तालिबानकडून युद्ध समाप्तीची घोषणा
सध्या अफगाणिस्तानमध्ये तालिबानने सत्ता काबिज केली आहे. तालिबानच्या प्रवक्त्यांनी अल जजिराला म्हटले आहे की अफगाणिस्तानमध्ये युद्ध समाप्ती झाली आहे.
अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अश्रफ घनी यांनी अफगाणिस्तान सोडले आहे.
तालिबानचे प्रवक्ते मोहम्मद नईम यांनी म्हटले आहे की त्यांना आंतरराष्ट्रीय समुदायाबरोबर शांततापूर्ण संबंध हवे आहेत.
नईम यांनी सांगितले आहे की तालिबानकडून शरिया कायद्यानुसार महिलांचे हक्क आणि अल्पसंख्यांकांच्या अधिकारांचा सन्मान केला जाईल. तसेच अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर केला जाईल.
तालिबान कोणच्याही अंतर्गत व्यवहारांकडे लक्ष देणार नाही पण त्याच बरोबर अफगाणिस्तानच्या अंतर्गत व्यवहारांमध्ये देखील कुणी हस्तक्षेप करू नये.
गेल्या 20 वर्षांपासून सुरू असलेल्या आमच्या प्रयत्नांना यश आले आहे असे नईम म्हणाले. आम्हाला आमच्या देशाचे आणि येथील लोकांचे स्वातंत्र्य हवे आहे.
कुणाला लक्ष्य करण्यासाठी आम्ही आमच्या जमिनीचा वापर होऊ देणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.