आज दिवसभरात काय काय घडलं?
युक्रेन-रशिया संघर्षाचा आज चौथा दिवस होता. आजही बऱ्याच घटना युक्रेनच्या भूमीवर घडल्या. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी त्यांच्या आण्विक दलाला दिलेला ‘स्पेशल अलर्ट’ आजची सर्वात मोठी घडामोड मानली जातेय.
आजचे लाईव्ह अपडेट्स आपण इथेच थांबवतोय. उद्या सकाळी नवीन अपडेट्ससह बीबीसी मराठीच्या वेबसाईटवर भेटू.
तत्पूर्वी, आज दिवसभरात काय काय घडलं, त्यावर एक नजर टाकूया.
- रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी रशियन लष्कराला आदेश दिलाय की, “आण्विक दलाला ‘स्पेशल अलर्ट’वर ठेवावं.”
- बेलारुसच्यासीमेवररशियाच्याशिष्टमंडळालाभेटण्यासतयार असल्याचे युक्रेनचेराष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी पत्रक जारी करत सांगितलं.
- खारकीव्ह शहराच्या प्रशासनप्रमुखांच्या दाव्यानुसार, युक्रेनच्या सैनिकांनी रशियाच्या सैनिकांशी लढा दिल्यानंतर, पुन्हा एकदा शहरावर युक्रेनचं नियंत्रण अबाधित ठेवलंय.
- युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्कींनी मागणी केलीय की, संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेतील रशियाचा मतदानाचा अदिकार काढून घ्यावा.
- युक्रेन-रशिया युद्ध म्हणजे व्लादिमीर पुतीन यांच्या शेवटाची सुरुवात असल्याचं ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्री लिज ट्रस यांनी म्हटलंय.
- युक्रेननं इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टीसमध्ये रशियाविरोधात अर्ज दाखल केला असून, युक्रेनवरील आक्रमणासाठी रशियाला जबाबदार ठरवलं गेलं पाहिजे, अशी मागणी त्यात राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केलीय.
- युक्रेनची राजधानी कीव्ह पासून 30 किलोमीटरवर असलेल्या वासिलकीव ऑईल टर्मिनलला रशियाच्या क्षेपणास्त्राने लक्ष्य केलं. हल्ल्यानंतर लागलेल्या आगीमुळे सगळीकडे धुराचे लोट उठल्याचं दिसतं आहे. कीव्ह शहरात नागरिकांना विषारी हवेपासून वाचण्यासाठी घरातच राहण्याचं आणि दारंखिडक्या बंद करून घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
- स्पेस एक्सचे संस्थापक एलॉन मस्क यांनी युक्रेनला मदतीचा हात दिला आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणामुळे या देशात इंटरनेट कनेक्टिव्हिटीवर परिणाम झाला आहे. मस्क यांनी स्टारलिंक सॅटलाईट ब्रॉडबँड युक्रेनमध्ये कार्यान्वित केलं आहे.
- जर्मनी 1000 अँटी टँक हत्यारं आणि 5 जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रं युक्रेनला देणार आहे.
हे पेज आता थांबवण्यात येत आहे. आजच्या ताज्या घडामोडींसाठी बीबीसी मराठीच्या लाइव्ह पेजला भेट द्या.