You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अल पचिनो 83 व्या वर्षी वडील होणार, वडील होण्याचं वय खरंच काय असतं?
वडील होण्याचं वय वाढतंय का, असा प्रश्न पडावा अशी काही उदाहरणं आपल्यासमोर येतात.
या आठवड्यात दिग्गज अभिनेते अल पचिनो यांनी 83 व्या वर्षी पिता होणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यांच्या 29 वर्षीय गर्लफ्रेंड नूर अलफल्लाहपासून त्यांना मूल होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
याबरोबरच त्यांचा वयस्कर वडिलांच्या क्लबमध्ये समावेश झाला आहे. याआधी रॉबर्ट डि निरो यांनी मागच्या महिन्यात सांगितलं की ते 79 व्या सातव्या मुलाचे बाप होण्याच्या वाटेवर आहेत.
खरं सांगायचं झालं तर हे काही आत्ताच झालेलं नाही. अमेरिकेतले अनेक संगीतकार, अभिनेते अगदी अमेरिकेचे काही राष्ट्राध्यक्षसुद्धा उशीरा वडील झाले आहेत.
गेल्या काही वर्षांत बाप होण्याचं वाय वाढतचच चाललं आहे. 1972 ते 2015 या काळात ते 3.5 वर्षांनी वाढलं आहे. अमेरिका सारख्या देशात वडील होण्याचं वय 30.9 वर्षं आहे. 9% पुरुष त्यांचं पहिलं मूल जन्माला आलं तेव्हा ते चाळीस वर्षांचे होते.
गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने दिलेल्या माहितीनुसार, 92 व्या वर्षी एका मुलाला जन्म दिल्याचा विक्रम एका व्यक्तीच्या नावावर आहे. काही अनधिकृत सुत्रांनुसार आणखी जास्त वयाची माणसं सुद्धा वडील झाले आहेत.
मात्र, इतक्या उशीरा वडील होण्याचे अनेक धोके आहेत.
डिसेंबर 2022 मध्ये उटाह विद्यापीठाने आणि इतर संस्थांनी वडील होण्याचं योग्य वय या विषयावर एक अहवाल प्रकाशित केला आहे. त्यात प्रजननक्षमता, गरोदरपणातले धोके आणि मुलाच्या आरोग्याबद्दल होणारे धोके यांचा आढावा घेतला आहे.
या संशोधनात अल पचिनोसारख्या लोकांचा समावेश केलेला नाही. कारण त्यांच्या वयात वडील होणं दुर्मिळ असतं. मात्र काही वैद्यकीय अहवालांनुसार चाळीशी किंवा पन्नाशीतल्या पुरुषांच्या स्पर्मचा दर्जा, काऊंट, वेग खालावलेला असतो.
चाळीशीनंतरच्या वयात वडील झालं तर वंध्यत्वाचा धोका असतोच, मात्र नैसर्गिकरित्या गरोदर राहिलं तर गर्भपाताचा धोकाही संभवतो असं संशोधकांचं म्हणणं आहे. अनेक संशोधनात सिद्ध झालं आहे की वडिलांचं वय जास्त असेल तर गर्भपाताचा धोका जास्त असतो.
मुलाचा जन्म झाल्यानंतर त्याला विविध रोग होण्याचा धोकाही असतो. 1950 पासूनच ही माहिती आहे की जास्त वयात वडील झाल्यास मुलांना achondroplasia हा अनुवांशिक आजार होण्याची शक्यता आहे. तेव्हापासून अनेक असे आजार समोर आले आहेत.
“जसं आई होण्याचं वय वाढलं की बाळाला अनेक आजार होण्याची शक्यता असते त्याचप्रमाणे वडील होण्याचं वय वाढल्यावरसुद्धा असे आजार होण्याची शक्यता असते.” असं उटाह येथील संशोधकांनी नोंदवलं आहे.
स्टॅनफोर्ड विद्यापीठात झालेल्या संशोधनात असं समोर आलं आहे की वडिलांचं वय जास्त असेल तर बाळाला फिट येण्याचा आणि तसंच जन्माच्या वेळी वजन कमी असल्याचा धोका संभवतो. तसंच वडिलांचं वय जास्त असेल तर लहान वयात कॅन्सर तसंच लहानपणीच हृदयाचे वेगवेगळे आजार होण्याचा धोका जास्त होतो.
मात्र एक गोष्ट स्पष्ट आहे की या सर्व आजारांसाठी आणि रोगांसाठी कोणत्या बाबी जबाबदार आहेत हे अद्याप अस्पष्ट आहे. पालकांची जीवनशैली, प्रदुषण अशा अनेक गोष्टी यासाठी जबाबदार असतात.
तरी संशोधकांच्या मते जसं पुरुषाचं वय वाढतं तसं स्पर्म दुसऱ्या पिढीत जाणाऱ्या पेशीच्या डीएनएमध्ये म्युटेशन होण्याची शक्यता असते.
अशा संशोधनामुळे डॉक्टर आणि वैज्ञानिक प्रजननाबद्दल नव्याने विचार करायला लागले आहेत. पारंपरिकरित्या एखादं जोडपं मूल होण्यासाठी प्रयत्न करत असतील तर स्त्रियांच्या वयावर जास्त लक्ष केंद्रित केलं जातं. स्त्रियांच्या प्रजननक्षमतेवर जास्त प्रमाणात संशोधन केलं जातंय. मात्र आता हे स्पष्ट झालं की पुरुषांची प्रजननक्षमता हळूहळू कमी होते तरीही वडील होण्याचं वय महत्त्वाचं आहे.
तरीही अल पचिनो आणि डि निरो हे अजूनही अपवाद आहेत. वडील होणं ही आता तरुण लोकांची मक्तेदारी राहिलेली नाही. 1970 नंतर अमेरिकेत 30 वर्षं वयाच्या आत वडील होण्याऱ्या लोकांची संख्या 27 टक्क्यांनी कमी झाली आहे तर 45-49 या वयात वडील होणाऱ्या पुरुषांची संख्या 52% झाली आहे.
असंच जर सुरू राहिलं तर ही परिस्थितीसुद्धा समाज स्वीकारेल.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)