You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
युक्रेनमधील 219 भारतीय मुंबईत पोहोचले
युक्रेनची राजधानी कीव्हच्या रस्त्यांवर रशियन सैन्यासोबतची धुमश्चक्री सुरू झालेली आहे. काळ्या समुद्रातून कीव्हवर 2 क्षेपणास्त्रं डागण्यात आली.
लाईव्ह कव्हरेज
युक्रेन प्रकरणावर भारताची भूमिका कौतुकास्पद - रशिया
संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत युक्रेन प्रकरणावर आणलेल्या प्रस्तावावर भारतानं घेतलेली भूमिका कौतुकास्पद आहे, असं मत रशियाच्या भारतातील दूतावासानं व्यक्त केलंय.
25 फेब्रुवारीला झालेल्या सुरक्षा परिषदेत भारतानं मतदानात सहभाग घेतला नव्हता.
भारत नेटोचा सदस्य आहे का?
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनवर लष्करी कारवाई सुरू केली आहे. युक्रेनची राजधानी कीव्हपर्यंत रशियन सैन्य पोहोचलं आहे.
रशिया-युक्रेनमधील या संघर्षाचं मुख्य कारण आहे युक्रेनची नेटोमध्ये जाण्याची इच्छा. त्यादिशेने युक्रेननं पावलं उचलायला सुरूवात केल्यानंतर रशिया आणि युक्रेनमध्ये संघर्ष वाढत गेला.
ही नेटो संघटना काय आहे आणि भारत या संघटनेचा सदस्य आहे का, हे जाणून घेण्यासाठी या बातमीवर क्लिक करा.
ब्रेकिंग, युक्रेनमधील 219 भारतीयांना घेऊन पहिलं विमान मुंबईत पोहोचलं
रशिया-युक्रेन संघर्षानंतर युक्रेनमधून बाहेर पडू पाहणाऱ्या भारतीयांना घेऊन पहिलं विमान भारतात पोहोचलं आहे.
युक्रेनमधील हे भारतीय लोक युक्रेनमधून रस्तेमार्गे रोमानियात येऊन, तिथून विमानाने मुंबईत पोहोचले आहेत.
मुंबई विमानतळावर पोहोचलेल्या भारतीयांचं स्वागत केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी केलं. ते म्हणाले, "युक्रेनमधून परतलेल्या भारतीयांच्या चेहऱ्यावरील हास्य पाहून आनंद वाटला."
सर्व भारतीयांच्या सुरक्षेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सरकार काम करत आहे, असंही गोयल म्हणाले.
रशिया-युक्रेन संघर्ष : आता काय सुरू आहे?
रशियाने युक्रेनवर 'आक्रमण' केल्यानंतर मिनिटा-मिनिटाला मोठ्या घडामोडी घडतायेत. याबाबतचं विश्लेषण तुम्ही आता सुरू असलेल्या बीबीसी मराठीच्या फेसबुक लाईव्हवर पाहू शकता.
या घडामोडींची अचूक आणि ताजी माहिती, ग्राऊंड झिरोवरून वार्तांकन, या घटनेचे आपल्यावर होणारे परिणाम आणि तज्ज्ञांचं विश्लेषण इत्यादी सर्व गोष्टी आपण बीबीसी मराठीच्या या विशेष कार्यक्रमात तुम्ही पाहू शकता.
रशिया-युक्रेन संघर्षाचा पुढचा अध्याय काय असणार?
'स्विफ्ट' म्हणजे काय? 'या' नेत्यांना रशियाच्या आर्थिक नाड्या आवळता येतील?
युक्रेन रशिया युद्धाचे आपल्यावर होऊ शकणारे 5 परिणाम
जेव्हा व्लादिमीर पुतीन यांनी ताजमहाल पाहिला... पाहा 10 दुर्मिळ फोटो
निर्बंध म्हणजे काय? ते लादल्याने खरंच फरक पडतो का?
ब्रेकिंग, युक्रेनच्या राष्ट्रपतींची भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चर्चा
युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली. झेलेन्स्की यांनी ट्वीट करून याबाबत माहिती दिली.
रशियाच्या घुसखोरीबाबात मोदींना माहिती दिल्याचं झेलेन्स्कींनी सांगितलं.
रशियाचे एक लाखांहून अधिक सैनिक युक्रेनच्या धरतीवर आल्याचं झेलेन्स्की म्हणाले.
संयुक्त राष्ट्राच्या सिक्युरिटी काऊन्सिलमध्ये राजकीय पाठिंबा द्यावा, अशी विनंतीही झेलेन्स्की यांनी नरेंद्र मोदींना केलीय.
मला पकडण्याचा रशियाचा डाव फसला - युक्रेनचे राष्ट्रपती
युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी आज नवीन व्हीडिओ जारी करत म्हटलं की, "मला पकडण्याचा रशियाचा डाव फसला आहे."
"युक्रेनच्या लष्कराचा कीव्ह आणि आजूबाजूच्या परिसरावर पूर्ण नियंत्रण आहे. युक्रेनच्या प्रत्येक शहरात रशियाच्या सैनिकांना उत्तर दिले जात आहे," असं झएलेन्स्की म्हणाले.
या व्हीडिओतून झेलेन्स्की यांनी रशियन जनतेलाही आवाहन करत म्हटलं की, युक्रेनवरील हल्ला थांबवण्यासाठी तुम्ही तुमच्या राष्ट्राध्यक्षावर दबाव आणावा.
झेलेन्स्की यांच्या आवाहनातील काही भाग रशियन भाषेतही आहे. त्यात ते म्हणतात, "हजारो पीडित, शेकडो कैद्यांना हे कळत नाहीय की, त्यांना युक्रेनमध्ये का पाठवलं गेलंय. त्यांना इथं मरण्यासाठी आणि मारण्यासाठी पाठवलं गेलंय. जेवढ्या लवकर तुम्ही तुमच्या सरकारला लढाई बंद करायला सांगाल, तेवढेच तुमचे लोक जिवंत राहू शकतील."
झेलेन्स्की यांनी कीव्हमधील रस्त्यावर चालताना हा व्हीडिओ शूट केला आहे आणि ट्विटरवर पोस्ट केलाय.
युक्रेनच्या ज्या 2 प्रांतात संघर्ष सुरू झालाय ते नेमके कसे आहेत?
रशिया-युक्रेन संघर्ष : पुढे काय होणार? - ट्विटर स्पेस
रशियाने युक्रेनवर ‘आक्रमण’ केल्यानंतर जागतिक स्तरावर वेगवान घडामोडी घडत आहेत. याचा भारतावर आणि जगावर काय परिणाम होईल? याबाबत बीबीसी मराठीनं 25 फेब्रुवारी रोजी ट्विटर स्पेस आयोजित केली होती.
यात परराष्ट्र धोरणं, आंतरराष्ट्र राजकारण या विषयातील जाणकार तन्वी कुलकर्णी आणि रश्मिनी कोपरकर यांच्याशी बीबीसी मराठीनं चर्चा केली.
युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकलेला नागपूरचा पवन असा पडला बाहेर...
रशिया-युक्रेन संघर्षाचं कारण ठरलेल्या नेटोचा भारत सदस्य आहे का?
ब्रेकिंग, रशियाच्या हल्ल्यात आतापर्यंत 198 लोकांचा मृत्यू - युक्रेन
रशियाच्या हल्ल्यात आतापर्यंत युक्रेनच्या 198 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती युक्रेन सरकारनं दिलीय. मृतांमध्ये तीन लहान मुलांचाही समावेश आहे.
युक्रेनचे आरोग्यमंत्री व्हिक्टर ल्याशको यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करत सांगितलं की, "आतापर्यंत 1,115 नागरिक जखमी झाले आहेत. यात 33 लहान मुलं आहेत."
याआधी युक्रेननं दावा केला होता की, युक्रेनच्या लष्करानं रशियाच्या 3,500 सैनिकांना मारलं आहे आणि 200 सैनिकांना बंदी बनवलं आहे.
रशिया आतापर्यंत 14 एअरक्राफ्ट, 8 हेलिकॉप्टर आणि 102 टँक गमावून बसलाय, अशीही माहिती युक्रेनच्या लष्करानं दिलीय.
दरम्यान, या सर्व माहितीची बीबीसी स्वतंत्रपणे पडताळणी करू शकली नाहीय.
रशियानं युक्रेनच्या या दाव्याबाबत काहीच स्पष्टीकरण दिलं नाहीय.
भारताशिवाय चीन आणि युएईनेही या ठरावावर मतदान करणं टाळलंय
मराठी विद्यार्थ्यांसह 500 भारतीय युक्रेनबाहेर पडले
मराठी विद्यार्थ्यांसह 500 भारतीयांना युक्रेनबाहेर पडण्यात यश आलं आहे. त्यांच्यासाठी केंद्र सरकारकडून विमानाचीही सोय करण्यात आली आहे.
थोड्याच वेळात सर्वांना घेऊन हे विमान भारताच्या दिशेने रवाना होणार आहे, अशी माहिती युक्रेनमध्ये शिक्षण घेत असलेल्या पवन मेश्राम या विद्यार्थ्याने दिली.
काही तासांपूर्वी युक्रेनमध्ये युद्ध याचि देही याचि डोळा अनुभवलेला नागपूरचा पवन मेश्राम इव्हानो फ्रँकव्हिस्क शहरातून निघाला.
500 जणांची तुकडी रस्तेमार्गाने रोमानियात दाखल झाली. जेवणाची व्यवस्था त्यांनी स्वत:च केली. गाडीवर भारताचा झेंडा लावण्याची सूचना युक्रेनमधील भारतीय दूतावासाने केली होती, असं त्याने सांगितलं.
भारताने रोमानियातून विमानाची व्यवस्था केली असून काही तासातच त्यांचं विमान भारतासाठी रवाना होईल. भारत सरकार या प्रवासाचा खर्च उचलणार आहे, असंही त्याने सांगितलं.
ही बातमी सविस्तर इथं वाचता येईल.
रशिया-युक्रेन संघर्ष : आता काय घडतंय? - विशेष कव्हरेज
रशियाने युक्रेनवर 'आक्रमण' केल्यानंतर मिनिटा-मिनिटाला मोठ्या घडामोडी घडतायेत.
या घडामोडींची अचूक आणि ताजी माहिती, ग्राऊंड झिरोवरून वार्तांकन, या घटनेचे आपल्यावर होणारे परिणाम आणि तज्ज्ञांचं विश्लेषण इत्यादी सर्व गोष्टी आपण बीबीसी मराठीच्या या विशेष कार्यक्रमात पाहणार आहोत.
आज रात्री 8 वाजता बीबीसी मराठीच्या युट्यूब, फेसबुक पेजवर आणि जिओ टीव्हीच्या चॅनलवरही हा कार्यक्रम पाहता येईल.