्याचं नव्हतं झालं, 50 पोती सोयाबीन भिजलं आणि सविताताई धक्क्यात होत्या

    • Author, प्रवीण ठाकरे
    • Role, नाशिकहून ,बीबीसी मराठीसाठी
  • Published

नाशिक जिल्ह्यातील बहुतांश भागात गारपिटीसह झालेल्या अवकाळी पावसाने 32 हजार 832 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं आहे.

सर्वाधिक नुकसान 11 हजार 597 हेक्टरवरील द्राक्षबागांचं झालं असून त्या खालोखाल साडेदहा हजार हेक्टरवरील कांदा पिकाचं नुकसान झालं आहे.

26 नोव्हेंबरच्या गारपीट आणि अवकाळी पावसानंतर जिरायत, बागायत क्षेत्रासह बहुवार्षिक फळ पिकांचं नुकसान झाल्याचा कृषी विभागाचा प्राथमिक अंदाज आहे.

नाशिक जिल्ह्यातील एकूण 890 गावांतील 67 हजार 866 शेतकऱ्यांना अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका बसला आहे.

या वादळी गारपिटीचा सर्वाधिक फटका द्राक्षांना बसला आहे, निफाड तालुक्यातील खेरवाडी, कसबे सुकेने, पिंपरी रौळस, उगाव, निफाड आणि पिंपळस या द्राक्ष पंढरी समजल्या जाणाऱ्या गावांना बसला आहे.

निफाड तालुक्यातील कसबे-सुकणे गावातील महिला शेतकरी सविता माळोदे यांच्या पीकांचं नुकसान तर झालंच पण अवकाळी पावसाने त्यांच्या राहत्या घरावरील छप्पर हिरावून घेतलं आहे.

सविता यांच्या नुकत्याच बांधलेल्या घराचे पत्रे 200 मीटर ते 700 मीटर अंतरावर उडून गेले आहेत.

सविता माळोदे यांच्या पतीचं निधन होऊन 3 वर्षं झालीत. त्यांना 13 आणि 10 वर्षं वयाची दोन मुलं आहेत.

मुलं आणि सासुसह त्या राहतात आणि चार एकर शेती कसतात. रविवारीची (26 नोव्हेंबर) दुपारची वेळ सर्वार्थाने नुकसान करणारी ठरली.

गारपीट आणि अवकाळी पावसाने त्यांच्या घरावरील पत्रे उडाले तसंच बाजूची कच्ची भिंत पडली. त्यांनी गाय आणि वासराला वाचवलं आणि जवळच्या जुन्या घरात आश्रय घेतला आहे.

जेव्हा सर्व थांबलं तेव्हा त्यांच्या घरात फक्त भिंती होत्या, छप्पर उडालेले, घरात पाणी साचलेलं.

घरात साठवलेले सोयाबीन भिजलं होतं. बीबीसीची टीम जेव्हा त्यांचाकडे पोहचली. तेव्हा त्या आणि त्यांचे नातेवाईक सोयाबीन गोणीत भरून ठेवत होते.

त्यांचा मुलगा ही त्यांना मदत करत होता, त्यांचे वडील आणि काका त्यांच्या मदतीला आले होते, तर शेजारीही हातभार लावत होते.

सविता यांनी वडिलांना फोन करून मदतीसाठी बोलावून घेतलं होतं.

त्यांच्या घरात 50 पोते म्हणजे 50 क्विंटल सोयाबीन होतं. ते भिजल्याने त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळत होते. शेतातील 4 एकर गहू पावसाने आडवा झाला होता.

छप्पर उडल्यानं पावसाचं पाणी घरात आलं आणि स्वयंपाकाचं साहित्य ही भिजूून गेलं होतं. एवढं नुकसान झालं होतं की त्यांना काहीच सुचत नव्हतं, त्यांना सरकारकडून मदतीची अपेक्षा आहे. नाहीतर उपाशी राहण्याशिवाय गत्यंतर नसल्याच्या त्यांच्या भावना आहेत.

त्याच्या घरासमोर थोड्या अंतरावर मुख्य रस्ता आहे. वादळी आणि अवकाळी पावसाने तिथं झाडे पडलेली दिसली. एक टेम्पो आणि चारचाकी वर झाड कोसळलं होतं.

26 नोव्हेंबरच्या दुपारपासून वीज खंडित होती, ते आम्ही दुसऱ्या दिवशी सोमवार इथे पोहोचेपर्यंत तरी पूर्ववत झालेली नव्हती. सविता माळोदे बोलण्याच्या मनस्थितीत नव्हत्या.

घरबाहेर पडलेली कच्ची भिंत कोसळल्याच्या विटा आणि सविता शिवत असलेलं सोयबीनचं पोतं परिस्थितीची जाणीव करून देत होते.

दुष्काळी परिस्थितीमध्ये साठवलेल्या सोयाबीनमुळे योग्य वेळी भाव मिळेल आणि काही पैसे हाताशी राहतील, या सविताच्या स्वप्नांवर वादळाने पाणी फिरवलं.

'पुढे शेती करणं अवघड आहे... निसर्गापुढे आपण काही करू शकत नाही... '

बीबीसीची टीम नाशिक जिल्ह्यातील खेरवाडीत पोहोचली आणि गारपिटीमुळे नुकसान झालेल्या द्राक्षबागेची पाहणी केली.

बीबीसीने याच गावात याच वर्षी एप्रिल महिन्यात शेतकरी गणेश गायखे यांच्या द्राक्ष बागांच्या नुकसानीची बातमी केली होती. त्यांची 2 एकर बाग वादळ आणि गारपीटमुळे एप्रिल महिन्यात जमीनदोस्त झाली होती.

ज्याची मदत अजून त्यांना मिळालेली नाही, त्याच गणेश गायखे यांचं 26 नोव्हेंबरच्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे जवळपास 10 एकरवरील द्राक्ष बागेचं नुकसान झालेलं दिसलं.

गणेश गायखे यांची जवळपास 13 एकर परंपरागत द्राक्ष शेती या 7 महिन्यांत झालेल्या अवकाळी पावसाने संपलीय.

गणेश गायखे यांनी निर्यातक्षम द्राक्ष बाग तर केली होती, ही द्राक्ष पुढील 20 दिवसात काढणीला आली असती, पण आता होत्याचं नव्हतं झालं.

रविवारी (26 नोव्हेंबर) दुपारी जोरदार वार्‍यासह पाऊस आणि गारपीटमुळे संपूर्ण बागेतील द्राक्षांना गार्‍यांच्या मार्‍यामुळे तडे गेलेत, हे द्राक्षघड आता फेकून देण्याशिवाय काहीही पर्याय नाही.

गायखे यांचे एकूण 4 द्राक्ष प्लॉट 10 एकर मध्ये होते, त्यांनी डिसेंबर ते एप्रिल दरम्यान सलग द्राक्ष शेतातून निघतील असं नियोजन केलं होतं.

चार महिन्यात कोणत्या तरी एका प्लॉटला भाव मिळाला आणि इतर वेळेस दर न मिळाल्यास नुकसान होणार नाही, हे लक्षात घेऊन त्यांनी सप्टेंबरमध्ये अवकाश ठेवून चारही बागांची द्राक्ष छाटणी केली होती.

पण त्यांच्या या नियोजनावर गारपिटिमुळे पाणी फिरलं, त्यांना पाऊस येणार हे माहीत होतं, पण एवढ्या मोठ्या प्रमाणात जोरदार हवेसह गारा पडतील याची कल्पना नव्हती.

आतापर्यंत त्यांनी जवळपास 15 लाख रुपये खर्च केले होते, त्यांच्या नियोजनानुसार त्यांना यातून 30-35 लाख रुपये उत्पन्न अपेक्षित होतं.

त्यांना सरकारकडून आशा आहे की थोडीफार मदत मिळेल, पण सात महिन्यांपूर्वी त्यांची बाग चक्रीवादळ आणि अवकळी पावसाने जमीनदोस्त झाली होती.

तलाठी, सर्कल अधिकारी ते खासदार आमदार यांनी भेट दिली आणि पाहणी केली. मदतीचं आश्वासनही दिलं, मात्र अजून एक रुपयाचीही मदत आलेली नाही. चौकशी केली तर प्रक्रिया सुरू आहे, असंच उत्तर येतं.

गणेश गायखे सांगतात की, "पुढे शेती करणं अवघड आहे, शेतकरी आता लढू शकत नाही, निसर्गापुढे आपण काही करू शकत नाही."

पण सरकारवर मात्र ते नाराज आहेत, सरकारच्या धोरणांमुळे शेतकर्‍यांना योग्य भाव मिळत नाहीये, मग ते कोणतंही पीक असो. त्यांना सरकारकडून अपेक्षा आहे, जर सरकार उद्योजकांच्या पाठीशी उभं राहतं तर शेतकर्‍यांच्या पाठीशी का उभं राहत नाही? हा त्यांचा सवाल आहे.

काढणीला आलेले द्राक्षांचे घड गारपिटीमुळे उद्ध्वस्त

निफाड साखर कारखान्याजवळ राहणार्‍या अमोल भंडारे यांच्या बागेतील द्राक्ष ही डिसेंबर महिन्यात बाजारात जाणार होती. ही पर्पल जातीची टपोरी आणि निर्यातक्षम द्राक्ष होती. तर दुसरी सोनाका जातीची आहेत. ही द्राक्ष निर्यातक्षम असल्याने त्यांना पेपरने झाकून ठेवलेलं होतं.

15 दिवसात पेपर काढला की त्यानंतर ही द्राक्ष बाजारात जाणार होती. अमोल यांना 80 ते 100 रुपये किलोला भाव मिळेल ही अपेक्षा होती. पण पावसाबरोबर आलेल्या गारांनी द्राक्ष घडांवर असा काही आघात केला की द्राक्ष घडांना चिरा पडल्या.

सर्व चार एकर वरील द्राक्ष खराब झाली. आता फेकून देण्याशिवाय पर्याय उरला नाहीय.

26 नोव्हेंबरच्या अवकाळी आणि गारपीटीमुळे द्राक्ष बागेचं नुकसान झालेले शेतकरी अमोल भंडारे सांगतात की,

"माझ्या एकूण चार द्राक्षबागा होत्या. सप्टेंबर मधली छाटणी होती. चार ही बागा 10 -10 दिवसाच्या अंतरानं तयार होणार होत्या.

आमची ही वडिलोपार्जित द्राक्षशेती आहे. पूर्वी ती फायद्यात होती. आता मात्र गेल्या चार वर्षात बदलत्या हवामानामुळे वेगळच घडतंय. दरवर्षी नैसर्गिक आपत्ती आहे. पण 'ही' आपत्ति मात्र सर्वात भीषण होती."

अमोल यांच्या कुटुंबात सहा सदस्य आहेत. त्यांचे आई-वडील, अमोल यांची पत्नी आणि दोन मुले. या कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीवर चालतो.

आतापर्यंत या बागेवर त्यांचा 100 % खर्च करून झालाय. द्राक्ष हे वार्षिक पीक आहे. आता परत शून्यातून सुरुवात करावी लागेल आणि आता पुढील वर्षीच द्राक्ष घेता येईल, असं अमोल म्हणतात.

ते पुढे सांगतात की, "पंचनामे करून मदत देण्याचं आश्वासन मंत्री गावात देऊन गेले. पण माझ्या याच बागेला 2018 मध्ये पावसामुळे द्राक्षांच्या घडांना तडे गेलेले, त्याची भरपाई अजून मिळाली नाही, 2021 पासून पिकविम्याची भरपाई नाही आणि भरपाई देतात तर किती देतात, एकराला तीन लाख रुपये खर्च आहे. आणि सरकार हेक्टरला 15 हजार रुपये देतं. सरकारने धोरण बदलण्याची गरज आहे."

अमोल म्हणतात की, "पुढे काय करायचं हेच सुचत नाहीये, पुढे वर्षभर मेहनत आहे आणि चांगले पीक आलं तरी पुढे काय होणार याची शाश्वती नाही."

कांदा आणि इतर पिकांचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान

या भागातला नवीन लाल कांदा काढणीवर आला होता. पावसात 10 हजार 408 हेक्टरवरील कांद्याचं नुकसान झालं.

467 हेक्टरवरील कांदा रोपे पाण्यात गेल्यानं उन्हाळ कांद्याची लागवड अडचणीत येणार आहे.

भात (6729 हेक्टर), गहू (578), टोमॅटो ( 310), भाजीपाला आणि इतर (1795), मका ( 169), ऊस ( 221 हेक्टर) या पिकांचं नुकसान झालं आहे.

सुमारे 34 हेक्टरवरील डाळिंब बागांनाही फटका बसल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. जिरायत क्षेत्रातील 488 हेक्टरवरील भाजीपाल्याचं नुकसान झालं.

रविवारच्या अवकाळी पावसाने जिल्ह्यातील सुमारे 67 हजार 866 शेतकऱ्यांचं नुकसान झालं

यात चांदवड तालुक्यातील 19,470, निफाड 13,832, इगतपुरी 11,121, पेठ 4890, दिंडोरी 3440,

कळवण 3905, सटाणा 697, नाशिक 1896, त्र्यंबकेश्वर 551, येवला 904 , सुरगाणा 740 इतक्या शेतकऱ्यांचा समावेश आहे

इगतपुरी (122), कळवण (118), निफाड (102), दिंडोरी (98), नाशिक (98), नांदगाव (88), सटाणा (76), सुरगाणा (71), पेठ (64), चांदवड (30), त्र्यंबकेश्वर (20). सिन्नर (9), येवला (5) अशा 13 तालुक्यांतील एकूण 890 गावांत पिकांचं नुकसान झालं आहे.

मालेगाव आणि देवळा या तालुक्यांतील एकाही गावाचा प्राथमिक अहवालात समावेश नाही.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)