You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
एरंडाच्या बियांतून 'रायसिन'; गुजरात पोलिसांना डॉक्टरांकडे सापडलं विषारी शस्त्र?
- Author, बल्ला सतीश
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 5 मिनिटे
एरंडाच्या बियांपासून तयार होणाऱ्या रायसिन या घातक विषाची चर्चा पुन्हा एकदा होताना दिसत आहे. जगभरात अनेक ठिकाणी या विषाचा वापर करून गुन्हेगारी कृत्य करण्याचे प्रयत्न झाल्याचे दिसून आले आहे.
भारतातही रायसिन विष प्रसारमाध्यमांमध्ये बातम्यांचा विषय ठरला आहे. याला निमित्त ठरले गुजरात पोलीस.
गुजरात पोलिसांनी अहमद मोहिउद्दीन सय्यद, आझाद सुलेमान शेख आणि मोहम्मद सुहेल मोहम्मद सलीम या तिघांना अटक केली आहे.
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, गुजरात दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) सांगितलं आहे की, या तिघांनी लखनऊ, दिल्ली आणि अहमदाबादमध्ये मोठ्या कटाची पूर्वतयारी म्हणून विविध ठिकाणांची रेकी केली होती. पण त्यांनी त्यासाठी निवडलेला मार्ग आता मोठ्या चर्चेचा विषय बनला आहे.
गुजरात एटीएसने आरोप केला आहे की, या संशयित आरोपींनी लोकांना मारण्यासाठी एरंडाच्या बियांमधून काढलेलं विष वापरण्याची योजना आखली होती.
गुजरात पोलिसांच्या म्हणण्यानुसार, डॉ. अहमद मोहिउद्दीनने चीनमध्ये एमबीबीएसचं शिक्षण घेतलेलं आहे. रसायनशास्त्रातील ज्ञान वापरून त्याने एरंडाच्या बियांमधून विष तयार केल्याचा आरोप आहे.
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, मोहिउद्दीनचे इस्लामिक स्टेटशीही संबंध असल्याचे गुजरात पोलिसांनी सांगितलं आहे.
एरंडाच्या बियांपासून बनवलेल्या विषानं खरंच माणूस मरू शकतो का?, असा प्रश्न या प्रकरणामुळे निर्माण झाला आहे.
गुजरात पोलिसांनी संशयितांना जेव्हा अटक केली तेव्हा त्यांच्याकडे एरंडाचं तेल सापडलं. 'इंडियन एक्सप्रेस'ने दिलेल्या वृत्तानुसार, संशयितांपैकी एकाने पोलिसांना सांगितलं की, ते एरंडाच्या बियांमधून रायसिन काढण्याचा प्रयत्न करत होते. परंतु, त्या विषाचा वापर कसा करायचा हे अजून तपासून पाहायचं आहे. पोलीस सध्या त्याच दिशेने तपास करत आहेत.
गुजरात एटीएसचे डीआयजी म्हणाले की, संशयित आरोपी मोठ्या दहशतवादी हल्ल्याच्या तयारीत होते. परंतु त्यांनी तयार केलेलं रायसिन सापडलं नाही. रायसिन बनवण्याच्या प्रयत्नात असतानाच पोलिसांनी पकडलं.
रायसिन नक्की काय आहे?
रायसिन हे एरंडाच्या बियांपासून तयार होणारं एक विषारी द्रव्य आहे.
या वनस्पतीचं शास्त्रीय नाव रिकिनस कम्युनिस आहे. बियांमधून तेल काढल्यानंतर उरलेल्या भागातून हे विष मिळतं. याचा अगदी छोटासा डोस घेतला तरी ते धोकादायक ठरू शकतं.
एरंडाचं तेल धोकादायक नसतं. तेल काढल्यानंतर उरलेल्या बियांच्या घट्ट भागातून (पिप्पी) विशेष शुद्धीकरणाच्या पद्धतीने रायसिन वेगळं काढलं जातं.
भारतासह अनेक देश सदस्य असलेल्या 'ऑर्गनायझेशन फॉर द प्रोहिबिशन ऑफ केमिकल वेपन्स' या संस्थेच्या मते, रायसिनचा समावेश रासायनिक शस्त्रांच्या यादीत केला आहे.
परंतु आतापर्यंत सिद्ध झालेल्या गुन्ह्यांमध्ये, जगभरात फक्त एकाच प्रकरणात रायसिनचा वापर करून खून झाल्याचे स्पष्ट झालं आहे.
रायसिन शरीरात अनेक मार्गांनी घातक ठरू शकतो. इंजेक्शनने, तोंडाद्वारे, त्वचेद्वारे किंवा श्वासोच्छवासातून. याला वासही नाही आणि चवही नाही. त्यामुळे अन्नात मिसळलं तरी ते कोणी ओळखू शकत नाही.
रसायनशास्त्रानुसार रायसिन हे एक लेक्टिन नावाचं प्रोटीन म्हणजेच प्रथिन आहे. ते कार्बोहायड्रेटशी चिकटणारं प्रोटीन आहे.
'काही जण त्याचा गैरवापर करत आहेत'
''रायसिनचा वापर काही वेळा कॅन्सरवरील उपचारासाठीही होतो. परंतु, काही लोक त्याचा गैरवापर करत आहेत,'' असं सिकंदराबादच्या गांधी मेडिकल कॉलेजचे भूलशास्त्राचे प्राध्यापक डॉ. किरण मदाला यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.
त्यांच्या म्हणण्यानुसार, हे विष श्वासाद्वारे, तोंडाने किंवा इंजेक्शनने शरीरात गेलं तर हानी पोहोचू शकते. हे शरीरातील पेशींमध्ये प्रोटीन तयार होण्याची प्रक्रिया थांबवतं, त्यामुळे साधारण 36 ते 72 तासांत माणसाचा मृत्यू होऊ शकतो.
अमेरिकेची सरकारी संस्था सीडीसीने (सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन) आपल्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार...
रायसिन पांढऱ्या पिठासारखं दिसतं. ते द्रव किंवा घन अशा दोन्ही रूपांत तयार करता येतं. एरंडाचं तेल काढल्यानंतर उरलेल्या भागातून हे विष मिळवतात. हे शरीरातील पेशींमध्ये प्रोटीन तयार करण्याची प्रक्रिया थांबवतं. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या अॅलर्जी होऊ शकतात, आणि अगदी छोटासा डोस घेतला तरी ते घातक ठरू शकतं.
रायसिन हवा, पाणी किंवा अन्नात मिसळून शरीरात जाऊ शकतं. हे तोंडाने, इंजेक्शनने, श्वास घेऊन, डोळ्यांद्वारे किंवा जखमांमधूनही शरीरात प्रवेश करू शकतं.
रायसिन शरीरात गेल्यानंतर काही तासांपासून ते काही दिवसांपर्यंत कोणतीही लक्षणं दिसत नाहीत. त्यानंतर त्याचा परिणाम दिसू लागतो. साधारण सहा तासांत त्याचा पचनसंस्थेवर परिणाम जाणवू लागतो.
साधारणपणे, रायसिनमुळे झालेल्या विषाचा परिणाम 2 ते 5 दिवसांनी यकृत, मेंदूची मध्यवर्ती मज्जासंस्था (सीएनएस), मूत्रपिंड आणि एड्रिनल ग्रंथींवर (अधिवृक्क ग्रंथी) दिसू लागतो. यावर सायटोटॉक्सिक (पेशींना हानी पोहोचवणारा) परिणाम होतो.
रायसिनच्या विषाचा परिणाम सुरू झाल्यानंतर साधारण 3 ते 5 दिवसांत माणूस दगावण्याची शक्यता असते. रायसिन शरीरात कोणत्या रूपात गेला, किती प्रमाणात गेला आणि शरीराच्या कोणत्या भागात गेला, यावर हे अवलंबून असतं.
रायसिनसाठी थेट प्रतिकारक औषध (अँटिडोट) नाही. तरीही, प्राथमिक उपचार करून शक्य तितक्या लवकर रुग्णाला डॉक्टरांकडे घेऊन जाणं गरजेचं आहे. परिस्थितीचं गांभीर्य पाहून त्यानुसार उपचार केले पाहिजेत.
डॉ. किरण मदाला यांनी सांगितलं की, "एरंडाचं तेल धोकादायक नाही. थोड्या प्रमाणात बियांचं थेट सेवन केल्यासही फार धोका नाही. परंतु बियांना विशेष प्रक्रियेने शुद्ध (रिफाइन) केल्यावरच रायसिन तयार होतो.
एका बियात एवढं रायसिन नसतं की, ते धोकादायक ठरावं. पण एकाच वेळी मोठ्या प्रमाणात बिया खाल्ल्या तर विषबाधा होऊ शकते."
रायसिनमुळे झालेली हत्या
बल्गेरियाच्या कम्युनिस्ट राजवटीतून पळून जाऊन लंडनमध्ये राहणाऱ्या जॉर्ज मार्कोव्ह यांचा खून रायसिनमुळे झाला होता. अशाप्रकारचं हे एकमेव प्रकरण आहे. हा खून 1978 मध्ये झाला. बीबीसीच्या माहितीनुसार, लंडनच्या वॉटरलू ब्रिजवर झालेल्या या हल्ल्याला 'अम्ब्रेला असॅसिनेशन' किंवा 'अम्ब्रेला मर्डर' असंही म्हटलं जातं.
1960च्या दशकात जॉर्ज मार्कोव्ह बल्गेरियातील एक प्रसिद्ध लेखक होते. 1969 मध्ये कम्युनिस्ट पक्षाकडून त्रास झाल्यामुळे ते लंडनमध्ये स्थायिक झाले. बीबीसीच्या बाह्य सेवेसाठीही त्यांनी काम केलं. इतर संस्थांसाठी त्यांनी केलेल्या अहवालांमुळे कम्युनिस्ट शासक संतप्त झाले आणि त्यांची हत्या करण्यात आली.
एका अज्ञात व्यक्तीने छत्रीने त्यांच्यावर वार केला होता. त्यांना मांडीमध्ये वेदना जाणवत होत्या. रात्री त्यांना ताप झाला. चार दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला, त्यावेळी त्यांच्या मृत्यूचं कारण समजलेलं नव्हतं.
तपासात असं समजलं की, त्याच्या मृत्यूचे कारण रायसिनने भरलेली खूप छोटी धातूची नळी किंवा गोळी (पॅलेट) होती. या प्रकरणात बल्गेरिया आणि सोव्हिएत केजीबी यांचा सहभाग असल्याचे आरोप झाले आहेत.
जगभरातील रायसिनची प्रकरणं
पहिल्या महायुद्धाच्या काळापासूनच रायसिनचा उपयोग झाल्याच्या नोंदी आहेत.
जगभर अनेकवेळा लोकांना मारण्यासाठी किंवा हानी पोहोचवण्यासाठी रायसिन वापरायचे प्रयत्न झाले. जगभरातील पोलिसांनी असे अनेक कट वेळोवेळी उधळवून लावले आहेत.
अमेरिकेत ओबामा, ट्रम्प यांच्यासारख्या अनेक दिग्गज राजकीय नेत्यांना रायसिन पावडर पाठवण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत.
गुजरातप्रमाणेच 2018 मध्ये जर्मनीतही पोलिसांनी रायसिन तयार करणाऱ्यांना पकडलं होतं. जगभर अशा अनेक रायसिन प्रकरणांची नोंद आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)