हिटलरवेड, वैचारिक गुंता की भरकटलेलं मन; नागपूरच्या मुलीनं आत्महत्या का केली?

    • Author, भाग्यश्री राऊत
    • Role, बीबीसी मराठीसाठी
  • Published
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

(सुरुवातीला हत्येचा संशय असलेल्या पोलिसांनी तीन महिन्याच्या तपासात एक आत्महत्येचं प्रकरण कसं सोडवलं? त्या घटनेमागची गोष्ट काय आहे? हे बीबीसी मराठीच्या 'गुन्ह्याची गोष्ट' या मालिकेतून तुमच्यापर्यंत आणत आहोत.)

दोन पानांची टाईप केलेली मोठी सुसाईड नोट... ती पण इतक्या कठीण शब्दात होती की त्यात काय लिहिलंय... यासाठी पोलिसांना डिक्शनरीचा वापर करावा लागला, बेडरुममध्ये जर्मनसह इतर विदेशी भाषांमध्ये लिहिलेले सगळे कोट, डायरी हे सगळं वाचून प्रकरणाचा तपास करताना काही गोष्टी उलगडण्यासाठी पोलिसांना एका भाषातज्ज्ञाची मदत घ्यावी लागली.

सुरुवातीला सुसाईड नोटवरून आत्महत्या आहे, असं समोर आलंच. पण, तरीही पोलिसांना संशय असल्यानं त्यांनी तीन महिने तपास केला आणि ही आत्महत्याच असल्याचं स्पष्ट झालं.

पण, ही आत्महत्या काही साधी नव्हती. मृत्यूनंतर काय होतं? असं सर्च करून एका 17 वर्षीय मुलीनं आत्महत्या केली होती. त्यामुळे ही आत्महत्या सगळ्यांनाच हादरवणारी होती.

नेमकं काय घडलं होतं? पोलिसांना काय काय सापडलं? त्याची ही गोष्ट

सूचनाः या बातमीतील काही तपशील विचलित करू शकतात.

तारीख होती 27 जानेवारी 2025, वार सोमवार

ठिकाण होतं नागपूर

धंतोली पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनामिका मिर्झापुरे यांनी बीबीसी मराठीला दिलेल्या माहितीनुसार, धंतोली पोलीस ठाण्याला 27 जानेवारीला सकाळीच माहिती मिळाली की एका 17 वर्षीय मुलीनं आत्महत्या केली आहे. पोलीस तपासासाठी घरी गेले असता तिथली सगळी परिस्थिती बघून त्यांनाही धक्का बसला.

पांढऱ्या रंगाचा ड्रेस घालून मुलीनं आत्महत्या केली होती. तिच्या बेडरुममध्ये सगळीकडे रक्त सांडलेलं होतं. ती बेडरुमच्या बाहेर असलेल्या बाथरुममध्ये गेली असेल तर तिथपर्यंत सगळं रक्त सांडलं होतं.

मुलीनं स्वतःच्या गळ्यावर उल्लू नाईफ (चाकू)ने वार केला होता, तर हातावर चाकूनेच पाच रेषा काढल्या होत्या. हा चाकू तिच्या वडिलांना कुठूनतरी गिफ्ट मिळाला होता तर तो तिनं तिच्या खोलीत ठेवून घेतला होता.

रक्ताळलेला हात घेऊन ती घरात फिरली तरी घरातच असलेल्या तिच्या आई-वडिलांना काहीच माहिती झालं नाही. कारण, ती जराही ओरडली नव्हती.

महत्त्वाचं म्हणजे तिनं मृत्यूनंतर काय होतं? असं गुगलवर सर्च करून आत्महत्या केली होती.

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यांनी तिनं लिहिलेली सुसाईड नोट, तिनं लिहिलेल्या दोन डायरी असं सगळं साहित्य तपासासाठी जप्त केलं.

सुसाईड नोटमध्ये लिहिल्या होत्या धक्कादायक गोष्टी

अनामिका मिर्झापुरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, "तिने दोन पानांची सुसाईड नोट लिहिली होती. यामध्ये इतके अवघड शब्द लिहिले होते, काही शब्द Gen Z वापरतात तसेही होते त्यामुळे सुसाईड नोट समजायला थोडी अवघड होती. त्यानंतर डिक्शनरी बघून बघून त्या सुसाईड नोटमध्ये काय लिहिलंय हे पोलिसांनी शोधून काढलं.

"माझी प्रॉपर्टी लोकांना दान करून द्या. मला मृत्यूनंतर जंगलात गाडा किंवा समुद्रात फेका. तिला जर्मनीला जायचं आहे, इथं राहायचं नाही. तिनं नाझी विचारसरणीचा उल्लेखही केलेला होता," अशी माहितीही मिर्झापुरे यांनी दिली.

ती मोबाईल आणि लॅपटॉपवर खूप वेळ सर्च करायची. आत्महत्या करण्याआधी तिनं मृत्यूनंतर काय होतं? असं खूपवेळा सर्च केलं होतं. तसेच कोणती नस कापल्यानं कसं मरू शकतो? ल्युसिफर कोण होता? देवाच्या विरुद्ध नेमकं काय असतं? असं सगळं तिच्या सर्च हिस्ट्रीमध्ये पोलिसांना सापडलं होतं.

'ती नाझी विचारसरणीचं अनुसरण करायची'

ही मुलगी प्रचंड हुशार होती. तिला 12 भाषा यायच्या. ती रोज तिची डायरी लिहायची. यामध्ये ती सगळ्या गोष्टींची नोंद ठेवत होती. आपल्याला इतक्या वाजता अमुक काम करायचं आहे हे सुद्धा ती लिहून ठेवायची.

याच डायरीमध्ये तिनं, तिला मुंबईहून नागपूरला यायचं नव्हतं, नागपूर कमी दर्जाचं शहर आहे, असंही लिहिलं होतं. तिला जर्मनीला जायचं होतं. ती 2022 पासून आत्महत्येसाठी प्रयत्न करत होती, असंही समोर आल्याचं अनामिका मिर्झापुरे यांनी सांगितलं.

तिला वाचनाचं फार वेड होतं. तिच्या घरात खूप सारी पुस्तकं होती. ती फार शांत राहायची. कोणासोबत इतकं बोलायची पण नाही. तसेच तिच्या बेडरुममध्ये वेगवेगळ्या भाषांमधली वाक्यं लावली होती. जास्तीत जास्त वाक्यं नाझी विचारसरणीची होती. हिटलरची वाक्यं तिनं जर्मन भाषेत बेडरुममध्ये लावली होती.

नाझी विचारसरणीची त्यात अनेक वाक्यं होती. पोलिसांनी जर्मन भाषेच्या तज्ज्ञाला बोलावून त्या कोटचा अर्थ समजून घेतला होता. यामध्ये 'आता केलं नाहीतर कधीच करू शकणार नाही, आता त्रासदायक ठरेल' अशी काही वाक्यं तिच्या बेडरूममध्ये होती तिच्या सर्च हिस्ट्रीवरून आणि वाचनावरून ती नाझी विचारसरणीला खूप फॉलो करायची असं समोर आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

'कल्ट सायकॉलॉजीतून असे प्रकार घडतात'

पण, एखादी व्यक्ती हे सगळं करून आत्महत्या करण्याच्या विचारापर्यंत का पोहोचते? आत्महत्या का करते? यामागे काही मानसिक कारण असतं का? हे सुद्धा आम्ही मानसोपचार तज्ज्ञांकडून जाणून घेतलं.

नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक आणि मानसोपचार तज्ज्ञ डॉ. मनिष ठाकरे बीबीसी मराठीसोबत बोलताना म्हणाले, हा कल्ट सॉयकॉलॉजीचा प्रकार आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या, एखाद्या विचारसरणीच्या आहारी जाऊन आपली सारासार विचार करण्याची शक्ती गमावून आत्महत्या करणं. याआधी विदेशात कल्ट सॉयकॉलॉजीमुळे आत्महत्या झाल्याचे अनेक प्रकार घडले आहेत.

एखादा व्यक्ती म्हणत असेल की जग बुडणार आहे, तुम्ही असं केलं तर वाचाल तर कुठलाही विचार न करता तसंच वागायचं. एकूणच गूढ अनुभव घेण्यासाठी हे सगळं केलं जातं. यामध्ये स्वतःला किती हानी होईल याचा विचार करण्याचीही क्षमताही त्यांच्याकडे नसते. कारण, त्या गोष्टी सतत वाचल्यामुळे आपण असाच अनुभव घ्यायला हवा हे विचार डोक्यात सातत्यानं येतात. यामध्ये सारासार विचार करण्याची क्षमताही ते गमावून बसतात.

आधीच्या काळात एखादे धार्मिक महाराज, बाबा त्यांच्या विचारसरणीखाली येऊन अनेकांनी आत्महत्या केल्याचे प्रकार बाहेर देशात घडलेले आहेत, असंही डॉ. मनिष ठाकरे सांगतात.

अशा परिस्थितीत पालकांनी काय करायला हवं?

पण, आपली मुलं अशी विचित्र वागत असतील, त्यांच्या वागण्यात बदल झाला असेल, असा जीवाला धोका पोहोचवणाऱ्या कुठल्या विचारसरणीचं ते अनुसरण करत असतील तर पालकांनी नेमकं काय करायला हवं? याबद्दल डॉ मनिष ठाकरे सल्ला देतात.

ते म्हणतात, आपली मुलं अशा गोष्टी वाचत असतील, कुठलं गेम चॅलेंज स्वीकारत असतील तर त्यांना त्यापासून वेळीच दूर करा. त्यांच्यावर लक्ष ठेवा. पालकांनी या सगळ्या गोष्टी करून मुलं ऐकत नसतील तर ज्यांचं ते ऐकतात अशा व्यक्तीकडून त्यांचं काऊन्सलिंग करून घ्या. शेवटी कुठला पर्याय उरला नसेल मानसोपचारतज्ज्ञाकडे दाखवा. पण, मुलांकडे वेळीच लक्ष द्या.

महत्त्वाची सूचना

औषधोपचार आणि थेरपीच्या मदतीने मानसिक आजारांवर उपचार शक्य आहेत. यासाठी तुम्ही मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेणं गरजेचं आहे. तुम्हाला किंवा एखाद्या परिचित व्यक्तीमध्ये अशा प्रकारच्या मानसिक आजारांची लक्षणं दिसल्यास या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधून मदत मिळवू शकता.

हितगुज हेल्पलाईन, मुंबई - 022- 24131212

सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालय -1800-599-0019 (13 भाषांमध्ये उपलब्ध)

इंस्टिट्यूट ऑफ ह्यूमन बिहेवियर अँड एलाइड सायन्सेस - 9868396824, 9868396841, 011-22574820

नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्स - 080 - 26995000

विद्यासागर इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड एलाइड सायन्सेस, 24X7 हेल्पलाइन-011 2980 2980

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)