You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
ऑस्ट्रियात शाळेच्या माजी विद्यार्थ्याने केला गोळीबार, अनेकांच्या मृत्यूची भीती
ऑस्ट्रियाच्या ग्राझ शहरातील एका माध्यमिक शाळेत गोळीबाराची धक्कादायक घटना घडली आहे.
स्थानिक वेळेनुसार आज मंगळवारी 10 जून रोजी सकाळी 10 वाजता (भारतीय वेळेनुसार दुपारी दीड वाजता) ही घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ग्राझ शहरातील एका मोठ्या माध्यमिक शाळेत गोळीबाराचे आवाज ऐकू आल्याने खळबळ उडाली.
ऑस्ट्रियाच्या गृह मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या गोळीबारात संशयित बंदूकधाऱ्यासह अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती आहे.
संशयित हा 21 वर्षीय तरुण होता आणि तो याच शाळेचा माजी विद्यार्थी होता. घटनेनंतर त्याने शाळेच्या स्वच्छतागृहात स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
गोळीबार झाल्यानंतर संशयिताने शाळेच्या शौचालयात स्वतःवर गोळी झाडल्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा संशयित व्यक्ती त्याच शाळेतला विद्यार्थी असल्याचं ऑस्ट्रियन पोलिसांनी स्थानिक मीडियाला सांगितलं.
घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, विशेष तुकड्यांचीही उपस्थिती आहे.
या हल्ल्यात विद्यार्थी आणि शिक्षक गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान ही इमारत आता सुरक्षित करण्यात आली आहे आणि आता कोणताही धोका नसल्याचं पोलिसांनी सांगितलं.
संपूर्ण इमारत सुरक्षित केल्यानंतर पोलिसांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली. त्यामध्ये त्यांनी मृतांची एकूण संख्या सांगण्यास नकार दिला. पण काही ऑस्ट्रियन मीडियाने दिलेल्या बातम्यांनुसार यात संशयित बंदूकधाऱ्यासह किमान नऊ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले आहे.
ग्राझ हे ऑस्ट्रियातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे शहर आहे आणि ते राजधानी व्हिएन्नापासून सुमारे 200 किमी अंतरावर आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)