संदीप शर्माने धोनीला रोखलं; राजस्थानचा शानदार विजय

फोटो स्रोत, Getty Images
शेवटचं षटक. 21 धावांचा बचाव करण्याची जबाबदारी पण समोर सर्वोत्तम फिनिशर्सपैकी एक महेंद्रसिंग धोनी आणि रवींद्र जडेजा. नाट्यमय घडामोडींनंतर समीकरण 1 चेंडू 5 धावा असं झालं. धोनी विरुद्ध संदीप अशा थेट मुकाबल्यात संदीपने बाजी मारली. बुंध्यात यॉर्कर टाकत संदीपने धोनीला केवळ एकच धाव घेऊ दिली आणि राजस्थानने 3 धावांनी दिमाखदार विजय मिळवला.

फोटो स्रोत, ani
शेवटच्या षटकात चेन्नईला 21 धावांची आवश्यकता होती. शेवटचं षटक टाकण्यासाठी राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनकडे दोन पर्याय होते- संदीप शर्मा आणि कुलदीप सेन. संजूने अनुभवी संदीपच्या हातात चेंडू सोपवला. दडपणाखाली संजूने दोन वाईड टाकले. संदीपने पहिला चेंडू निर्धाव टाकला. पण दुसऱ्या चेंडूवर धोनीने लेगस्टंपच्या दिशेने टाकलेल्या चेंडूवर षटकार लगावला.
तिसऱ्या चेंडूवर धोनीने स्क्वेअर लेगच्या दिशेने तडाखेबंद षटकार लगावला. चौथ्या चेंडू संदीपने राऊंड द विकेट टाकला. या चेंडूवर धोनीने जोरदार फटका लगावला पण केवळ एकच धाव निघाली. पाचव्या चेंडूवर जडेजाने चेंडू तटवून काढत एक धाव घेतली. अखेरच्या चेंडूवर चेन्नईला विजयासाठी 5 धावा हव्या होत्या. षटकात आधी दोन यॉर्करवर धोनीने षटकार लगावले होते. मात्र शेवटचा चेंडू संदीपने यॉर्करच टाकला. धोनीने जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न यशस्वी होऊ शकला नाही. चेंडू मिडविकेट क्षेत्रात गेला आणि चेन्नईला एकच धाव मिळाली.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
176 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईने ऋतुराज गायकवाडला झटपट गमावलं. भन्नाट फॉर्मात असलेल्या ऋतुराजला संदीप शर्माने तंबूत परतावलं. ऋतुराजने शेवटच्या हंगामातला फॉर्म कायम राखला आहे. ऋतुराजने 8 धावाच करु शकला.
मुंबईविरुद्ध सामन्याचा शिलेदार अजिंक्य रहाणेने डेव्हॉन कॉनवेला चांगली साथ दिली. या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी 43 चेंडूत 68 धावांची भागीदारी केली. या जोडीने एकेरी-दुहेरी धावा आणि चौकारांची सुरेख मिलाफ साधत. खेळपट्टीवर स्थिरावलेला रहाणे धोकादायक वाटत होता. रवीचंद्रन अश्विनने रहाणेचा अडथळा दूर केला. अश्विनच्या गोलंदाजीवर स्वीप करण्याचा प्रयत्न फसला आणि रहाणेला तंबूत परतावं लागलं. त्याने 19 चेंडूत 31 धावांची खेळी केली.
अश्विनने भात्यातून आणखी एक शस्त्र काढत फटकेबाजीसाठी प्रसिद्ध शिवम दुबेला माघारी धाडलं. अश्विनचा टप्पा पडून शिवमच्या पॅडवर जाऊन आदळला. त्याला 8 धावाच करता आल्या. अडम झंपाच्या गोलंदाजीवर संदीप शर्माने लाँग लेग क्षेत्रात मोईन अलीचा शानदार झेल टिपला.
गोलंदाज सिसांदा मगालाच्या जागी इम्पॅक्ट प्लेयर म्हणून अंबाती रायुडूला समाविष्ट करण्यात आलं. रायुडू इम्पॅक्ट दाखवण्यात अपयशी ठरला. दुसऱ्याच चेंडूवर युझवेंद्र चहलच्या चेंडूवर षटकार मारायचा प्रयत्न शिमोरन हेटमायरच्या हातात गेला.
15 षटकं खेळून डेव्हॉन कॉनवेने 38 चेंडूत 50 धावा केल्या. वाढत्या धावगतीचं दडपणाखाली कॉनवेची एकाग्रता भंगली. चहलने फ्लाईट दिलेल्या चेंडूवर कॉनवे कव्हरच्या डोक्यावरून मारायला गेला पण चेंडू हवेत उंच उडाला, यशस्वी जैस्वालने कोणतीही चूक न करता चांगला झेल टिपला.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
धोनी फलंदाजीला उतरला तेव्हा चेन्नईला 30 चेंडूत 63 धावांची आवश्यकता होती.
धोनी-जडेजा जोडीने अश्विनविरुद्ध कोणताही धोका पत्करला नाही. 16व्या षटकात केवळ 4 धावा चेन्नईला मिळाल्या. चहलच्या शेवटच्या षटकातही त्यांनी कोणताही धोका घेतला नाही. चहलने केवळ 5 धावा दिल्या. धावगतीचं आव्हान 15च्या वर जात असतानाही धोनी-जडेजा जोडीने फिरकीपटूंना सन्मान देत एकेरी दुहेरी धावांवर भर दिला.
18वं षटक टाकण्यासाठी झंपा अवतरला. या षटकात धोनीने एक उत्तुंग षटकार आणि खणखणीत चौकार वसूला. या षटकात चेन्नईने 14 धावा कुटल्या.
शेवटच्या 2 षटकात चेन्नईला 40 धावा हव्या होत्या. जेसन होल्डरच्या पहिल्या चेंडूवर एक धाव मिळाली. दुसऱ्या चेंडूवर धोनीलाही एकच धाव करता आली. तिसऱ्या चेंडूवर जबरदस्त स्ट्रेट ड्राईव्ह लगावत चौकार लगावला. पुढचा चेंडू वाईड देण्यात आला. चौथ्या चेंडूवर रवींद्र जडेजाला पॅडवर चेंडू मिळाली आणि त्याने चेंडू फाईनलेगच्या दिशेने प्रेक्षकांमध्ये भिरकावून दिला. होल्डरने पुनरागमन करत पाचवा चेंडू निर्धाव टाकला. पण जडेजाने षटकातल्या शेवटच्या चेंडूवर षटकार खेचला. 19व्या षटकात चेन्नईने 19 धावा चोपून काढल्या.
शेवटच्या षटकात संदीप शर्माने धोनी-जडेजा जोडीला चमत्कार करू दिला नाही. राजस्थानतर्फे रवीचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल आणि अॅडम झंपा यांनी विकेट्स पटकावतानाच धावगतीला वेसण घातली. अश्विनला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.
चेन्नईचा कर्णधार धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. चेन्नईने युवा डावखुरा वेगवान गोलंदाज आकाश सिंगला पदार्पणाची संधी दिली. मिचेल सँटनर आणि ड्वेन प्रिटोरस यांच्याऐवजी मोईन अली आणि महेश ठिकसाना यांना संघात समाविष्ट केलं.
तुषार देशपांडेच्या बॅक ऑफ लेंथ चेंडूने यशस्वी जैस्वालला चकवलं. तो फक्त 10 धावा करु शकला. संथ खेळीमुळे मागच्या सामन्यात डच्चू देण्यात आलेला देवदत्त पड्डीकल या सामन्यात परतला. बटलर-पड्डीकल जोडीने दुसऱ्या विकेटसाठी 41 चेंडूत 77 धावांची खेळी केली. जडेजाच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याचा देवदत्तचा प्रयत्न फसला. त्याने 26 चेंडूत 38 धावांची खेळी केली. त्याच षटकात जडेजाने राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनला त्रिफळाचीत केलं आणि पाहुण्यांची 88/3 अशी स्थिती झाली.

फोटो स्रोत, IPL/BCCI
लागोपाठ 2 विकेट्स पडलेल्या आणि खेळपट्टी फिरकीपटूंना साथ देणारी या विचारातून रवीचंद्रन अश्विनला पाचव्या क्रमांकावर पाठवण्यात आलं. अश्विनने स्थिरावण्यासाठी वेळ घेतला. बटलरला चांगला सूर गवसला होता पण अश्विन आल्यानंतर त्याला स्ट्राईकच मिळेना. अश्विन-बटलर जोडीने 37 चेंडूत 47 धावा जोडल्या.
अश्विनने पदार्पणवीर आकाश सिंगच्या गोलंदाजीवर आक्रमण केलं. पण अश्विनचा फटका सिसांदा मगालाच्या हातात गेला. त्याने 22 चेंडूत 30 धावा केल्या. बटलरने आपल्या खेळीदरम्यान अर्धशतक पूर्ण केलं. आयपीएल स्पर्धेतलं त्याचं हे 22वं अर्धशतक आहे.
अर्धशतकी खेळीदरम्यान बटलरने आयपीएल स्पर्धेत 3000 धावांचा टप्पाही ओलांडला.
स्ट्राईकसाठी धडपडणाऱ्या जोस बटलरला इंग्लंड संघातील सहकारी मोईन अलीने बाद केलं. बटलरने 36 चेंडूत 1 चौकार आणि 3 षटकारांसह 52 धावांची खेळी केली.

फोटो स्रोत, ani
शिमोरन हेटमायरने जितके चेंडू मिळाले त्यांचा सदुपयोग करत 18 चेंडूत 30 धावांची उपयुक्त खेळी केली.
ध्रुव जुरेल (४),, जेसन होल्डर (0) आणि अडम झंपा (1) कोणीही मोठी खेळी करू शकले नाहीत. मोईन अलीने दोन झेल सोडले आणि एक रनआऊटची संधीही त्याच्या हातून हुकली.
चेन्नईतर्फे आकाश सिंग, तुषार देशपांडे आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
धोनीचा कर्णधार म्हणून 200 सामना

फोटो स्रोत, @CHENNAIIPL
चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार म्हणून महेंद्रसिंग धोनीचा 200 सामना होता. यानिमित्ताने चेन्नई संघव्यवस्थापनाने धोनीचा सत्कार केला. आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक सामन्यांमध्ये नेतृत्वाचा विक्रम धोनीच्याच नावावर आहे.
धोनीच्या नेतृत्वात चेन्नईने 120 सामन्यात विजय मिळवला आहे तर 78 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. धोनीच्या नेतृत्वात चेन्नईने चारवेळा (2010, 2011, 2018, 2021) आयपीएल जेतेपदावर नाव कोरलं आहे. धोनीच्या नेतृत्वात चेन्नईने 9वेळा आयपीएल स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























