पाकिस्तानात भीषण स्फोट, मृतांचा आकडा 44 वर, 100 पेक्षा अधिक जखमी

फोटो स्रोत, Getty Images
पाकिस्तानातील बाजौर जिल्ह्यातील खार तहसील भागात झालेल्या भीषण स्फोटात किमान 44 जण ठार, तर 100 हून अधिक जण जखमी झाल्याची बातमी आहे.
रविवारी खैबर पख्तुनख्वा प्रांतात जमियत उलेमा-ए-इस्लाम (फझल) ने आयोजित केलेल्या कार्यकर्त्यांच्या संमेलनात हा स्फोट झाला.
पोलिसांनी बीबीसीला सांगितलं की, त्यांना पुरावे सापडले आहेत ज्यावरूनहा आत्मघाती हल्ला असण्याची शक्यता आहे.
मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. प्रशासनाने संपूर्ण परिसराची नाकेबंदी केली आहे.
बातम्यांनुसार, जमियतच्या एका प्रमुख स्थानिक नेत्याचाही या स्फोटात मृत्यू झाला आहे. मौलाना झियाउल्लाह जान असं त्याचं नाव सांगण्यात आलं आहे.
जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून काही जखमींना जवळच्या भागातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

फोटो स्रोत, EPA-EFE/REX/SHUTTERSTOCK
गंभीर जखमींना पेशावर आणण्यासाठी बाजौरला हेलिकॉप्टर पाठवण्यात आले आहे. पेशावर येथील लेडी रीडिंग रुग्णालयात जखमींवर उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे.
आतापर्यंत कोणत्याही अतिरेकी संघटनेनं या स्फोटाची जबाबदारी स्वीकारलेली नाही, तसंच पोलिसांनी स्फोटाच्या कारणाबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही.
खैबर पख्तूनख्वा प्रांताची सीमा अफगाणिस्तानला लागून आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि इतर नेत्यांनी या स्फोटाचा निषेध केला आहे.
पंतप्रधान शरीफ यांनी या प्रकरणी गृहमंत्री आणि खैबर पख्तुनख्वा सरकारकडून अहवाल मागवला आहे. या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

फोटो स्रोत, Rescue 1122
प्रत्यक्षदर्शीनं काय सांगितलं?
बाजौर जिल्ह्यातील खार तहसील परिसरात ही रॅली काढण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यात शेकडो लोक सहभागी झाले होते.
एएफपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या रॅलीत सहभागी होण्यासाठी पक्षाचे जवळपास 400 कार्यकर्ते आणि समर्थक आले होते.
या स्फोटात 24 वर्षीय सबी उल्लाहचा एक हात जखमी झाला आहे. त्याने AFP ला सांगितले की , "आम्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांची वाट पाहत होतो, तेव्हा अचानक मोठा आवाज आला. थोड्या वेळाने मी शुद्धीवर आलो तर पाहिले की मी दुसऱ्या एका माणसाच्या शेजारी पडलेलो होतो, ज्याचा हात कापला गेला होता. हवेत रक्ताचा वास येत होता."
पंतप्रधान शरीफ काय म्हणाले?
पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी या स्फोटाचा निषेध केला आहे.
ते म्हणाले की, "धर्म आणि देशाबद्दल बोलणाऱ्या लोकांना दहशतवाद्यांनी लक्ष्य केलं आहे."
"दहशतवादी हे पाकिस्तानचे शत्रू आहेत आणि आम्हाला पाकिस्तानच्या शत्रूंना संपवायचे आहे," असेही ते म्हणाले आहेत.
पंतप्रधान शरीफ यांनी या प्रकरणी गृहमंत्री राणा सनाउल्लाह आणि खैबर पख्तुनख्वा प्रांत सरकारकडून अहवाल मागवला आहे.
या घटनेतील दोषींना सोडले जाणार नाही, असे गृहमंत्री सनाउल्लाह यांनी म्हटले आहे.
ते म्हणाले की, "देशविरोधी घटकांना पाकिस्तानमध्ये अराजकता पसरवायची आहे. घटनेतील दोषींना न्याय मिळवून दिला जाईल."

फोटो स्रोत, TARIQ ZAMAN
कटाचा आरोप
जमियत उलेमा-ए-इस्लामचे सरचिटणीस आणि सिनेटर मौलाना अब्दुल गफूर हैदरी यांनी या स्फोटाचा निषेध केला आहे.
विचारपूर्वक षड्यंत्र रचून देशातील वातावरण बिघडवले जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
ते म्हणाले, “जमियत उलेमा इस्लाम हा शांततेच्या मार्गावर चालणारा पक्ष आहे. आम्ही नेहमीच शांततेच्या मार्गाचा अवलंब केला आहे."
जमियत उलेमा-ए-इस्लाम काय आहे?
जमियत उलेमा-ए-इस्लाम फझल (JUI-F) हा पाकिस्तानमधील प्रमुख राजकीय पक्ष आहे. पाकिस्तानच्या सत्ताधारी आघाडीत या पक्षाचा समावेश आहे.
पाकिस्तानमध्ये या वर्षाच्या अखेरीस निवडणुका होऊ शकतात. त्यासाठी JUI-F तयारी करत असून रविवारचा मेळावा ही त्यांच्यासाठी ताकद दाखवण्याची संधी मानली जात होती.
पक्षाचे नेते फजल उर रहमान यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्याकडे या स्फोटाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)























