महिलांना पुरुषांपेक्षा अधिक वेळा लघवीला का जावं लागतं?

पुरुष आणि महिलांच्या मूत्राशयात 400 ते 600 मिलीलीटर लघवी सहज साठवली जाऊ शकते

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, पुरुष आणि महिलांच्या मूत्राशयात 400 ते 600 मिलीलीटर लघवी सहज साठवली जाऊ शकते
    • Author, मिशेल स्पीअर
    • Role, द कॉन्व्हर्सेशन
  • Published
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

"आपण पुन्हा थांबवणार आहोत का?" वाहनानं कुटुंबासह सहलीला जाताना ही तक्रार सर्रास ऐकू येते. ती अनेकदा महिलांच्या बाबतीत असते. टीव्हीवरील कॉमेडीपासून ते स्टँड-अप कॉमेडीपर्यंत महिलांच्या मूत्राशयाचा (ब्लॅडर) आकार हा एक सांस्कृतिक विनोद झाला आहे.

मात्र, शरीरशास्त्राचा विचार करता हे खरोखरंच बरोबर आहे का? म्हणजे महिलांचं मूत्राशय लहान असतं का?

तर याचं उत्तर आहे, अजिबात नाही. याचं संपूर्ण चित्र अधिक गुंतागुंतीचं आणि अधिक मनोरंजक आहे. ते शरीररचनाशास्त्र, शरीरविज्ञान आणि सामाजिक परिस्थिती यांच्यातील गुंतागुंतीचा परस्परसंबंध त्यातून दिसून येतो.

महिलांना अनेकदा लघवीला जावं लागतं किंवा जाण्याची इच्छा होते. मात्र प्रत्यक्षात त्यांच्या मूत्राशयाचा आकार फारसा वेगळा नसतो.

मूत्राशयाची रचना

यासाठी मूत्राशयाची रचना थोडी समजून घेतली पाहिजे. मूत्राशय हा स्नायूंचा एक फुगा असतो, त्याची रचना लवचिक राहण्यासाठी केलेली असते. दोन प्रमुख वैशिष्ट्यांमुळे हे शक्य होतं.

ती वैशिष्ट्यं म्हणजे डिस्ट्रुसर स्नायू (मूत्राशयाच्या भिंती तयार करणारे स्नायू) आणि संक्रमित होणारं एपिथेलियम (संरक्षण करणारा पेशींचा बाह्य थर).

डिस्ट्रुसर हा अतिशय गुळगुळीत स्नायूंचा थर असतो. या थरामुळेच मूत्राशयाच्या भिंती तयार होतात. हे स्नायू प्रचंड लवचिक असतात. त्यांच्या या लवचिकतेमुळेच मूत्राशय ताणलं जातं आणि ते "पूर्ण भरलं" असल्याचे सिग्नल शरीर सतत देत नाही.

जेव्हा आपल्याला तातडीनं लघवी करण्याची आवश्यकता असते, तेव्हा हे स्नायू आकुंचन पावतात. त्यामुळे मूत्राशय रिकामं होतं.

शरीररचनेचा विचार करता, पुरुष आणि महिला यांच्या मूत्राशयात फरक नसतो, तर ते अधिक समान असतात.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, शरीररचनेचा विचार करता, पुरुष आणि महिला यांच्या मूत्राशयात फरक नसतो, तर ते अधिक समान असतात.

मूत्राशयाच्या आत असणारा थर म्हणजे संक्रमित होणारं एपिथेलियम, एखाद्या जैविक ओरिगामीप्रमाणं (घड्या करण्याची कला) कार्य करतं. ते आतल्या लघवीला सामावून घेण्यासाठी ताणलं जातं आणि सपाट होतं. त्यामुळे मूत्राशयात साठलेल्या लघवीतील विषारी घटकांपासून आतल्या ऊतींचं संरक्षण होतं.

मूत्राशयाची ही रचना अतिशय कौशल्यपूर्ण असते. या रचनेमुळे आपलं मूत्राशय कोणताही अपाय न होता, त्याचा आकार न बदलता किंवा बहुतेक वेळा लघवी लागल्याचे खोटे संकेत न देता आयुष्यभर आकुंचन पावू शकतं.

पुरुष आणि महिलांच्या मूत्राशयातील फरक

शरीररचनेचा विचार करता, पुरुष आणि महिला यांच्या मूत्राशयात फरक नसतो. ते अधिक समान असतात. पुरुष आणि महिला दोघांच्या मूत्राशयात 400 ते 600 मिलीलीटर लघवी सहजपणे साठवली जाऊ शकते.

मूत्राशयाभोवती जे असतं, त्यामुळे त्यातील संवेदना आणि तत्परता यावर परिणाम होऊ शकतो. इथेच पुरुष आणि महिलांच्या मूत्राशयातील फरक सुरू होतो.

पुरुषांमध्ये मूत्राशय प्रोस्टेटच्या वरच्या बाजूला आणि रेक्टमच्या (मोठ्या आतड्याचा गुदद्वाराजवळचा भाग) समोरच्या बाजूला असतं.

तर महिलांमध्ये मूत्राशय एका अरुंद पेल्विक कंपार्टमेंटमध्ये असतं. ही जागा ते गर्भाशय आणि योनीसह वाटून घेतं.

पुरुषांना जास्त मोकळीक असते

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, पुरुषांना जास्त मोकळीक असते

गर्भधारणेच्या वेळी वाढणाऱ्या गर्भाशयामुळे मूत्राशयावर दाब पडू शकतो. त्यामुळे महिलांना तिसऱ्या तिमाहीत (28 आठवड्यायांपासून ते 40 व्या आठवड्यापर्यंत किंवा प्रसूतीपर्यंत) दर 20 मिनिटांनी लघवीला जावं लागतं.

जरी महिलांमध्ये गर्भधारणा झालेली नसली, तरीही मूत्राशय ज्या ठिकाणी असतं, तिथे असलेल्या जागेच्या मर्यादेमुळे मूत्राशय भरल्याची भावना लवकर निर्माण होऊ शकते.

काही अभ्यासांमधून असं दिसून आलं आहे की, कमी प्रमाणात लघवी साचलेली असतानाही महिलांना मूत्राशय पूर्ण भरल्याची जाणीव होण्याची शक्यता अधिक असते.

हार्मोनचा प्रभाव, वाढलेल्या संवेदना किंवा पेल्विक फ्लोअर सपोर्ट आणि मूत्राशयाचं ताणलं जाणं यातील गतिमान संबंधांमुळे हे होऊ शकतं.

गरोदरपणाच्या शेवटच्या तीन महिन्यात मूत्राशयावर पडणाऱ्या दाबामुळे महिलांना वारंवार लघवीला जावं लागतं

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, गरोदरपणाच्या शेवटच्या तीन महिन्यात मूत्राशयावर पडणाऱ्या दाबामुळे महिलांना वारंवार लघवीला जावं लागतं

पेल्विक फ्लोअर म्हणजे स्नायूंचा गट असतो, जो मूत्राशय, गर्भाशय आणि आतडे यांना आधार देतो. पेल्विक फ्लोअर आवश्यक असतो. महिलांमध्ये बाळंतपण, हार्मोन्समध्ये झालेले बदल किंवा निव्वळ वय वाढत गेल्यावर हा पेल्विक फ्लोअर म्हणजे स्नायूंचा गट कमकुवत होऊ शकतो.

त्यामुळे मूत्राशयात लघवी धरून ठेवणं आणि सोडणं यातील समन्वयामध्ये व्यत्यय येतो.

मूत्राशयातील लघवीचं बरचसं नियंत्रण बाह्य युरेथ्रल स्फिंक्टरवर म्हणजे लघवीचं नियमन करणाऱ्या मूत्राशयातील स्नायूंवर अवलंबून असतं. ही स्नायूंची रिंग असते, ती मूत्राशयासाठी द्वारपालाचं (डोअर कीपर) काम करते. यामुळे लघवी करण्यासाठी सोयीच्या वेळेवर तुम्हाला वाट पाहता येते.

हे स्नायू पेल्विक फ्लोअर कॉम्प्लेक्सचा भाग असतात. इतर कोणत्याही स्नायूंप्रमाणे या स्नायूंचा आकार जाऊ शकतो किंवा ते पूर्ववत होऊ शकतात.

दरम्यान, मूत्रमार्गात होणाऱ्या संसर्गामुळे (लहान आकाराच्या मूत्रमार्गामुळे ते महिलांमध्ये अधिक सामान्य असतं) मूत्राशय अती संवेदनशील होऊ शकतं. त्यामुळे संसर्ग गेल्यानंतरही लघवी करण्याची वारंवारता म्हणजे प्रमाण वाढतं.

"आवश्यकता नसली तरी जाऊन या"

बाथरूमला जाण्याच्या सवयी संस्कृतीनुसार बदलू शकतात. मात्र लहानपणापासूनच मुलींना 'फारशी आवश्यकता नसतानाही, लघवीला जाण्याचं' किंवा सार्वजनिक शौचालयं टाळण्याचं शिकवलं जातं.

या सवयींमुळे मूत्राशय आवश्यकता नसताना किंवा पूर्ण भरलेलं नसतानाही रिकामं होऊ शकतं. यामुळे त्याची लघवी साठवून ताणलं जाण्याची क्षमता कमी होऊ शकते.

दुसऱ्या बाजूला पुरुषांना सहसा अधिक मोकळीक दिली जाते किंवा वाट पाहण्यासाठी प्रोत्साहन दिलं जातं. ज्यांनी टॉयलेट सीटचा वापर केला आहे, त्यांच्या देखील हे लक्षात येईल की, स्वच्छतेची काळजी केल्यास त्याचा वर्तनावर परिणाम होतो.

कालांतरानं, मूत्राशयाला याची सवय होते. तुम्ही मूत्राशयाचा आकार बदलू शकत नाही. मात्र तुम्ही मूत्राशयाची सहनशीलता (लघवी साठवण्याची सवय) वाढवू शकता किंवा तसं प्रशिक्षण घेऊ शकता.

लघवीला वारंवार जाण्याचं प्रमाण कमी करणारं तंत्र

ब्लॅडर ट्रेनिंग म्हणजे मूत्राशयाचं प्रशिक्षण हे एक तंत्र आहे. यूकेची नॅशनल हेल्थ सर्व्हिस आणि ब्रिटिश असोसिएशन ऑफ युरोलॉजिकल सर्जन्स यांच्याकडून या तंत्राला प्रोत्साहन दिलं जातं.

यात बाथरूमला म्हणजे लघवीला जाण्याच्या दोन फेऱ्यांमधील वेळ वाढवण्याचा समावेश आहे.

यामुळे मूत्राशय आणि मेंदू यामधील फीडबॅक लूप पुन्हा स्थापित होण्यास, मूत्राशयाची क्षमता पुन्हा निर्माण होण्यास आणि लगेचच लघवीला जाण्याची भावना कमी होण्यास मदत होते.

यात अनेकदा पेल्विक फ्लोअरच्या व्यायामांचा समावेश केलेला असतो. हा नियंत्रण मिळवण्याचा प्रभावी मार्ग आहे.

विशेषकरून ज्यांना ओव्हरॲक्टिव्ह ब्लॅडर सिंड्रोम म्हणजे अतिक्रियाशील मूत्राशय सिंड्रोम किंवा मूत्राशयातून बाहेर पडणाऱ्या लघवीवर नियंत्रण नसलेल्यांसाठी हे तंत्र प्रभावी ठरू शकतं.

प्रातिनिधिक छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

महिलाचं मूत्राशय आकारानं सर्वात लहान नसेल, पण शारीरिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या हालचाल करण्यासाठी त्यांना मर्यादा असतात.

त्यामुळे, पुढील वेळेस जेव्हा कोणी बाथरुमला जायच्या ब्रेकबद्दल नाक मुरडेल, तेव्हा त्यांना सांगा की वारंवार लघवीला जाण्याचा संबंध कमकुवत इच्छाशक्ती किंवा छोट्या मूत्राशयाशी नाही, तर त्याचा संबंध शरीररचनाशास्त्र, सवयी आणि हार्मोन्सशी आहे.

(मिशेल स्पीअर या यूकेमधील ब्रिस्टल विद्यापीठात शरीररचनाशास्त्राच्या प्राध्यापक आहेत.

हा लेख मूळात द कॉन्व्हर्सेशनवर प्रकाशित झाला होता आणि क्रिएटिव्ह कॉमन्स लायसन्सअंतर्गत इथे पुन्हा प्रकाशित झाला आहे. मूळ लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा.)

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)