2024 मध्ये मोदी-शहांना तुरुंगात टाकल्याशिवाय राहणार नाही- प्रकाश आंबेडकर

फोटो स्रोत, facebook
विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा
1. 2024 मध्ये मोदी-शहांना तुरुंगात टाकल्याशिवाय राहणार नाही- प्रकाश आंबेडकर
शिवसेनेसोबत युती केल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आक्रमक झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना मी तुरुंगात टाकल्याशिवाय राहणार नाही, असं खळबळजनक विधान त्यांनी केलं आहे. ते पुण्यात बोलत होते.
आंबेडकर म्हणाले, “भाजपवाले म्हणतात की आम्ही 2024 मध्ये परत येऊ, मी म्हणतो 2029 मध्येही याल कारण आम्हा सगळ्यांना तुम्ही तुरुंगात टाकणार तर तुम्हाला विरोध करणार कोण? पण 2024 मध्ये भाजप आणि आरएसएसचं सरकार येऊ देऊ नका. मी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना आत टाकल्याशिवाय राहणार नाही”. ‘सकाळ’ने ही बातमी दिली आहे.
भाजपात मोदींनंतर दुसरा पंतप्रधान कोण आहे? एकही माणूस आपल्या नजरेसमोर नाही जो देशाचं नेतृत्व करु शकतो. ED, सीबीआय, आयबीचा लोकांना धाक आहे, म्हणून सगळे लोकं त्यांना मुजरा करतात, हात जोडतात असंही आंबेडकर म्हणाले.
2. आजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन

फोटो स्रोत, Getty Images
संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरु होत आहे. पहिल्या टप्प्यात अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात वित्त विधेयक मंजूर होईल. 31 जानेवारी 2023 ते 6 एप्रिलपर्यंत चालणार आहे. अधिवेशन 31 जानेवारीला राष्ट्रपतींच्या अभिभाषणानं सुरू होणार आहे.
यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 2022-23 च्या आर्थिक सर्वेक्षणाचा अहवाल संसदेच्या पटलावर ठेवतील. तर दुसऱ्या दिवशी म्हणजे 1 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री 2023-24 चा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करतील. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा पाचवा आणि शेवटचा अर्थसंकल्प असणार आहे. 'अमर उजाला'ने ही बातमी दिली आहे.
3. अमर्त्य सेन यांच्यावर जमीन बळकावल्याचा आरोप, ममता बॅनर्जींचा सेन यांना पाठिंबा

फोटो स्रोत, Getty Images
नोबेल पारितोषिक विजेते अमर्त्य सेन यांच्यावर जमीन बळकावल्याचा आरोप झाला आहे. याप्रकरणी विश्व भारतीने त्यांना एक नोटीस धाडली असून संबंधित जमीन रिकामी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या आरोपांनंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अमर्त्य सेन यांचं समर्थन केलं आहे.
सोमवारी त्यांनी अमर्त्य सेन यांच्या बीरभूम येथील घरी जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी संबंधित जमीन अमर्त्य सेन यांचीच असल्याचे कागदोपत्री पुरावे राज्य सरकारच्या वतीने सादर केले.
यावेळी ममता बॅनर्जी यांनी भारतीय जनता पार्टीवर जोरदार हल्लाबोल केला. ज्येष्ठ अर्थतज्ज्ञाचा भाजपाकडून अपमान करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. 'लोकसत्ता'ने ही बातमी दिली आहे.
ममता बॅनर्जी म्हणाल्या, “विश्व भारती विद्यापीठाने अमर्त्य सेन यांना एक नोटीस पाठवली होती. ज्यामध्ये सेन यांनी विद्यापीठाच्या जमिनीवर अतिक्रमण केल्याचा आरोप होता. तसेच संबंधित जमीन परत देण्याची मागणी नोटीसद्वारे करण्यात आली होती. यानंतर मी संबंधित अधिकाऱ्यांना जमिनीचे रेकॉर्ड तपासायला सांगितले. आम्ही जमिनीच्या मूळ नोंदी शोधल्या असून ती जमीन सेन यांचीच असल्याचं समोर आलं आहे. विद्यापीठ प्रशासन खोटं बोलत आहे.”
“ज्येष्ठ अर्थतज्ज्ञाचा अपमान का केला जात आहे? त्यांना बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे का? शिक्षणाच्या भगवीकरणाऐवजी विश्व भारती विद्यापीठ योग्यरित्या चालवावी अशी माझी इच्छा आहे,” असंही मुख्यमंत्री बॅनर्जी पुढे म्हणाल्या.
4. खासदार नवनीत राणांचे वडील फरार म्हणून घोषित

फोटो स्रोत, PTI
खासदार नवनीत राणा आणि त्यांच्या वडीलांना शिवजी महानगर दंडाधिकारी कोर्टाने मोठा दणका दिला आहे. जात पडताळणी प्रकरणात खासदार नवनीत राणा यांचे वडील हरभजन सिंग कौर यांना शिवडी कोर्टाकडून फरार म्हणून घोषित करण्यात आलं आहे. याशिवाय नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांना 1 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. 'झी न्यूज'ने ही बातमी दिली आहे.
सुप्रीम कोर्ट आणि मुलुंड पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेलं प्रकरण दोन्हीही वेगवेगळे असल्याचं निरीक्षण शिवडी कोर्टाने नोंदवलं आहे. कोर्टाने आता एक महिन्याची मुदत दिली आहे, या कालावधीत हजर न झाल्यास प्रॉपर्टी जप्त करण्यात येण्याची शक्यता आहे. याप्रकरणाची पुढील सुनावणी 16 फेब्रुवारीला आहे.
नवनवीत राणा यांच्यावर जात प्रमाणपत्रासाठी शाळा सोडल्याचा बनावट दाखला दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
नवनीत राणा यांचे वडिल हरभजन सिंग कौर यांनी फसवणूक करुन प्रमाणपत्र मिळवल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे. नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांविरोधात मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
5. दाभोलकर हत्येचा तपास पूर्ण; सीबीआयची उच्च न्यायालयात माहिती

फोटो स्रोत, FACEBOOK
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास पूर्ण झाला आहे. त्याचा अहवाल तपास अधिकाऱ्यांनी सादर केला आहे. पुढील तपासाची आवश्यकता नाही, अशी माहिती केंद्रीय तपास यंत्रणेने (सीबीआय) सोमवारी उच्च न्यायालयात दिली. 'माय महानगर'ने ही बातमी दिली आहे.
न्या. अजय गडकरी व न्या. प्रकाश नाईक यांच्या खंडपीठासमोर Additional Solicitor General (ASG) अनिल सिंग यांनी सीबीआयच्यावतीने ही माहिती दिली.
20 ऑगस्ट 2013 रोजी डॉ. दाभोलकर यांची हत्या करण्यात आली. या हत्येचा तपास समाधानकारक नाही. त्यामुळे न्यायालयाने या तपासावर नियंत्रण ठेवावे, अशी मागणी करणारी याचिका मुक्ता दाभोलकर यांनी अॅड. अभय नेवगी यांच्यामार्फत केली आहे.
मात्र या हत्येतील आरोपींनी 20121 मध्ये न्यायालयात अर्ज केला. न्यायालयाने डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या तपासावर लक्ष ठेवू नये, अशी मागणी आरोपींनी न्यायालयात केली.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)























