अमेरिकेचा चीनला रशिया-युक्रेन युद्धावरून इशारा, इराणबरोबरच्या मैत्रीच्या मुद्द्यावरून व्यक्त केली आशा

Published

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी चीनला इशारा देत म्हटलंय की, रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यात चीनची मदत थांबली नाही, तर अमेरिका चीनविरुद्ध कारवाई करू शकते.

अमेरिकेचा आरोप आहे की, चीनकडून रशियाला पुरवण्यात येणारं सामान रशिया युक्रेनविरुद्धच्या युद्धात वापरत आहे.

बीजिंगमध्ये बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत ब्लिंकन म्हणाले की त्यांनी आपल्या चिनी समकक्षांना स्पष्ट केलंय की, "शीतयुद्धानंतरच्या काळात युरोपच्या सुरक्षेला जो सर्वात मोठा धोका आहे त्यांना तुम्ही मदत करताय."

मात्र, बीबीसीशी बोलताना त्यांनी अमेरिका चीनविरोधात कोणती कारवाई करू शकते हे सांगितलं नाही.

फेन्टानिल हा मादक पदार्थ अमेरिकेत पोहोचण्यापासून रोखण्याच्या चीनच्या प्रयत्नांची त्यांनी प्रशंसा केली.

चीन हा या मादक पदार्थाचा मोठा स्त्रोत आहे.

अमेरिकेत ही इतकी मोठी समस्या आहे की, व्हाईट हाऊसने म्हटलं होतं की यामुळे देशभरात सार्वजनिक आरोग्य संकट निर्माण झालं आहे.

'चीनच्या इराणशी असलेल्या संबंधांचा' संदर्भ देत ब्लिंकन म्हणाले की, "इराणचा इस्रायलसोबतचा तणाव कमी करण्यासाठी चीनचा वापर होऊ शकतो."

ते म्हणाले की, मला वाटतं त्याप्रमाणे की चीन मध्यपूर्वेत सकारात्मक भूमिका बजावू शकतो.

ब्लिंकेन 24 ते 26 एप्रिल हे तीन दिवस चीनच्या दौऱ्यावर होते.

गेल्या 10 महिन्यांतील ब्लिंकन यांची चीनला ही दुसरी भेट आहे.

गेल्या वर्षी दोघांमधील तणाव शिगेला पोहोचला होता, त्यानंतर दोन्ही देश आपसातील संबंध सामान्य करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि दोघांमध्ये चर्चा आणि राजनैतिक प्रयत्न वाढले आहेत.

चीन आणि अमेरिका यांच्यात तणाव

गेल्या वर्षी अमेरिका आणि चीन यांच्यातील तणाव वाढला होता. कारण चीनने तैवानवर दावा केला होता सोबतच दक्षिण चीन समुद्रात चीन आपले हातपाय पसरण्याच प्रयत्न करतोय.

अमेरिकेने चीनवर आधीच अनेक निर्बंध घातले आहेत. त्यात भर म्हणून अमेरिकेने चीनला निर्यात होणाऱ्या अत्याधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता चिप्सच्या निर्यातीवर बंदी घातली.

गेल्या वर्षाच्या सुरुवातीला अमेरिकेच्या आकाशात चीनच्या कथित 'स्पाय बलून' दिसण्यावरून दोघांमधील वाद आणखी वाढला होता.

अमेरिकेने त्यांना 'स्पाय फुगे' म्हटले आणि लढाऊ विमानांमधून क्षेपणास्त्रे डागून त्यांना उडवले.

मात्र चीनने सांगितले की ते हवामानाची माहिती गोळा करण्यासाठी सोडलेले फुगे होते. मात्र, वाऱ्यामुळे त्यांचा मार्ग चुकला आणि ते अमेरिकेच्या दिशेने भरकटले.

पण या प्रकरणाबाबतचा तणाव इतका वाढला की, फेब्रुवारीमध्ये या घटनेनंतर अँटनी ब्लिंकन यांचा त्याच महिन्यात होणारा चीन दौरा पुढे ढकलावा लागला.

ब्लिंकन यांचा दौरा कसा होता?

या वादाच्या तीन महिन्यांनंतर ब्लिंकन यांनी चीनला भेट दिली. त्यांच्या दौऱ्याची सुरुवात तशी चांगली नव्हती.

विमानतळावर त्यांचे स्वागत करण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाचे केवळ वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पण दौऱ्याचा शेवट उत्साहवर्धक होता.

दौऱ्याच्या शेवटी, चीनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दोन दिवसांच्या चर्चेनंतर त्यांनी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतली. ही भेट पूर्वनियोजित नव्हती.

ब्लिंकन चीनहून परतताच राष्ट्राध्यक्ष बायडन यांनी एका कार्यक्रमात चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना हुकूमशहा म्हटलं होतं.

दरम्यान, अलीकडच्या काळात अमेरिकेने एक कायदा केला आहे, ज्यामुळे चीनच्या मालकीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टिकटॉकला एकतर त्याचे व्हिडिओ ॲप विकावे लागेल किंवा अमेरिकेत त्यावर बंदी घालण्यात येईल.

चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी झालेल्या संभाषणात या विषयावर कोणतीही चर्चा झाली नसल्याचं ब्लिंकन यांनी सांगितलं.

टिकटॉक ॲपद्वारे महत्त्वाची माहिती चोरली जाऊ शकते आणि ती चीन पर्यंत पोहोचवली जाऊ शकते, असं अमेरिकेचं म्हणणं आहे.

अमेरिकेने टिकटॉकची मूळ कंपनी बाइटडान्सला ॲप विकण्यासाठी किंवा बंदीला सामोरं जाण्यासाठी 270 दिवसांचा अवधी दिला आहे.

अध्यक्ष जो बायडन यांनी या आदेशावर स्वाक्षरी केली.

यानंतर, कंपनीने एक निवेदन प्रसिद्ध करत म्हटलंय की, टिकटॉक आणि बाइटडान्सचे जनरल काउंसिल एरिक अँडरसन जूनमध्ये आपले पद सोडतील आणि कंपनीच्या विशेष सल्लागाराच्या भूमिकेत जातील.

ब्लिंकन आणि शी जिनपिंग यांची भेट

शुक्रवारी दुपारी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी बीजिंगमधील ग्रेट हॉल ऑफ द पीपल येथे अँटोनी ब्लिंकन यांची भेट घेतली.

बैठकीनंतर, ते म्हणाले की गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात अध्यक्ष जो बायडन यांची भेट घेतल्यानंतर, दोन्ही बाजूंनी काही बाबींवर सकारात्मक प्रगती झाली आहे.

ते म्हणाले की दोन्ही देशांनी 'मित्र असलं पाहिजे, शत्रू नाही.'

ते म्हणाले, "अमेरिकेने चीनच्या विकासाबाबत सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर दोघांमधील संबंध खऱ्या अर्थाने स्थिर, चांगले होतील आणि दोघेही एकत्र पुढे जाऊ शकतील."

ब्लिंकन यांनी बीबीसीला सांगितलं की, जर अमेरिका आणि युरोपने रशियाला शस्त्रे बनवण्यासाठी वापरत असलेल्या 'साधनांचा' पुरवठा थांबवला तर चीनसोबत संबंध सुधारू शकतात.

युक्रेनसोबतच्या युद्धात चीनच्या कंपन्या रशियाला मोठी मदत करत असल्याचा आरोप अमेरिका करत आहे.

या वस्तूंमध्ये 'हत्यारं, मायक्रो इलेक्ट्रॉनिक घटक आणि ऑप्टिक्स' यांचा समावेश आहेत.

ब्लिंकन यांनी बीबीसीला सांगितलं की, "असं करून चीन रशियाला युक्रेनविरुद्धची आक्रमक भूमिका वाढवण्यास मदत तर करत आहेच, पण युरोपचाही धोकाही वाढवत आहे."

ते म्हणाले, "आम्ही या कामात गुंतलेल्या चिनी कंपन्यांवर कारवाई केली आहे. आज आम्ही पुन्हा एकदा स्पष्ट करू इच्छितो की, चीनने कारवाई न केल्यास आम्ही कारवाई करू."

हा एक संभाव्य मार्ग असल्याचं ब्लिंकन म्हणाले.

मात्र, चीन थेट रशियाला शस्त्रास्त्र पुरवत नाही, यावरही त्यांनी भर दिला.

बीबीसीशी बोलताना ब्लिंकन म्हणाले की, दोन्ही देश गुप्तचर आणि लष्करी दळणवळण यासारख्या परस्पर हिताच्या बाबींमध्ये अधिक चांगले सहकार्य करू शकतात हे पाहणे महत्त्वाचे आहे.

चीनची प्रतिक्रिया

चीनच्या बाबतीत अमेरिकेने मर्यादा ओलांडू नये, असं चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन यांना सांगितलं आहे.

शुक्रवारी बीजिंगमध्ये दोन्ही नेत्यांची भेट झाली.

यानंतर वांग यी म्हणाले की, अमेरिकेने चीनने आखलेली 'मर्यादा' ओलांडू नये.

दोन्ही देशांमधील संबंध आता स्थिरतेकडे वाटचाल करत असल्याचं त्यांनी मान्य केलं. मात्र ते असंही म्हणाले की, नातेसंबंधात अजूनही 'नकारात्मकता' आहे.

बैठकीनंतर वांग यी म्हणाले, "दोन्ही देशांनी त्यांच्यातील मतभेदांवर स्पष्टपणे चर्चा करणे महत्त्वाचं आहे. यामुळे समज आणि गैरसमज निर्माण होण्याचा धोका टळेल."