जगात अव्वल असलेल्या भारताचा सलग दोन मालिकांत 'यामुळं' झाला पराभव, ही आहेत आव्हानं

फोटो स्रोत, Getty Images
- Author, नितीन सुलताने
- Role, बीबीसी मराठी
- Published
- वाचन वेळ: 6 मिनिटे
ब्रिस्टलच्या मैदानावर तिसऱ्या टी 20 सामन्यात भारताला दारुण पराभव करत इंग्लिश क्रिकेटपटूंनी मालिका खिशात घातली आहे. आयर्लंडपाठोपाठ झालेला भारताचा हा सलग दुसरा टी 20 मालिका पराभव आहे.
सलग दुसऱ्यांदा टी 20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर भारतानं पुढील विश्वचषकाची तयारी सुरू करण्यासाठी नव्या पद्धतीनं संघ निवड केली. 2028 च्या टी 20 विश्वचषकासाठीच्या संघाची बांधणी करण्यासाठीचा हा पहिला प्रयोग ठरला.
पण आयर्लंड आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या गेल्या सहा सामन्यांचा विचार करता हा प्रयोग फारसा यशस्वी झाला असं म्हणता येणार नाही. क्रिकेटच्या भाषेत सांगायचं झालं तर पहिल्या पॉवरप्लेमध्ये फार काही हाती लागलेलं दिसत नाही.
क्रिकेटमध्ये आणि त्यातही टी 20 क्रिकेटमध्ये अशा प्रकारचे पराभव होणं यात फार काही वेगळं असं नाही.
पण सलग दोन विश्वचषक जिंकलेल्या आणि टी 20 क्रिकेटमध्ये जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या संघाला अशा पराभवाचा सामना करावा लागलं हे चर्चेचं अधिक मोठं कारण आहे.
त्यात भारतीय क्रिकेट चाहत्यांची संख्या, क्रिकेटसाठी त्यांचं असलेलं प्रेम आणि त्या प्रेमापोटी पराभवानंतर व्यक्त होणाऱ्या भावना किंवा राग यामुळं अशा पराभवांची अधिक चर्चा आणि विश्लेषणही होत असतं.
त्यामुळंच या पराभवांमधून काही अत्यंत महत्त्वाचे प्रश्न किंवा भारतीय संघासमोर असलेली आव्हानं ठळकपणे स्पष्ट झाली आहेत. त्यावर चर्चा करण्याचा प्रयत्न करुयात.

फोटो स्रोत, Getty Images
प्लेइंग इलेव्हनचं गणित
भारतानं याच वर्षी चार महिन्यांपूर्वी सलग दुसऱ्यांदा टी 20 विश्वचषकाचं विजेतेपद पटकावत ऐतिहासिक कामगिरी करून दाखवली. रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात एका नव्या संघानं दिमाखात ही मोहीम फत्ते केली.
2024 मध्ये रोहित, विराट, रवींद्र जडेजा यांच्या उपस्थितीत भारतीय संघानं मिळवलेला विजय आणि त्यांच्या निवृत्तीनंतर अत्यंत अचूकपणे या रिकाम्या जागा भरत भारतानं 2026 मध्ये पुन्हा इतिहास रचला. त्यासाठी 15 पैकी अचूक 11 खेळाडूंच्या निवडीचं गणित संघ व्यवस्थापनाला अचूक जुळवता आलं.
पण 2026 मध्ये मिळवेल्या विश्वचषक विजयानंतरच्या या पहिल्या दोन मालिकांचा विचार करता भारतीय संघाचं हे गणित अद्याप जुळत नसलेलं पाहायला मिळतंय. फलंदाजी असेल किंवा गोलंदाजी दोन्ही क्षेत्रांत भारतीय संघाला सूर गवसलेला दिसत नाही.

फोटो स्रोत, Getty Images
नव्या संघबांधणीची तयारी करत असल्यानं प्रयोग केले जात असले तरी भारताच्या दृष्टीनं एक काळजी बाब ठरू शकते आणि ती म्हणजे भारतीय संघाला या दोन मालिकांमध्ये वेगवेगळ्या सामन्यांत भारताला वेगवेगळ्या आघाड्यांवर संकटांचा सामना करावा लागला.
पॉवरप्लेमध्ये आलेलं अपयश, मधल्या फळीकडून झालेली निराशा, गोलंदाजांमध्ये सातत्याचा अभाव म्हणजे सुरुवातीला यश मिळवल्यानंतर पुढच्या ओव्हर्समध्ये त्याचा फायदा घेता न येणं असं प्रत्येक सामन्यात वेगळं आव्हान पाहायला मिळालं.
संघाचं अंतिम 11 चं गणित साधताना एखाद-दुसरा बदल होत असला तरी साधारणपणे 8-9 नावं ही निश्चित असायला हवी. भारतीय संघाचा विचार करता अद्याप ती 8-9 नावं निश्चित झालेली दिसत नाही आणि हेच सध्या सर्वात मोठं आव्हान आहे असं वाटू लागलं आहे.
संधी आणि सातत्य
संघाच्या बांधणीसाठी कोच किंवा संपूर्ण संघ व्यवस्थापन जेव्हा वेगवेगळे प्रयोग करत असतात तेव्हा भविष्याचा विचार केला जात असतो. पण ते करत असतानाच नवीन चेहऱ्यांना संधी देताना काही नावांच्या बाबतीत सातत्य असणंही गरजेचं असतं.
भारतानं आतापर्यंत तीनदा टी 20 विश्वचषक विजय मिळवला. त्या तिन्ही संघांकडे पाहिलं तर आपल्या लक्षात येतं की, त्यात संघाचा कणा ठरू शकतील असे काही खेळाडू संघात वेळोवेळी महत्त्वाची भूमिका पार पाडायचे. पण त्यासाठी त्यांना मिळणाऱ्या संधीतही सातत्य होतं.
आता या नव्या संघाच्या बाबतीतही तसं होणं गरेजंचं आहे. प्रामुख्यानं संजू सॅमसनच्या उदाहरणावरून याबाबत प्रचंड चर्चा होत आहे.

फोटो स्रोत, Getty Images
सलग तीन अत्यंत महत्त्वाच्या खेळी करत भारताला विश्वचषक मिळवून देण्यात मोलाची भूमिका निभावलेल्या संजूला तीन सामन्यात आलेल्या अपयशामुळं संघाबाहेर बसावं लागलं. वैभवला खेळवण्यासाठी संजूला बाकावर बसवणं आणि झिम्बाब्वे दौऱ्यात तो नसणं हा या चर्चेमागचा एक ठोस मुद्दा आहे.
अशाप्रकारे संघात येणं पुन्हा बाहेर जाणं, संघात असताना बाकावर बसून राहावं लागणं या गोष्टींमुळं खेळाडूला आत्मविश्वास कसा मिळणार परिणामी त्याचा त्याच्या कामगिरीला फटका बसतो आणि संघावर नक्कीच त्याचा परिणाम होतो.
पण संजू सॅमसन केवळ उदाहरणादाखल आहे. क्रिकेटचा विचार करता भारतात चांगल्या खेळाडुंची कमतरता नाही. उलट एका जागेसाठी अनेक प्रतिस्पर्धी आहेत. हाच कदाचित धोका ठरू शकतो. कारण संधी मिळण्यातही सातत्य नसेल तर खेळाडुला त्याचं कौशल्य कसं दाखवता येणार.
मधल्या फळीची चिंता
भारताच्या सध्याच्या टी ट्वेंटी संघातील नावांचा विचारल केला तर फलंदाजीच्या दृष्टीनं मधल्या फळीचं अपयश ही सर्वात मोठी चिंता असल्याचं पाहायला मिळत आहे. अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, इशान किशन आता वैभव सूर्यवंशी या चार नावांचा विचार करता प्रामुख्यानं ते सलामीलाच खेळणार असं दिसतं.
या चौघांपैकी एकाला तिसऱ्या क्रमांकावर खेळवून त्याची जागा निश्चित होणं अत्यंत गरजेचं आहे. सध्या इशान किशनच्या माध्यमातून तसा प्रयत्न दिसत असला तरी त्यावर शिक्कामोर्तब झालेलं असं दिसत नाही.
श्रेयस अय्यर, तिलक वर्मा यांच्याही फलंदाजीच्या क्रमावर शिक्कामोर्तब करून जबाबदारी निश्चित करणं गरजेचं असल्याचं समोर आलं आहे.
सलामीला उतरणाऱ्या अभिषेक शर्माची खेळण्याची पद्धत ही अत्यंत तडाखेबाज आहे. त्याच्या जोडीला वैभव सारखा जोडीदार असेल तर ते ज्या पद्धतीचे धोके पत्करतात त्यामुळं तिसऱ्या क्रमांकावरील फलंजासह मधल्या फळीत चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावरील फलंदाजांचीही जबाबदारी अधिक वाढते.

फोटो स्रोत, Getty Images
त्यामुळं संघानं जर आक्रमक खेळण्याची पद्धत पुढं न्यायचं ठरवलं असेल तर अशावेळी या तीन, चार आणि पाच क्रमांकावरील खेळाडुंवर सर्वाधिक जबाबदारी असणार आहे. त्यानुसार त्यांना खेळवावं लागेल.
गेल्या काही स्पर्धा पाहिल्या तर तिलक वर्माच्या फलंदाजीच्या क्रमामध्ये अनेकदा बदल झाल्याचं पाहायला मिळालं आहे. अशा बदलांचा फलंदाजांना फटका बसू शकतो. परिणामी त्यांच्या कामगिरीबरोबरच संघावरही त्याचा प्रतिकुल परिणाम पाहायला मिळतो.
टी 20 क्रिकेटमध्ये पॉवर प्लेच्या सहा ओव्हर आणि शेवटच्या पाच ओव्हर सर्वात महत्त्वाच्या असं आधी म्हटलं जात होतं. पण खेळ बदलत चालला आहे. मधल्या षटकांत संघ ज्याप्रकारे गोलंदाजींचे प्रयोग करतात ते पाहता एक दोन रन करणाऱ्या आणि तंत्राचा वापर करून धावा करणाऱ्या फलंदाजांचं मधल्या फळीत महत्त्वं वाढत आहे.
आयर्लंड आणि इंग्लंडमध्ये ही समस्यादेखील जाणवली.
गोलंदाजीचं काय?
भारतीय संघाच्या टी-20 गोलंदाजीबाबत सर्वात मोठी समस्या म्हणजे जसप्रीत बुमरावर खूप जास्त अवलंबून असणं हे आहे. नवीन चेंडू, विकेटची गरज किंवा डेथ ओव्हर्स प्रत्येक वेळी भारताच्या नजरा बुमरा कडेच असतात.
पण, त्याच्या अनुपस्थितीत भारतीय गोलंदाजीकडे तसं भरवशाचं नाव दिसत नाही. विशेषतः डेथ ओव्हर्समध्ये धावा अडवून दबावात विकेट मिळवणाऱ्या गोलंदाजीच कमतरता भारतासमोर आहे.

फोटो स्रोत, Getty Images
अर्शदीपकडून खूप आशा असल्या तरी अद्याप तो तेवढा विश्वास मिळवण्यापर्यंत पोहोचू शकलेला नाही. तसंच त्याला भक्कम साथ देणारा दुसरा पार्टनरही दिसत नाही.
फिरकीच्याल बाबतीतही सध्या ठाम असं विश्वासार्ह नाव सापडलेलं दिसत नाही. अक्षर पटेलनं चांगली कामगिरी करत जबाबदारी उचलली असली. तरी मधल्या ओव्हर्समध्ये चांगली कामगिरी करणारा फिरकीपटू भारताला गरजेचा आहे.
वरुण चक्रवर्ती नसताना कोण ही दजबाबदारी स्वीकारणार हा प्रश्न नेहमीच उपस्थित होतो. या सर्वावर चोख उत्तर म्हणजे ऑलराऊंडर. पण भारतासमोर हाही एक प्रश्नच आहे.
कोणाची जागा कोण घेणार?
भारतानं 2024 आणि 2026 मध्ये टी ट्वेंटी विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय संघातून अनेक मोठी नावं कमी झाली आहेत. रोहित, विराट यांच्याबरोबर जडेजानंही निवृत्ती घेतली. त्याचबरोबर सूर्यकुमार यादव सध्या संघात नाही. तसंच हार्दिक आणि बुमरा हेही किती दिवस टी 20 खेळणार हे स्पष्ट नाही.
या सर्वाचा विचार करता यांच्या जागी तेवढ्याच भरवशाचे पर्याय तयार होणं गरजेचं आहे. चांगली कामगिरी करण्याची क्षमता असलेले अनेक क्रिकेटपटू आहेत. पण योग्यवेळी जबाबदारी खांद्यावर घेत संघाला विजयापर्यंत पोहोचवण्याची कामगिरी महत्त्वाची ठरत असते.

फोटो स्रोत, Getty Images
भारताकडे सध्या अनेक चांगले फलंदाज गोलंदाज रांगेत असल्याचं दिसत असलं तरी चांगले ऑलराऊंडर ही सध्या तरी अडचणीचीच बाब दिसत आहे. अक्षर पटेल, शिवम दुबे आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्यातून भारत सध्या त्या कायमस्वरुपी दोन ऑलराऊंडरच्या शोधात असल्याचं दिसतं.
पण त्यांच्याकडून अद्याप म्हणावी तशी कामगिरी पाहायला मिळालेली नाही. गोलंदाजीचा विचार करता बुमरानंतर कोण या प्रश्नाला उत्तर मिळणं हे जवळजवळ अशक्य आहे. पण तसं असलं तरी वेगवेगळ्या पर्यायांच्या माध्यमातून भारतीय संघ सध्या हा शोध घेत आहे.
त्यामुळं भारतीय संघाला आकार मिळण्यासाठी कोणाची जागा कोण घेणार?या प्रश्नाचं उत्तर संघ व्यवस्थापनाला सर्वात आधी शोधावं लागणार यात शंका नाही.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

























