अपयशी अभिनेता पण यशस्वी उद्योजक, ज्याच्या स्वार्थीपणामुळे लाखो महिलांना मिळाले उत्पन्नाचे साधन

    • Author, टिम हार्फर्ड
    • Role, प्रेझेंटर, 50 थिंग्ज दॅट मेड द मॉडर्न इकॉनॉमी
  • Published
  • वाचन वेळ: 7 मिनिटे

आज सहज उपलब्ध असलेलं शिवणयंत्र किंवा शिलाई मशीन एके काळी एक महागडं, दुर्लभ असं उपकरण होतं.

पण 19व्या शतकात एका स्वार्थी पण अतिशय चतुर उद्योजकाने म्हणजेच आयझॅक मेरिट सिंगरने केवळ मशीन बनवलं नाही, तर याची एक संपूर्ण बाजारपेठ उभी केली.

त्याच्या या संशोधनातून केवळ शिलाई यंत्राचा विकास झाला नाही, तर स्त्रियांच्या जीवनातही मोठा बदल घडून आला.

स्त्रियांना घरबसल्या पैसे कमावता येतील, असा एक नवा मार्ग त्याने उपलब्ध करुन दिला.

'स्त्रियांना निर्णय घेणाऱ्या' म्हणून जाहिरातीत दाखवलं गेलं, आर्थिक स्वावलंबनाचा विचार पुढे आला आणि बायकांचं स्थान हळूहळू बदलू लागलं, हे सगळं एका स्वार्थी व्यावसायिकाच्या यशस्वी मार्केटिंग धोरणामुळे झालं.

सिंगरने त्याच्या काळात, आपली उत्पादने विकण्यासाठी कदाचित फक्त नफा मिळवण्यासाठी सामाजिक बदलांना हातभार लावला.

या प्रकाराला 'वोक कॅपिटलिझम' म्हणतात, म्हणजे कंपन्या समाजात बदल घडवणाऱ्या विचारांना पाठिंबा देतात. आज हे सगळं खूप आधुनिक आणि नवीन वाटत असलं, तरी खरं तर वोक कॅपिटलिझम इतकं नवं नाही, जितकं आपल्याला वाटतं.

आपला नफा कमावण्यासाठी सिंगरने आपण काही तरी उदात्त कार्य करत आहोत असं भासवलं त्यामुळे त्याचे टीकाकार त्याला स्वार्थी म्हणतात.

नाविन्याची आवड असलेला अपयशी अभिनेता

शिलाई मशीन ज्या काळात आलं तो काळ आधी आपण समजून घेऊ. 1850 मधील अमेरिका सामाजिक सुधारणेच्या दृष्टीने फारसा प्रगत नव्हता.

काही वर्षांआधी जेव्हा एलिझाबेथ कॅडी स्टँटन यांनी महिलांना मतदानाचा अधिकार मिळावा अशी मागणी केली होती तेव्हा सर्वांना भुवया उंचावल्या होत्या. ही मागणी खूपच धाडसी आहे, असं त्यांच्यासोबत असणाऱ्या समर्थकांनाही त्यावेळी वाटत असत.

याच काळात बोस्टनमध्ये एक उद्योजक, संशोधक आपलं नशीब आजमावून पाहत होता. तोच हा सिंगर.

त्याने एका वर्कशॉपच्या शोरूममध्ये जागा भाड्याने घेतली होती, कारण त्याला लाकडी छपाईच्या अक्षरांना कोरणारी मशीन विकायची होती. पण तेव्हा लाकडी अक्षरांचा वापर कमी होत चालला होता.

त्यानं त्याचं उपकरण अत्यंत हुशारीने बनवलेलं होतं, पण कोणालाही ते विकत घ्यायचं नव्हतं. त्यामुळे तो हताश झाला होता. त्यानंतर या उद्योजकाने आणखी एका वेगळ्या उपकरणाच्या उत्पादनाकडे लक्ष द्यायचं ठरवलं. ते उपकरण होतं - शिलाई मशीन.

एक शर्ट शिवायला तब्बल 14 तास

शिलाई मशीन बनवण्यासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू होतं पण कुणालाही सफाईने चालणारे शिलाई मशीन बनवण्यात यश मिळाले नव्हते.

संधी अगदी स्पष्ट होती. खरं तर, त्या काळी शिवणकाम करणाऱ्या महिलांना फार कमी पैसे मिळायचे. न्यूयॉर्क हेराल्ड या वृत्तपत्राने लिहिलं होतं, "अशा महिला कामगारांना पगार तर खूप कमी मिळतो आणि पुन्हा त्यात खूप त्रासही सहन करावा लागतो."

त्यावेळी एक शर्ट शिवायला 14 तास लागायचे. पण जर हेच काम लवकर केलं, तर त्यातून खूप पैसे कमवता आले असते.

केवळ शिवणकाम करणाऱ्या महिलाच त्रास सहन करत नव्हत्या, तर बहुतांश घरातल्या मुलींनाही शिवणकाम करावं लागत होतं.

त्या काळातील एक लेखिका सारा हेल यांच्या मते, हे काम 'कधीच न संपणारं आणि वारंवार सुरू राहणारं' होतं.

'50 थिंग्स दॅट मेड द मॉडर्न इकॉनॉमी' या मालिकेत अशा शोधांबद्दल, कल्पनांबद्दल आणि नवीन संकल्पनांबद्दल सांगितलं जातं, ज्यांनी आजचं आर्थिक जग तयार होण्यास मदत केली.

ही मालिका 'बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस'वर प्रसारित केली जाते. या कार्यक्रमाबद्दल अधिक माहिती, त्याचे स्रोत, सर्व भाग ऑनलाईन ऐका किंवा पॉडकास्ट सबस्क्राईब करा.

वैयक्तिक आयुष्यात महिलांबद्दल असंवेदनशील

आयझॅक मेरिट सिंगर हा सुरुवातीला नाटकातून काम करायचा. त्यातून फारसं काही हाती न लागल्यानंतर तो उद्योगाकडे वळला.

तो आकर्षक, करिष्माई आणि खूप उदारही होता. पण त्याचबरोबर तो खूप कठोर आणि निर्दयीसुद्धा होता.

त्याचे अनेक महिलांशी असलेले संबंध हा चर्चेचा विषय असायचे, या संबंधातून त्याला किमान 22 मुलं झाली होती.

वर्षानुवर्षे तो एकाच वेळी तीन वेगवेगळ्या कुटुंबांबरोबर आयुष्य जगत होता आणि त्यातल्या सगळ्यांना एकमेकांच्या अस्तित्वाची माहितीही नव्हती.

एका महिलेशी लग्न करुन तिच्यापासून लपवून त्याने दुसऱ्या महिलेशी लग्न केलं होतं. एका महिलेने तर त्यानं तिला मारहाण केल्याची तक्रारही केली होती.

थोडक्यात सांगायचं तर, सिंगर हा स्त्रियांना हक्क मिळावेत याचा समर्थक नव्हता. पण त्याचं असं विचित्र वागणं पाहून काही महिलांना मात्र आपल्या हक्कांसाठी लढण्याची प्रेरणा मिळाली असेल.

त्याची चरित्रलेखिका, रूथ ब्रँडन या खोचकपणे म्हणतात की, "तो असा माणूस होता, ज्यामुळे महिलांच्या हक्कांसाठीच्या चळवळीला अधिक ठोस असं कारण मिळालं."

सिंगरने शिवणयंत्राचा नमुना (प्रोटोटाईप) बारकाईने पाहिला आणि विचार केला.

"गोल फिरणाऱ्या शटलच्या जागी मी ते सरळ रेषेत पुढे-पाठीमागे हालवीन, आणि वाकवलेल्या सुईला आडवं ढकलणाऱ्या नीडल बारच्या जागी, मी सरळ सुई वरखाली हालणारी ठेवीन," असं सिंगरने वर्कशॉप मालकाला सांगितलं.

सिंगरने आपण केलेल्या सुधारणांचे पेटंट करून घेतले आणि त्यानं तयार केलेलं मशीन विकायला सुरुवात केली. ते मशीन खरंच प्रभावी होतं, कारण ते पहिलं डिझाईन होतं जे खरंच व्यवस्थित चालत होतं. आता एक शर्ट फक्त एका तासात शिवता येत होता.

शिलाई मशीनचं जागतिक 'युद्ध'

दुर्दैवाने, सिंगरच्या मशीनमध्ये अशा अनेक शोधांचा वापर करण्यात आला होता, जे आधीच इतर शोधकांनी पेटंट करून ठेवले होतं, जसं की कपड्याला शिवताना लॉक स्टिच तयार करणारी खाच असलेली, टोकाला भोक असलेली सुई, आणि कापड पुढे सरकवण्यासाठी वापरली जाणारी यंत्रणा.

1850च्या दशकातल्या तथाकथित 'शिलाई मशीन युद्धा'दरम्यान, वेगवेगळ्या कंपन्या शिवणयंत्र विकण्यापेक्षा एकमेकांवर पेटंटच्या उल्लंघनासाठी खटले भरण्यातच अधिक रस घेत होत्या.

अखेरीस एका वकिलाने सगळ्यांना एकत्र बोलावलं आणि त्यांना हे सांगितलं की, तुमच्यापैकी चार वेगवेगळ्या गटांकडे चांगलं शिवणयंत्र बनवण्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टींची पेटंट्स आहेत. मग एकमेकांना परवानगी (लायसन्स) का देत नाही आणि इतर सर्वांवर खटला भरण्यासाठी एकत्र काम का करत नाही?

कायदेशीर अडचणी दूर झाल्यानंतर, शिलाई मशीनची विक्री जोरात वाढू लागली आणि सिंगरने या बाजारावर वर्चस्व गाजवले.

इतर शिलाई मशीनच्या कंपन्यांच्या तुलनेत सिंगरचे कारखाने छोटे आणि साधे वाटायचे. यावर आश्चर्य देखील व्यक्त केलं जायचं.

इतर मशीन असेम्बल करण्यासाठी खास उपकरणं लागायची पण त्या तुलनेत सिंगरचे मशीन मात्र सोपे आणि सुटसुटीत होते. अनेक वर्षं त्याचं मशीन हाताने बसवलेल्या भागांनी आणि दुकानातून आणलेल्या नट-बोल्ट्सनीच तयार केले जात होते.

हुशार पार्टनर आणि जाहिरातीची शक्कल

सिंगर आणि त्याचा हुशार व्यवसाय भागीदार एडवर्ड क्लार्क एका वेगळ्याच गोष्टीत आघाडीवर होता, ती म्हणजे जाहिरात आणि विक्रीची शक्कल (मार्केटिंग).

त्याकाळी शिवणयंत्र खूप महाग होतं. एका सरासरी कुटुंबाच्या काही महिन्यांच्या उत्पन्नाइतकी त्याची किंमत होती.

पूर्वी एखादी महागडी वस्तू विकत घ्यायची म्हणजे ती पूर्ण रक्कम देऊन घ्यावी लागत असे. आजच्या सारखे हप्त्याची पद्धत त्या काळी नव्हती. हप्त्याची पद्धतच सिंगरच्या पार्टनरने आणली.

क्लार्कने कल्पना मांडली की जर तुम्हाला शिलाई मशीन घ्यायचं आहे पण पूर्ण पैसे नाहीत तर तुम्ही ते भाड्याने न्या आणि दर महिन्याला एक ठराविक रक्कम चुकती करा. ज्यावेळी पूर्ण मशीनची किंमत वसूल होईल तेव्हा ते मशीन तुमच्या मालकीचे होईल.

यामुळे कंपनीची जुन्या, संथ आणि कमी विश्वासार्ह मशीन्समुळे निर्माण झालेली वाईट प्रतिमा दूर होण्यास मदत झाली. त्यातच सिंगरच्या एजंटांची टीमही उपयोगी ठरली. हे एजंट मशीन विकल्यानंतर ते घरात लावून देत आणि नंतर पुन्हा येऊन मशीन नीट चालते की नाही हेही तपासत.

महिलांबद्दल तिरस्कार?

तरीही या सगळ्या जाहिरात आणि विक्रीच्या प्रयत्नांपुढे एक अडचण होती. आणि ती अडचण म्हणजे महिलांबद्दल असलेला हीन दृष्टिकोन.

सामाजिक कार्यकर्त्या स्टँटन यांना ज्या प्रकारच्या मानसिकतेशी लढावं लागलं, त्याचा अंदाज यायला दोन व्यंगचित्रं पुरेशी आहेत. त्यापैकी एकामध्ये एक पुरुष विचारतोय – "शिलाई मशीन विकत घेण्याची गरजच काय, जेव्हा तुम्ही लग्न करून ते घरीच आणू शकता."

दुसऱ्या एका व्यंगचित्रात, एक विक्रेता म्हणतो की, "हे मशीन घेतल्यावर बायकांना त्यांच्या मेंदूंची वाढ होण्यासाठी जास्त वेळ मिळेल!"

ही गोष्ट किती हास्यास्पद आहे, हे लोकांना समजत होतं.

अशा प्रकारच्या पूर्वग्रहांमुळे लोकांना शंका वाटत होती की, स्त्रिया इतकं महागडं मशीन चालवू शकतील का?

धूर्त सिंगरनं जाहिरातीत महिलांना दाखवलं स्वावलंबी

सिंगरचा व्यवसाय यावरच अवलंबून होता की, बायका हे मशीन वापरू शकतात, हे लोकांना दाखवणं, जरी त्याने स्वतःच्या आयुष्यातील महिलांचा फारसा आदर केला नसला, तरीही. कारण सिंगर वैयक्तिक जीवनात अगदी याच्या विरूद्ध वागायचा.

त्याने न्यूयॉर्कमधल्या ब्रॉडवेवर एक दुकानाचं शोकेस भाड्याने घेतलं. तरुण महिलांना तिथे मशीन वापरून दाखवण्यासाठी कामावर घेतलं आणि हे बघायला मोठी गर्दी जमायची.

सिंगरच्या जाहिरातींमध्ये बायकांना निर्णय घेणाऱ्या म्हणून दाखवण्यात आलं होतं: "हे मशीन फक्त उत्पादक थेट घरातील महिलांना विकतो."

या जाहिरातींमधून असं सूचित केलं होतं की, महिलांनी आर्थिक स्वावलंबनाचं स्वप्न पाहायला हवं : "एक चांगली महिला ऑपरेटर या मशीनवर वर्षाला 1,000 डॉलर कमवू शकते!"

ही जाहिरात सिंगरच्या वैयक्तिक स्वभावापेक्षा अगदी विरूद्ध होती. पण सिंगर अत्यंत धूर्त आणि स्वार्थी होता.

1860 पर्यंत न्यूयॉर्क टाइम्सने कौतुकाने लिहिलं की, "आपल्या आई आणि मुलींना इतका मोठा दिलासा देणारं दुसरं कोणतंही यंत्र नव्हतं." शिवणकाम करणाऱ्या महिलांना 'कमी कष्टात जास्त पैसे' मिळू लागले होते.

तरीही, टाईम्सने हे सगळं श्रेय 'पुरुषाच्या शोधक बुद्धीला' देऊन, महिलांविषयी जागरूकतेचा दाखवलेला दावा थोडासा फसवाच ठरवला.

कदाचित यासाठी आपण एखाद्या महिलेचंच मत विचारात घ्यायला हवं.

सिंगरला फक्त नफ्यात रस

इथे सारा हेल 1860 मधील गोडे'स लेडीज बुक अँड मॅगझिनमध्ये म्हणते: "शिवणकाम करणारी स्त्री आता रात्री निवांत झोपू शकते आणि दिवसभरात घरगुती कामं आणि थोडा विरंगुळा यासाठी वेळ काढू शकते. हे जगासाठी मोठं यश नाही का?"

आजही 'वोक कॅपिटलिझम' भाष्य केलंच जातं.

जसं की 'ही सगळी नाटकं फक्त जास्त बीयर आणि रेझर विकण्यासाठीच असतात, नाही का?' कदाचित ते खरंही असेल.

सिंगर स्वतः म्हणायचा की त्याला फक्त नफ्यात रस आहे, म्हणजे त्याला फक्त पैशांशीच घेणं देणं होतं.

पण त्याचं उदाहरण हेही दाखवून देतं की, कधी कधी समाजातील बदल स्वार्थी हेतूंमुळेही पुढे जाऊ शकतो.

(लेखक फायनान्शियल टाइम्समधील अंडरकव्हर इकॉनॉमिस्ट हे सदर लिहितात. 50 थिंग्ज दॅट मेड द मॉडर्न इकॉनॉमी हा कार्यक्रम बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसवर प्रसारित केला जातो.

या कार्यक्रमाची अधिक माहिती, त्याचे स्रोत, सर्व भाग ऑनलाइन ऐकू शकता किंवा पॉडकास्टला सबस्क्राईब करू शकता.)

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.