कर्नाटक निवडणूक : 91 शिव्या आणि बजरंगबलीचा किती प्रभाव? पारडं कुणाचं जड? भाजपं की काँग्रेस?

नरेंद्र मोदी

फोटो स्रोत, Narendra Modi

    • Author, इम्रान कुरैशी
    • Role, बीबीसी हिंदीसाठी
  • Published

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकमधील विजयासाठी जीव एकवटला आहे. गेल्या सात दिवसांत त्यांनी 17 रॅली आणि पाच रोड शो केले आहेत. दक्षिण भारतातील अत्यंत महत्त्वाचं राज्य असलेल्या कर्नाटकातले निकाल लोकसभा आणि अनेक राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी कर्नाटकात भाजपाचा विजय आगामी निवडणुकांसाठी एक प्रतीक म्हणून वापरू इच्छित आहेत.

मोदी गेल्या नऊ दिवसांपैकी दोन दिवस दिल्लीच्या बाहेर होते. हे अभूतपूर्व आहे. त्यांनी असं यासाठी केलं जेणेकरून ते कर्नाटकात तीन ते चार रॅली करू शकतील,

कर्नाटकातील निवडणूक प्रचार आज (8 मे) ला संपेल. 10 मेला मतदान होईल. निवडणुकांचे निकाल 13 मेला येतील.

पंतप्रधान मोदी कर्नाटकवर लक्ष देणं अतिशय स्वाभाविक आहे कारण या राज्यात त्यांच्या पक्षाचं नशीब त्यांना बदलायचं आहे. तिथे 1985 नंतर कोणताच सत्ताधारी पक्ष सत्तेत परत आलेला नाही.

हा निवडणूक प्रचार यासाठी महत्त्वाचा आहे कारण ही अशी पहिली निवडणूक आहे जिथे कर्नाटकातले सगळ्यात मोठे नेते बीएस येडियुरप्पा पक्षाच्या प्रचाराचं नेतृत्व करत नाहीयेत.

येडियुरप्पांनी त्यांच्या बळावर 2008 मध्ये सत्ता मिळवून दिली होती. 2018 मध्ये त्रिशंकू विधानसभेनंतर 2019 मध्ये पक्षाचं सरकार स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

दोन्ही वेळेला भारतीय जनता पक्षाने 110 आणि 104 जागांवर विजय मिळवला होता. 224 सदस्य असलेल्या विधानसभेत 113 हा आकडा कोणालाही गाठता आला नाही.

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

हा निवडणूकीचा एक पैलू आहे आणि यावेळी भाजपला राज्यात विरोधी लाटेचा सामना करावा लागत आहे.

गेले अनेक महिने काँग्रेसने भाजपावर भ्रष्टाचाराचे आरोप लावले होते आणि त्याला 40 टक्के कमिशन असलेलं सरकार असल्याचं म्हटलं होतं.

भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर भाजपला घेरण्याशिवाय काँग्रेसने त्यांच्या निवडणूक प्रचारात चार आश्वासनं जनतेला दिली होती. त्यात बेरोजगारी, महागाई सारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर जनतेला दिलासा देण्याचं आश्वासन दिलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 29 एप्रिलला त्यांच्या प्रचाराला सुरुवात केली होती. काँग्रेसने त्यांच्यावर जे आरोप लावले होते त्यांना प्रत्युत्तर देत त्यांनी हा निवडणुकीचा मुख्य मुद्दा केला होता.

त्यांनी काँग्रेस नेत्यांना विषारी साप, नालायक बेटा अशा विधानांचा हवाला देत सांगितलं की काँग्रेसचे नेते कसे त्यांना शिव्या देतात आणि त्यांच्यावर वैयक्तिक टीका करतात.

त्याशिवाय त्यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावरही टीका केली. तसंच हनुमानाच्या अपमानाबद्दल वारंवार टीका केली.

राजकीय विश्लेषक संदीप शास्त्री म्हणतात, “भाजपा नेत्यांच्या देहबोलीतून आत्मविश्वास झळकत नाही.”

प्रचारात प्रभावी ठरलेले मुद्दे

नरेंद्र मोदी

फोटो स्रोत, Narendra Modi

निवडणुकीची तारीख जवळ येईस्तोवर कर्नाटकातील निवडणुकीचा प्रचार आणखी तीव्र झाला.

मात्र काँग्रेसने भाजपवर लावलेल्या 40 टक्के कमिशन सरकारचा आरोप याला अपवाद होता.

सर्वांत आधी राज्यात कंत्राटदारांनी आणि शाळेतल्या अधिकाऱ्यांनी सरकारवर हा आरोप लावला होता आणि पंतप्रधानांना पत्र लिहून या आरोपांची माहिती देण्यात आली होती.

राज्याच्या राजकारणावर लक्ष ठेवून असणाऱ्या राजकीय विश्लेषकांच्या मते काँग्रेसने भाजपाच्या आरोपांवर प्रतिक्रिया देण्याऐवजी निवडणुकीचा जाहीरनामा तयार करण्यावर भर दिला होता.

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या नेतृत्वात सत्ताधारी भाजप काँग्रेसच्या आरोपांना योग्य पद्धतीने उत्तर देऊ शकली नाही.

एका पेमेंट ऍपची निवडणूक प्रचारात मदत घेतली गेली. त्यात काँग्रेसने मुख्यमंत्र्यांना घेरण्यासाठी पेसीएम हे अभियान सुरू केलं. त्याला भाजप प्रत्युत्तर देऊ शकली नाही.

राज्यात निवडणुका जाहीर होण्याच्या आधीच राज्यात मुख्यमंत्र्यांना घेरण्यासाठी काँग्रेसने त्यांच्या निवडणुकीचा जाहीरनामा तयार केला होता.

काँग्रेसने काही कल्याणकारी योजनांचा आराखडा तयार केला. त्याला पंतप्रधान मोदी यांनी रेवडी संस्कृती म्हणत त्यावर टीका केली.

काँग्रेस पक्षाने दारिद्र्यरेषेखेली राहणाऱ्या प्रत्येक कुटुंबासाठी दर महिन्याला दहा किलो तांदूळ, दारिद्र्यरेषेखाली राहणाऱ्या महिला कुटुंबप्रमुखाला दर महिना दोन हजार रुपये आणि पदवीधर बेरोजगारांना दोन वर्षांपर्यंत बेरोजगारी भत्ता देण्याच्या लोकप्रिय घोषणा केल्या.

आक्रमक निवडणूक प्रचार

काँग्रेसने त्यांच्या जाहीरनाम्यात एका छोट्या परिच्छेदात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडलं.

काँग्रेसने त्यांच्या जाहीरनाम्यात बजरंग दल, पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया आणि अन्य संस्थांवर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आहे.

बजरंग दलाची तुलना PFI शी केल्यामुळे भाजप आक्रमक झाला आहे. PFI वर कथित दहशतवादी संस्थांकडून पैसे घेतल्याचा आरोप झाला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या निवडणूक सभांची सुरुवात जय बजरंग बली या घोषणेने केली.

नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलं की लोकांनी जय बजरंगबलीची घोषणा देऊन मतदान करावं.

काँग्रेसने प्रत्युत्तरादाखल गोव्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी श्रीराम संगठनेवर बंदी आणल्याचा उल्लेख केला. तेव्हा रामाचा अपमान झाला नाही का असा प्रश्न काँग्रेसने भाजपला विचारला.

काँग्रेस नेता जयराम रमेश एका पत्रकार परिषदेत म्हणाले, “तेव्हा असं काही म्हटलं गेलं नाही. बजरंग दलाची तुलना बजरंग बलीशी होऊ शकत नाही आणि बजरंग दल बजरंग बली होऊ शकत नाही.”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या प्रचाराची सुरुवात करण्याआधी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी मोदी यांना विषारी साप असं संबोधलं.

पंतप्रधान मोदी यावर उत्तर देताना म्हणाले की काँग्रेसने त्यांना 91 वेळा शिव्या दिल्या आहेत. त्याच्या दुसऱ्या दिवशी मोदी म्हणाले, “ते मला साप म्हणाले पण साप शंकराच्या गळ्यातला हार आहे. मी कर्नाटकच्या लोकांना शंकर मानतो. मी या वक्तव्याचं स्वागत करतो.”

दुसऱ्या दिवशी प्रियांक खर्गे यांनी मोदी यांना नालायक मुलगा असं म्हटलं. त्यामुळे मोदींना आणखी एक सोपा मुद्दा मिळाला. प्रियांक खर्गे चित्तापूर विधानसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा निवडून येऊ इच्छित आहेत.

काँग्रेससमोर चहावाला वादासारखी स्थिती तयार झाली आहे का?

नरेंद्र मोदी

फोटो स्रोत, Narendra Modi

2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेसचे नेते मणिशंकर अय्यर यांनी मोदींना चायवाला म्हटलं होतं.

यावर काँग्रेसविरुद्ध चाय पे चर्चा नावाने आक्रमक प्रचार अभियान राबवलं होतं. त्यामुळे काँग्रेसला प्रचंड नुकसान झालं होतं.

अशा परिस्थितीत प्रश्न पडतोय की आताच्या राजकीय वादाचा निवडणुकीवर काय परिणाम होईल?

राजकीय विश्लेषकांच्या मते असा कोणताही फरक पडणार नाही.

राजकीय विश्लेषक डी.उमापथी म्हणतात, “पंतप्रधान मोदींनी ध्रुवीकरणाचा मुद्दा बराच आधी सोडला आहे. कारण त्यांना कळून चुकलं आहे की त्याचा फारसा फायदा होणार नाही. कारण लोकांसमोर रोजगाराचा आणि महागाईचा मुद्दा होता. बेरोजगारी हाही मोठा मुद्दा होता. याशिवाय सरकारविरोधी लाटेचा सामना भाजपला करावा लागत आहे.”

तर अझीम प्रेमजी विद्यापीठाचे प्राध्यापक ए. नारायण म्हणतात, “मला वाटत नाही अशा प्रकारच्या वादाचा फारसा परिणाम होईल. कारण गेल्या काही दिवसात मी गावातल्या लोकांशी चर्चा केली आणि मला समजून चुकलं की प्रत्यक्ष असा कोणताही मुद्दा नाही. लोक काही बोलण्याच्या आधीच राज्यातल्या भाजप सरकारवर टीका करताना दिसतात.”

त्याचवेळी प्राध्यापक शास्त्री यांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं की काँग्रेस भाजपच्या हल्ल्याला तोंड देऊ शकतंय का हे शेवटच्या आठवड्यात कळेल आणि त्यांच्या मते काँग्रेसने बऱ्यापैकी तोंड दिलंय.

प्राध्यापक शास्त्री लोकनिती नेटवर्कचे सहाय्यक संचालक सुद्धा आहेत. त्यांनी सीएसडीएस आणि एनडीटीव्ही बरोबर सर्वेक्षण केलं होतं. त्यात असं समोर आलं होतं की भाजपला 61 टक्के विरोधी लाटेचा सामना करावा लागेल,

त्याशिवाय 57 टक्के लोकांना असं वाटतंय की भाजप पुन्हा सत्तेत येऊ नये. मुख्यमंत्रिपदासाठी सगळ्यांत लोकप्रिय नेते म्हणून सिद्धारमैय्या समोर आले आहेत.

बसवराज बोम्मई परत यावेत असं 22 टक्के लोकांना वाटतं. जेडीएस नेता आणि माजी मुख्यमंत्री एचडी कुमारास्वामीना 15 टक्के लोकांनी पसंती दिली आहे. येडियुरप्पा यावेळी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नाही. राज्यात पाच टक्के लोकांना वाटतं की ते मुख्यमंत्री व्हावेत तर डीके शिवकुमार मुख्यमंत्री व्हावेत असं चार टक्के लोकांना वाटतं.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)