You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.

Take me to the main website

अण्वस्त्रांची भाषा करणं पुतिन यांचा वेडेपणा - युक्रेन

रशिया आणि युक्रेन या दोन देशांमध्ये युद्ध संघर्ष सुरू आहे. ताज्या अपडेट्साठी हे पेज फॉलो करत राहा.

लाईव्ह कव्हरेज

  1. आज दिवसभरात काय काय घडलं?

    रशिया-युक्रेन संघर्षाचा आजचा पाचवा दिवस होता. आजही मोठ्या घडामोडी या संघर्षात घडल्या.

    आजचे आपण लाईव्ह अपडेट्स इथे थांबवत आहोत. तत्पूर्वी, आजच्या महत्वाच्या घडामोडी थोडक्यात जाणून घेऊ.

    • रशिया आणि युक्रेनच्या शिष्टमंडळांची युक्रेन-बेलारुसच्या सीमेवर बैठक सुरू झाली आहे. शस्त्रसंधीच्या मुद्द्यावर युक्रेननं या बैठकीत जोर दिलाय.
    • अण्वस्त्रांची भाषण करणं म्हणजे पुतिन यांचा वेडेपण असल्याची टीका युक्रेनचे संयुक्त राष्ट्रातील कायमस्वरूपी सदस्य सर्गेई किस्लीत्सयांनी केलीय.
    • रशिया आणि बेलारुसच्या खेळाडूंवर बंदी घालण्याची शिफारस इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी (IOC) ने इंटरनॅशनल स्पोर्ट्स फेडरेशनकडे केलीय.
    • रशियानं 36 देशांच्या हवाई वाहतुकीवर बंदी घातली आहे. ब्रिटन, स्पेन, इटली आणि कॅनडा या देशांचा या 36 देशांमध्ये समावेश असून, या देशांच्या एअरलाईन्सवर रशियानं बंदी घातलीय.
    • युक्रेनमधून आतापर्यंत 1400 भारतीयांना मायदेशात आणल्याची माहिती भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी दिली. आज पत्रकार परिषद घेऊन त्यांनी याबाबत माहिती दिली.
    • पाश्चिमात्य देशांनी लादलेल्या निर्बंधांना झेलण्यास आम्ही सक्षम असून, त्यावर लवकर मार्ग काढू, असं रशियानं म्हटलंय.
    • युक्रेनवरील 'आक्रमणा'नंतर पाश्चिमात्य देशांनी लादलेल्या निर्बंधांचा परिणाम रशियात दिसू लागलाय. रशियाच्या सेंट्रल बँकेनं व्याज दर 9.5 टक्क्यांवरून 20 टक्क्यांपर्यंत वाढवलंय.

    हे पेज आता थांबवत आहोत. 1 मार्चच्या घडामोडी पाहण्यासाठी बीबीसी मराठीच्या लाइव्ह पेजला भेट द्या.

  2. ब्रेकिंग, अण्वस्त्रांची भाषा करणं पुतिन यांचा वेडेपणा - युक्रेन

    संयुक्त राष्ट्राच्या सर्वसाधारण सभेत युक्रेनच्या कायमस्वरूपी सदस्यांनी रशियावर जोरदार टीका केलीय. अण्वस्त्रांची भाषण करणं म्हणजे पुतिन यांचा वेडेपणा असल्याची टीका युक्रेनचे संयुक्त राष्ट्रातील कायमस्वरूपी सदस्य सर्गेई किस्लीत्सयांनी केलीय.

    किस्लीत्सया म्हणाले की, जागतिक सुरक्षेला सध्या तसाच धोका आहे, जसा दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान होता.

    ते पुढे म्हणाले की, "पुतिन यांनी अण्वस्त्रांना अलर्टवर ठेवलंय. हा वेडेपणा आहे. जर ते स्वत:च मरू पाहतायेत, तर त्यांना अण्वस्त्रांची गरज नाहीय. त्यांनी तेच करायला पाहिजे, जे दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान एका व्यक्तीनं बर्लिनमध्ये केलं होतं."

    दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान सेव्हिएट सैन्य बर्लिनमध्ये दाखल झाल्यानंतर जर्मनीचा हुकूमशाह हिटलरनं बंकरमध्ये आत्महत्या केली होती.

  3. रशिया आणि बेलारुसच्या खेळाडूंवर बंदी घाला - IOC ची शिफारस

    रशिया आणि बेलारुसच्या खेळाडूंवर बंदी घालण्याची शिफारस इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी (IOC) ने इंटरनॅशनल स्पोर्ट्स फेडरेशनकडे केलीय.

    युक्रेनवर रशियानं केलेल्या आक्रमणानंतर आयओसीनं ही शिफारस केलीय.

    रशिया आणि बेलारुसचे राष्ट्रीय प्रतिक, रंग, झेंडा किंवा राष्ट्रगीताला परवानगी नसावी, असं आयओसीनं शिफारशीत म्हटलंय.

  4. रशियानं 36 देशांमध्ये एअरलाईन्सवर घातली बंदी

    रशियानं 36 देशांच्या हवाई वाहतुकीवर बंदी घातली आहे. ब्रिटन, स्पेन, इटली आणि कॅनडा या देशांचा या 36 देशांमध्ये समावेश असून, या देशांच्या एअरलाईन्सवर रशियानं बंदी घातलीय.

    युरोपियन युनियनने त्यांच्या हवाई क्षेत्रात रशियाच्या विमानांना वाहतुकीस मनाई केल्यानंतर रशियानं हा निर्णय घेतला.

    ब्रिटनने एअरोफ्लोट विमानांना त्यांच्या धरतीवर उतरण्यास मनाई केली होती. त्यानंतर उत्तरादाखल ब्रिटिश एअरलाईन्सवर रशियानं बंदी आणली.

  5. व्हाईट हाऊसबाहेर पुतिन यांच्याविरोधात निदर्शनं

    अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टनस्थित व्हाईट हाऊसच्या बाहेर मोठ्या संख्येत आंदोलक गोळा झाले असून, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याविरोधात ते निदर्शनं करत आहेत.

    यातील अनेक लोकांनी यु्क्रेनचा झेंडा हाती घेतला आहे आणि पुतिन यांच्याविरोधात घोषणा देत आहेत.

    अनेक लोक युक्रेनवासियांसाठी प्रार्थना करत असून, युक्रेनच्या समर्थनार्थ घोषणाही देत आहेत.

  6. युक्रेनमधून आतापर्यंत 1400 भारतीय मायदेशी परतले

    युक्रेनमधून आतापर्यंत 1400 भारतीयांना मायदेशात आणल्याची माहिती भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी दिली. आज पत्रकार परिषद घेऊन त्यांनी याबाबत माहिती दिली.

    बुखारेस्ट (रोमानिया) मधून चार विमानं आणि बुडापेस्ट (हंगेरी) मधून दोन विमानं भारतीयांना घेऊन मायदेशी आल्याची माहिती बागचींनी दिली.

    युक्रेनच्या शेजारील चार देशांमध्ये विशेष दूत तैनात करण्याचा निर्णयही भारतानं घेतल्याची माहिती बागचींनी दिली.

    युक्रेनमध्ये असलेल्या भारतीयांना जवळील शहरात आश्रय घेण्यास सांगितलं गेलंय, तसंच तिथं भारताची पथकं व्यवस्था करत आहेत, घाबरण्याची आवश्यकता नाही, कारण विमानं उपलब्ध करून दिली जातायेत, असंही बागची म्हणाले.

  7. आर्थिक निर्बंधांना झेलण्यास सक्षम, लवकरच मार्ग काढू - रशिया

    पाश्चिमात्य देशांनी लादलेल्या निर्बंधांना झेलण्यास आम्ही सक्षम असून, त्यावर लवकर मार्ग काढू, असं रशियानं म्हटलंय.

    रशियाचे प्रवक्ते दमित्री पेश्कोव्ह यांनी कॉन्फरन्स कॉलद्वारे पत्रकारांना सांगितलं की, पाश्चिमात्य देशांनी लादलेल्या निर्बंधांना झेलण्यासाठी रशियानं योजना तयार केलीय.

    पाश्चिमात्य देशांच्या निर्बंधांमुळे रशियाचं चलन रुबलच्या दरात कमालीची घट झालीय.

    पेश्कोव्ह यांनी म्हटलं की, रशियावरील पाश्चिमात्य देशांचे निर्बंध अत्यंत कठोर आहेत. मात्र, यामुळे होणाऱ्या नुकसानाला झेलण्यास रशिया सक्षम आहे.

    "पुतिन रशियाला आर्थिक समस्यांमधून सोडवण्याच्या दृष्टीने काम करतील. सेंट्रल बँकेचे गव्हर्नरसह प्रमुख मंत्र्यांना ते भेटली," असंही त्यांनी सांगितलं.

  8. चार लाखांहून अधिक लोकांनी युक्रेन सोडलं - संयुक्त राष्ट्र

    रशियाच्या आक्रमणानंतर चार लाख लोकांनी युक्रेन सोडल्याची माहिती संयुक्त राष्ट्रानं दिलीय. मोठ्या प्रमाणात शेजारील देशांमध्ये हे लोक युक्रेनमधून जात आहेत, असंही संयुक्त राष्ट्रानं म्हटलंय.

    संयुक्त राष्ट्राच्या यूएनएचसीआर या शरणार्थीसंबंधित यंत्रणेनं म्हटलंय की, युक्रेनमध्ये लोकांना ट्रेनमध्ये चढण्यापासून रोखलं जातंय.

    आतापर्यंत 4 लाख 22 हजार लोकांनी युक्रेनमधून शेजारी देशांमध्ये पलायन केलंय, असं यूएनएचसीआरनं म्हटलंय.

  9. रशियाविरोधात लढण्यासाठी युक्रेन कैद्यांना सोडणार

    युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्कींनी युरोपियन युनियनला आवाहन केलंय की, युक्रेनला तातडीनं सदस्यत्व द्यावं.

    झेलेन्स्की पुढे म्हणाले की, "सर्व युरोपियन लोकांसोबत राहण्याचं आमचं लक्ष्य आहे. विशेषत: समान स्तरावर राहायचंय. मला खात्री आहे की, हे शक्य आहे."

    "शस्त्र बाजूला टाकून, इथून निघून जा. तुमच्या कमांडरवर विश्वास ठेवू नका. तुमच्या प्रचारकांवर विश्वास ठेवू नका. तुमचा जीव वाचवा," असं आवाहन झेलेन्स्कींनी रशियन सैन्याला केलंय.

    तसंच, युक्रेनच्या तुरुंगात असलेल्यांना, ज्यांना युद्धाचा अनुभव आहे, त्यांना देशाच्या रक्षणासाठी सोडलं जाणार आहे, असंही युक्रेननं जाहीर केलंय.

    हा निर्णय नैतिकदृष्ट्या बरोबर नसला, तरी सुरक्षेसाठी खूप मदतीचा ठरणार असल्याचं युक्रेननं म्हटलंय.

  10. व्लादिमीर पुतिन 'न्युक्लिअर बटन' दाबतील का?

    युक्रेनमधलं युद्ध हे व्लादिमीर पुतिन यांचं युद्ध आहे. जर त्यांना त्यांची लष्करी उद्दिष्टं साध्य करण्यात यश आलं, तर सार्वभौम देश म्हणून युक्रेनचं भवितव्य हे धोक्यात आहे.

    पण जर पुतिन यांना अपयश येतंय असं चित्र निर्माण झालं आणि रशियाची मोठ्या प्रमाणावर मनुष्यहानी झाली तर ते अजूनच आक्रमक होतील. त्यावेळी 'अमुक गोष्ट पुतिन कधीही करणार नाहीत' असं खात्रीने सांगताच येणार नाही.

    ही संपूर्ण बातमी वाचण्यासाठी इथे क्लिककरा.

  11. रशियासोबत चर्चेसाठी युक्रेनचं शिष्टमंडळ बेलारुसच्या सीमेवर पोहोचलं

    रशियासोबत चर्चेसाठी युक्रेनचं शिष्टमंडळ बेलारुसच्या सीमेवर पोहोचलं आहे.

    शस्त्रसंधी लागू करणं आणि युक्रेनमधील रशियन सैनिकांना बाहेर काढणं, हे दोन मुद्दे प्रामुख्यानं युक्रेनच्या अजेंड्यावर आहेत.

    याआदी सुरक्षेच्या मुद्द्यावरून रशियासोबत चर्चा करण्यास युक्रेन धजावत नव्हता. मात्र, आता बेलारुसच्या सीमेवर दोन्ही देशांच्या शिष्टमंडळामध्ये चर्चा होत आहे.

  12. आर्थिक निर्बंधाचा परिणाम, रशियाच्या सेंट्रल बँकेनं व्याजदर वाढवल

    युक्रेनवरील 'आक्रमणा'नंतर पाश्चिमात्य देशांनी लादलेल्या निर्बंधांचा परिणाम रशियात दिसू लागलाय. रशियाच्या सेंट्रल बँकेनं व्याजदरात मोठी वाढ केलीय.

    रशियाच्या सेंट्रल बँकेनं व्याज दर 9.5 टक्क्यांवरून 20 टक्क्यांपर्यंत वाढवलंय.

    पाश्चिमात्य देशांनी निर्बंध आणल्यानं रशियाचं चलन रुबलच्या दरात घट झाली असून, महागाई वाढण्याची चिन्ह निर्माण झालीय. त्यामुळे रशियानं व्याज दर वाढवण्याचा निर्णय घेतलाय.

    तसंच, रशियाच्या अर्थमंत्रालयाच्या माहितीनुसार, रशियन सरकारनं परदेशी चलनातील महसुलातील 80 टक्के भाग विकण्याचे आदेशही दिलेत.

    रशियन अर्थव्यवस्था बाहेरील परिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात बदललीय, असं सेंट्रल बँकेनं म्हटलंय.

  13. युक्रेन-रशिया शांतता चर्चेसाठी तय्यार-बेलारुस

    युक्रेन आणि रशिया यांच्यातील शांतता चर्चेसाठी व्यासपाठी सज्ज असल्याचं बेलारुसने म्हटलं आहे. रशियाने पाच दिवसांपूर्वी युक्रेनवर हल्ला केला.

    शांतता चर्चेसाठी युक्रेन आणि बेलारुसच्या सीमेजवळ एक जागा सज्ज करण्यात आली आहे. युक्रेनने याठिकाणी राजदूत पाठवण्यासाठी सहमती दर्शवली आहे.

    रशियाच्या आक्रमणाचा भाग होण्यासाठी लष्कर पाठवण्यास तय्यार आहोत असं बेलारुसचे हुकूमशहा अलेक्झांद्र लुकाशेंको यांनी स्पष्ट केलं होतं. असं असलं तरी युक्रेन रशियाशी चर्चा करण्यासाठी शिष्टमंडळ पाठवायला राजी झालं आहे.

    बेलारुसच्या परराष्ट्र मंत्रालयाने सोशल मीडियावर रशिया आणि युक्रेनचे ध्वज असलेलं ठिकाण ट्वीट करताना म्हटलं आहे, रशिया-युक्रेन शांतता चर्चेसाठी बेलारुसमध्ये ठिकाण तयार आहे. दोन्ही देशांचं शिष्टमंडळ येणार आहेत.

    बेलारुसच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते ऐनातोली ग्लैज यांनी सांगितलं की, शिष्टमंडळ घटनास्थळी दाखल होताच चर्चेला सुरुवात होईल.

    या चर्चेतून फार काही हाती लागण्याची शक्यता नाही असं युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदोमिर झेलेन्स्की यांनी म्हटलं आहे.

    बेलारूस हे युक्रेनच्या उत्तरेकडचं राष्ट्रही एकेकाळी सोव्हिएत रशियाचा भाग होतं. तिथे अलेक्झांद्र लुकाशेंको यांची सत्ता आहे. लुकाशेंको यांचा उल्लेख अनेकदा युरोपातले अखेरचे हुकूमशहा असाही केला जातो.

    युक्रेन रशिया वादात लुकाशेंकोंनी रशियाला साथ दिली आहे, ते युक्रेनमध्ये आपलं सैन्य पाठवण्याच्या तयारीत असल्याचंही वृत्त आहे.

  14. कीव्ह शहरातला कर्फ्यू मागे; युक्रेनबाहेर पडण्यासाठी विशेष ट्रेन्सची व्यवस्था

    युक्रेनची राजधान कीव्ह शहरात कर्फ्यू मागे घेण्यात आला आहे. भारतीय विद्यार्थ्यांनी पश्चिमेकडच्या भागात जाण्यासाठी जवळच्या रेल्वे स्टेशनवर जावं असं युक्रेनमधील भारतीय दूतावासाने म्हटलं आहे.

    युक्रेनमधून बाहेर पडण्यासाठी विशेष ट्रेन्स सोडण्यात येणार असल्याचं भारतीय दूतावासाने सांगितलं.

    कर्फ्यू हटल्यामुळे लोक भूमिगत निवाऱ्यातून बाहेर पडू शकतात.

    जीवनावश्यक वस्तूंची दुकानं उघडतील. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू होईल, मात्र ट्रेन्सची संख्या कमी असेल.

    शनिवार-रविवारी कीव्ह शहराच्या बाहेरच्या भागात रशियाची क्षेपणास्त्रं आदळत होती. रशियाने कीव्ह शहराच्या मध्यभागी क्षेपणास्त्रं दागून नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. पण तो यशस्वी झाला नाही. अद्याप कीव्ह शहर युक्रेनच्या ताब्यात आहे.

    कर्फ्यू हटला असला तरी युद्ध अद्याप संपलेलं नाही असं स्थानिक प्रशासनाने म्हटलं आहे. देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात संघर्ष सुरू आहे.

  15. कीव्हमधील कर्फ्यू शिथिल, भारतीय विद्यार्थ्यांना रेल्वे स्टेशनवर जाण्याची परवानगी

    युक्रेनची राजधानी कीव्हमधील कर्फ्यू शिथिल करण्यात आला आहे. भारतीय दुतावासाने भारतीय विद्यार्थ्यांना रेल्वे स्टेशनवर जाण्याची परवानगी दिली आहे.

    रेल्वे स्टेशनवरून युक्रेनच्या पश्चिमी भागात जावे अशा सूचना भारतीय दुतावासाने विद्यार्थ्यांना दिली आहे.

    भारतीय दुतावासाने सांगितले आहे की लोकांनी सुरक्षितस्थळी जावे यासाठी विशेष रेल्वे गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.

  16. रशियाचा सैनिक आणि युक्रेनच्या आजी आमनेसामने येतात तेव्हा...

    जेव्हा परकीय सैन्य तुमच्या भूमीवर हल्ला करतं, तुमच्या शहरात घुसतं, तेव्हा नागरिक म्हणून तुम्हाला परकीय सैनिकांचा राग येणं स्वाभाविक आहे.

  17. युक्रेनवासीयांनी एका कॉमेडियनकडून ठेवलेय उज्वल भविष्याची आशा- बोलसोनारो

    ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांनी उडवली युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांची खिल्ली ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जेर बोलसोनारो यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होल्दिमीर झेलेन्स्की यांची खिल्ली उडवली आहे.

    युक्रेनच्या लोकांनी एका कॉमेडियनकडून आपल्या उज्ज्वल भवितव्याची आशा ठेवली आहे असं बोलसोनारो यांनी म्हटलं आहे.

    बोलसोनारो यांनी रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याचा निषेध करण्यास नकार दिला. रशिया-युक्रेन संघर्षात तटस्थ राहणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. ब्राझील आणि रशिया भाऊभाऊ आहेत असंही ते म्हणाले. पण आम्ही कोणाची बाजू घेणार नाही, आम्ही तटस्थच राहू, जी मदत करता येईल ती करू असं ते म्हणाले.

    युक्रेनच्या लोकसंख्येपैकी एक मोठा वर्ग रशियन भाषा बोलतो. रविवारी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी दोन तास चर्चा केल्याचा दावा बोलसोनारो यांनी केला. मात्र ही भेट म्हणजे गेल्या महिन्यात बोलसोनारो आणि पुतिन भेटले होते ती असल्याचं ब्राझीलच्या परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्ट केलं.

  18. चार केंद्रीय मंत्री युक्रेनच्या शेजारी देशात जाणार

    युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांची सुटका करण्यासाठी आखण्यात आलेल्या ऑपरेशन गंगा मोहिमेच्या समन्वयासाठी चार केंद्रीय मंत्री युक्रेनच्या शेजारी देशांमध्ये जाणार आहेत.

    आतापर्यंत रोमानिया आणि पोलंड इथून भारतीय विद्यार्थी मायदेशी रवाना झाले आहेत.

    हरदीप सिंग पुरी, ज्योतिरादित्य सिंदिया, किरण रिजीजू आणि जनरल व्ही.के.सिंग हे केंद्रीय मंत्री ऑपरेशन गंगा मोहिमेत समन्वय असावा यासाठी रवाना होत आहेत.

    ज्योतिरादित्य सिंदिया रोमानिया-मोल्दोव्हाला, किरण रीजिजू स्लोव्हाकियाला, हरदीप सिंग पुरी हंगेरीला तर व्ही.के.सिंग पोलंडला जाणार आहेत.

    युक्रेन-रशिया युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात उच्चस्तरीय बैठक झाली. दोन तास चाललेल्या या बैठकीत युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा आढावा घेण्यात आला.

  19. पृथ्वीवरील सगळ्यांत धोकादायक जागा

    रशियाच्या सैन्यानं युक्रेनमधील चेर्नोबिल अणुभट्टीवर ताबा मिळवला आहे. 1986 मध्ये घडलेल्या अपघातानंतर आजपर्यंत याठिकाणी किरणोत्सर्ग कायम असल्याचं सांगितलं जातं.

    त्यामुळं या परिसरातील संघर्षामुळं आंतरराष्ट्रीय आण्विक घडामोडींवर लक्ष ठेऊन असलेल्या संस्थांनी काळजी व्यक्त केली आहे.

    हा परिसर आता सुरक्षित आहे किंवा नाही हे सांगणं आता कठीण असल्याचं युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचे सल्लागार मिखायलो पोडोल्याक यांनी म्हटलं आहे. तीव्र संघर्षानंतर युक्रेननं याठिकाणचा ताबा गमावल्याचं ते म्हणाले.

  20. बेलारुसचं सैन्यही युद्धात उतरणार?

    रशियाचा सहकारी देश असलेला बेलारुस आता युक्रेनमध्ये फौजा पाठवणार असल्याचं वृत्त समोर येतं आहे. वॉशिंग्टन पोस्ट यांनी निनावी अमेरिकेच्या अधिकाऱ्याच्या हवाल्याने हे वृत्त दिलं आहे.

    या बातमीतील तथ्याची शहानिशा करण्यासाठी बीबीसीने व्हाईट हाऊस आणि पेंटॉगॉनला संपर्क केला आहे.

    द कीव्ह इंडिपेडंटने बहुविध स्रोतांच्या आधारे दिलेल्या बातमीनुसार बेलारुसचे पॅराट्रूपर्स युक्रेनमध्ये दाखल होणार असल्याचं वृत्त दिलं आहे.

    बेलारुस हा प्रदीर्घकाळापासूनर रशियाचा मित्रराष्ट्र राहिला आहे. बिगरआण्विकधारी असल्याचं बेलारुसने रविवारी जाहीर केलं. यामुळे रशियाला आण्विक अस्त्रांचं आगार तसेच प्रक्षेपणासाठी युद्धभूमी म्हणून बेलारुसची भूमी वापरता येईल.

    दरम्यान बेलारुसचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर ल्युकाशेन्को यांनी युक्रेनमध्ये फौजा पाठवणार नसल्याचं युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होल्दिमिर झेलेन्स्की यांनी म्हटलं आहे.