मनोज जरांगे: सगेसोयऱ्यांचा अध्यादेश आज द्या नाहीतर उद्या आम्ही आझाद मैदानात जाऊ

Published

'नोंदी सापडलेल्यांच्या नातेवाईकांनी अर्ज करा. त्यांनाही प्रमाणपत्र मिळेल,' असं मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

वाशीच्या शिवाजी महाराज चौकात जमलेल्या हजारो आंदोलकांना बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, "आज(26 जानेवारी) ला सकाळी शासनाच्या वतीने आपल्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. आपण शासनाकडे काही मागण्या केल्या होत्या आणि त्या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठीच आपण मुंबईपर्यंत आलो आहोत. सरकारशी चर्चा झाली पण एकही मंत्री आले नाहीत.

सामान्य प्रशासनाचे सचिव सुमंत भांगे सरकारचा निर्णय घेऊन आपल्यापर्यंत आले होते. सरकारने कोणते निर्णय घेतले आहेत ते त्यांनी आम्हाला सांगितलं.

आम्हीही ते निर्णय अर्धवट वाचले. तेवढा वेळही सकाळी नव्हता. आज संपूर्ण देश आपल्याकडे बघतो आहे. सरकारने त्यांची भूमिका आम्हाला कळवली.

आपलं म्हणणं होतं की 54 लाख नोंदी मराठ्यांच्या खरच सापडल्या असतील तर त्या प्रमाणपत्रांचं वाटप तुम्ही करा. ज्या नोंदी सापडल्या त्या नेमक्या कुणाच्या आहेत हे माहिती करायचं असलं तर ग्रामपंचायतीला तसे कागद चिकटवले पाहिजेत आणि तरच लोकांना प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्ज करता येईल.

ते म्हणाले की काही जणांनी अर्ज केले नाहीत. असं होऊ नये म्हणूनच ग्रामपंचायतींमध्ये या नोंदीची माहिती लावा. 54 लाख नोंदी ज्या मिळालेल्या आहेत त्यांना प्रमाणपत्र देण्यासाठी गावागावात शिबिरं लावण्यात आल्याची माहिती सरकारने दिली.

57 लाख लोकांपैकी कोणाला दिलेत त्याचा डाटा द्या.

दुसरा विषय होता की ज्या नोंदी मिळालेल्या आहेत त्यांच्या सगळ्या कुटुंबाला ओबीसी प्रमाणपत्र देण्यात यावेत अशी आपली मागणी होती. काही ठिकाणी एका नोंदीवर सत्तर जणांना लाभ मिळाला, काही ठिकाणी दोनशे लोकांना मिळाला. एकाच नोंदीवर पाच जणांना प्रमाणपत्र मिळालं तर दोन कोटी मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र मिळेल.

54 लाख नोंदींच्या वंशावळी जोडायला काही काळ लागेल आणि त्यासाठी एक समिती बनवल्याचा शासननिर्णय त्यांनी घेतल्याचं सांगितलं. आता ज्यांच्या नोंदी मिळाल्या आहेत त्यांना प्रमाणपत्र मिळवायचं असेल तर त्यांनी अर्ज करणं गरजेचं आहे. ती आपली जबाबदारी आहे. आपल्याला नोंदी शोधण्यासाठी मदत करायची आहे.

आतापर्यंत 37 लाख लोकांना प्रमाणपत्र दिल्याचं सरकारने सांगितलं ज्या लोकांना मिळाले आहेत त्यांचा डाटा मागितला आहे कारण नेमके दिलेत कुणाला

57 लाख लोकांपैकी कोणाला दिलेत त्याचा डेटा द्या. 'नोंदी सापडलेल्यांच्या नातेवाईकांनी अर्ज करा. त्यांनाही प्रमाणपत्र मिळेल.' शिंदे समितीची दोन महिने मुदत वाढवली. त्यांनी वर्षभर मुदत वाढवावी. ज्याची नोंद मिळाली नाही त्यांच्या घरातल्यांच्या प्रमाणपत्राच्या आधारे प्रमाणपत्र द्यावे, याचा अध्यादेश आम्हाला पाहिजे

54 लाख नोंदी आणि त्यांच्या परिवारातील नोंदी आणि त्याच्या आधारावर सगेसोय-यांना प्रमाणपत्र द्यायचे. ज्यांच्याकडे नोंदी सापडल्या नाहीत त्यांनी शपथपत्र द्यायचं आहे की हा आमचा सगासोयरा आहे. त्या शपथपत्रावर लगेच प्रमाणपत्र देण्याची मागणी आम्ही करत आहोत.

सगळे गुन्हे मागे घ्या

अंतरवालीसह महाराष्ट्रातील सर्व गुन्हे मागे घ्यायचे - ही मागणीबाबत म्हटलंय की गृहविभागाकडून प्रक्रिया सुरू आहे. पण या आदेशाचं पत्र नाही. त्या पत्राची तयारी करावी.

वंशावळी जुळवण्यासाठी तालुकास्तरीय समिती गठीत केली आहे. तहसीलदार, पोलीस अधिकारी, मोडी लीपीचे अधिकारी अशी समिती नेमली आहे.

क्युरेटीव्ह पीटीशनचा विषय सुप्रीम कोर्टात आहे. सगेसोय-याच्या मार्गाने एखादा राहिला तर क्युरेटीव्ह पीटीशन पूर्ण होईपर्यंत - 100% आरक्षण मिळेपर्यंत सर्व मराठ्यांना 100% मोफत शिक्षण देण्यात यावं

जरांगे पाटील यांची नवीन मागणी

क्युरेटीव्ह पीटीशन मार्फत आरक्षण मिळेपर्यंत मोफत शिक्षण आणि सरकारी भरत्या आरक्षण मिळेपर्यंत करायच्या नाही.

शासकीय भरत्या करायच्या असल्या तर आमच्या जागा राखीव ठेऊन करायच्या. राज्यातील मुलींना केजी टू पीजी शिक्षण देण्याचा सरकारने घेतला आहे. मोफत शिक्षणात बदल करावा मुलींसोबत मुलांचाही उल्लेख करावा, हा जीआर संध्याकाळपर्यंत द्यावा

संपूर्ण आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजातील विद्यार्थ्यांना संपूर्ण मोफत शिक्षण देण्यात यावं अशी आमची मागणी आहे.

आम्हाला मुंबईत यायची हौस नव्हती

सग्यासोय-या व्याख्यासह अध्यादेश काढणार असं विधी व न्याय विभागाच्या सचिवांचं म्हणणं आहे. यावर सर्वांनी सह्या केलेल्या आहेत.

एवढं झालंय तर अध्यादेश रात्रीतून द्या. वाटल्यास आजची रात्र इकडेच काढतो. कायद्याचा सन्मान करून आज आझाद मैदानात जात नाही पण मुंबई सोडणार नाही.एवढं केलंय तर अध्यादेश द्या. मी ही

अभ्यासकांच्या माध्यमातून याचा कीस पाडतो, त्रुटी आहे की नाही याचा अभ्यास करतो, तुम्ही आज रात्रीतून अध्यादेश दिला नाही तर उद्या आझाद मैदानात जाणार, उपोषण सकाळी 11 पासून सुरू केलंय. ते सुरू राहणार.

मी माझ्या जातीसाठी मरायला सुद्धा तयार आहे. मराठा समाज न्यायासाठी इथे आला आहे. आम्ही आडमुठापणा करायला आलेलो नाही. त्रास देण्याचा प्रयत्न झाला तर राज्यभरातील सर्व मराठा करोडोंच्या संख्येने येईल.

सगेसोय-यांचा अध्यादेश आज संध्याकाळी, किंवा रात्रीत द्या. किंवा उद्या अकरा वाजेपर्यंत द्या. नाहीतर आम्ही आझाद मैदानात जाऊ.

हेही नक्की वाचा

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)