6 ते 12 वयोगटातली मुलं 'वेगळी' वागायला का लागतात? पौगंडावस्थेत मेंदूत काय सुरू असतं?

    • Author, डेव्हिड रॉबसन
    • Role, बीबीसी प्रतिनिधी
  • Published
  • वाचन वेळ: 10 मिनिटे

कसं जगायचं?

कसं वागायचं?

कुणी सांगेल का मला?

माझ्या आयुष्याचा हिरो व्हायचंय मला.

हे नायक नावाच्या मराठी मालिकेचं शीर्षकगीत तुम्हाला आठवत असेल. किंवा अगदी दिलिप प्रभावळकरांनी लिहिलेल्या बोक्या सातबंडेची तुमची ओळख असेल. लहानही नाही आणि पूर्ण तारुण्यातही नाही अशा वयातल्या मुलांच्या आयुष्यावर बेतलेल्या या गोष्टी होत्या.

आपल्या आजूबाजूलाही या वयाची मुलं असतात. या मुलांच्या डोक्यात सतत एक चक्र सुरू असतं. आपल्या आजूबाजूच्या जगाची ते ओळख करुन घेत असतात.

भावना, त्यांचं प्रकटीकरण, कसं वागायचं, बोलायचं याचा चहूबाजूंनी भडीमार होत असताना या मुलं स्वतःला शोधत असतात.

या वयातल्या मुलांना कसं समजून घ्यायचं, त्यांना कशी मदत करायची यावर विज्ञानलेखक आणि बीबीसीचे प्रतिनिधी डेव्हिड रॉबसन यांनी हा लेख लिहिला आहे.

मुलं जेव्हा 6 ते 12 वर्षांच्या वयोगटात असतात, त्याला 'मध्यम बालपण' म्हणतात. विज्ञानाकडून प्रदीर्घ काळ याकडे दुर्लक्ष झालं आहे.

मात्र मुलं मोठी होण्यासाठी हा एक महत्त्वाचा परिवर्तनाचा काळ असतो.

या परिवर्तनशील, अशांत काळात मुलांच्या डोक्यात नेमकं काय चालतं आणि त्यातून पुढे कसं यायचं याबद्दल जाणून घेऊया.

माझ्या आयुष्यातील पहिली छोटीसी बंडखोरी मी सहा वर्षांचा असताना केली होती.

गावातील एका स्थानिक हॉलमध्ये वाढदिवसाची पार्टी होती. मी त्या पार्टीला गेलो होतो. तिथे इतरही मुलं आली होती.

मात्र, त्यातील जवळपास कोणालाच मी ओळखत नव्हतो. ती मुलं त्यांच्या मित्रमंडळींबरोबर आली होती. त्यामुळे त्या सर्वांमध्ये मला लाजल्यासारखं आणि एकटं असल्यासारखं वाटलं होतं.

मी घरी परतलो, तोपर्यंत माझी मन:स्थिती अतिशय वाईट झाली होती. त्यावेळेस आईनं मला काय करायला सांगितलं होतं, ते मला आठवत नाही. मात्र त्यावरची माझी प्रतिक्रिया मला चांगलीच आठवते.

मी ओरडून आईला म्हणालो होतो, "घरात आळसावणं तुझ्यासाठी ठीक आहे, मला मात्र पार्टीमध्ये जावं लागलं!"

मी रागात तडकन तिथून निघून गेलो होतो. ते सर्व पाहून आई आश्चर्यचकीत झाली होती. माझ्या लहान, उत्साही गोड मुलाला काय झालं? असा प्रश्न आईच्या मनात होता.

जर आम्ही जर्मन भाषा बोलणाऱ्या देशात वास्तव्यास असतो, तर या गोष्टीचं तिला कमी आश्चर्य वाटलं असतं.

जर्मनी मुलांच्या या वयोगटाला 'वॅकेलझॅनपुबर्टेट' म्हणतात. म्हणजे 'दात हलतात त्या वयातील पौगंडावस्था' म्हणतात.

मानसिक बदलांचा काळ

सहा वर्षांची मुलं पौगंडावस्थेतील वाईट मूड किंवा मन:स्थिती कशी दाखवतात याचं वर्णन या शब्दातून किंवा संकल्पनेतून होतं.

वंडरकाईंड हे जर्मन मासिक या स्थितीबाबत म्हणतं, "आक्रमक वर्तन, बंडखोर सक्रियता आणि खोलवर दु:ख ही या स्थितीचं वैशिष्ट्यं असतात."

(मुलांच्या वर्तनात होणाऱ्या या बदलांना पालक कशाप्रकारे हाताळतात, यासाठीच्या टिप्स या लेखाच्या शेवटी दिल्या आहेत.)

वास्तवात जसं तारुण्य हार्मोनमधील बदलांमुळे येतं, तसं या वयोगटातील तारुण्य किंवा पौगंडावस्था हार्मोनमधील बदलांमुळे येत नाही. त्याऐवजी त्याचा संबंध 'मध्यम बालपणा'ची सुरुवात होण्याशी असतो.

हा प्रचंड मानसिक बदलांचा काळ असतो. ज्यात विचार आणि भावना अधिक परिपक्व होण्याचा पाया मेंदूमध्ये घातला जात असतो.

एव्हलिन अँटनी युकेतील डरहॅम विद्यापीठात मानसशास्त्रातील पीएचडीच्या विद्यार्थिनी आहेत.

त्या म्हणतात, "हा मुलांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा असतो. यात मूल त्यांची ओळख निर्माण करत असतं. इतर लोकांच्या संदर्भात ते कोण आहेत, हे शोधण्याचा प्रयत्न मुलं करत असतात. त्यांचं भावनिक विश्व देखील विस्तारत असतं."

बालपण आणि पौगंडावस्था या दोन्ही अवस्थांबद्दल आता चांगलं आकलन झालेलं आहे. मात्र सहा ते 12 वर्षे वयोगटातील मध्यम बालपणाकडे वैज्ञानिक संशोधनात अत्यंत दुर्लक्ष करण्यात आलं आहे. काही मानसशास्त्रज्ञ त्याचं वर्णन 'विस्मृतीत गेलेली वर्षे' असं करतात.

एव्हलिन अँटनी म्हणतात, "मुलं जेव्हा खूप लहान असता, ती बोलत आणि चालत असतात, तसंच नंतर जेव्हा ती पौंगडावस्थेत जातात, थोडे अधिक बंडखोर होतात, या टप्प्यांवर बरंच संशोधन केंद्रीत आहे. मात्र मध्यम बालपणाबद्दल कमी माहिती आहे."

मात्र आता यात बदल होतो आहे. मुलांच्या मानसिक बदलांची मुख्य वैशिष्ट्यं ओळखण्यासाठी होत असलेल्या नवीन संशोधनामुळे हे बदल होत आहेत.

या परिवर्तनात मुलांच्या भावनांवर चिंतन करण्याच्या आणि आवश्यकता पडल्यास त्यात बदल करण्याच्या अधिक क्षमतेचा समावेश आहे. तसंच त्यात 'प्रगत मनाचा सिद्धांत' देखील आहे. यात ते इतरांच्या वर्तनाबद्दल अधिक योग्यप्रकारे विचार करतात आणि त्याला योग्य प्रतिसाद देतात.

मुलं तर्कसंगत चौकशी आणि तर्कसंगत निष्कर्ष काढणं, यावर देखील प्रभुव्व मिळवू लागतात. त्यामुळे त्यांना त्यांच्या कृतीची अधिक जबाबदारी घेता येते. त्यामुळेच फ्रान्समध्ये या अवस्थेला 'लेग द रेझन' असंही म्हणतात.

मुलांच्या या वयोगटाच्या संकल्पनेनुसार, मध्यम बालपणाच्या सुरुवातीला काही अधिक वेदना देखील असू शकतात. मात्र त्या समाविष्ट असलेल्या न्यूरोलॉजिकल आणि मानसिक बदलांची सखोल समज, या अवस्थेतील त्यांच्या प्रवासात मुलांना आधार देण्याच्या सर्वोत्तम मार्गांवर नवीन समज वाढवते आहे.

दातांमधील बदलांमुळे येणारी पौगंडावस्था

यासंदर्भात आधी भावनिक नियमन लक्षात घेऊया. मध्यम बालपणाची सुरुवात होईपर्यंत, बहुतांश मुलांनी त्यांच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याच्या क्षमतेमध्ये मोठी प्रगती केलेली असते.

जन्मलेलं बाळ त्यांची वेदना कमी करण्यासाठी पूर्णपणे पालकांवर किंवा आसपासच्या प्रौढांवर अवलंबून असतं. या वेदना बहुतेक वेळा शरीराशी संबंधित असतात, उदाहरणार्थ, भूक लागणं, थकवा येणं किंवा पोटदुखी. त्या दाखवण्यासाठी मुलं रडतात.

मात्र हळूहळू मोठं होत गेल्यावर त्यांच्यामध्ये आनंदाबरोबरच राग आणि भीतीचा समावेश असलेल्या अनेक भावनांचा संग्रह विकसित होतो. मात्र त्या कशा हाताळाव्यात हे त्यांना माहित नसतं. त्यातून मग मुलं प्रचंड राग व्यक्त करतात.

मुलांची वेगानं विकसित होत जाणारी भाषा या सर्व गोंधळापासून त्यांना थोडासा दिलासा देऊ शकते. कारण यामुळे मुलांना त्यांच्या गरजा अधिक अचूकतेनं व्यक्त करता येतात. त्यामुळे मुलांमधील निराशा वाढण्यापूर्वी इतरांना मुलांना योग्य प्रतिसाद देता येतो.

जर तुम्हाला फक्त एवढं म्हणता येत असेल की 'मला भूक लागली आहे' तर मग तुम्हाला अधिक अन्नासाठी ओरडण्याची आवश्यकता राहत नाही. तुम्ही तसं सांगितल्यावर प्रौढ व्यक्ती त्यानुसार तुम्हाला प्रतिसाद देतो.

मात्र, भावना व्यक्त करणाऱ्या शब्दांचा त्याहून तात्काळ फायदा होऊ शकतो. भावनेला नाव दिल्यामुळे त्याला मिळणारा मज्जातंतूचा प्रतिसाद बदलतो. ते प्रिफ्रंटल कॉर्टेक्सच्या काही भागांना गुंतवून ठेवतं. यात भागात अधिक अमूर्त विचार निर्माण होतात.

'अमिग्दला' (amygdala) या मेंदूच्या भावनांवर प्रक्रिया करणाऱ्या भागाला ते शांत करतं. याच भागात प्राथमिक स्वरुपाच्या भावनांची संवेदनशीलता निर्माण होते.

मुलं जेव्हा पाच किंवा सहा वर्षांची होतात, तेव्हा त्यांना नवीन आव्हानांना तोंड द्यावं लागतं. त्यामुळे त्यांची भावनिक आकलनाची परीक्षा होते, असं अँटनी आणि इतर संशोधकाचं म्हणणं आहे.

प्रत्येक कृतीवर मार्गदर्शन मिळण्यासाठी वडीलधाऱ्यांवर किंवा पालकांवर अवलंबून राहण्याऐवजी, मुलांना अधिक स्वातंत्र्य मिळण्याची अपेक्षा केली जाते. यातून एकप्रकारची अनिश्चितता आणि अस्पष्टता निर्माण होते, त्यातून निराशा निर्माण होऊ शकते.

मुलांनी स्वत:च मैत्री करावी, त्यांना आवडत नसलेल्या लोकांशी जुळवून घ्यावं आणि वडिलधाऱ्यांच्या नियमांचं पालन करावं अशी अपेक्षा केली जाते.

अँटनी यांनी नमूद केल्यामुळे, मुलं मोठी होतात, तशी त्यांच्याच स्वत:बद्दलची एक मजबूत भावना देखील विकसित होते. त्याचबरोबर इतरांच्या तुलनेत ते कोण आहे हे स्पष्ट जाणून घेण्याची आवश्यकता देखील निर्माण होते.

हा बदल किंवा संक्रमण मुलांच्या भावनांच्या नियमनाला त्याच्या मर्यादेपर्यंत वाढवू शकतं. यातून त्यांच्या मन:स्थितीवर किंवा मूडवर परिणाम होऊ शकतो.

या अवस्थेदरम्यान मूल निराश होऊ शकतं किंवा भावनिक आधारासाठी पालकांशी अधिक जोडलं जाऊ शकतं किंवा त्यांच्यात रागाचा अचानक उद्रेक होऊ शकतो.

सुदैवानं, मुलांचा मेंदू नवीन मागण्यांशी, गरजांशी लवकर जुळवून घेतो.

यात त्यांना काय वाटतं आहे, याचं वर्णन करण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी त्यांच्यात एक मोठा शब्दसाठा विकसित होतो. त्यामध्ये मिश्र स्वरुपाच्या भावनांची संकल्पना समाविष्ट असते.

(उदाहरणार्थ, वयाच्या नवव्या वर्षापर्यंत, 'डिस्नीज द लिटल मर्मेड'चा शेवट कडू-गोड शेवटामध्ये आनंद आणि दु:ख दोन्ही आहे, हे बहुतांश मुलांच्या लक्षात येऊ शकतं.)

पालक किंवा शिक्षकांवर अवलंबून न राहता, शांत होण्यासाठी स्वत:बद्दल काय वाटतं, हे बदलण्यासाठीच्या नवीन रणनीतीदेखील मुलं शिकतात.

मध्यम बालपणात मुलं, 'आकलनाच्या पुनर्मुल्यांकना'चा वापर करण्यात निपुण होतात. उदाहरणार्थ, एखाद्या घटनेचा भावनिक परिणाम बदलण्यासाठी त्याचा वेगळा अर्थ लावणं.

जर त्यांना शाळेत एखाद्या गोष्टीत अडचण येत असेल, उदाहरणार्थ, मुलांना असं वाटू लागू शकतं की 'मी हे करू शकत नाही' किंवा 'मी मूर्ख आहे' - किंवा ते त्यांच्या निराशेतून एखादी नवीन रणनीती शिकू शकतात. यामुळे त्यांचा राग शांत होईल आणि त्यांची चिकाटी वाढेल.

मुलांच्या परिपक्व होण्यामध्ये आसपासच्या प्रौढ, वडिलधाऱ्यांचं निरीक्षण करण्याचा मोठा भाग असतो. "आपले पालक त्यांच्या आयुष्यातील संघर्षांना आणि वेगवेगळ्या समस्यांना कसं तोडं देतात, हे पाहून मुलं त्या गोष्टींना कसं सामोरं जायचं ते शिकतात," असं अँटनी म्हणतात.

मैत्रीचा शोध

"या अवस्थेत मुलांचं सामाजिक जग देखील बदलत असतं. मध्यम बालपण हा असा काळ असतो ज्यात 'समान भावानं मैत्री' विकसित होण्यास सुरुवात होतं," असं सिमोन डोब्बेलार म्हणतात. त्या नेदरलँड्समधील लिडेन विद्यापीठात विकासात्मक आणि शैक्षणिक मानसशास्त्रातील पोस्ट-डॉक्टरेट संशोधक आहेत.

दुसऱ्या शब्दांत, मध्यम बालपणाच्या काळात मुलांना नातेसंबंधांमधील देवाण-घेवाण समजू लागते. ते त्यांच्या आयुष्यात यावर अधिक लक्ष केंद्रीत करू लागतात.

सिमोन म्हणतात, "शाळेत आणि शाळेबाहेर मुलं त्यांच्या समवयस्क मुलांबरोबर अधिक वेळ घालवू लागतात."

मध्यम बालपणात, मुलं अनेक लोकांच्या विचारांचा आणि भावनांचा मागोवा ठेवण्यासाठी या सामाजिक कौशल्यांचा आणि मानसिक आकलनाचा वापर करतात.

उदाहरणार्थ, निक नावच्या एका मुलाच्या गोष्टीची कल्पना करा. यात निकला फुटबॉल संघात सहभागी व्हायचं आहे. मात्र संघात स्थान मिळेल असं त्याला वाटत नाही. निकच्या अनिश्चितेबद्दल प्रशिक्षकांना माहित आहे. मात्र प्रशिक्षकांना निक संघात हवा आहे.

एकदा का प्रशिक्षकांनी निकची निवड केली की प्रशिक्षकांना हे माहीत आहे का, की निकचा समावेश संघात करण्यात आला आहे, या निर्णयाबद्दल त्याला अद्याप माहित नाही? (याचं योग्य उत्तर, हो आहे)

याप्रकारच्या प्रश्नाचं उत्तर देम्यासाठी निकच्या प्रशिक्षकांना काय माहित आहे याबद्दल निकला प्रशिक्षकांच्या मताबद्दल काय माहित आहे, याबद्दल विचार करावा लागतो.

दुसऱ्या शब्दांत, ते एका व्यक्तीच्या मनाच्या सिद्धांताचा, दुसऱ्या व्यक्तीच्या मनाच्या सिद्धांतासंदर्भात विचार करत आहेत. याला 'पुनरावृत्तीची प्रक्रिया' म्हणून ओळखलं जातं.

कोणाला गुपित माहिती आहे याचा मागोवा ठेवण्यासाठी, खेळाच्या मैदानावर गप्पा मारण्यासाठी आणि खेळामध्ये आपल्याला मूर्ख बनवण्यासाठी कोणीतरी 'दुहेरी थाप' मारत असेल हे लक्षात घेण्यासाठी अशाप्रकारचा तर्कसंगत विचार करणं महत्त्वाचं आहे.

मात्र, अगदी अलीकडेपर्यंत, बालपणात या गोष्टीची सुरूवात नेमकी कधी होते, याचं मानसशास्त्रज्ञांना आकलन नव्हतं.

हे शोधण्यासाठी, वेक्टा विद्यापीठातील क्रिस्तोफर ऑस्टरहॉस आणि फ्रीबर्ग विद्यापीठातील सुसान कोर्बर यांनी पाच वर्षे वयाच्या 161 मुलांचा अभ्यास केला.

त्यांनी पुढील पाच वर्षे विविध मनाच्या सिद्धांताशी निगडीत टास्कमधील या मुलांच्या कामगिरीचं मोजमाप केलं.

या माहितीचं विश्लेषण केल्यानंतर, त्यांना आढळलं की या मुलांची कामगिरी स्थिर होण्याआधी, पाच ते सात वर्षांच्या वयात या मुलांच्या क्षमतांमध्ये 'जोरदार वाढ' झाली होती. यातून असं दिसतं की त्यात एक संकल्पनात्मक किंवा वैचारिक स्वरुपाची झेप होती.

ते म्हणतात, "जर ती फक्त (कामातील गुंतागुंत हाताळण्यात मुलं हळूहळू चांगले होत असतील) टास्कमधील गुंतागुंत असती, तर त्यांच्या कामगिरीत स्थिर वाढ होण्याची अपेक्षा करता आली असती."

संशोधनातून असं दिसतं की, मानसिक स्थितीत ही झेप घेतल्यामुळे मुलांच्या सामाजिक जीवनावर आणि कल्याणावर तात्काळ, सकारात्मक परिणाम होतात.

"आम्हाला आढळलं की सामाजिक गोष्टींबाबत ते जितका अधिक तर्कसंगत विचार करू शकतात, तितकीच त्यांची एकाकीपणाची भावना कमी होते. कदाचित त्यांनी मैत्री करणं सोपं वाटत असेल किंवा घट्ट मैत्री करणं त्यांना अधिक सोपं जात असेल," असं ऑस्टरहॉस म्हणतात.

या निष्कर्षांसह डॉब्बेलार यांच्या संशोधनातून असं दिसून येतं की, सामाजिक वर्तनात वाढ झाल्यास संवेदनशीलतेमध्ये वाढ होते. उदाहरणार्थ, ज्यांना बाजूला सारण्यात आलं आहे, अशा व्यक्तीशी दयाळूपणानं वागणं.

याचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी एक प्रयोग केला. त्यात त्यांनी खेळाच्या मैदानात दुर्दैवानं दिसून येणाऱ्या सामान्य दादागिरीची नक्कल केली.

या प्रयोगात सायबरबॉल नावाचा एक साधा व्हीडिओगेम होता. यात चार खेळाडू एकमेकांकडे तो चेंडू देतात. यात भाग घेणाऱ्या मुलांना हे माहित नव्हतं की यातील इतर तीन खेळाडूंवर संगणकाद्वारे नियंत्रण ठेवलं जातं आहे. त्यातील दोन खेळाडूंचं कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंग असं केलं जाऊ शकतं, की ते तिसऱ्याकडे चेंडू देणार नाहीत आणि त्याला चेंडू पकडण्याची संधी कधीही देणार नाहीत.

यात सहभागी होणारे तरुण मुलं अन्यायाबाबत कमी संवेदनशील असल्याचं आढळून आलं. मात्र त्याऐवजी मध्यम बालपण आणि पौगंडावस्थेच्या सुरुवातीच्या टप्प्यात असणाऱ्या मुलांचा विचार करता, अनेक मुलं इतर खेळाडू ज्या मुलाकडे (बॉट) दुर्लक्ष केलं करत होते किंवा ज्याच्याकडे चेंडू देत नव्हते, त्याच्याकडे चेंडू पाठवत होते. ही मुलं पीडित मुलाला पाठिंबा देत होते.

मुलांच्या मेंदूचा एफएमआरआय स्कॅन केल्यावर, डोब्बेलार आणि त्यांच्या सहकाऱ्यांना आढळलं की, त्यांचं हे वर्तन मज्जातंतूच्या क्रियांमधील काही वैशिष्ट्यपूर्ण बदलांशी संबंधित आहे. यात स्वत:वर कमी लक्ष केंद्रीत करणं आणि इतरांवर अधिक लक्ष केंद्रीत करण्यात येत होतं.

"एखाद्या गोष्टीसंदर्भात दृष्टीकोन निर्माण करण्याच्या कौशल्यात वाढ झाल्यामुळे हे होऊ शकतं," असं त्या म्हणतात. कारण मुलांचे विकसित होणारे मेंदू त्या 'दुर्लक्षित किंवा पीडित मुलाच्या (बॉट)' भावना लक्षात घेण्यास सक्षम होते.

स्वत:वर संशय घेण्याची सुरुवात

हे इतके फायदे असले तरी सामाजिक बाबींमध्ये प्रगत तर्क करण्याचे तोटेदेखील असू शकतात. स्वत:बद्दल अधिक सजग होणं आणि स्वत:वर शंका घेणं हे ते तोटे असू शकतात.

'लायकिंग गॅप'चा अभ्यास यासाठी विचारात घ्या. या अभ्यासात आपल्याला एखादी व्यक्ती किती आवडते याच्या तुलनेत एखाद्या व्यक्तीला आपण किती आवडतो याला कमी लेखण्याची आपली प्रवृत्ती असते.

वॉटर वुल्फ सध्या उट्रेक्ट विद्यापीठात कार्यरत आहेत. त्यांनी अलीकडेच केलेल्या अभ्यासात आढळलं की, आवडण्यातील हा फरक सर्वात आधी वयाच्या पाचव्या वर्षी दिसून येतो. मध्यम बालपणात तो हळूहळू वाढतो.

इतरांच्या मानसिक स्थितीशी आपण जितकं अधिक जुळवून घेतो, तितकंच आपल्याला काळजी वाटू लागते की आपल्याबद्दलचा त्यांचा दृष्टीकोन आपल्याला हवा तितका मैत्रीपूर्ण आणि सकारात्मक नाही.

मला शंका आहे की पार्टीतील माझ्या खराब मूडमागं कदाचित हेच कारण असेल. स्वत:बद्दलचा सजगपणा आणि एकाकीपणाचा तो माझा पहिलाच अनुभव होता.

त्या अनुभवातून मला दु:ख का झालं आणि राग का आला हे व्यक्त करण्यासाठी तोपर्यंत माझ्याकडे शब्द नव्हते किंवा माझ्या इतरांबरोबरच्या आवडीनिवडीमधील अंतर कमी करून ज्यांना मी चांगलं ओळखत नव्हतो, त्यांच्याशी मैत्री करण्याचं कौशल्य माझ्यात नव्हतं.

गप्पांची ताकद

मुलांच्या आयुष्यातील वडिलधारे किंवा प्रौढ व्यक्ती, त्यांच्याशी नियमित संभाषण करून त्यांच्यामध्ये या कौशल्यांचा विकास होण्याची प्रक्रिया सुलक्ष करू शकतात.

उदाहरणार्थ, अँटनी 'भावनांच्या प्रशिक्षणा'च्या शक्तीबाबतच्या संशोधनाकडे लक्ष वेधतात. यात कोणतीही भूमिका न घेता किंवा निर्णय न घेता मुलांचं ऐकून घेणं, त्यांना काय वाटतं आहे हे मान्य करणं आणि यातून ते अधिक सकारात्मकपणे कसे पुढे जाऊ शकतात हे सुचवणं या गोष्टींचा समावेश आहे.

"वडिलधाऱ्यांनी किंवा प्रौढांनी मुलांसाठी सर्वकाही ठीक करण्याची गरज नाही. तर त्यांच्या भावना कशा हाताळाव्यात याच्या प्रक्रियेबद्दल मुलांना मार्गदर्शन करणं महत्त्वाचं आहे," असं अँटनी म्हणतात,

वडिलधारे मुलांना आकलनानं पुनर्मुल्यांकन करण्यास प्रोत्साहन देऊ शकतात. सुरूवातीला अस्वस्थ करणाऱ्या घटनेचा वेगवेगळ्या प्रकारे अर्थ कसा लावता येतो, हे मुलांना सांगू शकतात.

नंतर हे मूल पुन्हा याप्रकारे अस्वस्थ झाल्यावर ही शिकवण लागू करू शकतं. यामुळे भविष्यातील तणावांना ते हाताळू शकतं.

पालक किंवा वडीलधारे सामाजिक कोंडी किंवा पेचप्रसंगाबद्दल देखील मुलांशी बोलू शकतात. मग ते वास्तविक आयुष्यातील असेल किंवा काल्पनिक स्वरुपातील असेल.

"तुम्ही त्यांना विचारू शकता की या व्यक्तीनं अशी प्रतिक्रिया का दिली असेल? त्यांनी असं का म्हटलं असेल?" असं ऑस्टरहॉस म्हणतात.

यामुळे मुलांना इतर लोकांच्या मन:स्थितीबद्दल अधिक काळजीपूर्वक विचार करण्यास मदत होते. यातून मनाच्या अधिक प्रगत सिद्धांताला प्रोत्साहन मिळालं पाहिजे, असं ते म्हणतात.

कधीकधी, दोन वेगवेगळे दृष्टीकोन नैसर्गिकरित्या एकत्र येतात. जिवलग मित्र चुकीचा किंवा उर्मटपणे वागल्यामुळे एखाद्या मुलाला धक्का बसला असेल, तर यामागचं संभाव्य कारणांबद्दल प्रश्न विचारण्यास तुम्ही मुलांना प्रोत्साहन देऊ शकता.

कदाचित तो मित्र थकला असेल किंवा त्याचा तो दिवस खराब गेलेला असेल. ते काही तुझ्याबद्दल वैयक्तिक स्वरुपाचं नव्हतं आणि मित्राच्या त्या वर्तणुकीबद्दल रागावण्याऐवजी त्याकडे सहानुभुतीनं पाहिलं पाहिजे, असं तुम्ही मुलाला सांगू शकता.

आपण इतर कौशल्यं शिकतो, त्याचप्रमाणे या क्षमतांना देखील सततच्या सरावाची आवश्यकता असते. तसं केल्यानं अशा अनेक प्रसंगांमध्ये, स्वत:ची आणि इतरांची मन:स्थिती लक्षात घेण्यासाठी मूल अधिक सज्ज असेल.

तसंच त्यांच्या या विशिष्ट वयोगटानंतर (हलणाऱ्या दातांचं तारुण्यं) येणाऱ्या पौगंडावस्थेत आणि त्यानंतरच्या विविध प्रसंगांमध्ये ते उत्तमरितीनं मार्गदर्शक ठरू शकेल.

(डेव्हिड रॉबसन हे पुरस्कार विजेते विज्ञान लेखक आहेत. त्यांनी इतरही लिखाण केलं आहे. 'द लॉज ऑफ कनेक्शन: 13 सोशल स्ट्रॅटेजिस दॅट विल ट्रान्सफॉर्म युवर लाईफ' हे त्यांचं सर्वात अलीकडचं पुस्तक कॅनॉनगेट (युके) आणि पेगासस बुक्स (यूएसए आणि कॅनडा) यांनी जून 2024 मध्ये प्रकाशित केलं. ते इन्स्टाग्रामवर आणि थ्रेड्सवर @davidarobson या खात्यावर आहेत. तसंच सबस्टॅकवर ते 60 - सेकंड सायकॉलॉजी हे बातमीपत्र लिहितात.)

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.