You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मेंढपाळ अडखळला आणि वितळलेल्या हिमनदीमध्ये सापडला 28 वर्षांपूर्वीचा मृतदेह
- Author, जोएल गुइंटो आणि मोहम्मद झुबैर खान
- Role, सिंगापूर आणि पाकिस्तानमधून
- Published
- वाचन वेळ: 2 मिनिटे
पाकिस्तानच्या कोहिस्तान या दुर्गम प्रदेशात 28 वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या एका व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे. हा मृतदेह हिमनदी वितळल्यामुळे सापडला आहे.
पाकिस्तानच्या पूर्वेस लेडी व्हॅली नावानं ओळखला जाणारा डोंगराळ प्रदेश आहे. एक मेंढपाळ अडखळला आणि त्याला हा मृतदेह सापडला. या देहावरचे कपडे सुस्थितीत होते आणि त्याच्याजवळ एक ओळखपत्रही सापडलं. त्यावर नसिरुद्दीन असं नाव लिहिलेलं आहे. हा माणूस 1997 साली बेपत्ता झाला होता.
पोलिसांनी त्याचा माग काढायचा प्रयत्न केला पण तो सापडला नाही. 1997 साली जून महिन्यात हिमवादळामुळे हिमनदीला पडलेल्या भेगेत तो पडला आणि बेपत्ता झाला होता.
गेल्या काही वर्षांमध्ये इथला हिमवर्षाव कमी झाला आहे. यामुळे सूर्यप्रकाशाशी थेट संपर्क आल्यामुळे हिमनद्या वेगानं वितळत आहेत. हा मृतदेह सापडल्यामुळे हवामान बदलामुळे हिमनद्या किती वेगानं वितळत आहे याचा अंदाज येतो असं तज्ज्ञ म्हणत आहेत.
ओमर खान नावाच्या मेंढपाळाला हा मृतदेह सापडला. त्यांनी याबद्दल बीबीसी ऊर्दूला माहिती दिली. ते म्हणाले, पहिल्यांदा तो (मृतदेह) पाहिला तेव्हा मला विश्वासच बसला नाही. हा देह अगदी सुस्थितीत होता, त्यावरचे कपडेही फाटले नव्हते.
हा देह नसिरुद्दीन यांचा आहे हे स्थानिकांनी दिलेल्या अधिक माहितीनंतर पोलिसांनी स्पष्ट केलं.
नसिरुद्दीन यांच्यामागे एक पत्नी आणि दोन मुलं होती. ते आपले भाऊ कथिरुद्दीन यांच्याबरोबर घोड्यावरुन प्रवास करत होते. घरात झालेल्या वादामुळे या दोन्ही भावांनी घर सोडलं होतं.
कथिरुद्दीन बीबीसी ऊर्दूशी बोलताना म्हणाले, त्यादिवशी सकाळी ते या खोऱ्यात पोहोचले होते. दुपारच्या सुमारास त्यांच्या भावानं तिथल्या एका गुहेत प्रवेश केला आणि तो परतलाच नाही. भाऊ दिसेनासा झाल्यावर कथिरुद्दीन यांनी गुहेजवळ शोध घेतला. तसंच स्थानिकांच्या मदतीनं थोडा तपास करायचा प्रयत्न केला पण त्यांचा भाऊ (नसिरउद्दीन) काही सापडला नाही.
जेव्हा एखादा देह हिमनदीत पडतो तेव्हा तो वेगानं गोठतो. त्यामुळे त्याचं विघटन होत नाही असं इस्लामाबादमधल्या कोमसॅट्स विद्यापिठातील पर्यावरण विभागाचे प्रमुख प्राध्यापक मोहम्मद बिलाल यांनी सांगितलं.
हिमनदीत ओलावा आणि ऑक्सिजन कमी असल्यामुळे हा मृतदेह गोठला आणि त्यावर एखाद्या ममीसारखी प्रक्रिया झाली.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.