You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'आणखी अमेरिकन लोकांना जीव गमवावा लागू शकतो'; हे विधान ट्रम्प यांना महागात पडेल?
अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेले संयुक्त लष्करी हल्ले सुरू असतानाच आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, "आम्ही ठरवलेली सर्व लक्ष्य साध्य होईपर्यंत अमेरिकेचे हल्ले सुरूच राहतील."
डोनाल्ड ट्रम्प एका व्हीडिओमध्ये म्हणाले, "आम्ही संपूर्ण ताकदीनिशी हे लष्करी अभियान राबवत आहोत. दुर्दैवाने यामध्ये अमेरिकन लोकांना देखील त्यांचा जीव गमवावा लागू शकतो."
ते म्हणाले, "युद्धात असंच होत असतं."
डोनाल्ड ट्रम्प पुढे असंही म्हणाले, "ज्या लोकांनी मानवतेच्या विरोधात युद्ध पुकारलं आहे अशा अतिरेक्यांना अमेरिका कठोर शिक्षा देणार आहे. ज्या निर्दोष व्यक्तींना त्यांचा जीव गमवावा लागला त्यांच्या मृत्यूचा बदला आम्ही घेणार आहोत."
"मी पुन्हा एकदा रिव्होल्यूशनरी गार्ड्स आणि इराणी मिलिटरी पोलिसांना हल्ले थांबवण्याचे आणि सुरक्षित राहण्याचे आवाहन करतो. अन्यथा, येणाऱ्या मृत्यूसाठी त्यांनी तयार रहावं," असा इशारा ट्रम्प यांनी दिला.
ट्रम्प म्हणाले की, इराणमध्ये सत्ताबदल होणं गरजेचं आहे आणि त्यासाठीच त्यांनी इराणी जनतेला आवाहन केलं आहे.
ट्रम्प म्हणाले, "स्वतंत्र होऊ पाहणाऱ्या सर्व इराणच्या देशभक्तांना मी आवाहन करतो की, या प्रसंगी तुम्ही शौर्य दाखवलं पाहिजे, धाडस दाखवून स्वतःचा देश मुक्त केला पाहिजे. अमेरिका तुमच्यासोबत आहे."
दरम्यान, ब्रिटन, फ्रान्स आणि जर्मनी यांनी संयुक्त निवेदन जारी करून मध्य पूर्वेतील देशांवर इराणने सुरू ठेवलेल्या हल्ल्यांबद्दल टीका केली.
ब्रिटनचे पंतप्रधान किअर स्टार्मर, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅनुअल मॅक्रॉन आणि जर्मन चांसलर फ्रेडरिक मेर्ट्झ यांनी सांगितलं की, ते मध्य पूर्वेतील त्यांच्या हितांचे रक्षण करण्यासाठी आवश्यक पावले उचलण्यास तयार आहेत.
यापूर्वी, एका फॅक्ट शीटमध्ये, युनायटेड स्टेट्स सेंट्रल कमांडनं (CENTCOM) म्हटलं की, ऑपरेशन 'एपिक फ्युरी'च्या पहिल्या 24 तासांमध्ये इराणच्या 1,000 हून अधिक ठिकाणांवर हल्ला करण्यात आला.
अमेरिकेने इराणविरुद्ध सुरू केलेल्या या मोहिमेला 'ऑपरेशन एपिक फ्यूरी' असं म्हटलं जात आहे.
या निवेदनात या कारवाईसाठी वापरल्या जाणाऱ्या अमेरिकेच्या लष्करी क्षमतांचा आणि शस्त्रांचा देखील उल्लेख करण्यात आला. त्यामध्ये स्टेल्थ बॉम्बर्स, ड्रोन, लढाऊ विमाने आणि क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणांचा समावेश आहे.
इराणच्या कमांड अँड कंट्रोल सेंटर, बॅलिस्टिक क्षेपणास्त्र साइट्स आणि इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सचे (IRGC) संयुक्त मुख्यालय अशा ठिकाणांवर अमेरिकेने हल्ला केला.
अमेरिकेवर दबाव येऊ शकतो का?
अँथनी जर्चर, बीबीसी प्रतिनिधी
अमेरिकेच्या संरक्षण विभागाचे मुख्यालय असलेल्या पेंटागॉनने इराणच्या प्रत्युत्तराच्या हल्ल्यात 3 अमेरिकन सैनिकांचा मृत्यू झाल्याची कबुली दिली.
या क्षेत्रातील तज्ज्ञांना वाटतं की, 'आणखी अमेरिकन लोकांना त्यांचा जीव गमवावा लागू शकतो' हे ट्रम्प यांचं विधान एक वाईट रणनीती ठरू शकतं.
याआधी दिलेल्या एका मुलाखतीत सुद्धा ट्रम्प म्हणाले, "या कारवाईत आमच्या लोकांचाही मृत्यू होऊ शकतो अशी शक्यता आहे, पण शेवटी जगाच्या भल्यासाठी हे गरजेचं असेल."
पण इराणविरुद्धच्या कारवाईत अमेरिकन सैनिकांच्या मृत्यूंची संख्या वाढली, तर ट्रम्प यांच्यावर हे विधान उलटू शकतं.
यासाठी 2003 च्या एका भाषणाचं उदाहरण आपल्यासमोर आहे. 2003 मध्ये इराक युद्धाच्या दरम्यान अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश यांनी एका विमानवाहू जहाजावर केलेलं भाषण प्रसिद्ध आहे.
'मिशन अकम्प्लिश्ड' या त्यांच्या भाषणात त्यांनी वापरलेले शब्द पुन्हा कसे महागात पडले होते हे दिसलं होतं.
सध्या इराणवर अमेरिकेचे बॉम्ब हल्ले सुरूच आहेत. अमेरिकेत मात्र सामान्य गतीने लोक जगत आहेत. येणाऱ्या काळात परिस्थिती बदलू शकते.
इराणचे मध्य पूर्वेतल्या देशांवर हल्ले
बीबीसीचे प्रतिनिधी फ्रँक गार्डनर यांनी दिलेल्या माहितीनुसार, अबू धाबीमध्ये इराणच्या हल्ल्यानंतर आकाशात धुराचे ढग दिसले. इराणने सतत बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा मारा केल्याने असं घडलं आहे.
रविवारी (1 मार्च) दुपारपर्यंत, संयुक्त अरब अमिरातीच्या (UAE) संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार त्यांनी आतापर्यंत 165 बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे, 2 क्रूझ क्षेपणास्त्रे आणि 541 इराणी ड्रोन नष्ट केले आहेत.
दरम्यान, इस्रायल डिफेन्स फोर्सेसने (आयडीएफ) सांगितलं की, त्यांनी इस्रायलकडे डागण्यात आलेल्या प्रोजेक्टाइल हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून लेबनॉनमध्ये हिजबुल्लाहशी संबंधित लक्ष्यांवर हल्ले केले आहेत.
एका निवेदनात, इस्रायली सैन्याने आरोप केला की, हिजबुल्लाह इराणवतीनं कारवाया करत आहे आणि इस्रायली नागरिकांना लक्ष्य करत आहे.
आयडीएफने म्हटले की, ते हिजबुल्लाहने घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात कारवाई करतील आणि हिजबुल्लाहला उत्तर इस्रायलसाठी धोका बनू देणार नाहीत.
लेबनॉनचे पंतप्रधान नवाफ सलाम यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक निवेदन जारी केलं. त्यामध्ये दक्षिण लेबनॉनमधून रॉकेट डागण्याविरुद्ध त्यांनी इशारा दिला.
त्यांनी म्हटलं, "यामागे कुणीही असलं तरी, दक्षिण लेबनॉनमधून होणारे रॉकेट हल्ले हे एक बेजबाबदार आणि संशयास्पद कृत्य आहे जे लेबनॉनच्या सुरक्षा आणि स्थिरतेला धोका निर्माण करतं आणि इस्रायलला त्यांचे हल्ले सुरू ठेवण्यासाठी एक कारण देतं."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)