बीबीसी मराठी : या आठवड्यातील महत्त्वाच्या बातम्या आणि लेख..

Published

नमस्कार मंडळी, कसा गेला हा तुमचा आठवडा. या आठवड्यात बऱ्याच घडामोडी घडल्या.

आम्ही त्या तुमच्यापर्यंत पोहोचवल्या देखील.पण असं होऊ शकतं की तुमच्याकडून काही महत्त्वाचे लेख वाचायचे राहून गेले असतील.

तर मंडळी काळजी नको.आम्ही तुमच्यासाठी या आठवड्यातले पाच खास लेख देत आहोत. ते तुम्ही एकाच ठिकाणी वाचू शकाल.

बीबीसी मराठीने नेहमीच आपले वैविध्य जपण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे या आठवड्यात विविध क्षेत्रातील पाच खास बातम्या आम्ही देत आहोत.

राजकारण, मनोरंजन, प्रेरणादायी, ट्रेंडिंग आणि ज्ञानवर्धक असे पाच लेख जे तुम्ही नक्की वाचले पाहिजेत..

1. महाराष्ट्राने आंतरधर्मीय विवाहांविषयी स्थापन केलेली समिती काय आहे? त्यावरून वाद का?

धर्माबाहेर विवाह करणाऱ्या मुलींसदर्भात महाराष्ट्र सरकारनं स्थापन केलेली एक समिती वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

राज्याचे महिला बाल विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली ‘आंतरजातीय/आंतरधर्मीय विवाह – परिवार समन्वय समिती’ची स्थापना केल्याचं सरकारनं जाहीर केलं आणि या वादाला सुरुवात झाली.

या समितीच्या नावात आंतरजातीय/आंतरधर्मीय असा उल्लेख होता. मात्र गुरुवारी (15 डिसेंबर) सरकारने नवीन सरकारी आदेश (जीआर) प्रसिद्ध केला.

या नवीन जीआरनुसार आता आंतरजातीय हा शब्द वगळण्यात आला आहे. ही समिती आता केवळ आंतरधर्मीय विवाहांबद्दलच काम करेल. विरोधी पक्षातले नेते आणि राज्यातील प्रमुख महिला संघटनांनीही या समितीला विरोध दर्शवला आहे.

2. शेतजमिनीच्या ताब्यावरील वाद मिटवणारी महाराष्ट्र सरकारची सलोखा योजना काय आहे?

शेतजमिनीच्या ताब्यावरुन शेतकऱ्यांमध्ये असणारे आपआपसातील वाद मिटवण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं सलोखा योजनेस मंजुरी दिली आहे.

13 डिसेंबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. पण, सलोखा योजना नेमकी कशी असेल?

ही योजना आणण्याची गरज का निर्माण झाली? ही योजना राबवणं किती आव्हानात्मक असेल?

3. शाहरुख खान : सोशल मीडियाचा वापर संकुचित दृष्टिकोनातून, काही लोक नकारात्मकता पसरवत आहेत..

“सोशल मीडिया अनेकदा विशिष्ट संकुचित दृष्टिकोनातून वापरला जातो. तो मानवी स्वभावाला त्याच्या स्वार्थापुरता मर्यादित ठेवतो,” असं अभिनेता शाहरूख खान याने म्हटलं.

‘पठाण’ सिनेमातील ‘बेशरम रंग’ या गाण्यावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर शाहरूख खानने हे विधान केलं आहे.

सोशल मीडियाचा वापर आणि त्याचा प्रभाव यावर त्यानं भाष्य केलं.शाहरुख 28 व्या आंतरराष्ट्रीय कोलकाता फिल्म फेस्टिव्हलमध्ये बोलत होता.“काही लोक सोशल मीडियावर नकारात्मकता पसरवत आहेत.

सोशल मीडिया आपल्या सामूहिक नॅरेटिव्हला आकार देत आहे. सोशल मीडिया सिनेमावर नकारात्मक प्रभाव टाकेल या धारणेला छेद देत सिनेमाला आता महत्त्वपूर्ण भूमिका बजावावी लागेल.”

4. व्हिटॅमिन B12 ची कमतरता का निर्माण होते? त्यामुळे काय त्रास होतात?

शरीरामध्ये व्हिटॅमिन B12 ची कमतरता असल्यामुळे अनेक जणांना वेगवेगळ्या शारीरिक समस्यांना सामोरं जावं लागतं.

डॉक्टरांनाही चटकन या कमतरतेचं निदान आणि त्यावर उपचार करणं शक्य होत नाही.व्हिटॅमिन B12 ची कमतरता असण्याचं सर्वांत महत्त्वाचं कारण म्हणजे तुमच्या रोजच्या आहारात या जीवनसत्त्वाचं प्रमाण कमी असलेल्या पदार्थांचा अभाव.

आपल्याला खरंतर दररोज केवळ 2.4 मायक्रोग्रॅम्स व्हिटॅमिन B12 ची आवश्यकता असते.

वाचताना हा आकडा अतिशय लहान वाटतो. पण अनेकदा ती गरजही पूर्ण होत नाही आणि मग अनेक आरोग्यविषयक समस्या सुरू होतात.

5. लिओनेल मेस्सी : आजीमुळे त्याला फुटबॉलचं वेड लागलं आणि जग त्याच्या फुटबॉलचं वेडं झालं

हिरव्यागार मैदानाचा गालिचा पसरलेला. पांढऱ्या-निळ्या रंगाची 10 क्रमांकाची जर्सी. डोळ्याचं पातं लवतं न लवतं तोच तो बॉलवर ताबा मिळवतो.

प्रतिस्पर्धी संघाचे खेळाडू त्याच्याकडून बॉल काढून घेण्यासाठी झटू लागतात. त्याचे पाय जणू हरणाचे होतात. बॉलला घेऊन तो सुसाट निघतो. वाटेत जो येतो त्याला चकवतो.

मैदानाच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या गोलपोस्टच्या दिशेने बॉलला नेण्यासाठी त्याचं शरीर सळसळू लागतं. त्याच्या ऊर्जेने प्रतिस्पर्धी भारून जातात.त्याचं काम, वेगाचं सूत्र समोरच्यांना नामोहरम करतं. बॉलसह दौडत तो गोलकीपरकडे जातो.

गोलकीपरच्या मनात काय चाललंय हे त्याला कसं कळतं माहिती नाही पण तो कुठल्या दिशेने झेपावणार याचा त्याचा अंदाज चुकत नाही.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)