राज्यातील पावसाची स्थिती काय? जाणून घ्या मान्सूनचा अंदाज

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

राज्यात मान्सूनपूर्व पावसाने अनेक भागांत प्रवेश केला असून आज (6 जून) अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाच्या सरींचं आगमन होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

हवामान विभागानुसार, दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना, मुसळधार पाऊस आणि ताशी 40-50 किमी वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची दाट शक्यता आहे.

तसेच उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी 40-50 किमी वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.

उत्तर कोकणातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

थोडक्यात पुढील 48 तासांत मान्सून महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांमध्ये वेगाने आगेकूच करू शकतो. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

पुढील 4-5 दिवसांत पश्चिम महाराष्ट्रातील कमाल तापमानात 1 ते 2 अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

शेतकरी आणि नागरिकांना वादळी पावसात सुरक्षित ठिकाणी थांबण्याचे आणि विद्युत उपकरणे व झाडांपासून अंतर राखण्याचे आवाहन केले आहे.

कुठे काय स्थिती?

मान्सूनने मध्य अरबी समुद्राचा काही भाग, गोव्याचा काही भाग, कर्नाटक, तामिळनाडू आणि नैऋत्य बंगाल्या उपसागराच्या आणखी काही भागांत यशस्वी घोडदौड केली आहे.

पुढील 2 ते 3 दिवसांत मान्सून आणखी पुढए सरकरण्यासाठीची परिस्थिती अनुकूल असल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे.

मध्य अरबी समुद्राचा काही भाग, गोव्याचा काही भाग, आंध्र प्रदेशचा काही भभाग आणि तामिळनाडू, नैऋत्य बंगालच्या उपसागराच्या काही भागात मान्सून पुढे सरकण्याची शक्यता आहे.

दक्षिण महाराष्ट्र, गोवा, केरळ, कर्नाटकचे किनारपट्टी भाग आणि लक्षद्वीप तसेच त्याला लागून असलेल्या मालदीवच्या क्षेत्रांमध्ये ताशी 40-50 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. या वाऱ्यांचा वेग ताशी 60 किमीपर्यंत वाढू शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

जूनमध्ये असं असेल हवामान

महिन्याचा पावसाचा विचार केला तर जून महिन्यात देशातील पावसाचं प्रणाम सरासरीच्या 92 टक्केच राहील.

जून महिन्यात देशात बहुतांश ठिकाणी कमाल आणि किमान तापमानही सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी यंदा जूनमध्येही नेहमीपेक्षा जास्त दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.

उत्तर प्रदेश, हरयाणा, पंजाब, बिहार, ओडिसा, छत्तीसगड, गुजरात, आंध्र प्रदेशमध्ये जास्त दिवस उष्णतेच्या लाटेची शक्यता जास्त आहे.

जुलै महिन्यासाठीचा अंदाज हवामान विभाग जून महिन्याच्या अखेरीस वर्तवेल.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)