स्वीडन: शाळेच्या कॅम्पसमध्ये गोळीबार, 10 जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी

फोटो स्रोत, Reuters
- Author, जोहान्ना चिशोल्म
- Role, बीबीसी न्यूज
- Published
- वाचन वेळ: 3 मिनिटे
मध्य स्वीडनमधील एका शाळेत झालेल्या गोळीबारात सुमारे 10 जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाल्याची माहिती आहे.
मृत व्यक्तींमध्ये संशयित हल्लोखोराचाही समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली. राजधानी स्टॉकहोमपासून सुमारे 200 किमी अंतरावर असलेल्या ओरेब्रू शहरात ही घटना घडली आहे.
स्वीडनचे पंतप्रधान उल्फ क्रिस्टरसन यांनी मंगळवारी (5 फेब्रुवारी) एक निवेदन जारी करत या घटनेला "हा स्वीडिश इतिहासातील सर्वांत भीषण गोळीबार" असं म्हटलं.
घटनेतील जखमी लोकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून किमान चार जणांवर शस्त्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे. घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
तसेच, या घटनेचा तपास हत्येचा प्रयत्न, जाळपोळ आणि गंभीर शस्त्रसंबंधी गुन्हा म्हणून केला जात आहे.

फोटो स्रोत, Getty Images
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित हल्लेखोराचाही मृतांमध्ये समावेश असल्याची शक्यता आहे. यापूर्वी त्याची कोणतीही नोंद पोलिसांकडे नव्हती.
या घटनेमागे हल्लेखोराचा नेमका काय हेतू होता हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही, तसेच हल्लेखोर एकटाच असल्याचंही पोलिसांनी सांगितलं.


दरम्यान, स्थानिक माध्यमांनी या घटनेत अनेकांचा मृत्यू झाल्याचं वृत्त प्रकाशित केलं होतं. त्यानंतर पोलिसांनी सुमारे 10 लोक ठार झाल्याचं सांगितलं.
पण, मृतांचा नेमका आकडा सांगणं शक्य नसल्याचंही नमूद केलं. या हल्ल्यामागे 'दहशतवादाशी संबंधित हेतू' असल्याचे कोणतेही संकेत दिसत नाही, असंही त्यांनी सांगितलं.
पोलिसांना सदर गोळीबाराच्या घटनेची माहिती स्थानिक वेळेनुसार 12 वाजून 33 (GMT 11:44) मिनिटांनी प्राप्त झाली. ही घटना रिसबर्गस्का शाळा हे एक प्रौढ शिक्षण केंद्र आहे, येथे घडली असून हे शिक्षण केंद्र अशा कॅम्पवर स्थित आहे, जेथे इतरही शाळा आहेत.
या केंद्रांत मुख्यतः ज्यांचं प्राथमिक किंवा माध्यमिक शिक्षण पूर्ण झालेलं नाही, असे लोक शिक्षण घेत असतात.

फोटो स्रोत, Getty Images
स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळच्या रुग्णालयांनी रुग्णांसाठी जागा मोकळी करण्यासाठी आपत्कालीन कक्ष आणि अतिदक्षता विभाग रिकामे केले आहेत.
ओरेब्रू विद्यापीठ रुग्णालयाने सांगितलं की, गोळीबारात जखमी झालेल्या पाच जणांवर त्यांच्या आपत्कालीन विभागात उपचार करण्यात आले. तर अन्य एक व्यक्ती, जी गोळीबारात जखमी नव्हती, तिच्यावर किरकोळ दुखापतीसाठी उपचार करण्यात आले.
उपचार घेत असलेल्या जखमींमध्ये कोणतेही मूल सामिल नाही, अशी माहिती ओरेब्रू काउंटी नगरपालिका प्रशासनाने दिली.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.


























