जुळ्या बाळांपैकी एकाचा गर्भपात करणं किती धोकादायक?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, सुशीला सिंह
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- Published
एका महिलेने आपल्या गर्भात वाढणाऱ्या दोन जुळ्यांपैकी एकाला टर्मिनेट करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
टर्मिनेट करणं म्हणजे गर्भ खाली करणं.
भारतातील मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी (सुधारणा) ऍक्ट 2021 नुसार, महिलांना 24 आठवड्यांपर्यंत गर्भपात करण्याची परवानगी मिळते.
खरं तर 1971 मध्ये मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी कायद्यात सुधारणा करून काही विशिष्ट परिस्थितींमध्ये गर्भपाताचा कालावधी 20 आठवड्यांवरून 24 आठवडे करण्यात आला आहे.
या महिलेचा गर्भ 25 आठवड्यांपेक्षा जास्त आहे.
या प्रकरणासंदर्भात याचिकाकर्तीच्या वकील आदिती सक्सेना म्हणाल्या की, 'या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने एक मेडिकल बोर्ड स्थापन केलं आहे. न्यायालयाने या बोर्डला विचारलंय की, 25 आठवड्याच्या गरोदर महिलेचं फीटल रिडक्शन म्हणजेच दोनपैकी एक गर्भ काढून टाकणं शक्य आहे का? याचा आईवर आणि गर्भात वाढणाऱ्या दुसऱ्या बाळावर परिणाम होईल का?'
त्या सांगतात की, ही भारतातील दुसरी घटना असून दोन्ही घटनांमध्ये बऱ्याच गोष्टी समान आहेत.
त्यांच्या म्हणण्यानुसार, "2020 मध्ये पहिली घटना समोर आली होती. या केसमध्ये एका गर्भात दोष होते, तर दुसरा गर्भ निरोगी होता. आताच्या केसमध्ये पण तीच परिस्थिती आहे.
त्यामुळे निरोगी गर्भ वाचवून दुसऱ्या गर्भाचं फीटल रिडक्शन करण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती. पहिल्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी दिली नाही. पुढे हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं आणि कोर्टाने गर्भ काढून टाकण्यास परवानगी दिली."
आताच्या प्रकरणाबद्दल सक्सेना सांगतात की, न्यायालयाच्या आदेशानुसार जे जे रुग्णालयातील डॉक्टरांची एक टीम तयार करण्यात आली. या बोर्डने सुचवलंय की, या गर्भात दोष आहेत. त्यामुळे फीटल रिडक्शन करणं गरजेचं आहे. मात्र हे लगेच नाही तर थोड्या दिवसांनी करावं.
नेमकं प्रकरण काय आहे?

फोटो स्रोत, Getty Images
मुंबईत राहणारी एका महिला आयव्हीएफ टेक्नॉलॉजीच्या साहाय्याने गरोदर राहिली.
आयव्हीएफ टेक्नॉलॉजीमध्ये, प्रयोगशाळेत स्त्रीबीज आणि शुक्राणूंचं फलन केलं जातं. यानंतर तयार झालेला भ्रूण आईच्या गर्भाशयात प्रत्यारोपित केला जातो.
या महिलेचा नवरा अमेरिकेत असतो. आयव्हीएफ केल्यानंतर ही महिला भारतात परतली. ऑगस्ट महिन्यात तिला कळलं की, ती जुळ्या मुलांची आई होणार आहे.
महिलेने तिच्या याचिकेत म्हटलंय की, नोव्हेंबर महिन्यात जेव्हा टेस्ट करण्यात आली तेव्हा तिला समजलं की, जुळ्या गर्भांपैकी एकामध्ये जेनेटिक क्रोमोसोमल दोष आहे. एका व्यक्तीमध्ये एकूण क्रोमोसोमची संख्या 46 असते. जर त्यामध्ये काही विकृती असतील, तर त्याला वैद्यकीय भाषेत जेनेटिक क्रोमोसोमल दोष असं म्हटलं जातं.

फोटो स्रोत, Getty Images
यानंतर या दाम्पत्याने डॉक्टरांचा सल्ला घेतला. त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना फीटल रिडक्शनचा सल्ला दिला.
यादरम्यान गर्भ 25 आठवड्यांचा झाला असल्याने या जोडप्याने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली.
वकील आदिती सक्सेना सांगतात की, राज्यात मेडिकल बोर्ड नसल्याने हे प्रकरण कोर्टात पोहोचलं. न्यायालयाने जे जे रुग्णालयाला मेडिकल बोर्ड स्थापन करण्यास सांगून त्यात फीटल एक्सपर्टचा समावेश करण्याच्या सूचना केल्या.
न्यायालयाने बोर्डला विचारलंय की, हा गर्भपात आई आणि दुसऱ्या बाळासाठी सुरक्षित आहे का? आणि हे कधी करायला हवं?
बाळाला काय धोके असतात?

फोटो स्रोत, Getty Images
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, गर्भात वाढणाऱ्या बाळामध्ये जर हा दोष असेल तर त्याला खालील धोके असतात-
- हृदयरोगाचा धोका
- क्लेफ्ट लिप अँड पॅलेट म्हणजेच फाटलेले ओठ आणि टाळूची संरचना बिघडणे
- विचार करण्यात अडचणी
- रक्तात कॅल्शियमची कमतरता
- ऐकण्यात अडचणी
- डाउन सिंड्रोम
- किडनीच्या कार्यक्षमतेत समस्या, आदी गोष्टींच्या अडचणी येऊ शकतात.
फीटल रिडक्शन काय असतं?
एशिया सेफ अबॉर्शन पार्टनरशिप नावाने काम करणाऱ्या नेटवर्कच्या डॉक्टर सुचित्रा दळवी सांगतात, “24 आठवड्यांनतर फीटल रिडक्शन करणं ही सामान्य गोष्ट नाही. जेव्हा भ्रूण मोठं होतं, तेव्हा रिडक्शनमध्ये अडचणीही येऊ शकतात. अनेकदा एकाहून जास्त भ्रूण असतील तर रिडक्शन अजूनच कठीण होतं, कारण दुसऱ्या निरोगी भ्रूणावरही त्याचा परिणाम होऊ शकतो.”
गुजरातच्या आणंदमध्ये आयव्हीएफ क्लिनिक असलेल्या डॉक्टर नयना पटेल यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, इन्फर्टिलिटीच्या उपचारांमध्ये अनेकदा एकाहून जास्त भ्रूण तयार होतात.
त्यांच्यामते, आयव्हीएफ प्रक्रियेत कधीकधी तीन किंवा चार भ्रूणही बनतात. अशावेळी फीटल रिडक्शन करावं लागतं. जर जोडप्याला आधी एक मूल असेल आणि आयव्हीएफच्या माध्यमातून जुळी मुलं असतील, तरी फीटल रिडक्शन करावं लागतं.
फीटल रिडक्शनची प्रक्रिया
फीटल रिडक्शनची प्रक्रिया समजावून सांगतात त्या म्हणतात की, पोटॅशियम क्लोराईडचं इंजेक्शन आईच्या पोटातून बाळाच्या हृदयात दिलं जातं. त्यानंतर त्याच्या हृदयाचे ठोके बंद होतात. इंजेक्शनसाठी वापरली जाणारी सुई लांब असते.
त्यानंतर त्या महिलेला 24 आठवडे देखरेखीखाली ठेवण्यात येतं. या कालावधीत भ्रूणाचा विकास थांबतो आणि ते अम्निओटिक फ्लूइड्समध्ये विरघळून जातं.
जर भ्रूण सहा किंवा सात आठवड्यांचं असेल तर व्हजायनल सक्शन नीडलचा वापर करून योनी मार्गातूनच काढलं जातं.
गर्भधारणेला 25 आठवडे होऊन झाले असतील तर प्रसूती होऊ शकते का? या प्रश्नाचं उत्तर देताना डॉक्टर सुचित्रा दळवी सांगतात की, अनेकदा वेळेआधीही प्रसूती होते आणि त्याची अनेक कारणं असतात.
मात्र, या मुलांच्या फुफ्फुसात एवढी क्षमता नसते की, श्वास घेता येईल. कारण त्यांची फुफ्फुसं विकसित झालेलीच नसतात. अशा बाळांना एनआयसीयूमध्ये ऑक्सिजन दिला जातो.
जर मुलांमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण कमी-जास्त होत असेल, तर त्यांचा बुद्ध्यांक आणि डोळ्यांवर परिणाम होऊ शकतो, असं डॉक्टर दळवी सांगतात.
वेळेआधी प्रसूती मुलांसाठी धोकादायक असू शकते. अशावेळी डॉक्टर या प्रकरणात काय करतात हे पाहायला हवं. कारण ही एक असाधारण केस आहे.
या प्रकरणाची पुढची सुनावणी 16 जानेवारीला होणार आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























