भर विधानसभेत जयललिता यांची साडी ओढली होती? काय घडलं होतं?

    • Author, मुरुगेश मडकन्नू
    • Role, बीबीसी तमिळ प्रतिनिधी
  • Published

गेल्या काही दिवसांपासून भूतकाळातल्या एका घटनेनं तामिळनाडूच्या राजकारणात वादळ निर्माण झालं आहे. ही घटना माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्यासोबत 1989 मध्ये विधानसभेत घडली होती.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी त्याचा संसदेत उल्लेख केल्यावर सुरू झालेला गदारोळ अजूनही कमी झालेला नाही.

1989 मध्ये तामिळनाडूच्या विधिमंडळात नेमकं काय घडलं? जयललितांचा अपमान झाला होता का?

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारविरोधात विरोधी पक्षांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर बोलताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण म्हणाल्या की, 'डीएमकेने तर विधीमंडळात जयललितांची साडी ओढली होती'.

निर्मला सीतारामण यांचे हे भाषण आणि त्यावर राजकीय पक्षांच्या प्रतिक्रिया यामुळे तामिळनाडूच्या राजकारणात सध्या खळबळ माजलेली दिसते आहे.

मणिपूरच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारविरोधात विरोधी पक्षांनी अविश्वास प्रस्तावावर चर्चा झाली. अविश्वास प्रस्तावासंदर्भात 10 ऑगस्ट रोजी झालेल्या चर्चेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण सहभागी झाल्या होत्या.

त्यावेळी डीएमकेच्या खासदार कनिमोळी यांनी महाभारत आणि द्रौपदीबद्दल भाष्य केले.

यावर बोलताना निर्मला सीतारमण म्हणाल्या की, “25 मार्च 1989 रोजी घडलेला एक प्रसंगाची मी इथं आठवण करू देते. जयललिता तामिळनाडू विधानसभेत विरोधी पक्षनेत्या असताना त्यांची साडी ओढण्यात आली होती. तेथील द्रमुक सदस्यांनी जयललिता यांच्यावर असभ्य टीका केली आणि त्यांच्यावर हसले.”

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी हिंदुस्थान टाईम्स या इंग्रजी माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत निर्मला सीतारामण यांच्या टीकेला उत्तर दिले.

ते जयललितांनी रंगवलेलं नाटक होतं का?

त्या मुलाखतीत स्टॅलिन यांनी निर्मला सीतारमण यांच्या विधानावर टीका केली.

“निर्मला सीतारमण काही व्हॉट्सअॅप मेसेज वाचून असं बोलल्या असतील. तमिळनाडू विधानसभेत अशी कोणतीही घटना घडली नाही. ते जयललिता यांनी रंगवलेलं नाटक होतं, हे सभागृहात उपस्थित सर्वांना माहीत होतं,” असं स्टॅलिन म्हणाले.

स्टॅलिन असंही म्हणाले की, “माजी मंत्री थिरुनावुकारासू (आता त्रिची काँग्रेसचे खासदार) यांनी आधी विधानसभेत सांगितलं होतं की, जयललिता यांनी विधानसभेत असं व्हावं याचा सराव यापूर्वी आपल्या पॉईस गार्डन इथल्या घरात केला होता. त्यावेळी ते उपस्थित होते. तेही त्यांच्या चिठ्ठीत आहे. त्यामुळे तामिळनाडू विधानसभेच्या कामकाजाचा चुकीचा अर्थ लावून निर्मला सीतारामन यांनी संसदेत केलेले भाषण खेदजनक आणि सभागृहाची दिशाभूल करणारे आहे.”

एआयएडीएमकेचे सरचिटणीस पलानीस्वामी यांनी मात्र स्टॅलिन यांचे दावे फेटाळले असून 1989 मध्ये जयललिता यांच्यावर विधानसभेत हल्ला झाला हे खरं असल्याचं त्यांनी सांगितलं.

“त्या दिवशी मी तिथेच होतो. हे मी माझ्या स्वतःच्या अनुभवाच्या आधारे सांगत आहे. महिला आणि विरोधी पक्षनेत्या म्हणून जयललिता यांचा अपमान झाला. करुणानिधी यांच्या उपस्थितीत हा सगळा प्रकार घडला,” असं पलानीस्वामी यांनी म्हटलं.

याचप्रमाणे तेलंगणाच्या राज्यपाल तमिलिसाई सुंदरराजन यांनीही प्रसारमाध्यमांशी बोलताना जयललिता यांच्या बाबत हा प्रकार घडला होता, असं म्हटलं.

“मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी अशी घटना कधीच घडली नाही आणि निर्मला सीतारामन व्हॉट्सअॅप मेसेज पाहिल्यानंतर त्या बोलल्या असं म्हटलं. पण जयललिता यांच्यावर विधानसभेत हल्ला झाला हे खरे आहे. स्वत:ला वाचवण्यासाठी त्या कपडे फाटलेल्या अवस्थेत विधानसभेबाहेर आल्या. मी या घटनेची साक्षीदार आहे. त्यावेळी माझे वडील कुमारी आनंदन हे उप-विरोधी पक्षनेते होते आणि मूपनार हे विरोधी पक्षनेते होते. ही घटना घडली तेव्हा सभागृहात पुस्तके फेकली गेली होती. ती दुसऱ्यांवर पडू नये यासाठी प्रयत्न करताना माझ्या वडिलांचा हात तुटला. तामिळनाडू विधानसभेतील ही घटना दुर्दैवी होती. एक महिला नेत्या म्हणून आम्हाला खेद वाटावा अशी ही घटना होती,” असं त्या म्हणाल्या.

जेव्हा डीएमके 13 वर्षांनंतर सत्तेत आली

एमजीआर यांच्या निधनानंतर एआयएडीएमकेचे जयललिता यांची टीम आणि जानकी यांची टीम असे दोन तुकडे झाले.

1989 च्या विधानसभा निवडणुकीत डीएमके आघाडीने 150 जागा जिंकून सत्ता मिळवली.

एआयएडीएमके आघाडी (जयललिता यांच्या टीमने) 27 जागा जिंकल्या. काँग्रेसपक्षाने 26 आणि एआयएडीएमके आघाडी (जानकी टीम) 2 जागा जिंकल्या. डीएमकेने बहुमताने विजय मिळवला आणि तब्बल 13 वर्षांनंतर पुन्हा सत्ता मिळवली.

करुणानिधी यांनी तिसऱ्यांदा तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतली. अर्थमंत्रालयही त्यांच्या नियंत्रणाखाली होते. तसेच 25 मार्च 1989 रोजी बजेट सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला.

जयललिता यांच्या राजीनाम्यामुळे खळबळ उडाली

दरम्यान, त्या काळात जयललिता प्रचंड तणावाखाली होत्या आणि राजीनामा देण्याच्या मार्गावर असल्याचे बोलले जात होते.

बीबीसी तमिळशी बोलताना मत ज्येष्ठ पत्रकार कल्याण अरुण यांनी सांगितलं की, "जयललिता यांच्या गटाला 1989 च्या निवडणुकीत फक्त 27 जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे जयललिता यांच्यावर ताण आला.”

त्यामुळे जयललिता यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देण्याचे पत्र लिहिल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.

“परंतु, त्यांनी ते पत्र विधानसभेला पाठवले नाही. दरम्यान, निवडणुकीत तिकीट खरेदी करून फसवणूक केल्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी नटराजन यांच्या घरावर छापा टाकला. जयललिता यांचे राजीनामा पत्र प्राप्त होऊन ते पत्र विधानसभा अध्यक्ष तमीळ गुदिमाकन यांच्याकडे गेले. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी जयललिता यांचा राजीनामा स्वीकारणार असल्याचे जाहीर केले. यामुळे जयललिता संतापल्या. या घटनेचा निषेध करण्यासाठी त्यांनी चेपॉक येथे सभाही घेतली. विधानसभा अध्यक्षांच्या हातात राजीनामा देण्यामागे करुणानिधींचा हात आहे, असं त्यांना वाटत होतं,” असं कल्याण अरुण सांगतात.

25 मार्च 1989 रोजी विधानसभेत काय घडलं होतं?

कल्याण अरुण यांनी त्या दिवशी झालेला प्रकार सांगितला.

“करुणानिधी यांनी 25 मार्च रोजी विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर एआयएडीएमकेच्या वतीने आवाज झाला. एखाद्या गुन्हेगाराने अर्थसंकल्प सादर करू नये, असे जयललिता म्हणाल्या. तेव्हा करुणानिधी यांनी एक शब्द उच्चारला. यामुळे संतापलेल्या सेनगोट्टयन यांच्यासह एआयएडीएमकेच्या सदस्यांनी त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

सेनगोट्टयन यांनी हात झटकताच करुणानिधी यांचा चष्मा खाली पडला. यामुळे संतापलेल्या डीएमकेने एआयएडीएमकेवर हल्लाबोल केला. त्यांनी बजेटचे बंडल घेऊन फेकून दिले,” असं कल्याण अरुण यांनी सांगितलं.

कल्याण अरुण पुढे सांगतात की, “अर्थसंकल्पाच्या बंडलांचा फटका जयललिता यांना बसला आणि थिरुनावुक्करसर आणि केकेएसएसआर यांनी त्यांना घेरले जेणेकरून त्यांच्यावर आणखी हल्ला होऊ नये. त्यामुळं सर्व फटके दोघांवरही पडले.

डीएमकेच्या वतीने के. सी. मणी यांनी अर्थसंकल्पीय भाषण वाचण्यासाठी टेबलावर ठेवलेली छोटी खुर्ची घेऊन जयललिता यांच्यावर ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दुराई मुरुगन यांनी को.सी.मणी यांना धडक दिली आणि खुर्ची खाली पडली. याच दरम्यान जयललिता यांची साडी दुराईमुरुगन यांच्या हातात पडली आणि त्यांची साडी फाटली. या घटनेनंतर जयललिता यांना सभागृहातून सुखरूप बाहेर आणणाऱ्या अण्णाद्रमुकच्या सदस्यांनी त्यांना देवकी रुग्णालयात दाखल केले.”

या घटनेच्या वेळी विधानसभेत असलेले आणखी एक ज्येष्ठ पत्रकार थिरुनावुकरस यांनीही जयललिता यांच्यावर हल्ला झाल्याचं म्हटलं आहे.

तिरुनावुकारसू सांगतात की, “जेव्हा करुणानिधी यांनी अर्थसंकल्पीय भाषण वाचायला सुरुवात केली तेव्हा जयललिता यांनी त्यांना विचारले की राजीनामा पत्र तुमच्याकडे कोणी आणले आणि जयललिता यांनी करुणानिधींना त्यांच्या प्रश्नाचे उत्तर देण्यास सांगितले आणि नंतरच अर्थसंकल्प वाचा असं सांगितलं.

मात्र, करुणानिधी एक शब्द बोलले आणि मग अर्थसंकल्प वाचायला सुरुवात केली. एआयएडीएमकेने करुणानिधी यांचे अर्थसंकल्पीय भाषण हिसकावून घेतले, त्यामुळे त्यांचा चष्मा चुकून पडला. यामुळे संतापलेल्या डीएमकेच्या सदस्यांनी मध्येच टेबलावर चढून त्यांच्यावर सर्वतोपरी हल्ला चढवला. त्यावेळी जयललिता यांच्यावरही हल्ला झाला होता. तिची साडीही ओढण्यात आली होती."

तामिळनाडूच्या मुख्यमंत्री झाल्यावर जयललिता यांनी 25 मार्च 2003 रोजी विधानसभेत भाषण केले, तेव्हा त्या म्हणाल्या, "दुराईमुरुगन, वीरपंडी अरुमुगम आणि डीएमकेच्या इतर मंत्र्यांनी माझी साडी ओढली आणि सभागृहात मला मारहाण केली. 1991 पर्यंत मी सभागृहात आले नाही, कारण त्यावेळी मला सुरक्षा नव्हती.”

यावर उत्तर देताना दुराई मुरुगन म्हणाले की, त्यावेळी जयललिता यांच्या बाजूने असलेले थिरुनावुक्करसर यांनी अशी कोणतीही घटना घडली नसल्याचे सांगितले होते.

त्याचप्रमाणे जयललिता यांच्या सांगण्यवरुन एआयएडीएमकेने त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, असा करुणानिधी यांनी नंतर दावा केला होता.

तत्कालीन विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे विद्यमान खासदार थिरुनावुक्करसर यांनी बीबीसी तमिळशी या विषयावर संवाद साधला.

“त्यावेळी जयललिता यांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावरून खळबळजनक वातावरण निर्माण झाले होते. अर्थसंकल्प सादर करण्याच्या दिवशी सकाळी जयललिता यांच्या बोइस गार्डन येथील निवासस्थानी एडीएमकेच्या आमदारांची बैठक झाली. त्यानंतर करुणानिधी यांना अर्थसंकल्पीय भाषण वाचू न देण्याचा निर्णय घेण्यात आला. शक्य असल्यास त्याच्या हातातील बजेट बुक जप्त करावे, असेही सांगण्यात आले. पण हे कोण करणार हे ठरलं नाही," असं थिरुनावुक्करसर यांनी सांगितलं.

ते पुढे सांगतात की, “काहीतरी अनुचित प्रकार घडणार आहे, याची आधीच कल्पना असल्याने करुणानिधी यांनी टेबलाच्यावर एका छोट्या टेबलावर अर्थसंकल्प वाचला. यानंतर जयललिता यांनी अर्थसंकल्प वाचू नका असे सांगितले आणि ते अर्थसंकल्प वाचत राहिले. यानंतर वाद झाला. तेव्हा एआयएडीएमकेच्या आमदारांपैकी करुणानिधी यांचे अर्थसंकल्पीय भाषण खेचण्यासाठी कोणीतरी आवाज केला. यात करुणानिधी यांचा चेष्मा खाली पडला,” असे थिरुनावुक्करसर यांनी सांगितले.

त्यानंतर ते म्हणाले की, “करुणानिधी यांना मारहाण झाली असल्याचं वाटून, डीएमकेच्या आमदारांनी अर्थसंकल्पाचे बंडल फेकले. जयललिता यांचे केस गुंतले गेले. मी आणि केकेएसएसआर त्यांच्या रक्षणासाठी तिथे होतो. त्यानंतर आम्ही त्यांना सुखरूप बाहेर काढले.

शिवाय या घटनेदरम्यान करुणानिधी यांच्यावर हल्ला झाला नाही आणि जयललिता यांची साडी ओढली गेली नाही, असे काँग्रेसचे विद्यमान खासदार थिरुनावुक्करसर सांगतात.

हे वाचलंत का

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)