संजय राऊत: 'एकच शिवसेना खरी, बाकी सर्व धोतऱ्याच्या कडू बिया' #5मोठ्या बातम्या

103 दिवसांनी तुरुंगातून सुटका झाल्यावर संजय राऊत यांनी शिंदे गटावर टीका केली आहे.

फोटो स्रोत, Getty Images

Published

1. संजय राऊत: 'एकच शिवसेना खरी, बाकी सर्व धोतऱ्याच्या कडू बिया'

शिवसेनेचे ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) खासदार संजय राऊत अखेर तुरुंगाबाहेर आले आहे. 102 दिवसांनंतर पीएमएलए न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर संजय राऊत आर्थर रोड तुरुंगातून बाहेर आले.

यावेळी गळ्यात भगवं उपरण आणि त्याच जोशात संजय राऊतांनी शिवसैनिकांना अभिवादन केलं. त्यानंतर एकच शिवसेना खरी आहे, बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केलेली. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील. बाकी सर्व धोतऱ्याच्या कडू बिया आहेत. हळूहळू तुम्हाला कळेलच असे म्हणत संजय राऊतांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे. ते ‘एबीपी माझा’शी बोलत होते.

“ 100 दिवसानंतर बाहेर आलो आहे, बाहेर काय चाललं याची माहिती मिळत नव्हती. शिवसेनेचा कणा मोडलेला नाही. मी लढणारा शिवसैनिक असून, आख्ख आयुष्य बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंबरोबर गेलं आहे. एकच शिवसेना खरी आहे, ती बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील, बाकी सर्व धोतऱ्याच्या कडू बिया आहेत. हा महाराष्ट्र आणि मुंबई कोणाच्या मागे उभी आहे कळेल,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

2. 'खोके घेतले म्हणजे पैसे घेतले असा अर्थ होत नाही' - एकनाथ खडसे

एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेना आमदार आणि अपक्षांनी केलेल्या बंडानंतर राज्याच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांची मालिका रंगली आहे.

यातच ठाकरे गट आणि विरोधकांनी 50 खोक्यांच्या मुद्द्यावरुन शिंदे गटावर वारंवार निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. परिणामी आता शिंदे गटाने विरोधकांना कोर्टात खेचण्याचा इशारा दिला आहे.

आमच्यावर 50 खोक्यांचा आरोप करणाऱ्यांवर मानहानीचा दावा ठोकू, असा इशारा शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी दिला आहे. यावर आता एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

एकनाथ खडसे

"खोक्यांचा व्यवहार हा आतला व्यवहार असतो. त्यामुळे खोके घेतले की नाही घेतले याला पुरावा असू शकत नाही. खोके आणि पेट्यांचा व्यवहार झाला, हे शिंदे गटाच्या आमदारांनीच सांगितलं होतं.

गुवाहाटीपासून खोक्यांची सुरुवात झाली आणि शिंदे गटाचे आमदार ज्यावेळी गेले होते तेव्हा त्यांनीच खोक्यांचा विषय काढत सूचक वक्तव्य केलं होतं," असा आरोप एकनाथ खडसे यांनी केला. ही बातमी आयबीएन न्यूज 18 लोकमतने दिली आहे.

3. पक्ष तोंडानं कसा फोडला जाऊ शकतो, याचं उत्तम उदाहरण म्हणजे… - सय्यद यांची खोचक टीका

दीपाली सय्यद या शिंदे गटात सहभागी होणार आहेत. शिंदे गटात सहभागी होण्याच्या आधीच दीपाली सय्यद यांनी रश्मी ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर टीका केली. शिवसेनेच्या फायरब्रँड महिला नेत्या अशी दीपाली सय्यद यांची ओळख. कधीकाळी भाजपच्या महिला नेत्यांना त्या थेट भिडत होत्या.

शिंदे आणि ठाकरे गटात दिलजमाईसाठीही त्यांनी प्रयत्न केले होते. मात्र, याच दीपाली सय्यद आता शिंदे गटात जाणार आहेत. शनिवारपर्यंत दीपाली सय्यद यांचा शिंदे गटात प्रवेश होणार आहे.

शिंदे आणि ठाकरे असे दोन गट होण्यात सर्वात जास्त वाटा हा संजय राऊत यांचा असल्याचा आरोप दीपाली सय्यद यांनी केला आहे. पक्ष तोंडानं कसा फोडला जाऊ शकतो, याचं उत्तम उदाहरण म्हणजे संजय राऊत असं त्या म्हणाल्या.

ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली आहे.

4. संभाजी भिडे कोण आहेत हे माहित नव्हते, मोठे आहेत म्हणून पाया पडले - सुधा मूर्ती

संभाजी भिडे यांच्या पाया पडल्या म्हणून लेखिका-उद्योजक सुधा मूर्ती यांच्यावर सोशल मीडियावर टीकेची झोड उठलेली पाहायला मिळाली.

त्यानंतर सुधा मूर्ती यांनी संभाजी भिडेंबाबत सांगली येथे झालेल्या भेटीबाबत खुलासा केला आहे.

संभाजी भिडे हे कोण आहेत माहीत नव्हते. ते वयाने मोठे आहेत म्हणून मी त्यांच्या पाया पडले असं सुधा मूर्ती यांनी म्हटले आहे.

सिंधुदुर्गमध्ये माध्यमांना त्यांनी सांगितले. लोकमतने ही बातमी दिली आहे.

सुधा मूर्ती

5. मोदी-शाहांच्या गुजरातमधील गावाचा निवडणुकीवर बहिष्कार

गुजरात विधानसभेच्या निवडणुका जाहीर होणार असल्याने सध्या गुजरातचीच चर्चा आहे. डिसेंबर महिन्यामध्ये गुजरात विधानसभेसाठी निवडणुका होणार आहेत.

1 आणि 5 डिसेंबर रोजी मतदान होणार असून 8 डिसेंबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. पण, नवसारी जिल्ह्यातील गावामधील नागरिक निवडणुकीवर बहिष्कार टाकत आहेत. नवसारीत वाहणारी अंबिका नदी अनेक गावातून जाते, त्या नदीवर वटी गावाचाही समावेश आहे.

वटी गावातून जाणारी अंबिका नदीमुळे आता जनतेने निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. ही नदी ओलांडण्यासाठी पूल बांधण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.

स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही आपल्याला पाण्यातून नदी पार करावी लागत असल्याची खंत येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे. वर्षानुवर्षे येथील नागरिक नदीच्या पाण्यातून प्रवास करत असल्याचे येथील नागरिक सांगतात, ही बातमी आज तक ने दिली आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त