बीबीसी मराठी : या आठवड्यातील महत्त्वाच्या बातम्या आणि लेख...

फोटो स्रोत, Maha Gov
नमस्कार मंडळी, कसा गेला हा तुमचा आठवडा. या आठवड्यात बऱ्याच घडामोडी घडल्या.
आम्ही त्या तुमच्यापर्यंत पोहोचवल्या देखील.पण असं होऊ शकतं की तुमच्याकडून काही महत्त्वाचे लेख वाचायचे राहून गेले असतील.
तर मंडळी काळजी नको.आम्ही तुमच्यासाठी या आठवड्यातले पाच खास लेख देत आहोत. ते तुम्ही एकाच ठिकाणी वाचू शकाल.
बीबीसी मराठीने नेहमीच आपले वैविध्य जपण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे या आठवड्यात विविध क्षेत्रातील पाच खास बातम्या आम्ही देत आहोत.
राजकारण, मनोरंजन, प्रेरणादायी, ट्रेंडिंग आणि ज्ञानवर्धक असे पाच लेख जे तुम्ही नक्की वाचले पाहिजेत..
1. शिंदे-फडणवीस सरकारच्या महिलांसाठी 'या' 5 मोठ्या घोषणा

महापालिका निवडणुकांच्या तोंडावर अर्थसंकल्प सादर होत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पहिल्याच अर्थसंकल्पात महिला वर्गासाठी घोषणांचा पाऊस पाडला.
अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या अर्थसंकल्पात लहान मुलींसह संपूर्ण महिला वर्गासाठी मोठ्या योजना जाहीर केल्या आहेत.
या योजना कोणत्या आहेत? याचा फायदा महिलांना कसा होईल? आणि महिला मतदारांना खूष करण्याचा हा प्रयत्न आहे का? जाणून घेऊया,
अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला पहिला अर्थसंकल्प आज (9 मार्च 2023) विधानसभेत मांडला. आयपॅडवर सादर झालेला हा पहिलाच अर्थसंकल्प आहे.
तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे-फडणवीस सरकारने 'निवडणूक बजेट' सादर केलंय अशी टीका विरोधकांकडून केली जात आहे.
या अर्थसंकल्पात सरकारने महिलांसाठी मोठ्या घोषणा आणि योजना जाहीर केल्या आहेत. या घोषणा कोणत्या आहेत पाहूया? या घोषणा महिला मतदारांना आकर्षून घेण्याचा प्रयत्न आहे?

2. मीराबाई चानू सलग दुसऱ्या वर्षी 'बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवूमन ऑफ द इयर'
वेटलिफ्टर मीराबाई चानू 2022 बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवूमन ऑफ द इयर पुरस्काराची मानकरी ठरली आहे. जनतेने दिलेल्या कौलानुसार मीराबाईची निवड झाली आहे.
सलग दुसऱ्यांदा हा पुरस्कार पटकावणारी मीराबाई ही पहिलीच खेळाडू ठरली आहे. 2021 वर्षासाठी मीराबाईला याच पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.
2020 टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत, मीराबाई वेटलिफ्टिंग प्रकारात सुवर्णपदकाची कमाई करणारी पहिली भारतीय खेळाडू ठरली होती. हाच फॉर्म कायम राखत मीराबाईने इंग्लंडमधल्या बर्मिंगहम इथे झालेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत सुवर्णपदकावर नाव कोरलं. त्याच वर्षी झालेल्या वर्ल्ड वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप रौप्यपदक पटकावलं.
बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवूमन ऑफ द इयर पुरस्काराची मानकरी ठरल्यानंतर बोलताना मीराबाई म्हणाली, "मुली क्रीडा क्षेत्रात आल्या तर त्यांच्या शरीरावर त्याचा परिणाम होईल ही मानसिकता बदलण्याची गरज आहे. ही अनाठायी भीती आपण घालवायला हवी."

फोटो स्रोत, Getty Images
3. सतीश कौशिक: कॉमेडियन होण्यासाठी आले अन् दिग्दर्शकही बनले...
बॉलिवूडमधीस प्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक सतीश कौशिक यांचं निधन झाल्याची माहिती अभिनेता अनुपेम खेर यांनी ट्वीटद्वारे दिली आहे.
कौशिक 67 वर्षांचे होते.
सतीश कौशिक यांचे पुतणे निशाण कौशिक यांनी बीबीसी हिंदीला सांगितले की त्यांचे निधन हृदयविकाराच्या झटक्याने झाले.
कौशिक हे होळी खेळण्यासाठी गुरुग्राम येथे आले होते. मित्राच्या घरी असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला.
त्यांना फोर्टिस रुग्णालयात नेण्यात आले पण त्यांचा जीव वाचू शकला नाही अशी माहिती निशाण कौशिक यांनी दिली.

फोटो स्रोत, Getty Images
4. आई होण्यास अनेक चिनी महिलांचा नकार, हे आहे कारण..
“मुलांचं संगोपन करणं माझ्या आवाक्यात नाही,” असं ग्लोरिया म्हणते. ग्लोरिया विवाहित असून, ती आता तिच्या वयाच्या तिशीत आहे.
ग्लोरियानं बाळाचं संगोपन करण्यासाठी किती खर्च येऊ शकतो, याचा अंदाज बांधला असता, तिला लक्षात आलं की, चीनसारख्या देशात इतर सर्व खर्च वगळूनही महिन्याकाठी 2400 डॉलर इतका येईल. म्हणजे, भारतीय रुपयात हीच रक्कम दोन लाखांच्या जवळ जाते.
ग्लोरिया पुढे सांगते की, “अन्नासारख्या दैनंदिन खर्चासाठी 3 हजार युआन (436 डॉलर) खर्च असेल. केजीच्या शिक्षणासाठी 200 युआन, पार्ट टाईम चाईल्डकेअरसाठी 1000 युआन आणि शालेय शिक्षणासाठी कमीत कमी 10 हजार युआन लागेल.”
ही केवळ ग्लोरियाची कहाणी नाही. चीनमधल्या अनेक महिला असाच विचार करत आहेत.
काय आहेत त्यामागची कारणं?

फोटो स्रोत, Getty Images
5. H3N2 व्हायरसचा धोका टाळण्यासाठी डॉक्टरांनी दिले हे सल्ले
'खोकला सुरू होऊन तीन आठवडे झाले पण खोकला थांबतच नाही,' हा अनुभव तुमच्यापैकी अनेकांना आला असेल किंवा आपल्या आजुबाजुला खोकणाऱ्यांचं प्रमाण वाढलं आहे असं तुम्हालाही जाणवत असेल. याचं कारण म्हणजे देशभरात फ्ल्यू रुग्णांची संख्या वाढल्याचं निदर्शनास येत आहे.
या फ्लूमध्ये H3N2 हा व्हायरस असल्याचंही दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर इंडियन मेडिकल असोसिएशनने एक पत्रक जारी केलं आहे. व्हायरल फ्लूची लागण झाली असल्यास अँटिबायोटिक्स घेऊ नका असंही आवाहन IMA कडून करण्यात आलं आहे.
फ्ल्यू आणि या व्हायरसविषयी इंडियन मेडिकल असोसिएशनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. शिवकुमार उत्तुरे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सविस्तर माहिती दिली आहे. अँटिबायोटिक्स का वापरू नये?
या व्हायरसची लक्षणं काय? आणि काय काळजी घ्यायला हवी? लहान मुलांची काळजी कशी घ्याल? अशा सर्व प्रश्नांची उत्तरं त्यांनी दिली आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)























