मतदार महाराष्ट्रातले, पण BLO मध्य प्रदेशातले; नागपुरात SIR दरम्यान नेमकं काय घडलं?

- Author, भाग्यश्री राऊत
- Role, बीबीसी मराठीसाठी, नागपूर
- Published
- वाचन वेळ: 2 मिनिटे
महाराष्ट्रात सध्या एसआयआर (Special Intensive Revision) सुरू आहे. या प्रक्रियेदरम्यान नागपुरातील एकाच घरातील दोन मतदारांचे BLO (Booth Level Officer) थेट मध्य प्रदेशात दाखवत आहेत. हे दोन्ही मतदार वर्षानुवर्षापासून नागपुरात वास्तव्यास असताना देखील हा प्रकार घडल्यानं कुटुंबीयांनी नाराजी व्यक्त केली आहे.
प्रभावती हंसराज गजभिये आणि अरुणा हंसराज गजभिये असं या आई व मुलीचं नाव असून या दोन्ही मतदारांचे BLO मध्य प्रदेशात दाखवत आहेत.
सध्या SIR सुरू असल्यानं त्यांचा मुलगा ही प्रक्रिया करण्यासाठी BLO कडे गेला होता. पण BLO नं सांगितलं की, दोघींचंही नाव कुठेच दिसत नाहीत. त्यामुळे मग त्यांच्या मुलानं आपला BLO कुठला आहे याचा शोध निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर घेतला असता मध्य प्रदेशातील धुहौनी येथील BLO असल्याचं दाखवलं.
इतकंच नाही, तर दोघीही एकाच घरी राहत असताना दोन्ही मतदारांचे BLO दोन वेगवेगळे दाखवले आहेत. यापैकी एका BLO चे नाव जानींद्रप्रसाद यादव आणि दुसऱ्याचे नाव राजेंद्रप्रसाद द्विवेदी असल्याचं मतदार प्रभावती गजभिये यांचा मुलगा रवी गजभिये यांनी बीबीसी मराठीसोबत बोलताना सांगितलं.
2002 मध्ये हा भाग पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघात येत होता. त्या यादीत भाग क्रमांक 333 मध्ये 1368 आणि 1369 क्रमांकावर प्रभावती हंजराज गजभिये आणि अरुणा हंसराज गजभिये या आई व मुलीचे नाव दिसतेय.
आता हा भाग दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघात येतो. नागपूर महापालिकेच्या प्रभाक क्रमांक 28 धन्वंतरी या भागात ते राहतात. हा प्रभाग नागपूरच्या महापौर निता ठाकरे यांचा आहे.
गजभिये कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, हे कुटुंब वर्षानुवर्ष इथंच वास्तव्यास आहे. आतापर्यंत झालेल्या सगळ्या निवडणुकांमध्ये नागपुरातच मतदान केलं. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीतही या दोन्ही मतदारांनी मतदान केलं.
SIR साठी प्रमाण मानलेल्या 2002 च्या मतदार यादीत नाव असतानाही SIR च्या वेळी नाव का सापडत नाही? दोन मतदारांचे नाव मध्य प्रदेशात कसे गेले? नाव मुद्दाम गायब करून मतदानाचा हक्क हिसकावण्याचा हा प्रकार आहे का? असा सवाल रवी गजभिये यांनी उपस्थित केला.

यासंदर्भात बीबीसी मराठीनं नागपूरच्या उपजिल्हा निवडणूक अधिकारी रचना इंदूरकर यांच्यासोबत बोललो. ही तांत्रिक चूक असल्याचं त्यांनी मान्य केलंय.
त्या सांगतात, "ही तांत्रिक चूक आहे. मी त्या भागातल्या ERO ला (Electoral Registration Officer) आदेश दिले आहेत. असं का घडलं? मध्य प्रदेशातला BLO कसा काय मिळाला? याची चौकशी आम्ही करत आहोत."
SIR चं काम होण्याआधी प्री-एसआयआर प्रक्रिया करण्यात आली होती. त्यामध्ये BLO ना टेबल वर्क करून एकसारखी नाव बघून मॅपिंग करायची होती. त्यामध्ये कदाचित ही चूक झाली असावी, असंही इंदूरकर यांचं म्हणणं आहे.
उपजिल्हा निवडणूक अधिकाऱ्याकडे आलेली ही दुसरी तक्रार आहे. याआधी नागपुरातील एका मतदाराला पालघरमधील BLO मिळाल्याची तक्रार होती.
तुमच्यासोबतही असाच प्रकार घडला तर काय करायचं?
समजा एखाद्या मतदाराचं नाव एसआयआर करताना मतदार यादीत सापडलं नाही किंवा 2002 च्या यादीत आहे, पण आता तुमच्या बीएलओकडे तुमचं नावच नाही किंवा तुमचा बीएलओ दुसऱ्या राज्यात दाखवतोय, दुसऱ्या जिल्ह्यात दाखवतोय, तर अशावेळी काय करायचं?
तर निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या मतदारांचे 8 ऑगस्टपर्यंत नोंदणी फॉर्म म्हणजे ईएफ आले, त्यांची नोंदणी यशस्वी होईल. पण जे मतदार सुटले किंवा ज्यांचं नाव मतदार यादीत सापडलं नाही, त्यांनी स्थानिक मतदार नोंदणी अधिकारी म्हणजे ईआरओकडे एक अर्ज करायचा आहे. त्या अर्जांवर 17 ऑगस्टपासून सुनावणी सुरू होणार आहे. त्यामध्ये संबंधित मतदार याच ठिकाणी राहतो, त्याचा जन्माचा पुराव्यासारखे कागदपत्रं पडताळून अधिकाऱ्याची खात्री झाल्यानंतर त्यांचं नाव मतदार यादीत समाविष्ट केलं जाईल. नवीन मतदार असेल तर त्यांना नव्यानं नोंदणी करायला सांगितलं जाणार आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






















