You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
काव्या मारन कोण आहेत, ज्या IPL लिलावामुळे चर्चेत आल्यात....
कोचीत सुरू असलेल्या इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेसाठीच्या लिलावात सनरायझर्स हैदराबादच्या काव्या मारन चर्चेत आहेत.
दरवर्षी लिलाव असला की काव्या यांची चर्चा होते. सोशल मीडियावर मीम्मना उधाण येतं. त्यांना नॅशनल क्रश असंही संबोधलं जातं.
सनरायझर्स हैदराबाद संघाची मालकी सन टीव्हीचे प्रमुख कलानिधी मारन यांच्याकडे आहे.
काव्या या कलानिधी मारन यांच्या कन्या. कलानिधी हे तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम.करुणानिधी यांचे चुलत पणतू.
काव्या यांचे काका दयानिधी मारन हे चेन्नई सेंट्रल मतदारसंघाचे खासदार आहेत.
आयपीएल लिलावात फ्रँचाईजतर्फे टेबलावर पाच ते सहा प्रतिनिधी उपस्थित असतात. यामध्ये मालक, सहमालक, प्रशिक्षक, मेन्टॉर यांचा समावेश असतो. सनरायझर्स हैदराबाद संघाच्या टेबलवर काव्या यांची उपस्थिती नेहमी चर्चेत असते.
2019 मध्ये काव्या यांचा सन टीव्हीच्या संचालक मंडळात समावेश करण्यात आला. सन टीव्ही देशातल्या अग्रगण्य टीव्ही वाहिन्यांपैकी एक आहे. तामीळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या चार भाषांमध्ये त्यांच्या टीव्ही वाहिन्या आहेत.
काव्या सनरायझर्सच्या सामन्यांनाही हजर असतात. आयपीएल लिलावात केकेआर सहमालक जुही चावला तसंच त्यांची कन्या, मुंबई इंडियन्सच्या मालक नीता अंबानी, पंजाब किंग्जच्या मालक प्रीती झिंटा या उपस्थित असतात. आज सुरू असलेल्या लिलावात मात्र सगळे फ्रँचाईज मिळून काव्या या एकच महिला उपस्थित आहेत.
काव्या यांनी चेन्नईतल्या स्टेलिया मॉरिस महाविद्यालयातून बीकॉमचं शिक्षण घेतलं. त्यानंतर सन टीव्हीतच काम केलं. न्यूयॉर्कमधल्या लियोनार्ड अँड स्टर्न स्कूल ऑफ बिझनेस या संस्थेतून एमबीएचं शिक्षण घेतलं. काव्या यांनी काव्या कॉस्मेटिक्स नावाची कंपनी सुरू केली.
यंदाच्या लिलावात सर्वाधिक पैसे सनरायझर्स हैदराबादकडे आहेत. त्यामुळे हैदराबाद जोरदार बोली लावून खेळाडूंना खरेदी करू शकत होते. हॅरी ब्रूक, मयांक अगरवाल, हेनरिच लासेन यांना मिळवण्यासाठी काव्या यांनी जोरदार बोली लावली.
सनरायझर्स हैदराबाद संघाने 2016 मध्ये जेतेपदावर नाव कोरलं होतं. डेव्हिड वॉर्नर हा त्यांचा हुकूमी एक्का होता. मात्र वॉर्नर आणि हैदराबाद संघांमध्ये वेबनाव झाला. वॉर्नरला कर्णधारपदावरून डच्चू देण्यात आला. काही सामन्यानंतर वॉर्नरला संघातूनही काढण्यात आलं. फिट असूनही वॉर्नर हॉटेलमध्ये बसून सामना बघत होता. काही दिवसांनंतर वॉर्नर डगआऊटमध्ये दिसला पण तो संघाचा भाग नव्हता. वॉर्नरच्या अनुपस्थितीत केन विल्यमसनने नेतृत्वाची धुरा सांभाळली. पण यंदा लिलावाआधी हैदराबादने केनलाही रिलीज केलं.
यामुळे हैदराबादला लिलावाच्या माध्यमातून नव्याने संघबांधणी करायची होती. याची जाणीव असलेल्या काव्या यांनी लिलावाच्या सुरुवातीला इंग्लंडचा धडाकेबाज फलंदाज हॅरी ब्रूकसाठी जोरदार मोर्चेबांधणी केली.
त्यानंतर भारताचा सलामीवीर मयांक अगरवालला आपल्याकडे वळवण्यासाठी त्यांनी जोरदार मोहीम राबवली.
लिलावात सनरायझर्स हैदराबादच्या टेबलवर दिग्गज फलंदाज ब्रायन लारा, भारताचा माजी खेळाडू हेमांग बदानी, श्रीलंकेचा महान फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन ही मंडळी आहेत. काव्या या सगळ्यांशी सल्लामसलत करुन निर्णय घेत आहेत.