क्रिएटिनमुळे खरंच 'बॉडी' बनते का? क्रिएटिनचे फायदे-तोटे काय आहेत?

    • Author, जेसिका ब्रॅडली
    • Role, बीबीसी प्रतिनिधी
  • Published
  • वाचन वेळ: 11 मिनिटे

तुम्ही कदाचित क्रिएटिनबद्दल ऐकलं असेल. क्रिएटिनचं सेवन लोक बऱ्याचवेळा स्नायूंची वाढ करण्यासाठी करतात. या रसायनाचा आपली आकलन क्षमता आणि मूड यावर काय परिणाम होतो? यावर वैज्ञानिक आता संशोधन करत आहेत.

क्रिएटिन हे सर्वाधिक सर्च केल्या जाणाऱ्या सप्लिमेंटपैकी एक आहे. व्यायाम करताना स्टॅमिना वाढण्याशी आणि अधिक चांगल्या प्रकारे व्यायाम होण्याशी क्रिएटिनशी संबंध असतो.

सर्वसाधारणपणे बॉडीबिल्डर हे सप्लिमेंट क्रिएटिन मोनोहायड्रेटच्या स्वरूपात घेतात. मात्र ज्यांना चांगली शरीरयष्टी कमवायची आहे किंवा स्नायू बळकट करायचे आहेत, फक्त अशाच लोकांसाठी क्रिएटिन उपयुक्त नसतं.

क्रिएटिन हा आपल्या शरीरातील महत्त्वाचं रासायनिक घटक आहे. यकृत, मूत्रपिंड आणि स्वादूपिंडात तो नैसर्गिकरित्या तयार होतो. नंतर क्रिएटिन आपले स्नायू आणि मेंदूमध्ये साठवलं जातं.

आपल्या शरीरात नैसर्गिकरीत्या जे क्रिएटिन तयार होतं ते सामान्यपणे आपल्या एकूण आवश्यकतेसाठी पुरेसं नसतं. त्यामुळे बरेचसे लोक आहारातून मिळणाऱ्या क्रिएटिनवर देखील अवलंबून असतात.

मांसाहार आणि अधिक चरबी असणारे मासे यासारख्या पदार्थांमध्ये हा पोषणघटक मोठ्या प्रमाणात आढळतो.

आपल्या पेशी आणि ऊतींना मिळणाऱ्या ऊर्जेचं व्यवस्थापन करण्यासाठी क्रिएटिनची मदत होते. काहीजणांना क्रिएटिनच्या सप्लिमेंट घेतल्याचा फायदा होऊ शकतो, असे पुरावेही आता समोर येत आहेत.

विषाणूंमुळे होणाऱ्या आजारांमुळे आलेला थकवा कमी करण्यापासून ते तणावाखाली असलेल्यांची आकलन क्षमता वाढवण्यापर्यंत आणि अगदी स्मरणशक्ती वाढवण्यापर्यंत क्रिएटिन सप्लिमेंटमुळे काहीजणांना फायदा होऊ शकतो.

क्रिएटिन कदाचित अल्झायमर या आजाराच्या लक्षणांचा प्रभाव कमी करण्यासाठी आणि त्यांची मन:स्थिती सुधारण्यासाठी फायदेशीर ठरू शकतं, असाही अंदाज बांधला जात आहे.

तुम्हाला पुरेसं क्रिएटिन मिळतं आहे का? आणि सप्लिमेंट घेणं कधी चांगलं असतं?

क्रिएटिनवरील संशोधनाचा जन्म आणि विविध संशोधनं

दिवंगत रॉजर हॅरिस यांनी 1970 च्या दशकात पहिल्यांदा क्रिएटिनच्या सप्लिमेंटचे फायदे शोधले होते. ते वेल्समधील एबेरिस्टविथ विद्यापीठात प्राध्यापक होते.

तेव्हापासून, क्रिएटिनचा आपल्या आरोग्याला काय फायदा होतो, यासंदर्भातील संशोधन वाढलं आहे. त्यामुळे क्रीडा जगतात क्रिएटिनचा वापर सर्रास होतो आहे.

मात्र गेल्या दोन दशकांपासून, क्रिएटिन सप्लिमेंट्सचे आरोग्यासाठीचे इतर संभाव्य फायदे अभ्यासातून समोर येऊ लागले आहेत.

मानवाच्या आकलन क्षमतेबाबत मोठ्या प्रमाणात संशोधन होतं आहे. क्रिएटिनची निओजेनेसिसमध्ये भूमिका असते, हे लक्षात घेऊन हे संशोधन होतं आहे. निओजेनेसिस म्हणजे मेंदूमध्ये नवीन न्युरॉन्सची निर्मिती होणं.

अली गोर्डजिनेजाद जर्मनीतील फोर्शंग्सझेन्ट्रम ज्युलिच रिसर्च सेंटरमध्ये संशोधन करणारे वैज्ञानिक आहेत.

गोर्डजिनेजाद यांचं कमी झोप मिळणाऱ्या लोकांमधील कार्यतत्परता आणि शॉर्ट टर्म मेमरीशी क्रिएटिनच्या सप्लिमेंटचा संबंध जोडणाऱ्या अभ्यासाकडं लक्ष गेलं.

तेव्हा त्यांना दिसलं की त्या व्यक्तीमध्ये कोणतेही फायदे दिसण्यासाठी काही आठवडे किंवा महिने क्रिएटिन घ्यावं लागेल.

"आम्ही अभ्यास करेपर्यंत, असं गृहीत धरण्यात आलं होतं की शरीरातील पेशींमध्ये क्रिएटिनची भूमिका किरकोळ स्वरूपाची आहे. त्यामुळे त्या पेशी त्या फक्त एका रात्रीच्या झोपेच्या कमतरतेसाठी काम करणार नाही," असं गोर्डजिनेजाद म्हणतात.

गोर्डजिनेजाद यांनी ठरवलं की फक्त एका रात्री अपुरी झोप झाल्यानंतर क्रिएटिनच्या एका डोसचा आकलन क्षमतेवर काय परिणाम होतो त्याची चाचणी करायची.

त्यांनी 15 जणांना निवडलं आणि त्यांना संध्याकाळी 6 वाजता एकतर क्रिएटिनचं सप्लिमेंट दिलं किंवा प्लासिबो (मुख्य घटक विरहित औषध किंवा सप्लिमेंट) दिलं.

सकाळी 9 वाजेपर्यंत दर अडीच तासांनी त्यांनी त्या लोकांची आकलन क्षमता तपासली. यात त्या लोकांच्या प्रतिक्रिया देण्याचा कालावधी आणि शॉर्ट टर्म मेमरीचा समावेश होता.

गोर्डजिनेजाद यांना आढळलं की, ज्या लोकांना प्लॅसिबो देण्यात आलं होतं, त्यांच्या तुलनेत क्रिएटिन देण्यात आलेल्या लोकांच्या प्रक्रियेची गती खूपच वाढली होती. असं नेमकं का झालं? हे गोर्डजिनेजाद यांना माहित नाही.

मात्र त्यांना असं वाटतं की झोपेची कमतरता आणि आकलन शक्तीशी निगडीत कामांमुळे, त्या अभ्यासात सहभागी झालेल्या लोकांच्या न्युरॉन्सवर ताण आला आणि त्यामुळे त्यांचं शरीर अधिक क्रिएटिन घेण्यास प्रवृत्त झालं.

"जर पेशींकडून ऊर्जेची अधिक मागणी केली जात असेल, तर फॉस्फोक्रिएटिन (जे थोड्या कालावधीसाठी केलेल्या तीव्र कामासाठी उर्जा पुरवतं) पुढे येतं आणि ऊर्जेचा साठा म्हणून काम करतं," असं गोर्डजिनेजाद म्हणतात.

ते स्पष्ट करतात की आहारातून घेण्यात आलेलं क्रिएटिन, हे ऊर्जेचे साठे पुन्हा भरून काढण्यासाठी उपयुक्त ठरू शकतं.

जर थोड्या कालावधीसाठी शरीरातील पेशींना खूप जास्त प्रमाणात ऊर्जेची आवश्यकता असेल तर फॉस्फोक्रिएटिन पुढे येऊ शकतं आणि ते ऊर्जेचा साठा म्हणून काम करू शकतं, असं गोर्डजिनेजाद सांगतात.

गोर्डजिनेजाद यांना वाटतं की, त्यांच्या अभ्यासातून समोर आलेल्या निष्कर्षातून दिसतं की झोपेच्या कमतरतेमुळे निर्माण होणाऱ्या नकारात्मक परिणामांवर मात करण्यासाठी क्रिएटिन फायदेशीर ठरू शकतं. मात्र ते फक्त अल्पकालावधीसाठी असू शकतं.

मात्र, गोर्डजिनेजाद यांच्या अभ्यासात सहभागी झालेल्या लोकांनी क्रिएटिनच्या दररोज सुचवलेल्या डोसऐवजी त्याच्या 10 पट डोस घेतला. त्यांनी 35 ग्रॅम क्रिएटिन घेतलं. ते जवळपास पावडर सप्लिमेंटनं भरलेल्या अर्ध्या ग्लासएवढं आहे. (कृपया हे घरी करू नका)

गोर्डजिनेजाद म्हणतात की, "या एवढ्या मोठ्या डोसमुळे मूत्रपिंडाच्या समस्या असलेल्या लोकांना धोका उद्भवू शकतो. तसंच सर्वसामान्य व्यक्तीला त्यामुळे पोटदुखीचा त्रास होऊ शकतो."

गोर्डजिनेजाद अशीच एका चाचणी करण्याचं नियोजन करत आहेत, यामध्ये ते चाचणीत सहभागी झालेल्या लोकांना कमी डोस देणार आहेत.

त्यांना आशा आहे की भविष्यात, क्रिएटिनचा वापर अशा लोकांकडून केला जाऊ शकतो की ज्यांना अनपेक्षितपणे दीर्घकाळ जागं राहावं लागतं. उदाहरणार्थ आपत्कालीन सेवांमध्ये काम करणारे कर्मचारी किंवा परीक्षा देणारे विद्यार्थी.

टेरी मॅकमॉरिस हे चिचेस्टर विद्यापीठात प्रोफेसर एमिरिटस आहेत. त्यांनी 2024 मध्ये 15 अभ्यासांचा आढावा घेतला.

त्यातून त्यांना आढळून आलं की क्रिएटिनच्या सप्लिमेंटमुळे आकलन शक्तीमध्ये सुधारणा होऊ शकते, या सिद्धांताला पाठिंबा देण्यासाठी आतापर्यंत झालेल्या संशोधनाला अपयश आलं आहे.

मात्र मॅकमॉरिस म्हणतात की, असं कदाचित यामुळे असेल की त्यांनी ज्या अभ्यासांचा आढावा घेतला त्यात क्रिएटिनच्या सप्लिमेंटचे विविध नियम वापरले गेले होते. तसंच ते सांगतात की अनेक अभ्यास कालबाह्य झालेल्या आकलन चाचण्यांवर अवलंबून होते.

"यातील काही आकलन चाचण्या तर 1930 च्या दशकातील आहेत. त्या खूपच सोप्या आहेत. त्यातून आपण लोकांवर पुरेसा दबाव आणू शकत नाही," असं ते म्हणतात.

मात्र मॅकमॉरिस म्हणतात की कोणताही निष्कर्ष काढण्यासाठी पुरेसे पुरावे उपलब्ध नाहीत.

त्याचबरोबर त्यांना वाटतं की या क्षेत्रात आणखी संशोधन झालं पाहिजे.

आकलन शक्तीव्यतिरिक्त क्रिएटिनचे इतर फायदे

अभ्यासातून क्रिएटिनचे आरोग्यासाठी असलेले अनेक संभाव्य फायदे दिसून येत आहेत. यात क्रिएटिनमुळे ट्युमरची वाढ थांबवणं आणि मेनोपॉज किंवा रजोनिवृत्तीच्या लक्षणांमध्ये सुधारणा होण्याचा समावेश आहे.

यामागचं एक कारण कदाचित असं असू शकतं की क्रिएटिनमुळे संरक्षणात्मक अँटिऑक्सिडंट परिणाम होत असावा. त्यामुळे आपल्या शरीराला ताणतणाला तोंड देण्यास मदत होत असावी.

अलीकडेच झालेल्या एका अभ्यासात 25,000 जणांचा समावेश होता.

त्या अभ्यासातून आढळून आलं की, अभ्यासात सहभागी झालेल्या 52 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांमध्ये, ज्यांच्या आहारात क्रिएटिनचं प्रमाण सर्वाधिक होतं (म्हणजे दोन दिवसांच्या सरासरीपेक्षा 0.09 ग्रॅम इतकं क्रिएटन), त्यांना कर्करोगाचा धोका 14 टक्क्यांनी कमी होता. क्रिएटिनमुळे आपल्या मानसिक आरोग्याला देखील फायदे होऊ शकतात. एका अभ्यासात, नैराश्य आलेल्या लोकांना, कॉग्निटिव्ह बिहेव्हिरल थेरेपी (सीबीटी) बरोबर क्रिएटिनची पावडर देण्यात आली.

यात संशोधकांना आढळलं की आठ आठवड्यांहून अधिक कालावधीत ज्या लोकांना क्रिएटिनशिवाय सीबीटी देण्यात आली त्यांच्यापेक्षा सीबीटीबरोबर क्रिएटिव्ह घेणाऱ्यांच्या लक्षणांमध्ये सुधारणा झाली होती.

"नैराश्य असलेल्या लोकांना क्रिएटिनचा फायदा होऊ शकतो. यामागचं एक कारण म्हणजे त्याचा वापर मेंदूमध्ये ऊर्जेच्या निर्मितीसाठी आणि वापरासाठी लक्षणीयरित्या केला जातो," असं डग्लस कालमन म्हणतात. ते फ्लोरिडातील नोव्हा साऊथईस्टर्न युनिव्हर्सिटीत क्लिनिकल सहाय्यक प्राध्यापक आहेत.

जर क्रिएटिनची पातळी कमी असेल तर त्यामुळे मेंदूतील ऊर्जेच्या निर्मितीवर परिणाम होतो. त्याचबरोबर न्युरोट्रान्समिटर्सच्या पातळीवरदेखील परिणाम होतो, असं ते म्हणतात. यामुळे त्या व्यक्तीच्या मन:स्थितीवर परिणाम होऊ शकतो.

न्युरोट्रान्समीटर म्हणजे एकप्रकारचे रासायनिक सिग्नल असतात. त्यामुळे मज्जातंतूंना एकमेकांशी संवाद साधता येतो.

सर्गेई ओस्टोजिक नॉर्वेतील ॲग्डर विद्यापीठात न्युट्रिशनचे प्राध्यापक आहेत. ते म्हणतात, हा निष्कर्ष व्हिगन लोकांसाठी विशेषकरून महत्त्वाचा असू शकतो.

काही संशोधनांनुसार, या प्रकारच्या लोकांना नैराश्याचा अधिक धोका असतो. यात क्रिएटिनची भूमिका असू शकते. कारण शाकाहार आणि मांसाहार दोन्ही घेणाऱ्या लोकांच्या तुलनेत व्हिगन किंवा शाकाहारी लोकांमध्ये, क्रिएटिनचं प्रमाण कमी असल्याचं आढळून आलं आहे.

काही संशोधनातून तर असंही आढळून आलं आहे की दीर्घकालीन आजारांमध्येदेखील क्रिएटिनची मदत होऊ शकते.

2023 मध्ये सर्बियामधील नोव्ही सॅड विद्यापीठातील ऑस्टोजिक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लाँग कोव्हिड असलेल्या 19 रुग्णांवर क्रिएटिन सप्लिमेंटच्या परिणामांची चाचणी केली.

संशोधकांनी यातील निम्म्या रुग्णांना 4 ग्रॅम क्रिएटिन दिलं आणि उरलेल्या निम्म्या रुग्णांना क्रिएटिन विरहित घटक म्हणजे प्लासिबो दिला. त्यानंतर संशोधकांनी त्यांच्या लक्षणांचं आणि त्यांच्या मेंदू आणि स्नायूंमधील क्रिएटिनच्या पातळीचं निरीक्षण केलं.

सहा महिन्यांनी संशोधकांच्या या टीमला असं आढळून आलं की ज्या लोकांना अधिक प्रमाणात क्रिएटिन मिळालं आहे, त्यांच्यामध्ये सुधारणा होते आहे. त्यांच्या आकलन शक्तीमध्ये, स्मरणशक्तीत सुधारणा झाली होती. तसंच एकाग्रता होण्यासाठी येणाऱ्या अडचणी कमी झाल्या होत्या.

आजार जितका गंभीर असेल तितकं रुग्णांच्या शरीरात क्रिएटिनचं प्रमाण कमी असल्याचं अभ्यासाच्या सुरुवातीला दिसून आलं होतं.

"लाँग कोव्हिडमध्ये तणावाखाली असल्यावर मेंदू क्रिएटिनची पातळी कमी करतो, असं गृहितक होतं. क्रिएटिन ऊर्जेचा पुरवठा करणारा महत्त्वाचा घटक आहे," ओस्टोजिक म्हणतात.

"दीर्घकाळ कोव्हिडच्या तणावाखाली राहिल्यावर मेंदू क्रिएटिनची पातळी कमी करतो. किएटिन हा ऊर्जा पुरवणारा महत्त्वाचा घटक आहे," असं ओस्टोजिक म्हणतात.

लाँग कोव्हिडवर क्रिएटिन हा उपचार नसला तरी त्यामुळे काही फायदे होऊ शकतात, असा निष्कर्ष ओस्टोजिक काढतात. मात्र त्यासंदर्भात आणखी बरंच काम व्हायचं आहे.

त्यांना लाँग कोव्हिड आणि क्रिएटिनबाबत लिंगानुसार असलेला संभाव्य भेद ओस्टोजिक यांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घ्यायचा आहे.

पुरुषांपेक्षा महिलांमध्ये लाँग कोव्हिड होण्याची शक्यता अधिक असते. त्यांचं क्रिएटिनबाबतचं चयापचय वेगळ्या प्रकारचं असतं.

असं मानलं जातं की क्रिएटिनचं शरीरातील वहन, जैवउपलब्धता आणि क्रिएटिनची निर्मिती यामुळे महिलांमध्ये आयुष्यभर बदल होऊ शकतो. हार्मोनमधील बदल किंवा चढउतारांमुळे असं होतं.

ओस्टोजिक पुढे सांगतात की, लघवीवाटे महिलांच्या शरीरातून जास्त प्रमाणात क्रिएटिन कमी होतं आणि पुरुषांच्या तुलनेत महिलांमधील स्नायूंचं प्रमाण कमी असतं. क्रिएटिन बहुतेकवेळा स्नायूंमध्ये साठवलं जात असल्यामुळे, एकंदरीतच महिलांमध्ये क्रिएटिनचं प्रमाण कमी असतं.

"दीर्घकाळ असणाऱ्या कोरोना (लाँग कोव्हिड) असलेल्या महिला (पुरुषांपेक्षा) क्रिएटिनच्या सप्लिमेंटला अधिक चांगला प्रतिसाद देऊ शकतात, असं मला वाटतं," असं ते म्हणतात.

जन्मापासून ते वृद्धत्वापर्यंत क्रिएटिनची भूमिका

अलीकडच्या काळात क्रिएटिनवरील संशोधनात एक बदल झाला आहे. तो म्हणजे, शरीरातील क्रिएटिनची भूमिका आता एखाद्या व्यक्तीच्या संपूर्ण आयुष्यभराच्या संदर्भात पाहिली जाते आहे, असं कालमन म्हणतात.

उदाहरणार्थ, गर्भधारणेपासून ते बाळाच्या आयुष्यातील सुरुवातीच्या काही वर्षांपर्यंत क्रिएटिन किती महत्त्वाचं ठरू शकतं, हे दाखवणाऱ्या संशोधनांमध्ये वाढ होते आहे.

आपल्या शरीरातील पेशी पुनरुत्पादनाच्या प्रत्येक टप्प्यावर क्रिएटिनचा वापर एक ऊर्जा स्त्रोत म्हणून करतात, असं स्टेसी एलेरी म्हणतात. त्या ऑस्ट्रेलियातील मोनाश विद्यापीठातील एनएचएमआरसी पीटर डोहर्टी अर्ली करियर रिसर्च फेलो आहेत.

यात शुक्राणूंची गतिशीलता, गर्भाशय आणि प्लेसेंटल (गर्भाशयातील सुरुवातीची वाढ) तसंच गर्भाची वाढ आणि आईचं दूध यांचा समावेश आहे.

ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे झालेलं नुकसान कमी करण्यामध्येदेखील क्रिएटिनची महत्त्वाची भूमिका असू शकते, असं एलरी म्हणतात. यात जन्माच्या वेळेस किंवा गर्भाशयात गर्भाला होणारं नुकसान याचा समावेश आहे.

ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे महत्त्वाच्या पेशीची पुरेशी ऊर्जा निर्माण करण्याची क्षमता मर्यादित किंवा कमी होते. यात प्लेसेंटा आणि गर्भाचा मेंदू यांचा समावेश असतो. यामुळे गर्भाची वाढ खुंटू शकते किंवा त्यांच्या दीर्घकालीन आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, असं त्या सांगतात.

मात्र अल्पकालावधीत, क्रिएटिन ऑक्सिजनची आवश्यकता नसताना पेशींना ऊर्जेचा पुरवठा करू देऊ शकतं.

एलरी म्हणतात, "क्रिएटिनच्या सप्लिमेंटमुळे, ऑक्सिजनचा तुटवडा किंवा कमतरता असताना पेशींना ऊर्जेची निर्मिती करण्यासाठी उपलब्ध असलेलं क्रिएटिनचं प्रमाण वाढू शकतं."

"वीजपुरवठा खंडीत झाल्यानंतर वापरण्यासाठी आधीच एखादी अतिरिक्त बॅटरी चार्ज करून ठेवली जाते, हे देखील तसंच आहे. पेशींमध्ये पुरेशी ऊर्जा असल्यामुळे वाढ होत असताना बाळाला गंभीर अपाय होण्याचा धोका कमी होतो."

गुंतागुंतीच्या गर्भधारणेत क्रिएटिन अतिशय महत्त्वाचं ठरू शकतं. एलरी यांना त्यांच्या संशोधनात हे दिसून आलं आहे.

उदाहरणार्थ, प्री-एक्लेम्पसियासारख्या संभाव्य जीवघेण्या आजारात गर्भवती महिलांमध्ये गर्भनाळ (प्लेसेंटा), आईच्या शरीरात क्रिएटिनचं प्रमाण वाढवण्यासाठी कशाप्रकारे जुळवून घेऊ शकतं हे संशोधनात आढळलं आहे.

मात्र, गर्भधारणेच्या काळात क्रिएटिनचं सप्लिमेंट देणं हे किती सुरक्षित असतं, याचा अद्याप थेट अभ्यास झालेला नाही. त्यामुळे कोणतीही सप्लिमेंट घेण्याआधी तुमच्या डॉक्टरांशी चर्चा करणं महत्त्वाचं आहे.

एलरी म्हणतात की, प्रसूतीच्या वेळेस कठीण स्थिती उद्भवल्यास आईकडून बाळाला अधिक प्रमाणात क्रिएटिनचा पुरवठा केला जातो.

गर्भधारणेच्या शेवटच्या महिन्यांमध्ये आईच्या रक्तातील क्रिएटिनचं प्रमाण कमी झाल्यामुळे गर्भात किंवा प्रसूतीच्या वेळेस किंवा प्रसूतीनंतर थोड्या दिवसात लगेच बाळाचा मृत्यू होणं, प्रीमॅच्युअर प्रसूती, वजनाने कमी बाळ जन्माला येणं आणि बाळाला अतिदक्षता विभागात दाखल करावं लागणं, यासारख्या गोष्टींचं प्रमाण वाढतं.

मात्र हे असं का होतं किंवा क्रिएटिनच्या सप्लिमेंट घेतल्यामुळे त्यात काही फायदा होईल का हे अद्याप स्पष्ट नाही.

या क्षेत्रातील संशोधन सुरुवातीच्या टप्प्यात असताना ओस्टोजिक यांनी अलीकडेच 12 महिन्यांपर्यंतच्या बाळासाठी शिफारस केलेल्या क्रिएटिनच्या रोजच्या सेवनाचं पहिलं कॅल्क्युलेशन प्रकाशित केलं.

त्यांनी यात अंदाज व्यक्त केला की, आईच्या दूधावर असणाऱ्या बाळांना सहा महिन्यांपर्यंत दररोज 7 मिलीग्रॅम क्रिएटिनची आवश्यकता असते. त्यानंतर 7-12 महिन्यांपर्यतच्या बाळांना दररोज 8.4 मिलीग्रॅम क्रिएटिनची आवश्यकता असते.

ते म्हणतात की, यासंदर्भात अधिक माहिती किंवा आकडेवारीची आवश्यकता आहे.

तर मानवी जीवनचक्राच्या (जन्मापासून मृत्यूपर्यंत) शेवटी, म्हणजे वृद्धावस्थेत, लोकांना सार्कोपेनिया होतो. यात स्नायू कमी होतात किंवा स्नायूंची कार्यक्षमता कमी होते. स्नायूंमधील ताकद कमी होते.

वृद्धावस्थेमुळे किंवा वय वाढल्यामुळे स्नायू कमकुवत होत जातात. अशावेळी आपल्या स्नायूंचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी क्रिएटिन उपयुक्त ठरू शकतं.

"जसजसे लोक वृद्ध होत जातात, त्यांचं वय वाढत जातं, तसतसे त्यांच्या शरीरातील स्नायू कमी होत जातात. अभ्यासातून असं दिसून आलं आहे की क्रिएटिनमुळे सार्कोपेनियाचं प्रमाण कमी होण्यास मदत होऊ शकते," असं कालमन म्हणतात.

आपल्याला पुरेसं क्रिएटिन मिळतं का?

एलरी म्हणतात की बहुतांश महिला, ज्या पाश्चात्य पद्धतीचा आहार घेतात, त्या पुरेशा प्रमाणात क्रिएटिनयुक्त पदार्थ किंवा अन्न खात नाहीत, याचे पुरावे समोर येत आहेत.

अलीकडेच झालेल्या अभ्यासात असं दिसून आलं आहे की 10 पैकी 6 महिलांनी, संशोधकांनी सुचवल्याप्रमाणे दररोज क्रिएटिनचं सेवन केलं नाही.

संशोधक शिफारस करतात की शरीराच्या वजनाच्या प्रत्येक किलोमागे दररोज 13 मिलीग्रॅम क्रिएटिनचं सेवन केलं पाहिजे. जवळपास एक पंचमांश गर्भवतींनी क्रिएटिनचं अजिबात सेवन केलं नाही.

प्राथमिक स्वरुपाच्या अभ्यासातून असं दिसून आलं आहे की प्रौढांना दररोज जवळपास 1 ग्रॅम क्रिएटिनची आवश्यकता असते.

लोकांवरील संशोधनातून सुरुवातीला मिळालेल्या आकडेवारीनुसार असं दिसतं की दररोज 1 ग्रॅमपेक्षा कमी क्रिएटिनचं सेवन करणाऱ्या लोकांमध्ये नैराश्य, ह्रदयविकार, रक्तदाब, मधुमेह आणि कर्करोग होण्याचं प्रमाण जास्त आढळून येतं.

मात्र,सार्वजनिक आरोग्य सेवांकडून दररोज किती प्रमाणात क्रिएटिनचं सेवन करायचं यासासाठी कोणतीही शिफारस किंवा सूचना करण्यात आलेली नाही.

बहुतांश जणांना त्यांच्या आहारातून क्रिएटिन मिळतं. मात्र व्हिगन लोकांना मात्र त्यांच्या आहारातून पुरेशा प्रमाणात क्रिएटिन न मिळण्याचा धोका असू शकतो, असं ऑस्टोजिक म्हणतात.

क्रिएटिन आपल्या शरीरात नैसर्गिकरित्या तयार होणारा घटक आहे. याचा अर्थ ते 'आवश्यक' या श्रेणीत समाविष्ट करण्यात आलेलं नाही. आवश्यक पोषक घटकांची निर्मिती शरीरात होऊ शकत नाही आणि त्यामुळेच त्यांचा पुरवठा आपल्या आहारातून होतो.

मात्र ओस्टोजिक यांच्यासह काही संशोधक युक्तिवाद करतात की, क्रिएटिनचं वर्गीकरण अर्ध-आवश्यक घटकात करण्यात आलं पाहिजे. कारण असं दिसतं की आपलं शरीर क्रिएटिनची निर्मिती पुरेशा प्रमाणात करू शकत नाही.

"काही अभ्यासांमधून असं दिसून येतं की ज्या लोकांना त्यांच्या आहारातून क्रिएटिन मिळत नाही, त्यांच्या स्नायूंमध्ये क्रिएटिनचं प्रमाण कमी असतं. त्यामुळे ते सर्वोत्तम शारीरिक तंदुरुस्ती मिळवू शकत नाहीत," असं ओस्टोजिक म्हणतात.

क्रिएटिन हा काही सर्वोत्तम उपाय किंवा अनोखं असं औषध नाही. मात्र त्यांचं म्हणणं आहे की, याचं योग्यप्रकारे मूल्यांकन केलं पाहिजे. त्यासंदर्भात लोकांना पुराव्यावर आधारित मार्गदर्शन केलं पाहिजे.

क्रिएटिन अनेक अभ्यास केले जात आहेत. तसंच अनेकजणांच्या आहारात क्रिएटिनची कमतरता किंवा अभाव दिसून येतो आहे. मात्र तरीदेखील आपल्या संपूर्ण आयुष्यात क्रिएटिनमुळे आरोग्याला होणाऱ्या फायद्यांबाबत केलं जाणारं संशोधन अजूनही सुरुवातीच्या टप्प्यातच आहे.

मात्र तरीदेखील एलरीसह संशोधक आशावादी आहेत. त्यांना वाटतं की, संशोधक क्रिएटिनमध्ये जो रस घेत आहेत त्याचा फायदा शेवटी जनसामान्यांच्या आरोग्याला होईल. त्यातून आपल्याला कळेल की क्रिएटिनच्या सप्लिमेंट घेतल्यामुळे कोणत्या लोकांना त्याचा फायदा होईल.

क्रिएटिनचं घेण्याचे धोके

क्रिएटिनच्या सप्लिमेंट घेतल्यामुळे काही जणांना फायदा होण्याची जरी शक्यता असली तरीदेखील त्याचे काही साईड इफेक्ट्स किंवा दुष्परिणाम असू शकतात. त्यामध्ये शरीरात पाण्याचं प्रमाण वाढणं, स्नायूंमध्ये पेटके येणं आणि मळमळ होणं यांचा समावेश आहे.

ज्या लोकांना मूत्रपिंड किंवा यकृताच्या समस्या आहेत किंवा जे काही विशिष्ट औषधं घेत आहेत अशांसाठी क्रिएटिन योग्य नसतं.

क्रिएटिन हा सुरक्षित आणि शरीरात स्वीकारला जाणारा घटक असल्याचं मानलं जातं. तरीदेखील, क्रिएटिनच्या सप्लिमेंटमुळे यकृत निकामी होण्यासारख्या काही दुर्मिळ गंभीर स्वरुपाच्या घटना घडल्या आहेत.

* महत्त्वाची सूचना: या लेखातील सर्व माहिती फक्त सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. तुमच्या डॉक्टर किंवा वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्याऐवजी याचा वापर करण्यात येऊ नये. या वेबासाईटवरील माहितीच्या आधारे वाचकांनी कोणतंही निदान केल्यास बीबीसी त्यासाठी जबाबदार असणार नाही. या वेबसाईटवर दिसत असलेल्या इतर बाह्य वेबसाईट्सवरील माहितीसाठी बीबीसी जबाबदार नाही. तसंच या वेबसाईटपैकी कोणत्याही वेबसाईटवर उल्लेख करण्यात आलेलं कोणतंही व्यावसायिक उत्पादन किंवा सेवा किंवा सल्ला याचं बीबीसी समर्थन करत नाही. तुमच्या आरोग्याविषयी काही समस्या असल्यास नेहमीच तुमच्या डॉक्टरांचं मार्गदर्शन घ्या.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)